दूरचित्रवाणी : (टेलिव्हिजन). दृश्य प्रतिमा (चल किंवा अचल) किंवा त्यांच्या द्वारे मिळणाऱ्या अवगमाचे (अथवा ज्ञानाचे) व दृश्य प्रतिमेशी संबंधित ध्वनिसंकेताचे उच्च कंप्रतेच्या (दर सेकंदास होणारी कंपनसंख्या उच्च असलेल्या) विद्युत् चुंबकीय तरंगांच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रेषण व ग्रहण.

कोणत्याही दृश्याकडे किंवा वस्तूकडे पाहिले असता डोळ्यांच्या साह्याने आपणास जे ज्ञान मिळते त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येते. (१) दृश्याच्या निरनिराळ्या घटक विभागांतून परावर्तित झालेल्या प्रकाशाची कमी अगर अधिक तीव्रता आणि त्यामुळे निर्माण होणारी प्रकाश व छाया यांची एक वैशिष्ट्यपूर्ण रचनाकृती (२) गतिमान घटक अंतर्भूत असलेल्या दृश्यांतील काही घटक स्थिर असतात तर काहींना गती असते ही वस्तुस्थिती (३) निरनिराळे रंग व त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण (४) त्रिमिती अवकाशातील वस्तूंच्या लांबी, रुंदी इ. परिमाणांविषयीच्या अथवा त्यांच्या एकमेकांपासून (किंवा बघणाऱ्यापासून) असणाऱ्या अंतराविषयीचे अंदाज.

दूरचित्रवाणीची जी पद्धत प्रथम उपयोगात आली तिच्यात पहिल्या दोन प्रकारचे ज्ञान संपादन करण्यावरच लक्ष केंद्रित केले गेले होते. छायाचित्र काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामधील भिंगाची केंद्र–खोली [→ कॅमेरा] पुरेशी असेल, तर मुख्य वस्तूच्या प्रतिमेबरोबरच या वस्तूपासून थोड्याफार अंतरावर असणाऱ्या इतर वस्तूंच्या प्रतिमासुद्धा बऱ्याचशा सुस्पष्ट मिळू शकतात. कॅमेऱ्याच्या साह्याने मिळणारे चित्र जरी द्विमितीय असले, तरी आजूबाजूच्या वस्तूंमुळे आणि त्यांच्या कमीअधिक स्पष्ट प्रतिमांमुळे त्यात त्रिमितीचा आभास निर्माण होतो. हेच तत्त्व दूरचित्रवाणीत वापरले असून त्यामध्ये द्विमितीय चित्रानेच त्रिमितीचा आभास निर्माण केला जातो. अलीकडे रंगीत दूरचित्रवाणीची प्रसार अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, फ्रान्स इ. देशांत सुरू झालेली आहे. तेव्हा दृष्टीद्वारे मिळणारे सर्व प्रकारचे ज्ञान सर्वसाधारण दूरचित्रवाणीमुळे आत प्रेषित करता येते, असे म्हणता येईल.

प्राथमिक प्रगती : मनुष्य बोलतो तेव्हा तो आपले विचार शब्दांच्या माध्यमाने प्रगट करीत असतो. या क्रियेत शब्द हे अवगमाचे वाहक असतात. आपण एखादा शब्द उच्चारतो, तेव्हा त्याचे एकापेक्षा अधिक अवयव पाडून त्यांचा विशिष्ट क्रमाने उच्चार करतो. हे अवयव त्याच विशिष्ट क्रमाने कानावर पडले असता त्यापासून साकल्याने पूर्ण अर्थबोध होतो. त्याप्रमाणे ध्वनिसंकेताचे घटकांत विभाजन व त्यांची क्रमवार मांडणी हे ध्वनिप्रेषण क्रियेमध्ये नैसर्गिक रीत्याच होत असल्यामुळे ध्वनिसंकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर व नंतर प्रेषण करणे सुलभ होते.

याउलट कोणताही मनुष्य कोठल्याही दृश्याचे निरीक्षण करतो तेव्हा त्याच्या प्रत्येक डोळ्यात असणाऱ्या भिंगाच्या योगाने त्यामागील दृक्‌पटलावर एक द्विमितीय प्रतिमा तयार होते. तेथे तिचे विद्युत् संकेतात रूपांतर होऊन कित्येक लक्ष पृथक् विद्युत् संकेत दृक्‌पटलापासून एक समयावच्छेदे निघून ते मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतात. येथे दोन्ही डोळ्यांपासून मिळालेल्या या लक्षावधी पृथक् संकेतांचे संश्लेषण (एकत्रीकरण) व निःसंकेतन (मूळ प्रतिमा मिळविण्याची क्रिया) होते. यामुळे मनुष्याला दृश्याचे मूळ त्रिमितीय स्वरूपात आकलन होते वा अनुभव मिळतो. प्रकाशविद्युतीय (प्रकाश पडल्यावर जिची विद्युत् स्थिती बदलते) प्रयुक्तीच्या साह्याने दृक्‌संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर करता येते. संवेशवहनाच्या आधुनिक इलेक्ट्रॉनीय तंत्रात प्रेषक व ग्राही यांमध्ये फक्त एकाच परिवाहाच्या (मार्गाच्या) द्वारे संबंध जोडता येतो. या मर्यादेमुळे दूरचित्रवणीच्या प्रेषणक्रियेमध्ये दृश्य चित्राचे (१) त्याच्या घटकांत विभाजन, (२) प्रत्येक घटकाच्या दृक्‌संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर व (३) या विद्युत् संकेतांची परत क्रमवार मांडणी करून मूळ प्रतिमेची जुळणी हे तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचे असे टप्पे ठरले. छायाचित्रांचे छापील स्वरूपात रूपांतर करण्याकरिता सुद्धा घटक विभाजन पद्धती वापरली जाते. काहीशी त्याच तऱ्हेची क्रिया दूरचित्रवाणीत उपयोगात आणली जाते. छापलेल्या चित्राचे आपण जर सूक्ष्मदर्शक यंत्रातून निरीक्षण केले, तर ते अनेक लहान लहान ठिपक्यांनी बनले आहे, असे आढळून येते. प्रत्येक ठिपक्याचा कमीअधिक काळेपणा ही बदलती राशी असते व त्यामुळे काही अंतरावरून चित्राकडे बघितले असता चित्राकृतीचे साकल्याने ज्ञान मिळते.


 आ. १. निपको तबकडी क्रमवीक्षण योजना (१८ रेषा प्रती चौकट) : (१) क्रमवीक्षित प्रतिमा श्रेत्र, (२) चौकोनी रंध्रे.क्रमवीक्षण (ठराविक क्रमाने निरीक्षण याचे अधिक स्पष्टीकरण खाली दिले आहे) करून दृक्‌प्रतिमेचे प्रेषणास योग्य असे विभाजन करण्याची कल्पना डब्ल्यू. ई. सॉयर (अमेरिका) आणि एम्. लब्लां (फ्रान्स) यांनी १८८० साली प्रथम सुचविली. अशी प्रत्यक्ष योजना १८८४ साली जर्मनीत पाउल निपको यांनी प्रयोगशाळेत वापरली. सिलिनियम धातूचा विद्युत् रोध तीवर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो, या तत्त्वाचा उपयोग करून त्यांनी दृक्‌संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर केले. क्रमवीक्षण व प्रतिमेची परत जोडणी करण्याकरिता एक परिभ्रमी गोल तबकडी वापरण्यात आली होती. आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे या तबकडीवर सर्पिल वक्रावर अनेक चौकोनी रंध्रे पाडलेली होती.

दृक्‌प्रतिमा तबकडीच्या कडेजवळच्या एका भगावरच केंद्रित केली होती. एका ठराविक स्थिर गतीने तबकडी फिरविली असता, प्रथम सर्वांत कडेचे छिद्र प्रतिमेवरून आसन्नपणे (साधारणपणे) एका रेषेत मार्गक्रमण करून त्याखाली येणाऱ्या प्रतिमेच्या भागाचे क्रमवीक्षण करीत होते. छिद्रातून जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता मूळ दृश्यातील प्रकाशछाया वितरणानुसार कमीजास्त राहते. त्यामुळे हा प्रकाश जेव्हा सिलिनियम प्रयुक्तीवर पडतो तेव्हा त्यापासून कमीजास्त तीव्रतेचे विद्युत् संकेत मिळतात. छिद्रांतील अंतर असे ठेवले होते की, पहिल्या छिद्राचे क्रमवीक्षण कार्य संपल्यानंतर अनुक्रमाने त्याच्या खालील छिद्र हे कार्य करू लागत होते आणि अशा रीतीने तबकडीच्या संपूर्ण एका परिभ्रमणामध्ये सर्व प्रतिमेचे क्रमवीक्षण केले जात होते. या क्रियेपासून मिळणाऱ्या पृथक् संकेतांचे एकाच परिवाहातून प्रेषण करणे शक्य होत होते. ग्राहीस्थानी हे कालानुक्रमे येणारे संकेत एका विशिष्ट रचनेच्या विद्युत् दिव्यास दिले जाते. या दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाची तीव्रता त्याला दिलेल्या विद्युत् दाबाच्या प्रमाणात बदलत जाते. या दिव्याच्या पुढे क्रमवीक्षण करण्याकरिता वापरलेल्या तबकडीसारखीच दुसरी एक तबकडी बसविलेली होती. दिव्यापासून मिळणारा प्रकाशझोत मूळ दृक्‌प्रतिमेच्या क्षेत्रफळाच्या आकारमानाचाच तबकडीचा भाग प्रकाशित करीत होता. ही दुसरी तबकडी पहिल्या तबकडीच्या गतीने व तिच्या गतीशी समकालीकरण करून फिरविली जात होती. असलेल्या तबकडीच्या छिद्रातून कमीजास्त तीव्रतेचा प्रकाश जाऊन त्यामागे असलेल्या पटलावर अशा तऱ्हेने मूळ दृक्‌प्रतिमा तयार हाेत होती. याच प्रकारची सुधारित योजना वापरून इंग्लंडमध्ये जे.एल्. बेअर्ड यांनी दूरचित्रवाणी प्रेषणाचे प्रात्यक्षिक प्रथम १९२६ साली दाखविले. त्यांच्या योजनेत दृकप्रतिमेचे क्रमवीक्षण एकाखाली एक अशा ३० रेषांनी केले गेले होते. या रेषासमूहास चौकट असे म्हणतात. बेअर्ड पद्धतीत प्रतिसेकंद १० चौकटी पटलावर एकामागून एक पडल्यामुळे अंतिम दृकप्रतिमा तयार होत होती. ए. ए. कँबेलस्विन्‌टन यांनी या यांत्रिक योजनेऐवजी इलेक्ट्रॉन शलाकेचा क्रमवीक्षण आणि परत दृक्‌प्रतिमा जुळवणी करण्याकरिता वापर करावा अशी सूचना १९०८ मध्ये केली होती. योग्य विद्युत् प्रवाहवाहक वेटोळ्याच्या साह्याने चुंबकीय क्षेत्र निर्माण करून त्यायोगे इलेक्ट्रॉन शलाकेला क्रमवीक्षण करण्याकरिता लागणारी गती निर्माण करावी अशी कल्पना त्यांनी मांडली. इलेक्ट्रॉनाचे वस्तुमान अगदी कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन शलाका क्रमवीक्षण कार्य अत्यंत जलद गतीने करू शकते. प्रेषण व ग्राहीस्थानी असलेल्या इलेक्ट्रॉन शलाकांच्या गती एकरूप राखणे व त्यांच्यात समकालीकरण करणे हे सुद्धा सुलभ असते.

आयकॉनोस्कोप ही सुविकसित प्रयुक्ती व्ही. के. झ्‌व्हाऱ्यक्यिन यांनी अमेरिकेत १९२३ साली संशोधन तयार केली. या प्रयुक्तीने इलेक्ट्रॉनीय क्रमवीक्षण पद्धतीची सुरुवात केली. १९३२ साली अमेरिकेत आर. सी. ए. कंपनीने संपूर्ण इलेक्ट्रॉनीय दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रत्येक चौकटीत १८० रेषा असलेली दूरचित्रवाणी प्रेषणसेवा प्रथम जर्मनीत १९३५ साली प्रत्यक्ष कार्यवाहीत आली. त्याच साली एमिस्ट्रॉन या आयकॉनोस्कोपच्या सुधारित आवृत्तीचा शोध लागला. त्यानंतर प्रतिमा ऑर्थिकॉन इ. प्रकार अस्तित्वात आले. त्यामुळे दूरचित्रवाणी तंत्रामध्ये खूपच सुधारणा झाली. सर्वसाधारण दूरचित्रवाणी कार्यक्रम अमेरिकेत १९४१ मध्ये, तर यूरोपीय देशांत १९५० पर्यंत सुरू झाले. अमेरिकन व यूरोपीय पद्धतींत थोडा फरक आहे. अमेरिकेन दूरचित्रवाणीमध्ये प्रत्येक चौकटीत ६२५ रेषा असून त्यांची वारंवारता प्रतिसेकंद २५ एवढी असते, तर यूरोपीय पद्धतीत एका चौकटीत ५२५ रेषा असून त्यांची वारंवारता प्रतिसेकंद ३० एवढी आहे.


 दूरचित्रवाणी यंत्रणेचे प्रमुख विभाग : दूरचित्रवाणीच्या यंत्रणेचे विशिष्ट कार्यानुसार पुढील प्रमुख विभाग पडतात.

(अ) कॅमेरानलिका : दृश्याची सुस्पष्ट प्रतिमा भिंगाच्या साह्याने प्रकाशविद्युत् संवेदनशील पडद्यावर प्रथम पाडली जाते. पडद्याच्या प्रत्येक सूक्ष्म घटक भागावर आगत प्रकाशाच्या तीव्रतेच्या समप्रमाणात विद्युत् भार अगर विद्युत् संवाहकता निर्माण करण्याची क्रिया होते. अशा रितीने प्रकाश संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर होते.

दूरचित्रवाणीमधील चित्रप्रेषणाच्या क्रियेमध्ये क्रमवीक्षणाची क्रिया अत्यंत महत्त्वाची असून कॅमेरानलिकेमध्ये ही क्रिया पार पाडण्याची योजना केलेली असते. आपण पुस्तक वाचतो त्या रीतीने कॅमेरानलिकेच्या पडद्यावरील प्रतिमेचे इलेक्ट्रॉन शलाकेच्या साह्याने क्रमवीक्षण केले जाते. पुस्तक वाचताना आपली दृष्टी पानावरच्या पहिल्या ओळीच्या आरंभापासून डावीकडून उजवीकडे अशी फिरवून ओळीतील सर्व शब्द आपण वाचतो. अशा रीतीने डावीकडून उजवीकडे हळूहळू खाली या क्रमाने सर्व ओळींचे आपण क्रमशः निरीक्षण करतो. कॅमेरानलिकेतील इलेक्ट्रॉन शलाका याच प्रकारच्या आवृत्तीय गतीद्वारा पडद्यावरील प्रतिमेचे क्रमवीक्षण करते. प्रतिमेचे या तऱ्हेने क्रमवीक्षण होत असताना नलिकेच्या प्रदान विद्युत् मंडलात वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहात पडद्याच्या घटक भागांवर निर्माण झालेल्या प्रकाशविद्युताच्या समप्रमाणात क्रमवार बदल होतो. एका रेषेचे निरीक्षण अशा रीतीने पूर्ण झाल्यानंतर परत पुढील रेषेच्या प्रारंभापाशी येण्यास इलेक्ट्रॉन शलाकेचा जो कालावधी लागतो त्या काळात प्रदान संकेत निर्मिती होणार नाही, अशी व्यवस्था करावी लागते [→ ऋण किरण नलिक].

(आ) प्रेषक : कॅमेरानलिकेच्या प्रदान मंडलांतील विद्युत् प्रवाहात होणारे क्रमवार बदल म्हणजेच चित्रसंकेत होत. हे चित्रसंकेत विवर्धित करून व उच्च कंप्रतेचा विद्युत् प्रवाह या संकेतांनी विरूपित करून [→ विरूपण] आकाशकाद्वारे (अँटेनाद्वारे) विद्युत् चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात या संकेतांचे प्रेषण करण्याचे कार्य दूरचित्रवाणीत प्रेषक करतो.

(इ) ग्राही : ज्या ठिकाणी दूरचित्रवाणीचा कार्यक्रम पहावयाचा असेल त्या ठिकाणी दुसऱ्या लहान आकाशकाद्वारे प्रेषकाकडून प्रेषित केलेले संकेत ग्रहण केले जातात. या संकेतांचे विवर्धन व शोधन करून चित्रसंकेत किंवा त्यांमधील दृश्य अवगम अलग करण्याचे आणि या चित्रसंकेतांचे अधिक विवर्धन करून ते चित्रनलिकेला पुरविण्याचे कार्य ग्राहीकडून केले जाते.

