एळुत्तच्छन : (सु. सोळावे शतक). प्रख्यात मलयाळम् संतकवी. संपूर्ण नाव तुंचत्तू रामानुज एळुत्तच्छन. जन्म केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यातील तृकंडियुर या गावी नायर कुटुंबात झाल्याचे सांगतात. तथापि त्याचे संपूर्ण नाव व जीवनवृत्तांत यांविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. 

अध्यात्मरामायणम्  हा त्याचा अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय काव्यग्रंथ. भाषाअध्यात्मरामायणम्  असेही त्याचे नाव रूढ आहे. आजही केरळमध्ये या ग्रंथाचे मोठ्या भक्तिभावाने घरोघर पारायण केले जाते. वाल्मीकि रामायणाच्या स्वैर अनुवादातही एळुत्तच्छनची स्वतंत्र प्रतिभा दिसते. महाभारताचाही त्याने मलयाळम्‌मध्ये भारतम्  नावाने संक्षिप्त अनुवाद केला. त्यात कृष्णभक्तिला प्राधान्य दिलेले आहे. यांशिवाय भागवतम्, उत्तररामायणम्,हरिनामकीर्तनम्, चिंतारत्‍नम्  इ. काव्यग्रंथही त्याने लिहिले. तथापि त्यांतील शेवटच्या दोन ग्रंथांच्या कर्तृत्त्वासंबंधी अभ्यासकांत मतभेद आहेत.

संस्कृत, तमिळ व तेलुगु ह्या भाषांवरही त्याचे चांगले प्रभुत्व होते. त्याने आपले सर्वच काव्यग्रंथ ‘किळिपाट्‍टु’ (‘किळि’ म्हणजे पोपट आणि ‘पाट्‍टु’ म्हणजे गाणे. पोपटाच्या मुखाने कथा वदविणे) नावाच्या काव्यप्रकारात लिहिले आहेत. अलंकृत व लालित्यपूर्ण भाषा, आकर्षक वर्णनशैली, उठावदार व्यक्तिचित्रण व उत्कट रसपरिपोष यांमुळे त्याचे ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ठरले. त्याचा प्रभाव नंतरच्या अनेक कवींवर दिसतो. मलयाळम् भाषा समृद्ध करण्याचे त्याचे कार्य ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.

संदर्भ : 1. Chelant, Achyuta, Ezhuttaccan and His Age, Madras, 1940.

     2. Menon, C. A. Eluttaccan and His Age, 1940.

नायर, एस्. के. (इं.) कापडी, सुलभा (म.)