केरळवर्मा, वलियकोयिल तंपुरान: ( ? १८४५–? १९१४). प्रख्यात मलयाळम् कवी व संस्कृत पंडित. ‘साहित्यसम्राट’ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. शालेय गद्य व पद्य पाठ्यपुस्तके त्यांनीच तयार करवून घेतली. ते प्रतिभासंपन्न कवी तसेच संस्कृत व मलयाळम् भाषेचे गाढे विद्वान होते. अनेक मलयाळम् कवींना व लेखकांना त्यांनी उदार आश्रय देऊन त्यांच्या साहित्य निर्मितीस उत्तेजन दिले. त्यांनी संस्कृतमध्ये सु. २९ व मलयाळम्‌मध्ये सु. ३२ गद्य-पद्य ग्रंथ लिहिले. मलयाळम् मधील त्यांचे सर्वोत्कृष्ट काव्य मयूर संदेशम् (१८९६) हे होय. राजाने कवीस नजरकैदेत ठेवल्यामुळे त्याची व त्याच्या पत्नीची ताटातूट झाली, ह्या कविजीवनातील प्रत्यक्ष घटनेवर हे काव्य आधारित आहे. हे काव्य त्यांनी मेघदूताच्या धर्तीवर लिहिले आहे. त्रावणकोरच्या महाराजांची पुतणी केरळ वर्मांची पत्नी. तथापि राजाला कवीच्या निष्ठेबाबत संशय निर्माण होऊन तो त्याला नजरकैदेत ठेवतो. त्यामुळे कवीची व त्याच्या प्रिय पत्नीची ताटातूट होते. तो एका मोरामार्फत आपल्या पत्नीला संदेश पाठवितो व आपली विरहव्यथा व्यक्त करतो, अशी पार्श्वभूमी ह्या काव्यास आहे. हे काव्य त्यांनी मणिप्रवाळ शैलीत (संस्कृत व मलयाळम् शब्दांच्या संमिश्र वापराने तयार झालेली शैली) लिहिले आहे. १८८२ मध्ये त्यांनी कालिदासाच्या शाकुंतलाचे  मलयाळम् भाषांतर केले असून ते महत्त्वपूर्ण मानले जाते. मलयाळम् नाट्यलेखनाची व नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांच्या ह्या भाषांतरित नाटकापासूनच मानली जाते. व्हान लिंबर्ग ब्रूव्हर यांच्या अकबर (१८७२) या मूळ डच कादंबरीने तिच्या इंग्रजी भाषांतरावरून (१८७९) त्यांनी अकबर  नावाने मलयाळम्‌मध्ये भाषांतर (१८९४) केले असून त्यांची ही कादंबरी युगप्रवर्तक मानली जाते. 

त्यांनी संस्कृत व मलयाळम्‌मध्ये काव्य, कादंबरी, नाटक, निबंध, चरित्र इ. विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन करून मलयाळम् साहित्यातील नव्या युगाचे प्रवर्तन केले. मलयाळम् साहित्याच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य सेवाभावाने व्यतीत केले. मलयाळम् साहित्यात त्यांना विशेष मानाचे स्थान आहे.  

नायर, एस्. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)