(ई) चित्रनलिका : विवर्धित चित्रसंकेत ग्राहीकडून चित्रनलिकेला पुरविले जातात. कॅमेरानलिकेमधील क्रमवीक्षक शलाकेप्रमाणे चित्रनलिकेतही एक शलाका असते. तिला डावीकडून उजवीकडे व हळूहळू खाली या क्रमाने प्रगत होणारी अगदी तंतोतंत तशीच गती असते. विशिष्ट विद्युत् मंडलाच्या योगाने दोन्ही शलाकांच्या हालचालीचा क्रम एकमेकींशी निगडित करून त्यांच्यात संपूर्ण समकालीनत्व आणलेले असते. चित्रनलिकेतील शलाकेची तीव्रता तिला ग्राहीने पुरविलेल्या विद्युत् संकेतानुसार कमीअधिक होत जाते. ही शलाका एका अनुस्फुरक (एखाद्या विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांचे शोषण करून जास्त तरंगलांबीच्या दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन करणाऱ्या) पडद्यावर आदळत असते व शलाकेच्या कमीअधिक होत असलेल्या तीव्रतेमुळे व विशिष्ट क्रमाने होत असलेल्या हालचालीमुळे पडद्यावर प्रकाश व छाया यांचे योग्य वितरण असलेली आकृती तयार होऊन मूळचे दृश्य त्यावर हुबेहूब उमटते. कोणत्याही एका क्षणी पडद्यावर ज्या ठिकाणी शलाका आदळत असते तेवढाच सूक्ष्म भाग प्रकाशाचे उत्सर्जन करीत असतो पण हे उत्सर्जन घडवून आणणारी इलेक्टॉन शलाका अतिशय वेगाने पडद्यावर धावत असल्याने दृष्टिसातत्याच्या गुणधर्मामुळे (डोळ्याच्या दृक्‌पटलावर पडलेल्या प्रतिमेची जाणीव ती प्रतिमा निघून गेल्यावरही अत्यल्प काळ टिकून राहणे या गुणधर्मामुळे) चित्र क्रमाक्रमाने उमटते आहे हे लक्षात येत नाही व एकाच वेळी सर्व प्रतिमा स्पष्टपणे उमटल्याचा भास होतो. चलचित्रपटात अनेक स्थिर चित्रे क्रमवार पडद्यावर दाखविली असता आपणास गतीचा अनुभव मिळतो, याच पद्धतीने गतीचा आभास दूरचित्रवाणीत निर्माण केला जातो. सलग गतीचा आभास निर्माण करण्यासाठी एका सेकंदात कमीतकमी २४ तरी स्थिर चित्रे एकामागून एक अशी दाखवावी लागतात. दूरचित्रवाणीत साधारणपणे हेच प्रमाण वापरले जाते. निरनिराळ्या प्रकारचे उपलब्ध असणारे दूरचित्रवाणी कॅमेरे व त्यांचे तांत्रिक दृष्ट्या विवेचन पुढील विभागात केले आहे.


कॅमेरानलिका : आयकॉनोस्कोप, प्रतिमा विच्छेदक, ऑर्थिकॉन या अत्यंत प्रभावी व कार्यक्षम अशा कॅमेरानलिकांचा शोध एकामागून एक लागला. प्रकाश संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर करण्याकरिता विद्युत् भार संचयाच्या तत्त्वावर आधारित नलिकांची निर्मिती आणि विवर्धन करण्याकरिता इलेक्ट्रॉन गुणक नलिकांची [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] निर्मिती हे या प्रगतीमधील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. या आधुनिक कॅमेरानलिकांचे वर्णन खाली दिले आहे.

आ.२. आयकॉनोस्कोप, मुलभूत करनै व कैरेय : १. इलेक्ट्रॉन बदूक, २. आगत प्रकाश, ३. संकलन, ४. लक्ष्य, ५. संकेत पट्टिका, ६. क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन सलाका, ७. निरोधक पटल, ८. प्रकाशसंवेदनशील घटक.

(१) आयकॉनोस्कोप : या नलिकेची रचना आ. २ मध्ये दाखविली आहे. मानवी डोळ्यात असणाऱ्या प्रतिमा पटलाप्रमाणेच या प्रयुक्तीत असणारे प्रतिमा पटल प्रकाशाला संवेदनशील असलेल्या असंख्य सूक्ष्म प्रकाशविद्युत् घटकांपासून तयार केलेले असते. हे प्रकाशसंवेदनशील घटक सिझियम–सिल्व्हर यांच्या ऑक्साइडांपासून बनविलेले असतात. हे घटक स्वतः जरी विद्युत् संवाहक असले, तरी एकमेकांपासून निरोधित कलेले असतात. या सर्व घटकांचे मिळून एक विशिष्ट विन्यास (मांडणी) असलेले लक्ष्य (४) तयार होते. लक्ष्याच्या मागे एक पातळ निरोधक पटल (७) (अभ्रकापासून बनविलेले) व त्यामागे संवाहक संकेत पट्टिका (५) असते. दृश्याची स्पष्ट प्रतिमा लक्ष्यावर पाडली असता आलेल्या प्रकाशाच्या तीव्रतेच्या प्रमाणात लक्ष्याच्या निरनिराळ्या घटकांपासून इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन होते. लक्ष्याजवळच असलेल्या संकलकाला (३) भरपूर धन विद्युत् दाब देऊन हे इलेक्ट्रॉन उत्सर्जित होताच संकलकाकडे खेचून घेतले जातात. प्रकाश जसजसा पडत राहतो तसतसे हे उत्सर्जन चालू राहून त्यामुळे लक्ष्याच्या विविध सूक्ष्म घटकांवर इलेक्ट्रॉनांची अधिकाधिक कमतरता निर्माण होते व परिणामतः त्यांवर धन विद्युत् भार जमत जातो. याचाच अर्थ असा की, प्रतिमा पटांवर आगत प्रकाश तीव्रतेच्या वितरणाप्रमाणे धन विद्युत् भार वितरणाचा विन्यास तयार होतो. आत प्रकाशाच्या बाजूनेच येणाऱ्या जलद गती इलेक्ट्रॉन शलाकेच्या (६) साह्याने या पटलाचे नंतर क्रमवीक्षण केले जाते. क्रमवीक्षण शलाकेमध्ये भरपूर ऊर्जा असल्यामुळे ती लक्ष्याच्या घटकांवर आपटताच त्यांपासून द्वितीयक इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन होते. द्वितीयक इलेक्ट्रॉन उत्सर्जनाचे प्रमाण प्रकाशजन्य प्राथमिक इलेक्ट्रॉन उत्सर्जनाच्या मूल्याच्या व्यस्त प्रमाणात राहते. ज्या घटकांवर प्रकाश पडल्यामुळे इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन होऊन जास्त धन विद्युत् भार जमला असेल त्यापासून होणारे द्वितीयक उत्सर्जन कमी असते. याउलट ज्या घटकांवर कमी प्रकाश पडल्यामुळे धन विद्युत् भार कमी आहे. त्यापासून होणाऱ्या द्वितीयक इलेक्ट्रॉन उत्सर्जन होण्याची क्रिया व घटकावर असलेल्या धन विद्युत् भारामुळे तो घटक शलाकेतील इलेक्ट्रॉनांचे ग्रहण करून आपल्या मूळ निर्भार स्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करतो ही क्रिया या दोन्ही क्रिया एकाच वेळी अशा प्रमाणात घडून येतात की, त्यामुळे घटकावर असलेला विद्युत् दाब हा संकलकावर असलेल्या दाबाएवढ्या मूल्यावर स्थिर हातो. याच स्थितीला येण्याकरिता घटकावर असलेल्या इलेक्ट्रॉन संख्येत होणारा बदल हाच दृक्‌संकेत बनतो. शलाका एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जात असताना लक्ष्यावरील इलेक्ट्रॉनांच्या संख्येमध्ये अशा रीतीने निर्माण होणारे क्षणैक बदल लक्ष्य व पट्टिका यांमध्ये असलेल्या विद्युत् धारणेमुळे संकेत पट्टिकेला जोडलेल्या मंडलामध्ये विद्युत् प्रवाह निर्माण करतात. या मंडलामध्ये एक रोधक जोडलेला असतो. त्यामधून जेव्हा हा प्रवाह वाहतो तेव्हा त्या रोधकावर या प्रवाहानुसार क्षणोक्षणी बदलणारा विद्युत् दाब संकेत निर्माण होतो. याचे योग्य विवर्धन करून दूरचित्रवाणी प्रेषित करण्यास आवश्यक असा दृक्‌संकेत मिळतो. कोणत्याही एका घटकाचे क्रमवीक्षण पूर्ण केल्यानंतर लक्ष्यावरील इतर सर्व घटकांचे क्रमवीक्षण करून परत त्या घटकापाशी येण्याकरिता शलाकेला १/२५ सेकंद एवढा कालावधी लागतो. यापुढील विवेचनाच्या सोयीकरिता दूरचित्रवाणी योजनेत यूरोपीय पद्धत वापरली आहे, असे गृहीत धरले आहे. याचा अर्थ चौकटीत ६२५ रेषा असून त्यांची वारंवारता २५ प्रती सेकंद ही आहे, या संख्यांचा उपयोग केला आहे. त्यामुळे या प्रयुक्तीमध्ये निर्माण होणारा संकेत आगत प्रकाशाच्या क्षणैक तीव्रतेमुळे ठरविला जात नसून १/२५ सेकंद या काळात मिळणाऱ्या एकंदर प्रकाश ऊर्जेवर अवलंबून असतो. या संचय क्रियेमुळे या प्रयुक्तीच्या कार्यक्षमतेत फार मोठी वाढ होते. आयकॉनोस्कोपच्या लक्ष्य पटलातून बाहेर पडणारे सर्व प्रकाशजन्य इलेक्ट्रॉन किंवा द्वितीयक इलेक्ट्रॉन संकलकाकडून पकडले जात नाही. त्यांपैकी काही लक्ष्यावर परत पडून त्यावर तयार होत असलेल्या विद्युत् प्रतिमेमध्ये बिघाड घडवून आणतात. या प्रयुक्तीत हा एक मोठा दोष आहे.


 आ. ३. प्रतिमा आयकॉनोस्कोप १. क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन शलाका, २. संकलन, ३. लक्ष्य, ४. उत्सर्जित इलेक्ट्रॉन, ५. आगत प्रकाश, ६. प्रतिमा चुंबकीय केंद्रिकरण वेटोळी, ७. इलेक्ट्रॉन शलाकेचे चुंबकीय केंद्रीकरण करणारी वेटोळी, ८. इलेक्ट्रॉन शलाकेला क्रमवीक्षण करण्यास आवश्यक असे चुंबकीय विचलन करणारी वेटोळी, ९. अर्धपारदर्शक काच पटल, १०. प्रकाशसंवेदनशील थराचा घटक, ११ इलेक्ट्रॉन बंदूक(२) प्रतिमा आयकॉनोस्कोप : या प्रयुक्तीची संवेदनक्षमता आयकॉनोस्कोपपेक्षा पाच ते दहा पटींनी जास्त असते. दृश्याची प्रतिमा (आ.३) अर्धपारदर्शक काच पटलावर (९) पाडली जाते. आगत प्रकाश दिशेच्या उलट बाजूच्या पटलपृष्ठभागावर प्रकाशसंवेदनशील घटकाचा (१०) एक पातळ थर दिलेला असतो. त्या बाजूने प्रकाशजन्य इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन होऊन दृश्यानुरूप अशी इलेक्ट्रॉन प्रतिमा बनते. लक्ष्य (३) व पटल यांमधील अवकाशातील विद्युत् क्षेत्रामुळे ही प्रतिमा नलिकेतून पुढे येते व शेवटी लक्ष्यावर जाऊन पडते. लक्ष्याची रचना आयकॉनोस्कोपमधील लक्ष्याप्रमाणेच असली, तरी याचा पृष्ठभाग प्रकाशसंवेदनशील नसून तो द्वितीयक इलेक्ट्रॉन उत्सर्जनास अनुकूल असा असतो. एक प्राथमिक इलेक्ट्रॉन यामधील एका सूक्ष्म घटकावर पडला असता त्यापासून अनेक द्वितीयक इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. शेवटी तेथे धन व़िद्युत् भार निर्माण होतो. याप्रमाणे लक्ष्यावर धन विद्युत् भाररूपी प्रतिमा तयार होते. द्रुत गती इलेक्ट्रॉन शलाकेच्या (१) साह्याने या लक्ष्याचे क्रमवीक्षण केले जाते. शलाकेतील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा भरपूर असल्यामूळे शलाकेने घटकांवर आघात करताच त्यांच्यापासून अनेक द्वितीयक इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन होते. निरनिराळ्या घटकांतून उत्सर्जित होणाऱ्या द्वितीयक इलेक्ट्रॉनांची संख्या त्या घटकाच्या तत्क्षणिक विद्युत् दाबावर अवलंबून राहते. क्रमवीक्षक शलाकेने उत्सर्जित केलेले हे इलेक्ट्रॉन संकलन धनाग्राकडे (२) आकर्षिले जातात. आयकॉनोस्कोपप्रमाणेच संकेत पट्टिका मंडलात विद्युत् संकेत निर्माण होतो. या प्रयुक्तीत उत्सर्जित इलेक्ट्रॉन परत पटलावर पडण्याची शक्यता कमी करण्यासाठी खास योजना केलेली असती. त्यामुळे या नलिकेच्या साह्याने मिळणारी प्रतिमा जास्त स्पष्ट मिळते. द्वितीयक इलेक्ट्रॉन उत्सर्जनाला अनुकूल असे दुसरे पटल असल्यामुळे प्रयुक्तीमध्येच संकेताचे बऱ्याच पटींनी विवर्धन होते. आकृतीमध्ये (६) व (७) ही विद्युत् प्रवाहवाहक तारेची वेटोळी आहेत. (६) या वेटोळ्यांनी निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रॉन प्रतिमेच्या इलेक्ट्रॉनमधील परस्परअपसरण प्रेरणेमुळे होणाऱ्या  विकेंद्रीकरणाचे निवारण होते. (७) ही वेटोळी चुंबकीय क्षेत्र निर्माण करून क्रमवीक्षण शलाकेला केंद्रित करतात, तर वेटोळी (८) योग्य असे आवर्ती चुंबकीय क्षेत्र निर्माण करून शलाकेला लक्ष्याचे क्रमवीक्षण करण्यास आवश्यक क्षैतिज (आडवी) व उदग्र (उभी) गती देतात.

आ. ४. प्रतिमा ऑर्थिकॉन १. आगत प्रकाश, २. प्रकाशसंवेदनशील अर्धपारदर्शक थर, ३. धातूची जाळी, ४. लक्ष्य, ५. इलेक्ट्रॉन बंदूक, ६. इलेक्ट्रॉन शलाका, ७. संकेंद्रन वेटोळी, ८. विचलन वेटोळी, ९. इलेक्ट्रॉन गुणक.

(३) प्रतिमा ऑर्थिकॉन : या प्रयुक्तीची संवेदनक्षमता इतर सर्व कॅमेरानलिकांच्यापेक्षा जास्त असल्यामुळे सध्या याच नलिकेचा वापर दूरचित्रवाणीमध्ये सर्वांत अधिक होऊ लागला आहे. नलिकेच्या एका बाजूच्या आतील पृष्ठभागावर (आ.४) प्रकाशविद्युत् संवेदनशील द्रव्याचा पातळ अर्धपारदर्शक असा (२) थर दिलेला असतो. दृश्यापासून येणारे प्रकाशकिरण या थराच्या एका बाजूने प्रवेश करतात आणि इलेक्ट्रॉन मात्र दुसऱ्या बाजूने उत्सर्जित होतात. हा थर विद्युत् संवाहक असतो म्हणून या उत्सर्जनामुळे याच्या पृष्ठभागावर विद्युत् भार वितरण होत नाही. पुरेशा शक्तीचे विद्युत् क्षेत्र लावून या इलेक्ट्रॉनांना लक्ष्याच्या (४) दिशेने गतिमान केले जाते. या क्रियेमध्ये त्यांच्या गतिरेषा एकमेकींशी समांतर राहतील, अशी योजना केलेली असते. विद्युत् वाहक वेटोळ्यांनी (७) निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रॉन प्रतिमा विकृत न होता, ती प्रगत होऊन लक्ष्यावर जाऊन आदळते. या प्रयुक्तीमधील लक्ष्य (४) हे एका अत्यंत पातळ (जाडी ≈ १ सहस्रांश मिमी.) पण सपाट अशा काचेपासून बनविलेले असते. त्याच्या पुढे अगदी जवळ अत्यंत सूक्ष्म अशी असंख्य छिद्रे असलेली धातूची जाळी (३) बसविलेली असते. (२) पासून निघालेले बहुसंख्य इलेक्ट्रॉन या जाळीच्या छिद्रांमधून पलीकडे जाऊन काचेच्या लक्ष्यावर पडतात आणि लक्ष्यापासून द्वितीयक इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन करतात. उत्सर्जित द्वितीयक इलेक्ट्रॉन जाळीला दिलेल्या धन विद्युत् दाबामुळे जाळीकडे आकर्षिले जातात. काच ही व़िद्युत् निरोधक असल्यामुळे तिच्या पृष्ठभागावर या क्रियेमुळे धन विद्युत् भाराचे विशिष्ट वितरण तयार होते. या विद्युत् भार वितरणाचे क्रमवीक्षण लक्ष्याच्या दुसऱ्या बाजूच्या पृष्ठभागावर पडत असलेल्या मंदगती इलेक्ट्रॉन शलाकेच्या (६) साह्याने केले जाते. क्रमवीक्षक शलाकेची ऊर्जा कमी असल्यामुळे तिच्या आघातामुळे द्वितीयक इलेक्ट्रॉन उत्सर्जित होत नाहीत. लक्ष्यावरील काचेचा थर अत्यंत पातळ असल्यामुळे त्यामधून इलेक्ट्रॉन व़िद्युत् प्रवाहाचे क्षरण (गळती) होऊ शकते. लक्ष्याचा कोणताही भाग त्यावर असलेला धन विद्युत् भार नाहीसा करण्यास आवश्यक तेवढेच इलेक्ट्रॉन शलाकेतून काढून घेतो. लक्ष्याच्या उजव्या बाजूच्या पृष्ठभागावर पडत असलेल्या शलाकेतील काढून घेतलेले इलेक्ट्रॉन, ती शलाका पुन्हा त्याच ठिकाणी येण्यास लागणाऱ्या कालावधीत, काचेमधून क्षरणाने त्याच्या डाव्या बाजूच्या पृष्ठभागापर्यंत येणे जरूर असते. लक्ष्याच्या एका बिंदूवर क्रमवीक्षण शलाका पडत असताना त्या बिंदूवरील धन विद्युत् दाब नष्ट करण्यास आवश्यक तेवढेच इलेक्ट्रॉन तिच्यापासून काढून घेतले जातात व या क्रियेच्या शेवटी त्या बिंदूचा विद्युत् दाब शलाका ज्यापासून उगम पावते त्या ऋणाग्राच्या तुलनेने शून्य होतो. इलेक्ट्रॉन गमावून क्षीण झालेली शलाका तिच्या उगमस्थानाकडे परत जाते. ज्या बिंदूपासून द्वितीयक इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन झालेले नसेल (प्रकाश प्रतिमेच्या काळ्या भागासमोरील बिंदू) त्या बिंदूवर शलाका पडते तेव्हा शलाकेतील बहुतेक सर्व इलेक्ट्रॉन परत फिरतात. याउलट ज्या बिंदूपासून द्वितीयक इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन जास्त प्रमाणात झालेले असेल (प्रकाश प्रतिमेच्या उजळ भागासमोरील बिंदू) त्यावर शलाका पडली असता ती जास्तीत जास्त संख्येने इलेक्ट्रॉन गमावून बसेल, हे उघड आहे. परत फिरणाऱ्या शलाकेतील इलेक्ट्रॉनांचे इलेक्ट्रॉन गुणकामध्ये (९) सु. सहस्रपटीने विवर्धन केले जाते. अशा रीतीने प्रेषकांत दृक्‌संकेत म्हणून वापरण्यास योग्य असा विद्युत् संकेत मिळतो.


