पॉल, एम्. पी.: (१ मे १९०४ – १२ जुलै १९५२). प्रसिध्द मल्याळम् समीक्षक. जन्म एर्नाकुलम् जिल्ह्यातील पुत्तनपळ्ळी या गावी एका मध्यमवर्गिय कुटुंबात. त्यांचे शालेय शिक्षण एर्नाकुलम् आणि त्रिचूर येथे झाले. त्रिचनापल्ली येथील सेंट जोसेफस महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. पुढे एम्. ए आणि एफ्. एल्. ह्या पदव्याही त्यांनी संपादन केल्या.

निरनिराळ्या महाविद्याल्यांतून सु. १० वर्षे त्यांनी अध्यापन केले. पुढे त्यांनी स्वत:च्या नावाने एक शैक्षणिक महाविद्यालय स्थापन केले. अनेक साहित्यिक नियतकालिकेही सुरू केली.

मल्याळम् साहित्यात १९३० च्या सुमारास जी क्रांतिकारक चळवळ सुरू झाली, तिच्या संघटकांपैकी पॉल हे एक होत. ह्या चळवळीचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ त्यांनी काम केले. पण विचारस्वतंत्र्य त्यांच्या रक्तात भिनलेले होते आणि चळवळीचा साचेबंदपणा त्यांना मानवण्यासारखा नव्हता. त्यामुळे ह्या चळवळीशी असलेला संबंध त्यांना तोडावा लागला.    

पॉल यांची ग्रंथसंपदा संख्येने जरी कमी असली, तरी गुणवत्तेच्या आणि मौलिकतेच्या दृष्टीने ती मोठी आहे. लुब्धन् (१९५३-मोल्येरच्या मायझर नाट्यकृतीचा अनुवाद) ही अनुवादीत नाट्यकृती वगळता त्यांचे उर्वरित सर्व ग्रंथ साहित्यसमीक्षापर आहेत. 

त्यांचे नोवल साहित्यम् (१९३०) आणि चेरूकथाप्रस्थानम् (१९३२) हे दोन समीक्षाग्रंथ चिकित्सक स्वरूपाचे असून त्यामध्ये अनुक्रमे मल्याळम् कादंबरी आणि लघुकथा यांच्या प्रमुख तत्त्वांचे सोदाहरण विवेचन आहे. ह्या प्रकारच्या समीक्षेचे ते मल्याळममधील आद्य प्रवर्तक ठरतात. पाश्चिमात्य साहित्यसमीक्षेतील तत्त्वे त्यांनी मल्याळम् कादंबरी लघुकथा यांना लावून दाखविली. त्या काळात दोन्हीही साहित्यप्रकार पाश्चमात्त्य साहित्याच्या प्रभावाखाली होते, त्यामुळे त्यांची ही समीक्षा उदबोधक तसेच कालोचितही ठरते. 

गद्यगतीमध्ये मल्याळम् गद्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेऊन त्याच्या विकासाचे दिग्दर्शन केलेले आहे.सौंदर्यनिरीक्षणम् (१९४७) हा सौंदर्यशास्त्रावरील एक लहानसा विवेचक ग्रंथ असून ‘सौंदर्य हे वस्तूनिष्ठ की व्याक्तीनिष्ठ’ हा विवाद्य प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी यातील एका निबंधात केला आहे. सौंदर्याचा आस्वाद घेणार्‍या व्याक्तीत एक मूलभूत शक्ती असते. ती व्याक्ती जेव्हा एखादी वस्तू सुंदर आहे, असा निर्णय घेते, तेव्हा तो या शक्तीद्वाराच घेतलेला असतो परंतु हा सौंदर्यानुभव शब्दांत पकडता येण्यासारखा नाही. साहित्यविचारम् (१९५३) मधील निबंधात मल्याळम् काव्यावरील समीक्षा असून मूलभूत काव्यप्रेरणांचा शोध त्यांनी ह्या ग्रंथात घेतला आहे. काव्यदर्शनम् ह्या ग्रंथामध्येही काव्यशास्त्रावरील काही समीक्षात्मक निबंध संगृहीत असून एक रहस्यकथाही आहे.

पॉल यांची भाषाशैली स्वातंत्र्य, साधी पण प्रभावी आहे. विचारांतील नि:संदिग्धता ह्या त्यांच्या समीक्षेचा गुणविशेष होय. त्यांच्या लेखनात ताजेपणा आणि नाविन्य आढळते. कोणत्याही मळवाटेचा त्यांनी अवलंब केलाला आढळत नाही. त्यांच्या काही कल्पना इंग्रजी साहित्यातील असल्या, तरी त्या अतिशय सहजतेने आणि प्रभावी रीतिने मल्याळममध्ये आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. समीक्षक म्हणून त्यांना मल्याळम् साहित्यात मानाचे स्थान आहे.

भास्करन्,टी. (इं.) ब्रह्मो, माधुरी (म.)