 प्रतिमा ऑर्थिकॉन कॅमेऱ्यांचे खालील दोन सुधारित प्रकार अलीकडे संशोधण्यात आले आहेत.

आ. ५. तीव्रतावर्धक प्रतिमा ऑर्थिकॉन : १. तीव्रतावर्धक विभाग, २. प्रतिमा ऑर्थिकॉन विभाग, ३. प्रथम प्रकाशसंवेदनशील पटल, ४. ॲल्युमिनियम पत्रा, ५. प्रकाशसंवेदनशील थर (४ व ५ मिळून तीव्रतावर्धक बनलेला आहे. ६. द्वितीय प्रकाशसंवेदनशील पटल, ७. आगत प्रकाश.

तीव्रतावर्धक प्रतिका ऑर्थिकॉन : या प्रकारात (आ. ५) नेहमीच्या ऑर्थिकॉनच्या प्रकाशसंवेदनशील पटलापासून (३) निघालेल्या इलेक्ट्रॉनांना ८,०००–१०,००० व्होल्ट विद्युत् वर्चस् लावून प्रवेगित केले जातात. त्यानंतर ते तीव्रतावर्धक पटलावर (४ व ५ मिळून बनलेल्या पटलावर) पडतात. हे पटल एका अत्यंत पातळ अशा ॲल्युमिनियम पत्र्याचे (४) बनविलेले असून त्याच्या दुसऱ्या बाजूवर प्रकाशसंवेदनशील द्रव्याचा थर (५) दिलेला असतो. ऊर्जा खूप जास्त असल्यामुळे प्रवेगित इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियमाचा पत्रा भेदून त्यामागील थरावर आदळून त्यापासून पुष्कळ तीव्रतेच्या प्रकाशकणांचे उत्सर्जन करतात. योग्य योजनेचा उपयोग करून त्यातील बहुसंख्य प्रकाशकण लक्ष्याकडे (६) जातील अशी व्यवस्था केलेली असते. या योजनेमुळे मूळ प्रकाश तीव्रतेचे ६०–८० पटींनी विवर्धन होते.

 *****

प्रतिमा विच्छेदक : प्रतिमा ऑर्थिकॉनची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे (अ) प्रतिमा विभाग आणि क्रमवीक्षण विभाग यांचे विभक्तीकरण (आ) विवर्धनाकरिता इलेक्ट्रॉन गुणकाचा उपयोग ही आहेत. पी.टी. फार्न्झवर्थ (१९३४) यांनी प्रतिमा विच्छेदकामध्ये प्रथम या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला. आयकॉनोस्कोपमधील संचयाचे तत्त्व या नलिकेत वापरले नसल्यामुळे या प्रयुक्तीची कार्यक्षमता कमी असून तिला कार्यान्वित करण्याकरिता बऱ्याच जास्त प्रकाश ऊर्जेची जरूरी असते. या प्रयुक्तीचे आयुष्य जास्त आणि कार्यक्षमता स्थिर असल्यामुळे औद्योगिक दूरचित्रवाणीकरिता तिचा उपयोग बरीच वर्षे केला जात असे. सध्या बहुतांशी व्हिडिकॉनने या नलिकेची जागा घेतली आहे.

आ. ६. फार्न्झवर्थ प्रतिमा विच्छेदक : १. आगत प्रकाश, २. अर्धपारदर्शक प्रकाशसंवेदवशील ऋणाग्र, ३. इलेक्ट्रॉन शलाका, ४. केंद्रीकरण वेटोळी, ५. विचलन वेटोळी, ६. मध्यभागी छिद्र् असलेली पट्टीका, ७. इलेक्ट्रॉन गुणक, ८. वर्धकाग्रे, ९. धनाग्र.

या प्रयुक्तीचे कार्य. आ. ६ वरून कळून येईल. दृश्याची प्रतिमा अर्धपारदर्शक प्रकाशसंवेदक्षम सपाट ऋणाग्रावर (२) पाडली जाते. त्यापासून दुसऱ्या बाजूने इलेक्ट्रॉन बाहेर पडून दृश्याची इलेक्ट्रॉन–प्रतिमा तयार होते. ही इलेक्ट्रॉन –प्रतिमा विद्युत् क्षेत्राच्या साहाय्याने जशीच्या तशी नलिकेच्या दुसऱ्या टोकाकडे हलविता येते. हे इलेक्ट्रॉन पट्टिकेच्या (६) मध्यभागी असलेल्या छिद्रातून इलेक्ट्रॉन गुणक विभागात प्रवेश करतात. तेथे इलेक्ट्रॉनांच्या मूळ संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होऊन विवर्धित विद्युत् संकेत धनाग्रास (९) मिळतो. (५) या वेटोळ्यांनी इलेक्ट्रॉन–प्रतिमेचे विशिष्ट क्रमाने क्षैतिज व उदग्र दिशेने विचलन केले जाते व अशा रीतीने प्रतिमेच्या निरनिराळ्या विभागांतील इलेक्ट्रॉन क्रमशः पट्टिकेच्या छिद्रातून इलेक्ट्रॉन गुणकामध्ये सोडले जातात. कोणत्याही एका क्षणी छिद्रातून आत येणाऱ्या इलेक्ट्रॉनांचाच या प्रयुक्तीत संकेत निर्माण करण्याकरिता उपयोग केलेला असतो. त्यामुळे उरलेले बहुसंख्य इलेक्ट्रॉन वाया जातात. या कारणामुळे या प्रयुक्तीची कार्यक्षमता कमी असते.

(५) एमिट्रॉन : या नलिकेतील लक्ष्य तीन थरांचे बनलेले असते. प्रकाशसंवेदनशील अशा सूक्ष्म घटकांपासून बनलेले पटल, त्यामागे त्याला आधारभूत पातळ निरोधक पटल आणि त्याच्याही मागे पूर्ण पारदर्शक अशी संकेत पट्टिका असे ते तीन थर असतात. दृश्य प्रतिमेचे प्रकाशकिरण संकेत पट्टिका व निरोधक पटल या दोहोंना भेदून प्रकाशसंवेदनशील पटलावर पडतात आणि प्रकाशजन्य इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन करतात. पटलावर निर्माण होणाऱ्या धन विद्युत् भार वितरणाचे क्रमवीक्षण एका मंदगती इलेक्ट्रॉन शलाकेकडून केले जाते. प्रकाशजन्य इलेक्ट्रॉन मुद्दाम बसविलेल्या धन विद्युत् दाबयुक्त संकलकाकडे आकर्षिले जातात. शलाकेची ऊर्जा कमी असल्यामुळे या प्रयुक्तीमध्ये द्वितीयक इलेक्ट्रॉन उत्सर्जित होत नाहीत. लक्ष्य पटलाच्या विशिष्ट भागावर इलेक्ट्रॉन उत्सर्जनामुळे उत्पन्न झालेला धन विद्युत् भार नाहीसा करून त्याची विद्युत् दाब पातळी इलेक्ट्रॉन शलाकेच्या ऋणाग्रावर असलेल्या विद्युत् दाबाएवढी (म्हणजे शून्य) करण्याकरिता आवश्यक तेवढे इलेक्ट्रॉन पटलाच्या त्या भागाकडून शलाकेमधून काढून घेतले जातात. संकेत पट्टिका आणि प्रकाशसंवेदनशील पटल यांच्यामध्ये विद्युत् धारणा असल्यामुळे या पटलावर कोणत्याही एका घटक भागावरील विद्युत् भारात चटकन बदल झाला, तर त्यामुळे संकेत पट्टिकेला जोडलेल्या मंडलात त्या बदलाच्या प्रमाणात तत्कालिक विद्युत् प्रवाह मिळतो. या नलिकेची संवेदनक्षमता इतर कॅमेरानलिकांच्या तुलनेने मध्यम आहे. त्याचप्रमाणे जेथे प्रकाशाच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे (उदा., सूर्यप्रकाशातील अगर मोकळ्या जागेतील चित्रणासाठी) अशा जागी वापरण्यास ही नलिका उपयुक्त नाही.


 आ. ७. व्हिडिकॉन कॅमेरा : १. काच शलाका, २. अर्धपारदर्शक विद्युत् संवाहक, ३. प्रकाशसंवाहक थर, ४. इलेक्ट्रॉन शलाका, ५. इलेक्ट्रॉन बंदूक, ६. शलाका केंद्रीकरण वेटोळी, ७. शलाका विचलन वेटोळी, ८. आगत प्रकाश.(६) व्हिडिकॉन : आतापर्यंत वर्णन केलेल्या प्रयुक्तींमध्ये धातुपटलाच्या पृष्ठभागावर प्रकाश टाकला असता त्यापासून होणारे इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन, प्रकाश संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर करण्यासाठी वापरलेले असते. काही विशिष्ट अर्धसंवाहक (निरोधक व धातू यांच्यादरम्यान ज्यांची विद्युत् संवाहकता आहे अशा) पदार्थांच्या विद्युत् रोधाचे मूल्य त्यावर प्रकाश पाडला असता खूप घटते. या तत्त्वानुसार व्हिडिकॉनमध्ये संकेत रूपांतराची क्रिया केली जाते. अशा प्रकारच्या पदार्थांना प्रकाशसंवाहक पदार्थ म्हणतात व्हिडिकॉनमधील काचेच्या पडद्याच्या (१) आतील पृष्ठभागावर अर्धपारदर्शक पण विद्युत् संवाहक अशा द्रव्याचा एक पातळ थर (२) दिलेला असतो. हा थर विद्युत् संकेत पट्टिकेचे काम करतो. या थरावर प्रकाशसंवाहक द्रव्याचा (३) दुसरा एक थर दिलेला असतो. संकेत पट्टिकेला धन विद्युत् दाब दिलेला असतो. दृश्याची प्रतिमा लक्ष्य पटलावर पडली म्हणजे त्याचे निरनिराळ्या विभागांतील इलेक्ट्रॉन संवाहक स्थितीत आणले जातात. अशा प्रकारे निर्माण झालेल्या संवाहक इलेक्ट्रॉनांची संख्या त्यावर पडत असलेल्या प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. संकेत पट्टिकेला दिलेल्या धन दाबामुळे हे इलेक्ट्रॉन हळूहळू तीकडे आकर्षिले जातात व अशा प्रकारे लक्ष्याच्या दुसऱ्या पृष्ठभागावर विशिष्ट धन विद्युत् भार वितरण अथवा प्रतिमा निर्माण होते. संकेत पट्टिकेच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या प्रकाशसंवाहक थराचे एका मंदगती इलेक्ट्रॉन शलाकेच्या साह्याने क्रमवीक्षण केले जाते व या थराच्या प्रत्येक घटक बिंदूवर जेव्हा शलाका पडते, तेव्हा त्या बिंदूचा विद्युत् दाब ऋणाग्राइतका (म्हणजे शून्य) होईल इतके इलेक्ट्रॉन त्या बिंदुस्थानी शलाकेतून काढून घेतले जातात. संवाहक संकेत पट्टिकेला धन विद्युत् दाब दिलेला असल्यामुळे प्रकाशसंवाहक थराच्या विशिष्ट बिंदूची संवाहकता प्रतिमेतील प्रकाशामुळे जितक्या प्रमाणात वाढली असेल तितक्या प्रमाणात पट्टिकेला जोडलेल्या मंडलांत विद्युत् प्रवाह वाहतो व या मंडलांत जोडलेल्या रोधकामध्ये विद्युत् दाबाच्या स्वरूपात विद्युत् संकेत निर्माण होतो. प्रकाशसंवाहक थराची संवाहकता प्रतिमेतील प्रकाशामुळे वाढण्याची क्रिया क्षणिक नसून क्रमवीक्षणाच्या एका आवर्तनकालामध्ये होणारा तो संकलित परिणाम असतो. त्यामुळे या नलिकेत होणारी विद्युत् प्रतिमेची निर्मिती संचय तत्त्वानुसार होते.

आ. ८. प्लंबिकॉनच्या अवरोधी-स्तरयुक्त प्रकाशसंवाहक स्तराचे कार्य : १. काचेचा दर्शनी पट्ट, २. संकेत पट्टीका-अर्धपारदर्शक विद्युत् संवाहक, ३. n प्रकारचा लेड ऑक्साइड, ४. i प्रकारचा लेड ऑक्साइड (शेंदूर), ५. p प्रकारचा लेड ऑक्साइड, ६. आगत प्रकाश, ७. क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन शलाका, ८. ३ व ४ यांचा संधी, ९. ४ व ५ यांचा संधी.

(७) प्लंबिकॉन : या व लेडिकॉन ऑक्सिकॉन इ. व्यापारी नावांनी ओळखण्यात येणाऱ्या व्हिडिकॉन जातीच्या कॅमेऱ्यांत प्रकाशसंवाहक थराऐवजी लेड ऑक्साइड या अर्धसंवाहक द्रव्याच्या अवरोधी स्तरांच्या उपयोग केलेला असतो. या प्रकारच्या प्रयुक्ती प्रकाशसंवाहकापेक्षा जास्त संवेदनक्षम असून त्यांचा प्रतिसादही जास्त जलद असतो यामध्ये पूर्ण अंधकारात मिळणाऱ्या क्षरण विद्युत् संकेताची पातळी ही खूप कमी असते. या प्रयुक्तीचे कार्य आ. ८ वरून समजू शकते. संकेत पट्टिका (२) n प्रकारच्या लेड ऑक्साइड अर्धसंवाहकाचा  [→ अर्धसंवाहक] अत्यंत पातळ (≈०·००१५) थर (३) दिलेला असतो. ज्यामध्ये n व p प्रकारचे वाहक सारख्या संख्येत उपलब्ध आहेत अशा i प्रकारच्या लेड ऑक्साइड द्रव्याचा जरा जास्त जाड असा थर (४) असतो. या थरावर p प्रकारच्या लेड ऑक्साइडाचाच पातळ थर (५) असतो. n थराला धन विद्युत् वर्चस् तर p थराला जास्त ऋण विद्युत् वर्चस् दिलेले असते. या परिस्थितीत दोन्ही संधींवर (८ आणि ९ वर) व्यस्त अवपात [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] येत असल्यामुळे प्रयुक्तीतून अतिशय कमी मूल्याचा क्षरण विद्युत् वाहक असतो. अशा प्रकारे दोन विरुद्ध (n आणि p) प्रकारच्या वाहक थरांमध्ये तिसरा थर प्रस्थापित करून त्यास वरीलप्रमाणे व्यवस्त अवपात देऊन दोन संधी विभागांत अवरोधी स्तर निर्माण केले, तर अशा प्रयुक्तीस अवरोधी-स्तर प्रयुक्ती म्हणतात. या अवरोधी-स्तर विभागाचे विद्युत् गुणधर्म सर्वसाधारण संवाहक तारा जोडून मिळणाऱ्या संधीपेक्षा सर्वस्वी निराळे असतात. या प्रयुक्तीवर प्रकाश पडला असता त्यामुळे अर्धसंवाहकामध्ये n आणि p अतिरिक्त वाहक जोड्या निर्माण होतात. त्यांची संख्या प्रकाशसंकेताच्या तीव्रतेवर अवलंबून राहते. लावलेल्या विद्युत् वर्चसामुळे p प्रकारचे वाहक अर्धसंवाहकाच्या आगत प्रकाशाच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या (५) या भागात जाऊन जमा होतात. यामुळे (५) या पटलाच्या पृष्ठभागावर धन विद्युत् भार वितरणाच्या स्वरूपात विद्युत् प्रतिमा तयार होते. हिचे क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन शलाकेच्या साह्याने व्हिडिकॉनप्रमाणेच करण्यात येते. या प्रकारच्या कॅमेऱ्यात विभेदनाचे (प्रतिमेतील दोन जवळच्या बिंदूंमध्ये भेद करण्याच्या क्षमतेचे) प्रमाण कमी असते व हिचा प्रतिसादही पूर्णपणे रेषीय (प्रतिसादाच्या आलेखाचे स्वरूप सरळ रेषेसारखे) नसतो. या कारण्याकरिता ज्या दृश्यात तीव्रता विरोध जास्त आहे, याकरिता याचा उपयोग करता येत नाही.


 सिलिकॉन अर्धसंवाहक धातूच्या विद्युत् भार युग्मित प्रयुक्तीला समाकलित इलेक्ट्रॉनीय मंडलाची [→ सूक्ष्मीकरण, इलेक्ट्रॉनीय मंडलांचे] जोड देऊन अमेरिकेतील बेल टेलिफोन कंपनीला सर्वांत लहान पूर्ण अर्धसंवाहक कॅमेरा तयार करण्यात यश आले आहे. या कॅमेऱ्याचे आकारमान ७ X ७ X १५ सेंमी. एवढे आहे व त्याला उच्च विद्युत् वर्चसाची सुद्धा आवश्यकता नसते.

आ. ९ सिलीकॉन द्विप्रस्थ व्हिडिकॉनची मूलभूत रचना : १. N प्रकारच्या सिलिकॉनाचा पातळ समाईक थर, २. P प्रकारच्या सिलिकॉन अनेक सूक्ष्म विभाग, ३. सिलिकॉन ऑक्साइडाचा निरोधक विभाजक थर, ४. धन विद्युत् पुरवठा अग्र व दृक्‌संकेत अग्र, ५. आगत प्रकाश, ६. क्रमवीक्षण करणारी इलेक्ट्रॉन शलाका.

(८)सिलिकॉन द्विप्रस्थ व्हिडिकॉन : (आ. ९). व्हिडिकॉन कॅमेऱ्याच्या आधुनिक प्रकारात नेहमी वापरात असलेल्या प्रकाशसंवेदनक्षम द्रव्याऐवजी सिलिकॉन द्विप्रस्थाचा (दोन विद्युत् अग्रे असलेल्या प्रयुक्तीचा) उपयोग केला जातो. या प्रयुक्तीमध्ये दृश्यचित्र प्रतिमा ज्यावर केंद्रित केली जाते, अशा लक्ष्याची संरचना कित्येक लक्ष व्यस्त अवपाती वर्चस् दिलेले सूक्ष्म द्विप्रस्थ वापरून केलेली असते. या सर्व द्विप्रस्थांकरिता समाईक असलेला एक भाग (१) n प्रकारच्या सिलिकॉन अर्धसंवाहकाच्या पातळ थरापासून बनविलेला असतो. त्यावर आ. ९ मध्ये दाखविल्याप्रमाणे p प्रकारच्या सिलिकॉनाचे अनेक सूक्ष्म विभाग (२) वितरित केलेले असतात. सिलिकॉन ऑक्साइडाच्या पातळ निरोधक थराने (३) हे विभाग विद्युत् दृष्ट्या एकमेकांपासून अलग केलेले असतात. संपूर्ण लक्ष्याच्या पृष्ठभागावर अशा तऱ्हेचे ५ लक्ष सूक्ष्म विभाग असतात. (१) ला धन विद्युत् पुरवठा जोडलेला असून त्याच अग्रापासून दृक्‌संकेत मिळविण्याची व्यवस्था असते. (२) वर शून्य विद्युत् दाब असतो. या परिथितीत कोणत्याही द्विप्रस्थ घटकांचा रोध उच्च मानाचा असतो. जेव्हा (१) वर आगत प्रकाश (प्रतिमेतील) पडतो तेव्हा त्याचे संपूर्णपणे शोषण होऊन त्यामध्ये दोन्ही प्रकारचे विद्युत् भारवाहक निर्माण होतात. यांपैकी धन विद्युत् भारवाहक पोकळ्या [→ अर्धसंवाहक] लावलेल्या विद्युत् वर्चसामुळे द्विप्रस्थाच्या संधिभागाकडे ढकलल्या जातात व (२) सारख्या भागावर त्या जमा होतात. इतर कॅमेऱ्यांप्रमाणेच क्रिया होऊन लक्ष्याच्या (२) या बाजूच्या पृष्ठभागावर प्रकाश प्रतिमेशी सदृश अशी विद्युत् भार प्रतिमा तयार होते. क्रमवीक्षण करणारी इलेक्ट्रॉन शलाका या बाजूवर जेव्हा पडते तेव्हा द्विप्रस्थाच्या या टोकापाशी प्रकाश तीव्रतेच्या प्रमाणात कमीजास्त इलेक्ट्रॉन शोषले जाऊन तेथील प्रत्येक बिंदुस्थान परत शून्य विद्युत्  दाबावर येऊन स्थिरावले. ही क्रिया होत असताना (४) या अग्रापाशी दृक्‌संकेत निर्माण होतो. सिलिकॉन द्विप्रस्थाचा वर्णपटी प्रतिसाद संपूर्ण दृश्य विभागापासून अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य प्रारणाच्या) टोकापर्यंत चांगला असतो. योग्य अभिकल्प (आराखडा) अथवा प्रक्रिया करून हा प्रतिसाद कोणत्याही इष्ट विभागात वाढविता येतो. या प्रयुक्तीची संवेदनक्षमता उच्च प्रतीची आहे व प्रतिसादही जलद आहे. प्रकाश प्रतिमेची तीव्रता जास्त असेल, तर पटलावर जाळून दिलेल्या डागांप्रमाणे कायम स्वरूपाची प्रतिमा उमटविली जाऊन पटलामध्ये ज्याप्रमाणे इतर प्रयुक्तींमध्ये बिघाड होतो तसा बिघाड सिलिकॉन द्विप्रस्थ व्हिडिओकॉनमध्ये होत नाही. या प्रयुक्तीची रचना सदृढ आणि बिघाडरोधी आहे. आगत प्रकाश पडत नसतानाही कॅमेरानलिकेतून अल्प विद्युत् प्रवाह वाहत असतो. या विद्युत् प्रवाहाला अदीप्त विद्युत् प्रवाह म्हणतात. सिलिकॉन द्विप्रस्थ व्हिडिकॉनच्या बाबतीत या अदीप्त विद्युत् प्रवाहाचे प्रमाण जास्त असते, हा प्रयुक्तींचा एक दोष आहे. या प्रयुक्तीचा उपयोग विशेषकरून बंदमंडल दूरचित्रवाणी प्रणालीमध्ये (ज्यात कॅमेरा व ग्राही यांची जोडणी समाक्ष केबलीद्वारे केलेली आहे अशा प्रणालीमध्ये) केला गेला आहे.


 आ. १० साधे क्रमवीक्षणइलेक्ट्रॉन शलाकेद्वारा क्रमवीक्षण : इलेक्ट्रॉन शलाकेच्या साह्याने होणारी क्रमवीक्षण  क्रिया आधुनिक दूरचित्रवाणी तंत्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ही क्रिया करण्याकरिता शलाकेला क्षैतिज व उदग्र दिशांत विशिष्ट प्रकारच्या गती द्याव्या लागतात. अशीच गती चित्रनलिकेतील शलाकेलासुद्धा असावी लागते. शिवाय या दोन शलाकांच्या गतीत किंवा हालचालीत पूर्ण समकालिकता राहील अशी पण योजना करावी लागते. प्रत्येक शलाकेचा हालचालक्रम आणि दोन्ही शलाकांमध्ये समकालिकता आणण्यासाठी लागणारी आवृत्तीय (ठराविक काळानंतर पुनःपुन्हा ठराविक तीव्रता प्राप्त होणारी) क्षेत्रे व स्पंद मिळविण्यासाठी विशेष प्रकारची इलेक्ट्रॉनीय मंडले वापरतात. आवृत्तीय विचलन क्षेत्राच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारचे आंदोलक [विद्युत् प्रवाहाची आंदोलने निर्माण करणारी प्रयुक्ती [→ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] उपयुक्त ठरतात. या आंदोलकांपासून मिळणारा प्रदान विद्युत् प्रवाह आवृत्तीय असून त्याची तरंगाकृती करवतीच्या दात्यांच्या आकाराची असते. या आंदोलकाची पुनरावृत्ती-कंप्रता स्थिर ठेवण्याकरिता त्याच्या आंदोलनांवर एका प्रमाण आंदोलकापासून मिळणाऱ्या संकेतांच्या द्वारा नियंत्रण ठेवलेले असते. वर वर्णन केलेल्या प्रकारची तरंगाकृती असलेला आवृत्तीय विद्युत् प्रवाह कॅमेरानलिकेबाहेर अगर चित्रनलिकेबाहेर बसविलेल्या तारेच्या वेटोळ्यात सोडून त्यामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राद्वारा शलाकेची योग्य प्रकारची हालचाल होईल, अशी व्यवस्था केलेली असते. क्रमवीक्षण दोन प्रकारे करता येते : (१) सर्व प्रतिमेचे एकाखाली एक रेषांनी केलेले साधे क्रमवीक्षण, (२) आंतरगुंफित क्रमवीक्षण. आधुनिक दूरचित्रवाणी पद्धतीत दृश्य प्रतिमेचे क्रमवीक्षण प्रतिसेकंदाला १५,६२५ आडव्या रेषांच्या साह्याने केले जाते. संपूर्ण दृश्याचे अशा आडव्या रेषांनी प्रत्येक सेकंदाला २५ वेळा क्रमवीक्षण केले जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी एकाखाली एक अशा ६२५ क्षैतिज रेषा उमटवून चित्रनलिकेच्या पडद्यावर बनलेल्या आकृतीस ‘रेषा चौकट’ असे म्हणतात. वर निर्देशिलेल्या क्रमवीक्षण पद्धतीत (आ.१०) दृश्य प्रतिमेच्या सर्वांत वरच्या या बिंदूपासून शलाका क्रमवीक्षणास सुरुवात करून अआ ही रेषा ठराविक स्थिर वेगाने ओलांडते. पासून पर्यंत शलाका अगदी झटकन परत येते व यानंतर पूर्वीच्याच स्थिर वेगाने इई रेषेचे क्रमवीक्षण करते. याप्रमाणे एकामागून एक अशा सर्व ६२५ रेषा संपवल्यानंतर शलाका पुन्हा अगदी झटकन पासून जवळ जाते व पूर्वीच्याच क्रमाने क्रमवीक्षण पुन्हा सुरू करते. अशा रीतीने दृश्य प्रतिमेचे पुनःपुन्हा क्रमवीक्षण करण्यात येते. दोन रेषांच्या सलग क्रमवीक्षणासाठी काही काळ (उदा., पासून पर्यंत शलाका येण्याकरिता लागणारा अवधी) ‘कोरा’ जातो. शेवटच्या रेषेच्या टोकापासून परत पहिल्या रेषेच्या आरंभस्थानी यावयास लागणारा काळ ( बिंदूपासून बिंदूपर्यंत शलाका येण्याकरिता लागणारा काळ) हाही कोराच असतो. या दोन्ही प्रकारच्या ‘कोऱ्या’ कालखंडांत प्रेषक मंडल प्रकाशाचे अस्तित्व दर्शविणारा संकेत पाठविणार नाही व ग्राही मंडलातील चित्रनकिलकेतील शलाका अनुस्फुरक पडद्यावर आघात करून प्रकाश उत्सर्जन करणार नाही, अशी व्यवस्था विशिष्ट विद्युत् आदेशाद्वारे दूरचित्रवाणीत केलेली असते.

आ. ११. आंतरगुफित क्रमवीक्षणआंतरगुंफित क्रमवीक्षण पद्धतीत वापरलेली रीत यापेक्षा निराळी असते (आ.११). या पद्धतीत शलाका क्रमाने एकाखाली एक अशा सर्व रेषांवर न धावता ती प्रथम विषम क्रमांकाच्या सर्व रेषांवरून धावते व नंतर सम क्रमांकांच्या सर्व रेषा घेते. असे करण्याने चित्रनलिकेत दिसणारे चित्र जास्त स्थिर दिसते. या पद्धतीत शलाका क्रमांक १ या अर्धरेषेच्या डाव्या बाजूपासून क्रमवीक्षणास सुरुवात करून अर्धरेषेच्या शेवटापर्यंत मार्ग आक्रमते. यानंतर क्र. २ या रेषेकडे न जाता ती क्रमांक ३ ची रेषा घेते. अशा रीतीने एकामागून एक विषम क्रमांकांच्या सर्व रेषा संपविल्यानंतर शेवटी ती पडद्याच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्याशी येऊन क्र. २ च्या रेषेच्या आरंभस्थानाकडे जाते. या स्थानापासून सुरुवात करून शलाका या व इतर सम क्रमांकांच्या सर्व रेषांचे क्रमवीक्षण पुरे करते. या क्रियेच्या शेवटी शलाका शेवटच्या अर्धरेषेच्या अखेरच्या टोकाला जाऊन तेथून आरंभस्थानी म्हणजे क्र. १ च्या अर्धरेषेच्या सुरुवातीच्या बिंदूपाशी झटकन परत येते. अशा रीतीने प्रतिमेची पुनःपुन्हा क्रमवीक्षण केले जाते. एक रेषा पूर्णपणे ओलांडण्यास शलाकेला सु. ६४ मायक्रोसेकंद (१ मायक्रोसेकंद = १०–६ सेकंद) एवढा कालावधी लागतो. दोन रेषांच्या क्रमवीक्षण क्रियांमध्ये याच्या सु. १६% वेळ, ‘कोरा कालखंड’ किंवा ‘विराम काल’ म्हणून सोडलेला असतो. दोन चौकटींच्या क्रमवीक्षणामधील कोरा किंवा विराम काल, प्रत्येक चौकटीच्या क्रमवीक्षणासाठी लागणाऱ्या कालखंडाच्या सु. ३½% ते ४% एवढा असतो. शलाकेच्या क्षैतिज भ्रमाणाचा वेग उदग्र भ्रमणाच्या वेगापेक्षा बराच जास्त असल्यामुळे उदग्र भ्रमाणातील ‘विराम’ कालखंडात शलाकेचे क्षैतिज भ्रमण घडविणारा आंदोलक चालूच असतो. याचा परिणाम असा होतो की, ६२५ रेषांपैकी सु. ७% ते ८% रेषा उदग्र कोऱ्या कालखंडात वाया जातात व दृश्य संकेतांतील अवगमाचे विद्यत् संकेतांत रूपांतर करण्यासाठी तेवढ्या कार्यशील रेषा प्रत्येक चित्रचौकटीच्या बाबतीत उपयुक्त होत नाहीत (प्रत्येक चौकटीचे क्रमवीक्षण विषम क्रमांकांचे रेषा व सम क्रमांकांच्या रेषा अशा दोन टप्प्यांमध्ये होते. या प्रत्येक टप्प्यास ‘साचा’ अश संज्ञा आहे). क्षैतिज दिशेने क्रमवीक्षण करावयास लागणाऱ्या काळानुसार बदलणाऱ्या विद्युत् प्रवाह संकेताची तंरगाकृती, समकालीकरण स्पंद, विराम काल, क्रियाशील क्रमवीक्षण काल यांविषयी स्पष्ट कल्पना आ. १२ वरून येईल. या आकृतीत एकूण क्षैतिज क्रमवीक्षण काल = ६३·५ मायक्रोसेकंद, विराम काल = ११·१ मायक्रोसेकंद व क्रियाशील क्रमवीक्षण काल ५२·४ मायक्रोसेकंद गृहीत धरलेला आहे.


आ. १२. क्षैतिज क्रमवीक्षणाच्या एका आवर्तनातील विद्युत् संकेत : अ. क्षैतिज क्रमवीक्षणाच्या एका आवर्तनातील विद्युते प्रवाहामधील कालानुसार तलन आ. त्याच कालातील तदनुरूप दृक्‌संकेताचे चलन : १. शलाका डावीकडून उजवीकडे वितलित होते अथवा क्रियाशील क्रमवीक्षण काल, २. शलाका परत फिरते-म्हणून दृक्‌संकेताकरिता विराम काल (१+२) आवर्तनकाल, ३. विद्युत् प्रवाहमूल्य, ४. समकालीकरण विद्युत् वर्चस् स्पंद, ५. दृक्‌संकेत.

आकृतीच्या (आ) भागात दाखविलेला समकालीकरण विद्युत् स्पंद हा काटकोन चौकोन तरंगाकृती असलेला विद्युत् दाब स्पंद असतो. स्पंदाचा अग्रभाग हा शलाकेला एक क्रियाशील क्रमवीक्षण काल संपवून आपल्या आरंभस्थानी नेण्याची क्रिया सुरू करतो. उदग्र दिशेत विचलन करण्याकरिता अशाच एक कमी कंप्रतेच्या विद्युत् प्रवाह तरंगाकृती व स्पंद वापरतात.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, इलेक्ट्रॉन शलाकेला चौकटीचे पूर्ण क्रमवीक्षण करण्याकरिता पुढील प्रकारच्या गती दिल्या पाहिजेत : (१) क्षैतिज स्थिर गती (क्रमवीक्षण रेषेवर डावीकडून उजवीकडे मार्गक्रमणासाठी), (२) क्षैतिज उलट गती (उजवीकडून डावीकडे परत येण्यासाठी या गतीचा कालवधी = विराम काल), (३) उदग्र दिशेत स्थिर गती (पडद्यावर वरून खाली मार्गक्रमणासाठी),  (४) उदग्र दिशेत उलट गती (एका चौकटीचे क्रमवीक्षण पूर्ण झाल्यावर खालून वर परत येण्यासाठी).

प्रत्येक गतीचा अंत व आरंभ समकालीकरण स्पंदाच्या साहाय्याने केला जातो. क्षैतिज व उदग्र वेग अशा रीतीने निश्चित केलेले असतात की, एका क्षैतिज रेषेचे क्रमवीक्षण केल्यानंतर शलाकाबिंदू त्या क्रमवीक्षण करावयाच्या आरंभापाशी परत जातो. चित्रचौकटीचे विभाजन ज्या आडव्या रेषांमध्ये झालेले असते, त्या रेषांच्या जाडीइतकीच शलाकाबिंदूची जाडी असली पाहिजे, हे उघड आहे. पटलावर पडणारा शलाकेचा बिंदू गोलाकार असून त्याचे क्षेत्रफळ साधारणपणे ०·००४ चौ. सेंमी. एवढे असते.

प्रेषण : काळे–पांढरे चित्र प्रेषित करण्याची पद्धत अधिक सुलभ असल्यामुळे तिचाच विचार येथे विस्ताराने केला आहे. दूरचित्रवाणीमध्ये (१) दृक् व (२) श्राव्य या दोन प्रकारचा अवगम एकाच वेळी प्रक्षेपित करावयाचा असतो. हे कार्य करण्याकरिता वापरण्यात येणारी योजना ठोकळमानाने आ. १३ मध्ये दाखविली आहे. दृश्यापासून (१९) मिळणाऱ्या प्रकाश संकेताचे कॅमेऱ्याच्या (१) द्वारे विद्युत् संकेतात रूपांतर करून ते संकेत दृक्‌विवर्धकास (२) पुरवले जातात. क्रमवीक्षण क्रियेकरिता लागणारे विद्युत् संकेत व समकालीकरण संकेत जनित्र समूहामध्ये (३) निर्माण केले जातात. यांपैकी समकालीकरण संकेत दृक्‌संकेताबरोबरच विवर्धकाला पुरवले जातात. दृश्य चित्र हवे तसे मिळत आहे की नाही याची प्राथमिक परीक्षा करण्याकरिता चित्रपरीक्षा विवर्धक (१५) व परीक्षा चित्रनलिका (१६) यांचा उपयोग होतो. दृक्‌संकेताच्या योगाने रेडिओ कंप्रता आंदोलकाने (५) निर्माण केलेल्या तरंगांचे परमप्रसर–विरूपण [→ विरूपण] केले जाते.


 आ. १३. दूरचित्रवाणी प्रेषक मंडल योजनेचा आराखडा : १. दूरचित्रवाणी कॅमेरा, २. दृक्‌ कंप्रता विवर्धक, ३. क्रमवीक्षण व समकालीकरण संकेत जनित्र, ४. दृक् विरूपक, ५. दृक् संदेशवाहक कंप्रता आंदोलक, ६. विरूपित विवर्धक (चित्र) ७. उपपट्टा गाळणी, ८. विविध संकेत भारक, ९. ध्वनिग्राहक, १०. श्राव्य कंप्रता विवर्धक, ११. श्राव्य विरूपक, १२. ध्वनीसंकेत वाहक कंप्रता, १३. विरूपित विवर्धक (ध्वनी), १४. आकाशक, १५. चित्रपरीक्षा विवर्धक, १६. परीक्षा चित्रनलिका, १७. ध्वनी परीक्षक-विवर्धक, १८. ध्वनीश्रेपक, ११. दृश्य.प्रत्येक दूरचित्रवाणी केंद्रास साधारणपणे ६ मेगॅहर्ट्‌झ रुंदीचा कंप्रता पट्टा नेमून  दिलेला असतो. या कंप्रता पट्ट्याला ‘परिवाह’ अशी संज्ञा आहे. विरूपण क्रियेमध्ये आणि या मूल्यांच्या दोन कंप्रता वापरल्यास (फ+ब) आणि (फ–व) या विरूपित कंप्रतेपेक्षा अनुक्रमे अधिक व कमी मूल्यांच्या नवीन कंप्रता निर्माण होतात. पण दृक्‌संकेत एकाच कंप्रतेचा नसून ४–५ मेगॅहर्ट्‌झ रुंदीचा कंप्रता पट्टा त्याने व्यापलेला असतो. म्हणून या संकेताने वाहन तरंगाचे विरूपण केले असता वाहक तरंगाच्या कंप्रतेपेक्षा (१) जास्त व (२) कमी कंप्रता असलेले दोन कंप्रता उपपट्टे निर्माण होतात. दृश्य चित्रातील अवगम वाहक कंप्रतेच्या दोन्ही बाजूंस अशा रीतीने तयार झालेल्या उपपट्ट्यातच सामावलेला असतो. तांत्रिक सोयीकरता विद्युत् गाळणीच्या (७) साहाय्याने वाहक कंप्रतेपेक्षा कमी कंप्रतेचा उपपट्टा अंशतः काढून टाकलेला असतो. उच्च कंप्रता उपपट्टा व कमी कंप्रता उपपट्ट्याचा उरलेला काही भाग यांचा उपयोग प्रेषण कार्याकरिता करण्यात येतो. दृश्याशी संबंधित ध्वनिसंकेत ध्वनिग्राहक (९) यंत्राच्या योगाने पकडून त्यांचे प्रथम विवर्धन (१०) केले जाते. विवर्धकाच्या प्रदान ऊर्जेचा काही भाग आणखी विवर्धित (१७) करून परीक्षा ध्वनिक्षेपकास (१८) पुरवला जातो. प्रेषित होत असलेल्या ध्वनी अवगमाची प्राथमिक परीक्षा या योजनेमुळे करता येते. ध्वनिसंकेताचा उरलेला भाग विवर्धित (११) करून वाहक रेडिओ कंप्रता तरंगांची (१२) कंप्रता–विरूपण करण्याकरिता वापरण्यात येतो. दृक् व ध्वनिवाहक रेडिओ तरंगांची कंप्रता सारखी नसते. दृक्‌वाहक तरंगाची कंप्रता दूरचित्रवाणी केंद्राच्या परिवाहाच्या किमान कंप्रतेपेक्षा १·२५ मेगॅहर्ट्‌झने अधिक असते, तर ध्वनिवाहक तरंगाची कंप्रता परिवाहाच्या उच्च कंप्रता मर्यादेपेक्षा ०·२५ मेगॅहर्ट्‌झने कमी असते. या दोन निरनिराळ्या कंप्रतांच्या वाहक तरंगांचे विरूपणही वेगवेगळ्या तऱ्हेने करतात. हे येथे लक्षात घेतले पाहिजे की, दृक्‌वाहक तरंगाचे परमप्रसर विरूपण केलेले असते, तर ध्वनिवाहक तरंगाचे कंप्रताविरूपण केलेले असते. या दोन कंप्रतांचे तरंग विविध संकेत भारकाद्वारे एकाच वेळी आकाशकाला पुरवून प्रक्षेपित केले जातात.

दूरचित्रवाणी प्रेषक मंडल योजनेत (३) क्रमांकाने दाखविलेल्या नियंत्रण संकेत जनित्र समूहाचे कार्य फार महत्त्वाचे आहे. यांपैकी एक जनित्र म्हणजे इलेक्ट्रॉनीय आंदोलक असून त्याची कंप्रता ३१,२५० हर्ट्झ एवढी असते. बहुकंपक पद्धतीची मंडले [→ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] वापरून या कंप्रतेचे योग्य त्या उपपट्टीत क्रमशः विभाजन केले जाते. उदा., या पद्धतीने बहुकंपक मंडलापासून १५६२६, ६२५०, १२५०, २५० व ५० हर्ट्झ इ. कंप्रतांचे संकेत मिळू शकतात. ६२५ क्षैतिज रेषांचे १/२५ सेकंदात आंतरगुंफीत पद्धतीने क्रमवीक्षण करावयाचे असल्यास क्षैतिज क्रमवीक्षक जनित्राची कंप्रता १५,६२५ एवढी असावी लागते. क्रमवीक्षणामध्ये मागे वर्णिल्याप्रमाणे चार महत्त्वाचे टप्पे असतात : (१) क्षैतिज गती, (२) एक रेषा पूर्ण केल्यानंतर पुन्हा दुसरी रेषा सुरू करण्याकरिता इलेक्ट्रॉन शलाकेला आरंभ बिंदूवर झटकन परत आणणे, (३) उदग्र गती, (४) प्रतिमा चौकट पूर्ण केल्यानंतर परत दुसरी फेरी सुरू करण्याकरिता इलेक्ट्रॉन शलाकेला आरंभ बिंदूवर झटकन परत आणणे. याकरिता लागणारे निरनिराळ्या कंप्रतांचे संकेत व स्पंद या जनित्र समूहामधूनच मिळतात. या निरनिराळ्या गतींमध्ये असणारा कालानुक्रम व कालसंबंध जनित्र नियंत्रणक्रियेद्वारे स्थिर ठेवला जातो. या नियंत्रक मंडलाची कंप्रता प्रत्यावर्ती विद्युत् पुरवठ्याची कंप्रता आधारभूत धरून स्थिर करण्यात येते. येथे हे नमूद केले पाहिजे की, भारतात व यूरोपातील देशांत जरी आवृत्तीय विद्युत् पुरवठ्याची कंप्रता ५० हर्ट्झ असली, तरी अमेरिकेत व कॅनडात ही ६० हर्ट्झ असते.


प्रेषणाची प्रत्यक्ष योजना : रेडिओ प्रेषणाकरिता उपयोगात असलेल्या रेडिओ तरंगांच्या कंप्रतेपेक्षा दूरचित्रवाणीसाठी बऱ्याची जास्त कंप्रतेचे (४० मेगॅहर्ट्‌झपेक्षा जास्त) रेडिओ तरंग वापरतात. दूरचित्रवाणीच्या परिवाहाचा कंप्रता पट्टा ६ मेगॅहर्ट्‌झ रुंद असतो. परिवाहाच्या रुंदीपेक्षा वाहक तरंगांची कंप्रता अनेक पटींनी जास्त असल्याशिवाय इतक्या रुंदीचा कंप्रता पट्टा मिळू शकत नाही. त्यामुळे अतिउच्च किंवा अत्यंत उच्च कंप्रता पट्ट्यामधील कंप्रता दूरचित्रवाणी प्रेषणासाठी वापरणे अपरिहार्य ठरते. इतक्या उच्च कंप्रतांचे तरंग ⇨ आयनांबरापासून परावर्तित न होता ते आयनांबराला भेदून पुढे जातात. त्यामुळे दूरचित्रवाणीचे आकाशक मंडल असे बनविलेले असते की, त्याच्यापासून प्रेषित होणारे दूरचित्रवाणी तरंग क्षैतिज पातळीशी फारसा मोठा कोन करून आकाशाकडे जात नाहीत. ते पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर दिशेत म्हणजेच क्षैतिज पातळीत प्रगत होतात. पृथ्वीचा पृष्ठभाग सपाट नसून वक्र असल्यामुळे अशा रीतीने प्रेषित केलेले तरंग प्रेषक आकाशकापासून मर्यादित अंतरापर्यंतच (आकाशक भरपूर उंच जागी बसविला असल्यास सु. १५० किमी. अंतरापर्यंतच) ग्रहण करता येतात.

परिवाह क्रमांक

कंप्रता पट्टा (मेगॅहर्ट्‌झमध्ये)

५४-६०

६०-६६

६६-७२

७६-८२

८२-८८

७-१३

१७४-२१६ (प्रत्येकी ६ मेगॅहर्ट्झ)

१४-८३

४८०-८९० (प्रत्येकी ६ मेगॅहर्ट्झ)

(मूळचा १ क्रमांकाचा परिवाह आता इतर प्रकारच्या संदेशवहनाकरिता वापरतात).

मुख्य प्रेषण केंद्राचे कार्यक्षेत्र वाढविण्याकरिता अनेक पद्धती वापरता येतात. (१) अभिचालक पद्धतीत मुख्य केंद्राने प्रेषित केलेला कार्यक्रम जमिनीवर, त्यापासून योग्य अंतरावर व जागी बसविलेल्या अभिचालक दुय्यम स्थानकाद्वारे ग्रहण व विवर्धन करून तो पुन्हा प्रेषित करण्यात येतो. याच प्रकारच्या तंत्राने मुंबई येथून प्रेषित केले जाणारे कार्यक्रम पुणे उपस्थानकापासून परत प्रेषित केले जातात. मुंबई येथून प्रेषित होणाऱ्या मूळ संकेताची कंप्रता व त्यापासून पुणे येथून होणाऱ्या पुनःप्रेषित होणाऱ्या पुनःप्रेषित संकेताची कंप्रता या एकमेकींपासून भिन्न आहेत, हे विदितच आहे. (२) अवकाशात हजारो किलोमीटर उंचीवर सोडलेल्या कृत्रिम क्रियाशील उपग्रहाच्या साह्याने हे कार्य जास्त मोठ्या प्रमाणावर करता येते. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम पृथ्वीवरील एका ठिकाणाहून ग्रहण करून ते दुसऱ्या दूरच्या ठिकाणी या प्रकारे पाठवता येतात. मात्र ते पृथ्वीवरील उपग्रह संदेशवहन केंद्राकडून ग्रहण करून पुनःप्रेषित करावे लागतात (उदा., पुणे जिल्ह्यातील आर्वी येथील उपग्रह संदेशवहन केंद्र). संबंध भारताकरिता एक मध्यवर्ती दूरचित्रवाणी योजना अंमलात आणण्यासाठी अशाच प्रकारचा संदेशवहन उपग्रह वापरण्याच्या कल्पनेचा विचार चालू आहे [→ उपग्रह संदेशवहन दूरदर्शन].

 

एका दूरचित्रवाणी केंद्राला कार्यक्रम प्रेषित करण्याकरिता ६ मेगॅहर्ट्‌झ रुंदीचा कंप्रता पट्टा लागतो, याचा उल्लेख वर आलाच आहे. या रुंदीचे निरनिराळे परिवाह निश्चित करून ते विविध दूरचित्रवाणी केंद्राना नेमून देतात. या परिवाहांच्या कंप्रतामर्यादा कोष्टकातल्याप्रमाणे आहेत. 


आ. १४. दूरचित्रवाणी केंद्राचा परिवाह : १. दृक्‌संकेत उच्च कंप्रता उपपट्टा (५५.२५ ते ५९.२५), २. कमी कंप्रता उपपट्ट्याचा भाग दृक‌संकेताकरिता उपयोगात आणतात, ३. ध्वनीसंकेत कंप्रता पट्टा.)

यांपैकी कोणत्याही प्रातिनिधिक परिवाहावरील दृक् व ध्वनी वाहकतरंगांचा कंप्रता पट्टा आणि विरूपण केल्यानंतर व उपपट्टा गाळणीतून पाठवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या संकेताचा एकूण कंप्रता पट्टा यांमधील संबंध आ. १४ वरून स्पष्ट होईल. या आकृतीत केंद्रास नेमून दिलेल्या कंप्रता परिवाहाच्या मर्यादा ५४ ते ६० मेगॅहर्ट्झ आहेत, असे मानले आहे. दृक्‌वाहक तरंगाची कंप्रता ५४ + १·२५ मेगॅहर्ट्‌झ एवढी असते. त्याबरोबर ०–४·५ मेगॅहर्ट्‌झ या मर्यादेतील कंप्रता असलेल्या घटक संकेतांनी वाहक तरंगाचे विरूपण केल्यामुळे उच्च कंप्रता उपपट्ट्याच्या मर्यादा ५५·२५ मेगॅहर्ट्‌झ व जवळजवळ ५९·२५ मेगॅहर्ट्‌झ अशा होतात. ध्वनिवाहक तरंगाची कंप्रता ६०–०·२५ = ५९·७५ मेगॅहर्ट्‌झ एवढी असते. या वाहक तरंगाचे ध्वनिसंकेतांनी कंप्रता विरूपण केल्यामुळे निर्माण झालेला कंप्रता पट्टा वरील आकृतीत दाखविला आहे.

आ. १५ प्रेषक मंडलाची जोडणी दृक्संकेत विभाग १. ५५.२५/१२ मेगॅहर्ट्झ कंप्रता आंदोलक (स्फटीक नियंत्रण), २. कंप्रता गुमक, ३. शक्तिविवर्धक, ४. विरूपित विवर्धक, ५. विद्युत् गाळणी, ६. दृक् संकेत विवर्धक, ७. उच्चतम विवर्धक. ८. एकदिश विद्युत् दाब पुनःस्थापक, ९. विरूपक विवर्धक, १०. दृक् संकेत, ११. आकाशाकाकडे.

प्रेषक मंडलात वापरण्यात आलेल्या दोन रेडिओ कंप्रता आंदोलकाची (दृक्‌संकेत वाहक व ध्वनिसंकेत वाहक) कंप्रता स्थिर ठेवण्याकरिता विशेष उपाययोजना करावी लागते. याकरिता वारण्यात आलेले तंत्र आ. १५ मध्ये दाखविलेल्या प्रेषक मंडलाच्या काही विभागांच्या जास्त तपशीलवार मंडलजोडणीवरून स्पष्ट होईल. ५५·२५ मेगॅहर्ट्‌झ या कंप्रतेच्या आंदोलकाची आंदोलन कंप्रता नियंत्रण वापरून स्थिर करणे अवघड असल्यामुळे या जोडणीची सुरुवात ५५·२५/१२ मेगॅहर्ट्‌झ इतक्या कंप्रतेच्या स्फटिक नियंत्रित स्थिर आंदोलकापासून (१) होते. एक किंवा अधिक टप्प्यांनी कंप्रता गुणक (२) मंडले वापरून ही कंप्रता पाहिजे तितक्या पटीने वाढविता येते. उरलेल्या (३), (४) व (५) या घटकांचे कार्य आकृतीवरून समजण्यासारखे आहे. दृक्‌संकेत जोडणीतील (६), (७) व (८) या घटकांच्या कार्याचे वर्णन पूर्वी केले आहे. प्रेषित करण्यात यावयाच्या संकेतातील संदर्भभूत पातळीचे विद्युत् दाबमूल्य दृश्यातील पार्श्वभूमीच्या सर्वसाधारण प्रकाश तीव्रतेच्या प्रमाणात निश्चित करणे हे एकदिश विद्युत् दाब पुनःस्थापकाचे (८) कार्य होय. त्याला आपण अंधारमय म्हणू अशा (दृश्याच्या) भागातून येणाऱ्या प्रकाश तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या विद्युत संकेताची विद्युत् दाब पातळी नेहमी एकच असेल, अशी व्यवस्था या पुनःस्थापकामुळे आपोआप होते.

 आ. १६. प्रेषक आकाशकाचे काही मूलभूत प्रकार : अ. एकाकी द्विध्रुवी आकाशक ा. दुहेरी द्विध्रुवी आकाशक इ. द्विध्रुवी आकाशकांचा समुच्चय. = तरंगलांबी. प्रेषक आकाशक : या आकाशकाचा आकार व रचनाकृती निश्चित करण्याकरिता खालील दोन निकष वापरण्यात येतात. (१) प्रेषित विद्युत् चुंबकीय ऊर्जा ज्या दिशेला जास्तीत जास्त उपयोगात आणता येईल त्या दिशेलाच आकाशकाचे प्रारण केंद्रित व्हावे. उदा., आकाशकाचे उदग्र दिशेला ऊर्जा मुळीच प्रक्षेपित करू नये, कारण तिचा उपयोग करून घेता येत नाही. (२) परिवाहाच्या कंप्रता पट्ट्यामध्ये आकाशकाचा संरोध (सर्व प्रकारचा एकूण रोध) कमी व स्थिर असावा. यांपैकी पहिले उद्दिष्ट आकाशकाचे प्रारण विशिष्ट योजना वापरून विशिष्ट दिशेला केंद्रित केले असता सफल होते. एकाकी द्विध्रुवी आकाशकाच्या द्वारे उदग्र पातळीत ध्रुवित केलेले (एकाच, येथे उदग्र, पातळीत कंप पावणारे) विद्युत् चुंबकीय तरंग जर प्रेषित केले, तर ऊर्जा क्षितिजाच्या पातळीतच फेकली जाते व उदग्र दिशेने आकाशकाकडे जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण शून्य असते. याउलट द्विध्रुवी आकाशकापासून क्षैतिज पातळीत ध्रुवित केलेले तरंग पाठवले, तर क्षैतिज पातळीत व उदग्र दिशेत सारख्याच प्रमाणात ऊर्जेचे प्रेषण होते, असे आढळते. एकाकी द्विध्रुवाऐवजी उदग्र प्रतलात एकावर एक ठराविक अंतरावर बसविलेल्या अनेक द्विध्रुवी घटकांचा आकाशक समुच्चय वापरला, तर उदग्र दिशेला जाणाऱ्या ऊर्जेचे मूल्य अत्यंत कमी करता येते. द्विध्रुवी घटक वापरून बनविलेल्या आकाशकांचे काही मूलभूत प्रकार आ. १६ मध्ये दाखविले आहेत. याच प्रकारचे द्विध्रुवी घटक ग्राहीला जोडलेल्या आकाशकातही वापरतात. आकाशकाची विशिष्ट पद्धतीने रचना करून वर उल्लेख केलेले दुसरे उद्दिष्टही साध्य करता येते [→ आकाशक].


आ. १७. ग्राही आकाशकाचे आणखी काही प्रकार : अ. समभुज चौकोनाकृती आकाशक आ. Vआकाशक : १. ग्राही अग्राकडे इ. सामान्य प्रचारात असलेला घडीचा द्विध्रुवी यागी आकाशक : १. परावर्तक, २. घडीचा द्विध्रुवी ३., ४, व ५. दिक्‌देशक.

ग्रहण करावयाच्या संकेताची शक्ती : चित्रनलिकेला पुरविण्यात येणाऱ्या संकेताची पातळी विद्युत् गोंगाटाच्या [विद्युत् प्रयुक्तींमध्ये वा प्रणालींमध्ये व्यत्यय आणणाऱ्या व अनावश्यक असलेल्या विद्युत् प्रवाहांच्या वा विद्युत् दाबांच्या → विद्युत् गोंगाट] पातळीपेक्षा काही ठराविक पटीने (सु. ३० डेसिबेल) जास्त न ठेवल्यास दिसणारे चित्र पुरेसे स्पष्ट व अचूक असत नाही. विद्युत् गोंगाटाच्या उत्पत्तीची कारणे मुख्यतः दोन आहेत. (१) मंडलाच्या घटकांतील इलेक्ट्रॉनांच्या इतस्तः हालचालीमुळे निर्माण होणारा गोंगाट. याला औष्णिक गोंगाट अशी संज्ञा असून इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तमध्ये निर्माण होणाऱ्या अशा गोंगाटाचे मूल्य २ ते ५ मायक्रोव्होल्ट इतके असते. (२) मानव वापरीत असलेल्या अनेक तऱ्हेच्या विद्युत् यंत्रांपासून व विद्युत् साधनांपासून निर्माण होणारा गोंगाट. या प्रकारच्या गोंगाटाचे प्रमाण औद्योगिक कारखाने व यंत्रसामग्री ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी अर्थातच जास्त राहते. ग्राहीला जोडलेल्या आकाशकापासून ग्राहीच्या आदान अग्रापर्यंत येताना संकेत काही प्रमाणात क्षीण होतो. हे विचारात घेता मानवनिर्मित गोंगाट जेथे फारसा नाही अशा लोकवस्तीच्या ठिकाणी ग्राहीला मिळणारे संकेत आदान किमान ५०० मायक्रोव्होल्ट असावे, असे ठरविण्यात आले आहे व जेथे मानवनिर्मित विद्युत् गोंगाट बऱ्याच प्रमाणात उपस्थित असेल तेथे संकेत विद्युत् दाब किमान ५,००० मायक्रोव्होल्ट असावा, असे ठरवले गेले आहे. प्रेषक आकाशकापासून निघालेला संकेत अंतराप्रमाणे क्षीण होत होत ज्या ठिकाणी तो वर निर्देश केलेले किमान मूल्य धारण करतो तेथपर्यंत प्रेषण केंद्राच्या क्षेत्राची मर्यादा राहते. प्रेषक आकाशकापासून (आकाशक पुरेशा उंचीवर बसविला असल्यास) सर्व दिशांना साधारणपणे १५० किमी. इतका या क्षेत्राचा विस्तार असतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वक्राचाही या मर्यादेवर परिणाम होतो. ग्राहक आकाशकाची जमिनीपासून उंची जेवढी जास्त किंवा त्याची लांबी अथवा आकारमान जेवढे जास्त तेवढी संकेताची शक्ती अधिक मिळते. साधारपणपणे ग्राही आकाशक जमिनीपासून सु. ९ मी. उंचीवर बसविलेला असतो.

ग्राही आकाशक : ग्राही आकाशक बव्हंशी प्रेषक आकाशकासारखेच असतात. आजूबाजूच्या उंच इमारती, टेकड्या इत्यादींपासून होऊ शकणारे दूरचित्रवाणी संकेताचे परावर्तन व त्यामुळे अंतिम चित्रात होणारी विकृती ही शक्यतो कशी टाळता येईल, याचा विचार आकाशकाचा आकार व स्थान ठरविताना करावा लागतो. साधारणपणे द्विध्रुवी आकाशक व त्यांचे समुच्चय दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे ग्रहण करण्यासाठी वापरले जातात. आकाशक उंच जागी आणि इतर उंच वस्तूंपासून जास्तीत जास्त दूर राहील अशा रीतीने बसवितात. आकाशकाची कार्यक्षमता सर्व दिशांना सारखी नसून ती विशिष्ट दिशेला महत्तम असल्यामुळे इष्ट संकेत ग्रहणासाठी अनुकूल अशी त्याची उभारणी व दिशा करावी लागते.

द्विध्रुवी आकाशकाला पर्यायी म्हणून आ. १७ मध्ये दाखविलेले (१) समभुज चौकोनी किंवा (२) इंग्रजी व्ही (V) अक्षराच्या आकाराचे आकाशक बऱ्याच वेळा वापरतात. सुप्रसिद्ध यागी (एच्. यागी या जपानी विद्यत् अभियंत्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा) समुच्चयही यासाठी वापरतात. सर्वसामान्यपणे पुणे–मुंबई परिसरात दूरचित्रवाणी ग्राहीकरिता आकाशक म्हणून घडीच्या द्विध्रुवी यागी आकाशकाचा उपयोग केला जातो. याची संरचना आ. १७ (इ) मध्ये दाखविली आहे. यामध्ये मध्यवर्ती घडीचा द्विध्रुवी (२) असून (लांबी λ/२) त्याच्या एका बाजूला परावर्तक (१) असतो, तर दुसऱ्या बाजूला तीन (वा अधिक) दिक्‌देशक घटक असतात. परापवर्तक व दिक्‌देशक यांच्या लांब्या साधारपणपणे λ/२ पेक्षा ५–१०% कमी असतात. परावर्तक व पहिला दिक्‌देशक यांचे द्विध्रुवापासूनचे अंतर, तसेच उरलेल्या दिक्‌देशकांपैकी लागोपाठच्या दिक्‌देशकांचे एकमेकांपासूनचे अंतर सारखेच (≈ λ/५) असते. परावर्तक आणि दिक्‌देशक बसविल्यामुळे या आकशकाला दिशिक गुणधर्म प्राप्त होतात. यामुळे ग्राहीमधील चित्र अधिकतम स्पष्ट मिळावे. याकरिता हा आकाशक एका विशिष्ट दिशेत उभारावा लागतो.


आकाशकापासून ग्राहीच्या आदान अग्रापर्यंत संकेत वाहून नेण्याकरिता (१) समांतर प्रेषण तारा [प्रेषण मार्ग], (२) ⇨ समाक्ष केबल व (३) व्यावृत जोडी (एकमेकांपासून निरोधित केलेल्या व एकत्रितपणे पिळलेल्या पण समाईक आवेष्टन नसलेल्या संवाहकांची जोडी) या पर्यायी पद्धती उपलब्ध आहेत. यांपैकी शेवटच्या दोन पद्धती विशेष कार्यक्षम व सोयीच्या समजले जातात.

सामुदायिक ग्राही आकाशक योजना : १९५० सालापासून या पद्धतीचा विशेष प्रचार अमेरिका व ब्रिटन या देशांत झालेला आढळतो. हीमध्ये अनेक दूरचित्रवाणी ग्राहीना संकेत पुरविण्याकरिता एकच आकाशक वापरतात. हा आकाशक ग्राहीपासून दूर उंचावर ज्या जागी दूरचित्रवाणी संकेतांचे ग्रहण चांगले होते, अशा जागी बसविला जातो. त्यापासून मिळणारा संकेत समाक्ष तारांद्वारे प्रत्येक ग्राहीला पुरविला जातो. ज्या ग्राही स्थानाभोवती उंच टेकड्या आहेत किंवा आजूबाजूस उंच इमारती आहेत व ज्यामुळे नेहमीच्या रीतीने दूरचित्रवाणी कार्यक्रम मिळविण्यात अडचणी येतात, अशा ठिकाणाची या योजनेमुळे चांगली सोय होते. काही तज्ञांच्या मते या पद्धतीत सुधारणा केली असता तिच्या द्वारे कोणत्याही एका दूरचित्रवाणी ग्राहीचा उपयोग करून (दूरध्वनी योजनेत ज्याप्रमाणे विनिमय केंद्राच्या साह्याने पाहिजे त्या ठिकाणी संपर्क साधता येतो त्याप्रमाणे) पाहिजे तो परिवाह निवडणे शक्य होईल. सध्याच्या ग्राहीत परिवाहनिवड स्विच वापरून कार्यक्रम ग्रहण करता येतो. यूरोप, अमेरिका व जपान येथील मुख्य मुख्य शहरांमधून दोन–चार परिवाहांतून कार्यक्रम एकाच वेळी प्रेषित केले जातात. न्यूयॉर्क, टोकिओ अशा काही शहरांमधून एकाच वेळी ७ परिवाहांतून प्रेषण केले जाते. नवीन पद्धतीत निवड करता येईल अशा परिवाहांची संख्या खूप जास्त म्हणजे १२–२० पर्यत वाढविता येईल, अशी कल्पना आहे.

दूरचित्रवाणी ग्राही : ग्राही मंडलाचे महत्त्वाचे विभाग आ. १८ मध्ये दाखविले आहेत. प्रत्येक विभागाच्या कार्याचे वर्णन थोडक्यात खाली दिले आहे.

मेलक व मिश्रक (१) : मेलन मंडल (प्रेषण केंद्राच्या कंप्रतेशी जुळणी करणारे मंडल), विवर्धक, स्थानिक आंदोलक व मिश्रक यांचा समावेश क्र. १ घटकांत होतो. दूरचित्रवाणी केंद्राची त्याच्या कंप्रता पट्ट्यानुसार निवड, त्या केंद्रापासून येणाऱ्या संकेताचे विवर्धन व स्थानिक आंदोलकाने निर्माण केलेल्या आंदोलनांशी परासंकरण (सुपरहेटेराेडाइन) पद्धतीने मिश्रण करून मध्यम कंप्रतेचे संकेत मिळविणे, हे कार्य होय. या क्रियेमध्ये मूळ संकेतातील प्रत्येक कंप्रता घटकाचे आंदोलकाच्या कंप्रतेशी परासंकरण होऊन मूळ घटकाचे रूपांतर (आंदोलकाची कंप्रता–मूळ घटकाची कंप्रता) इतक्या कंप्रतेच्या घटकामध्ये होते व अशा रीतीने मूळ संकेताच्या कंप्रता पट्ट्याऐवजी मध्यम कंपतेचा तेवढ्याच रुंदीचा कंप्रता पट्टा तयार होतो. ध्वनिसंकेतासहित मूळच्या संपूर्ण संकेताचे असे रूपांतर होते.

मध्यम कंप्रता विवर्धक (२) : याच्या द्वारे मध्यम कंप्रता संकेताचे १,५०० ते १०,००० पटींनी विवर्धन होते. जवळपासच्या वाहक कंप्रतेवर प्रेषण करणाऱ्या अन्य दूरचित्रवाणी केंद्राच्या संकेतामुळे व्यतिकरण (सारख्या तरंगलांबीच्या तरंगांच्या दोन वा अधिक मालिका एकमेकींवर अध्यारोपित झाल्यामुळे –पडल्यामुळे –होणारा परिणाम) होऊन इष्ट संकेतात बिघाड होऊ नये, याकरिता या घटकांना चांगल्या प्रतीची विवेचनक्षमता (निवड करण्याची क्षमता) असावी लागते.

दृक्‌शाेधक (३) : मध्यम कंप्रता विवर्धकाने प्रदान केलेल्या ऊर्जेतून मूळ दृक्‌संकेत वेगळे करणे हे या घटकाचे कार्य असते. चित्रनलिकेतील इलेक्ट्रॉन शलाकेची हालचाल योग्य कालक्रमाने नियंत्रित करण्याकरिता लागणारे समाकालीकरण स्पंद दृक्‌संकेतांबरोबरच या घटकापासूनच मिळतात. ध्वनिसंकेताच्या बाबतीत शोधक (१०) हा मिश्रकाचेही कार्य करतो. दृक्‌संकेत वाहक व ध्वनिसंकेत वाहक यांच्या कंप्रतांमधील फरक ४·५ मेगॅहर्ट्‌झ इतका असतो व पहिल्या मिश्रकाने मूळ संकेताचे मध्यम कंप्रतेला रूपांतर केल्यावरही हा फरक तेवढाच राहतो. शोधकामध्ये या मध्यम कंप्रतेच्या दोन वाहक तरंगांमध्ये परासंकरण क्रिया होऊन शोधकाच्या प्रदान ऊर्जेमध्ये ४·५ मेगॅहर्ट्‌झ कंप्रतेचा नवीन कंप्रता घटक निर्माण होतो. हा घटक ध्वनिसंकेताचे कंप्रताविरूपित केलेला असतो. ४·५ मेगॅहर्ट्‌झ या कंप्रतेला मेलित केलेल्या मंडलाने हा घटक संकेत अलग करून ध्वनी मध्यम कंप्रता विवर्धकाला (९) पुरविला जातो. ध्वनिसंकेत वेगळे करण्याच्या पद्धतीला आंतर–वाहक तरंग ध्वनिपद्धती अशी संज्ञा आहे.


दृकसंकेत (४) : हा शोधकापसून मिळालेल्या दृक्‌संकेताचे विवर्धन करून त्याची पातळी ५० ते १०० व्होल्टपर्यंत वाढवितो. एकदिश विद्युत् दाबाचे पुनःस्थापन करून चित्रनलिकेच्या पडद्यावर उमटणाऱ्या चित्रांतील पार्श्वभूमीच्या सरासरी प्रकाश-तीव्रतेचे मूल्य निश्चित करण्याचे कार्यही या घटकातच होते. यासाठी शोधकाच्या प्रदान संकेतामधील एकदिश विद्युत् दाबाचा उपयोग करून घेण्यात येतो.

चित्रनलिका (५) : मूळ चित्र अगर दृश्य चित्रनलिकेच्या साह्याने पुन्हा मूळ स्वरूपात बघावयास मिळते. इलेक्ट्रॉन शलाकेची योग्य ती हालचाल घडवून आणण्याकरिता चुंबकीय क्षेत्रांचा वापर केलेला असतो. शलाकेची तीव्रता व केंद्रीकरण यांचे नियंत्रण करण्यासाठीही नलिकेमध्ये योजना केलेली असते. अनुस्फुरक पडद्यावर सु. ५८० कार्यशाली रेषांनी चित्रित केलेले व प्रत्येक रेषेत सु. ५२० चित्रघटक असलेले दृश्यचित्र उमटते (प्रत्येक चौकटीचे एकूण चित्रघटक : २,१०,०००). चित्रनलिकेचे आकारमान तिच्या ज्या पृष्ठावर चित्र उमटते त्याच्या (पडद्याच्या) कर्णमापाच्या प्रमाणात देतात. हे मूल्य सर्वसाधारणपणे ४६–६९ सेंमी. एवढे असते.

आ. १८. दूरचित्रवाणी ग्राही मंडलाचा आराखडा : १. मेलम मंडल, स्थानिक आंदोलक व विवर्धक, २. मध्यम कंप्रता विवर्धक, ३. दृक्‌शोधक, ४. दृक्‌संकेत विवर्धक, ५. चित्रनलिका, ६. समकालीकरण स्पंद विभक्तीकरण, ७. उदग्र गती प्रसर्प आंदोलक, ८. क्षैतिज गती प्रसर्प आंदोलक, (७ अ व ८ अ) विवर्धक, ९. ध्वनी मध्यम कंप्रता विवर्धक, १०. ध्वनीविवर्धक, १२. ध्वनीक्षेपक, १३. ग्राही आकाशक.

 समकालीकरण स्पंद विभक्तीकरण (६) : चित्रनलिकेतील शलाका आणि क्रमवीक्षण करणारी कॅमेरानलिकेतील इलेक्ट्रॉन शलाका यांच्या हालचालीत पूर्ण समकालीकरण राहावे याकरिता संकेताबरोबर प्रेषित करण्यात आलेले स्पंद शोधकाच्या (३) प्रदानात अंतर्भूत असतात. दृक्‌संकेताची विशिष्ट पातळीला छाटणी करून ते दृक्‌संकेतापासून वेगळे करण्याचे कार्य या घटकाकडून केले जाते. त्याबरोबरच शलाकेचे क्षैतिज व उदग्र विचलन नियंत्रित करणाऱ्या स्पंदाचा स्पंदनकाल निरनिराळा असल्यामुळे अवकलन मंडल [ज्याच्या प्रदान तरंगाचा आकार त्याच्या आदान तरंगाच्या आकाराच्या कालसापेक्ष अवकलजाने ठरविला जातो असे मंडल → अवकलन व समाकलन] व समाकलन मंडल (ज्याच्या प्रदान तरंगाचा आकार त्याच्या आदान तरंगाच्या आकाराच्या कालसापेक्ष समाकलाने ठरविला जातो असे मंडल) वापरून याच घटकामध्ये ते एकमेकांपासून अलग केले जातात.

 प्रसर्प आंदालक (७ व ८) : अलग केलेले उदग्र नियंत्रक स्पंद (७) या आंदाेलकास व क्षैतिज नियंत्रक स्पंद (८) या आंदोलकास पुरविले जातात. चित्रनलिकेच्या शलाकेची उदग्र व क्षैतिज दिशांनी हालचाल घडवून आणणाऱ्या वेटाेळ्यांना पुरविण्यासाठी योग्य त्या कंप्रतेचे व तरंगाकाराचे प्रसर्प (विचलन घडवून आणणारे) प्रवाह निर्माण करण्याचे कार्य हे आंदोलक करतात आणि या आंदाेलकांचे समकालीकरण क्र. ६ च्या घटकांत पुरविलेल्या स्पंदांनी होते. आंदोलकाच्या प्रदान ऊर्जेचे (७ अ) व (८ अ) या घटकांद्वारे विवर्धन करून प्रत्येक आंदोलकाची ऊर्जा योग्य त्या नियंत्रक वेटोळ्याला पुरविली जाते व अशा रीतीने शलाकेला उदग्र व क्षैतिज गती योग्य त्या क्रमाने दिल्या जातात.


 ध्वनी मध्यम कंप्रता विवर्धक (९) : शोधकाच्या प्रदानापासून मिळालेला (≈ ४·५ मेगॅहर्ट्‌झ या कंप्रतेचा) कंप्रता विरूपित संकेत म्हणजे दूरचित्रवाणीचा ध्वनिसंकेत असतो. क्र. ९ च्या घटकाने याचे विवर्धन केले जाते. हा विवर्धक म्हणजे योग्य ती पट्टा रुंदी असलेला मेलित विवर्धक [→ इलेक्ट्रॉनीय विवर्धक] असतो. याची मंडले इष्ट कंप्रतेला मेलित केलेली (जुळविलेली असतात).

ध्वनिशोधक (१०) : ध्वनी मध्यम कंप्रता विवर्धकाकडून मिळणाऱ्या कंप्रता विरूपित संकेतापासून मूळ ध्वनिसंकेत मिळविण्याचे कार्य या घटकाकडून केले जाते. कंप्रता विरूपित संकेत ग्रहण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ ग्राहीमधील शोधकाप्रमाणे हा घटक विवेचक किंवा गुणाेत्तर शोधक मंडलाच्या स्वरूपात असतो [→ शोधक].

श्राव्य विवर्धक (११) : ध्वनिशोधकापासून मिळणाऱ्या श्राव्य संकेताचे विवर्धन करून ध्वनिक्षेपकाला पुरविण्यासाठी आवश्यक तितकी श्राव्य कंप्रता संकेताची शक्ती वाढविणे, हे या घटकाचे कार्य होय.

ध्वनिक्षेपक (१२) :  श्राव्य कंप्रतेचे विद्युत् संकेताचे (क्र.११ या घटकाने पुरविलेल्या) प्रत्यक्ष ध्वनीमध्ये रूपांतर करण्याचे कार्य या घटकाकडून होते. रेडिओमधील ध्वनिक्षेपकासारखाच हा ध्वनिक्षेपक असतो [→ ध्वनिक्षेपक].

दूरचित्रवाणी संकेतांचे व्यतिकरण : चित्रनलिकेच्या पडद्यावर उमटणाऱ्या चित्रात अनेक कारणांमुळे बिघाड होऊ शकतो. यांपैकी मुख्य कारणे तीन असतात : (१) विद्युत् गोंगाट, (२) इष्ट केंद्राशिवाय इतर दूरचित्रवाणी केंद्रांमुळे होणारा व्यत्यय, (३) दूरचित्रवाणी संकेताच्या परावर्तनामुळे निर्माण होणारे चित्रपडसाद अथवा ‘भूत प्रतिमा’ (घोस्ट इमेजेस). विद्युत् गोंगाटामुळे चित्रावर हिमवर्षावाप्रमाणे भासणाऱ्या रेघोट्या दिसतात. ग्राही ज्या परिवाहाशी मेलित केला असेल, त्या परिवाहामध्ये व्यतिकरण संकेताची कंप्रता येत असेल, तर निर्माण होणारा व्यत्यय मूळ दृक्‌संकेत आणि व्यतिकरण संकेत यांच्यासापेक्ष शक्तीवर अवलंबून राहतो. या दोन संकेतांच्या कंप्रतांमध्ये जेवढ्या प्रमाणात फरक असेल तेवढ्या प्रमाणात व्यतिकरण संकेताची शक्ती कमी करण्याकरिता ग्राहीच्या विवेचन क्षमतेचा उपयोग करता येतो. एकाच कंप्रता परिवाहाची दोन दूरचित्रवाणी केंद्रे ग्राहीच्या स्थानाच्या जवळपास असतील, तर त्यामुळे पडद्यावरील चित्रांत ‘चिकाच्या पडद्यासारखी’ विकृती निर्माण होते. काही वेळा ग्राही ग्रहण करीत असलेल्या एका कार्यक्रमाच्या दूरचित्रवाणी कार्यक्रमामध्ये शेजारच्या कंप्रता परिवाहामध्ये प्रेषण करणाऱ्या अन्य केंद्राच्या कार्यक्रमामुळे व्यतिकरण निर्माण होते. या प्रकारामध्ये दोन वाहक कंप्रता किंवा कोणत्याही एका केंद्राची वाहक कंप्रता व दृक्‌संकेत विरूपणामुळे निर्माण झालेल्या दुसऱ्या केंद्राच्या उपपट्ट्यातील कंप्रता यांचे मिश्रण होऊन परिणामी चित्रात आवृत्तीय बदल घडून येतात. या व्यतिकरणामुळे सबंध चित्राकृतीवर बारीक टिंबे दिसू लागतात. दूरचित्रवाणीतील महत्त्वाचे व्यतिकरण म्हणजे ग्राहीला जोडलेल्या आकाशकाच्या आसपास असलेल मोठ्या इमारती, पूल, टेकड्या यांच्याकडून केंद्रापासून आलेल्या तरंगांचे परावर्तन होऊन त्यामुळे चित्रनलिकेच्या पडद्यावर दिसणारे चित्रपडसाद हे होय. परावर्तित तरंग शक्तीने कमी असतात. ते जास्त दूरच्या मार्गाने आकाशकाकडे प्रवास करीत असल्यामुळे सरळ मार्गाने येणाऱ्या तरंगांपेक्षा ते थोड्या उशीरा आकाशकाकडे पोहोचतात. परिणामतः परावर्तित तरंगांपासून निर्माण झालेली प्रतिमा मुख्य प्रतिमेपासून थोडी बाजूला सरकलेली व काहीशी अस्पष्ट अशी दिसते. यामुळेच परावर्तित तरंगांपासून अशा रीतीने तयार होणाऱ्या प्रतिमेला चित्रपडसाद किंवा भूत प्रतिमा अशा यथार्थ संज्ञा दिल्या आहेत. या तऱ्हेचे व्यतिकरण बहुमार्गी प्रेषण क्रियेमुळे होते असे म्हणता येईल. या भूत प्रतिमांमुळे चित्राची गुणवत्ता आणि स्पष्टपणा तर बिघडतातच. पण त्यामुळे समकालीकरण क्रियेमध्येसुद्धा मोठी विकृती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे परिणाम टाकण्याकरिता विशेष योजना करावी लागते. दूरचित्रवाणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राही आकाशकाची संवेदनक्षमता सर्व दिशांना सारखी नसून विशिष्ट दिशेला ती महत्तम असते. या गुणधर्माचा यासाठी उपयोग केला जातो. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आकाशकाची उंची व दिशा अशा रीतीने निश्चित केली जाते की, त्याची संवेदनक्षमता इष्ट दिशेला इतर कोणत्याही दिशेपेक्षा अनेक पटींनी जास्त असेल.


एकवर्णी दूरचित्रवाणी ग्राही नियंत्रक : वरील प्रकारच्या सर्वसाधारण ग्राहीमध्ये तो प्रत्यक्ष वापरण्याकरिता पुढील नियंत्रक असतात.

(१) परिवाह विवेचक स्विच : हा ग्राहीचे पाहिजे त्या परिवाह कंप्रतेशी मेलन करतो. (२) सूक्ष्म मेलन नियंत्रक : श्राव्य रेडिओमधील मेलकाप्रमाणे याचे कार्य असते. परिवाहातील वाहक कंप्रतेशी ग्राहीचे सूक्ष्ममेलन यामुळे केले जाते. (३) प्रकाश तीव्रता विरोध नियंत्रक : यामुळे दृक् विवर्धकातील चित्रसंकेताच्या विद्युत् वर्चस् पातळीचे नियंत्रण केले जाते. यामुळे चित्रनलिकेत मिळणाऱ्या चित्रातील प्रकाश व अंधार यांमधील विरोध बदलता येतो. (४) प्रकाश तीव्रता नियंत्रक : इलेक्ट्रॉन बंदुकीमधील नियंत्रक जालकाग्रावरील विद्युत् वर्चस् यामुळे बदलता येऊन त्यामुळे चित्रनलिकेच्या पटलावर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते. (५) उदग्र धर : यामुळे उदग्र विचलन जनित्राची कंप्रता बदलून तिचे प्रेषणस्थानी असणाऱ्या सदृश्य जनित्र कंप्रतेशी समकालीकरण करता येते. या नियंत्रकामुळे चित्र स्थिर करता येते.

आ. १९. रंगीत दूरचित्रवाणी कार्यपद्धतीतील तत्त्व : १. दृश्यापासून येणारा बहुरंगी प्रकाश (२, ३, ४, ५) रंग विवेचक आरसे (४, ६, ९) तांबड्या किरणाचा मार्ग (३, ७, १०) हिरव्या किरणाचा मार्ग (५, ८, ११) निळ्या किरणाचा मार्ग (६, ७, ९) कॅमेरानलिका (९, १०, ११) इलेक्ट्रॉन शलाका (१२) अनुस्फुरक पडदा.

रंगीत दूरचत्रिवाणी : रंगीत दूरचित्रवाणीचा व्यवहारात वापर १९५० पासून होऊ लागला. याकरिता वापरण्यात आलेले तत्त्व नवीन नाही. हे तत्त्व रंगीत चित्र छपाईकरिता पूर्वीपासून वापरले जात होते. या छपाई पद्धतीत मूळ चित्राचे तीन प्राथमिक रंगांत छायाचित्र काढले जाते आणि त्याचे तीन ठसे करून ते याच तीन रंगांत एकावर एक उमटविले जातात. त्यामुळे या रंगांचे मिश्रण होऊन मूळ रंगात चित्राची प्रतिमा उमटते. दूरचित्रवाणीत याकरिता दोन पद्धती वापरण्यात येतात. त्यांपैकी अमेरिकेत वापरात असलेल्या अनुरूप पद्धतीच्या कार्याचे वर्णन खाली दिले आहे. यामध्ये दृश्यापासून दोन प्रकारच्या संकेतांचे प्रेषण केले जाते. पहिल्या प्रेषणात त्यामध्ये असलेल्या प्रकाश तीव्रतेच्या वितरणाविषयीचा अवगम एकवर्णी दूरचित्रवाणी पद्धतीप्रमाणेच योजना वापरून प्रेषित केला जातो. दृश्यातील रंगवितरणाविषयीची माहिती त्याचे वेळी करण्यात येणाऱ्या दुसऱ्या विशिष्ट प्रेषण संकेताने पुरविलेली असते. या दुसऱ्या  प्रेषणासाठी दृश्यापासून मिळणाऱ्या  प्रकाशकिरणांच्या रंगांचे विवेचक आरसे (आ.१९) वापरून तांबडा, हिरवा व निळा या तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण केले जाते. रंगविवेचक आरसा एका विशिष्ट जातीच्या रंगाच्या प्रकाशाचे संपूर्ण परावर्तन करून इतर सर्व रंगांकरिता तो पारदर्शक असतो. या तीन प्राथमिक रंगांपासून संश्लेषण (एकत्रीकरण) करून कोणताही रंग मिळविता येतो, ही या पद्धतीमागील मूळ कल्पना आहे. तीन रंगांचे तीन किरण यानंतर तीन निरनिराळ्या कॅमेरानलिकांत (६, ७, ८) जातात व त्यामुळे निर्माण होणारे विद्युत् संकेत त्याच्यावर विशेष प्रकारची प्रक्रिया करून वाहक तरंगाच्या द्वारे एकाच वेळी प्रेषित केले जातात. ग्राही मंडलाद्वारे या सर्व प्रकारच्या संकेतांचे ग्रहण करून त्यांवर पुन्हा योग्य ती प्रक्रिया केली जाते. रंगीत चित्रवाणीकरिता तयार केलेल्या चित्रनलिकेमध्ये, तीन निरनिराळ्या इलेक्ट्रॉन बंदुका बसवून तीन इलेक्ट्राॅन शलाका मिळविण्यात येतात. या सर्व शलाका अनुस्फुरक पडद्यावर नेहमीच्याच प्रकाराने विचलित केल्या जातात. त्यांपैकी एक शलाका तांबड्या रंगापासून मिळालेल्या संकेताकडून नियंत्रित केली जाते व तीपासून तांबडी प्रतिमा मिळते (आ. २०). दुसरी शलाका हिरवी व तिसरी शलाका निळी प्रतिमा तयार करते. या प्रत्येक संकेतात पहिल्या प्रेषणातून मिळालेल्या प्रकाश तीव्रता संकेतांपैकी काही भाग मिसळलेला असतो. अशा तीनरंगी प्रतिमा एकाच वेळी मिळाव्यात याकरिता पडद्यावर तीन प्रकारच्या अनुस्फुरक घटकबिंदूंचे सारखे वितरण केलेले असते. इलेक्ट्रॉन शलाका त्यांवर पडली असता या घटकबिंदूंपासून अनुक्रमे तांबडा, हिरवा व निळा अशा प्रकारचे प्रकाश उत्सर्जित होतात. तांबड्या रंगाच्या संकेताने नियंत्रित केलेली इलेक्ट्रॉन शलाका फक्त तांबडा रंग उत्सर्जन करणाऱ्या घटकावर पडेल व इतर जातीच्या घटकावर पडणार नाही, अशी योजना मात्र करावी लागते. या कार्याकरता अनुस्फुरक पडद्याच्या मागेच एक पातळ धातुपत्र्याची जाळी बसविलेली असते. या जाळीवर २,००,००० छिद्रे अशा अचूक  रीतीने पाडलेली असतात की, त्यांतील प्रत्येक छिद्र पडद्यावरील तदनुरूप तीन रंगी घटक गटाच्या बरोबर समोर येते. तीन पृथक् शलाका प्रत्येक छिद्रातून एकाच वेळी प्रवेश करतात, पण प्रत्येकीचा प्रवेशकोन थोडा निराळा असतो. या प्रवेश कोनाचे प्रमाण असे ठेवलेले असते की, तांबड्या रंगाने नियंत्रित केलेली शलाका तांबडा रंग उत्सर्जन करणाऱ्या घटकबिंदूंवरच पडते. अशीच परिस्थिती इतर दोन रंगांच्या घटकबिंदूच्या बाबतीत असते. प्रत्येक रंगीत अनुस्फुरक घटकबिंदूंभोवती अपारदर्शक काळ्या पदार्थाची वेष्टने ठेवलेली असतात. यामुळे दोन घटकबिंदूच्या मधील भागावर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन शलाकेमुळे काहीच प्रकाश उत्सर्जन होत नाही. याप्रमाणे तीन प्राथमिक रंगांतील तीन प्रतिमा एकाच वेळी चित्रनलिकेत एकमेकांवर पडतात. यामधील रंगीत घटकबिंदू इतके सूक्ष्म व इतके समप्रमाणात विखुरलेले असतात की, या निरनिराळ्या तीन रंगीत प्रतिमांचा पृथक् अनुभव न येता, त्यांच्या मिश्रणामुळे झालेल्या संयुक्त रंगीत प्रतिमेचा भास पहाणाऱ्यास होतो. हे घटकबिंदू साध्या डोळ्यांनी बघितले असता जरी दिसत नसले, तरी वर्धक भिंगाच्या साह्याने त्यांचे अस्तित्व समजू शकते. या पद्धतीचे वैशिष्ट्य हे की, प्रेषित केलेल्या तीन संकेतांपैकी एका संकेतात मूळ दृश्याच्या प्रत्येक बिंदूच्या प्रकाश-तीव्रतेसंबंधीचा अवगम संकलित केलेला असतो आणि हा संकेत काळ्या–पांढऱ्या दूरचित्रवाणीच्या ग्राहीनेही ग्रहण करता येतो आणि रंगीत चित्राऐवजी काळ्या–पांढऱ्या रंगातील चित्र पडद्यावर पाहता येते.


दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे अभिलेखन : दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे पुनःप्रेषण करता यावे म्हणून हे कार्यक्रम अभिलेखित करून ठेवतात. काही घटना प्रत्यक्ष घडतात तेव्हा अभिलेखित करून ठेवून त्या हव्या तेव्हा प्रेषित करण्याची सोय अभिलेखनाच्या तंत्रामुळे झाली आहे. दृक्‌संकेतांचे अभिलेखन करण्याच्या तीन पद्धती आहेत : (१) किनेस्कोप किंवा चित्रनलिका अभिलेखन, (२) फीत अभिलेखन व (३) तबकडी अभिलेखन.

आ. २०. रंगीत दूरचित्रवाणी ग्राहीचे कार्य : १. प्रकाश तीव्रतासंकेत, २. निळ्या रंगाचा संकेत, ३. हिरव्या रंगाचा संकेत, ४. तांबड्या रंगाचा संकेत, ५. ाकाशक, ६. प्रमाणित दूरचित्रवाणी ग्राही मंडले, ७. रंगीत दृक्‌संकेत, ८. विलगक, ९. प्रकाश तीव्रता अवगम, १०. रंग अवगमाकरिता निःसंकेतक, ११ मूळ संकेत उत्तम तदरूपता असलेले प्राथमिक रंगांचे संकेत, १२. तीन रंगी किनेस्कोप.

 किनेस्कोप किंवा चित्रनलिका अभिलेखन : या पद्धतीने चित्रनलिकेवर उमटलेल्या प्रतिमांचे चलचित्रपटाच्या फिल्मवर छायाचित्रण केले जाते. हे तंत्र खूपच प्रगत झालेले असून ते विशेष खर्चाचे नाही. प्रक्रिया करून तयार झालेले व्यस्त (निगेटिव्ह) चित्रमालिका कार्यक्रम लगेच प्रेषित करण्यासाठी वापरता येतात. फक्त यासाठी विद्युत् मंडलातील संकेतांची ध्रुवीयता उलट करावी लागते व क्रमवीक्षण पद्धतीत योग्य ते बदल करावे लागतात.

फीत अभिलेखन : या पद्धतीमध्ये चुंबकीय फितीवर दूरचित्रवाणीतील चित्र व ध्वनिसंकेतांचे अभिलेखन करण्यात येते. चित्र व ध्वनी यांच्यापासून तयार झालेले विद्युत् संकेत चुंबकीय अभिलेखक शीर्षांना पुरविले जातात. शीर्षाच्या समोरून प्रतिसेकंदाला ३८ सेंमी. या वेगाने फीत सरकत असते. संकेताच्या विद्युत् प्रवाहामुळे फितीवर लेपित केलेल्या पायसामधील (संवेदनक्षम द्रव्यामधील) सूक्ष्म लोहकणांना कमीजास्त प्रमाणात चुंबकत्व प्राप्त होते. याउलट पुनरुत्पादक शीर्षासमोरून चुंबकत्व प्राप्त झालेली फीत त्याच वेगाने सरकविली असता फितीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे उद्ग्रहण (विद्युत् संकेतात रूपांतर करणाऱ्या) वेटोळ्यांमध्ये मूळच्या विद्युत् संकेतांसारखेच विद्युत् संकेत प्रवर्तित होतात. फीत अभिलेखनाचा विशेष फायदा असा की, कोणत्याही प्रक्रिया केल्याशिवाय अभिलेखित फीत ताबडतोब वापरता येते. ही फीत सु. ५ सेंमी. रुंदीची असून ती प्लॅस्टिक द्रव्याची केलेली असते. चुंबकीय पायसाचे या फितीवर लेपन केलेले असते. सु. ३२ सेंमी. व्यासाच्या एका रिळावर ६४ मिनिटे चालणारा कार्यक्रम अभिलेखित करता येतो. अभिलेखनापूर्वी दृक्‌संकेताने ४·२५ ते ५·९ मेगॅहर्ट्‌झ या मर्यादांमधील कोणतीही कंप्रता असलेल्या वाहक तरंगाचे कंप्रता विरूपण केले जाते. शेष उपपट्टा असलेला संकेत मिळवून त्या संकेताचे फितीवर सु. ०·०२५ सेंमी. रुंदीच्या अनुप्रस्थ (आडव्या) पट्ट्यांमध्ये अभिलेखन केले जाते. सु. ५ सेंमी. व्यासाच्या व प्रतिसेकंदाला कित्येक सहस्र फेरे इतक्या वेगाने फिरणाऱ्या चाकाच्या परिघावर सारख्या अंतरावर चार चुंबकीय शीर्षे बसविलेली असतात. कोणत्याही विशिष्ट वेळी फितीसमोर आलेले शीर्षच त्या वेळी फितीवर अभिलेखन करते. याप्रमाणे ही चार शीर्षे एकामागून एक याप्रमाणे फितीवर अभिलेखन करतात. प्रत्येक अनुप्रस्थ पट्ट्यावर सु. १८ क्रमवीक्षण रेषांचे मुद्रण होते. एका चित्रचौकटीचे अभिलेखन पूर्ण करण्यास ३२ अनुप्रस्थ पट्ट किंवा १·२७ सेंमी. लांबीची फीत लागते. कार्यक्रमाचा भाग असलेल्या ध्वनिसंकेतांचे व नियंत्रण संकेतांचे अभिलेखन निराळ्या अन्वायाम (लांबीला समांतर असलेल्या) पट्ट्यांमध्ये स्वतंत्र अभिलेखक शीर्षे वापरून करतात. संकेतांचे पुनरुत्पादन करताना कंप्रता विरूपपित संकेत परत मिळवून त्यांचे प्रथम अविरूपण करतात व मग ती कार्यक्रमाच्या प्रेषणासाठी वापरतात. दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रेषित करण्याकरिता चुंबकीय फितीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या पद्धतीने केलेल्या अभिलेखनाची गुणवत्ता चांगली असते. कोणत्याही कार्यक्रमाचा या पद्धतीने संग्रह करणे व तो परत प्रेषणाकरिता वापरणे हे शक्य होते.


ठराविक वेळ चालणारा दूरचित्रवाणी कार्यक्रम अभिलेखित करून सीलबंद डबीमध्ये रिळावर बसविलेली फीत आता उपलब्ध आहे. फीत अभिलेखकामध्ये ही सीलबंद डबी बसवून अभिलेखित कार्यक्रम घरच्या घरी चित्रनलिकेच्या पडद्यावर पाहता येण्याची सोय यामुळे झाली आहे व आपल्याला हवा तो कार्यक्रम हव्या त्या वेळी पाहता येणे शक्य झाले आहे. याच प्रकारचे कार्य करणाऱ्या दुसऱ्या आधुनिक पद्धतीत अभिलेखित तबकडी वापरली जाते. ही तबकडी साधारणपणे ध्वनिमुद्रिकेच्याच तऱ्हेची असते.

आ. २१. तबकडी अभिलेखन (फिलिप्स पद्धत) : १. लेसर उद्‌गम, २. केंद्रीकरण भिंग, ३. तबकडीवरील खाचांचा विन्यास, ४. अ‌ल्युमिनियम थर, ५. द्विमार्गी आरसा, ६. प्रकाशसंवेदनशील द्विप्रस्थ.

तबकडी अभिलेखन : याकरिता फिलिप्स व आर. सी. ए. या दोन पद्धती विशेष सुविकसित झाल्या आहेत. व्हिनीलच्या तबकडीवर लेसर शलाकेच्या [→ लेसर] साह्याने अभिलेखन केले जाते. याकरिता दृक् व ध्वनिसंकेतांनी विरूपित केलेली लेसर शलाका (०·००१ मिमी. व्यास) तबकडीवर पडून त्यावर एक सूक्ष्म खाच जाळून पाडते. या खाचेची खोली व आकार या संकेताच्या तीव्रतेवर अवलंबून असते. साध्या प्रकाशाची इतक्या सूक्ष्म काटछेदाची शलाका मिळवणे शक्य नसल्यामुळे येथे लेसर किरण शलाकाच वापरावी लागते. तबकडी १,८०० फेरे प्रतिमिनिट या वेगाने फिरते. त्यामुळे एका सेंमी. मध्ये सु. ५,११५ खाचा पाडल्या जातात. साध्या ग्रामोफोन ध्वनिमुद्रिकेमध्ये एका सेंमी. मध्ये सु. ७८ खाचा असतात. हवेतील धुळीचे कण व इतर काही विघातक प्रक्रिया यांपासून तबकडीचे संरक्षण करण्याकरिता त्यावर प्लॅस्टिक द्रव्याचा एक संरक्षक पारदर्शक आवरण लेप दिलेला असतो. त्यामुळे तबकडीचे क्रियाशील आयुष्य खूप वाढते. तबकडीपासून मूळ संकेत मिळविण्याकरिता ही अभिलेखित तबकडी त्याच वेगाने फिरविली जाते. त्यावर एक कमी शक्तीची पण त्याच व्यासाची लेसर शलाका वापरून खाचेचे क्रमवीक्षण केले जाते. परावर्तित प्रकाशाच्या कमीजास्त तीव्रतेच्या (आ.२१) स्वरूपात संकेत मिळतो. प्रकाश संवेदनशील द्विप्रस्थावर हा परावर्तित प्रकाश पाडून त्याचे विद्युत् संकेतात रूपांतर केले जाते. हा विद्युत् संकेत चित्रनलिकेला पुरवून तिच्या पडद्यावर चित्र पाहता येते किंवा हा संकेत प्रेषकाला पुरवून प्रेषित करता येतो.

अमेरिकेच्या आर. सी. ए. पद्धतीमध्ये अभिलेखनाचे कार्य एका सूक्ष्म आकारमानाच्या इलेक्ट्रॉन शलाकेच्या साह्याने केले जाते. या शलाकेमधील इलेक्ट्रॉनाची ऊर्जा दृक् व ध्वनिसंकेतांनी विरूपित केली जाते. यामध्ये तांब्याच्या पत्र्यावर एक पातळ थर दिलेली तबकडी मिनिटाला ४५० फेरे या गतीने फिरत असते. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन शलाका आदळते तेथे इलेक्ट्रॉन शलाका आवरणामध्ये एक खाच जाळून त्याखालील तांब्याचा पृष्ठभाग उघडा करते. दिलेल्या दृक् वा ध्वनिसंकेतानुसार या खाचांमधील अंतर कमीजास्त होते. अशा रीतीने अभिलेखित तबकडीपासून मूळ संकेत मिळविण्याकरिता ध्वनिमुद्रिका वादकाप्रमाणे (रेकॉर्ड प्लेअरप्रमाणे) एक नील रत्नाची (सफायरची) सूचिका या फिरत्या तबकडीवरील खाचांमधून मार्गक्रमण करते. या सूचिकेच्या टोकाला एक धातूचा सूक्ष्म थर दिलेला असतो. हा थर व तबकडीवरील उघडा केलेला धातूचा भाग यांमध्ये जी धारणा (विद्युत् भार साठवून ठेवण्याची क्षमता) असते तिच्या द्वारे विद्युत् संकेत मिळविला जातो. यावर मिळणारी खाच इतकी सूक्ष्म असते की, हवेमध्ये असलेले धुळीचे कण तीमध्ये जाऊन संकेतामध्ये बिघाड निर्माण करू शकत नाहीत. या पद्धतीमध्ये तबकडी परत परत वापरली असता सूचिका झिजते व ३०० वेळा चालविल्यानंतर सूचिका बदलावी लागते. या बाबतीत फिलिप्स पद्धत जास्त चांगली आहे, कारण तीमध्ये तबकडीचे क्रमवीक्षण लेसर शलाकेच्या साहाय्याने करण्यात येत असल्यामुळे त्यामध्ये उपयोगामुळे काही झीज वा बिघाड होत नाही.


येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, फिलिप्स किंवा आर. सी. ए. पद्धतीने कार्यक्रमाचे घरगुती अभिलेखन करता येणार नाही. ज्याप्रमाणे ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका कारखान्यात तयार होतात व त्या विकत घेऊन ध्वनिमुद्रिका वादकाद्वारे त्यापासून मूळ कार्यक्रम मिळविला जातो, त्याप्रमाणे या दृक् तबकड्यांचा उपयोग करता येतो. घरगुती अभिलेखन व पुनरुत्पादन करण्याकरिता मात्र फक्त चुंबकीय फितीचाच उपयोग सुलभ रीतीने करता येतो. दूरचित्रवाणी प्रेषित कार्यक्रमाचे (किंवा दूरचित्रवाणी कॅमेरा व ध्वनिग्राहक वापरून कोठल्याही दृश्याचे) अभिलेखन आधी वर्णन केल्याप्रमाणे करतात. घरगुती दूरचित्रवाणी ग्राही व त्याला एक जोडयंत्र जोडून या फितीद्वारे दृक् व ध्वनी संकेतांनी युक्त असा मूळ कार्यक्रम परत दाखवता येतो. ध्वनिमुद्रिका वादकाच्या सदृश असे या जोडयंत्राचे कार्य असते.

बंद–मंडल दूरचित्रवाणी : एक कॅमेरा व त्याला समाक्ष केबलीने जोडलेले अनेक अनुदर्शक ग्राही यांनी बनलेली मर्यादित जागेत बसविलेली दूरचित्रवाणी यंत्रणा ‘बंद–मंडल दूरचित्रवाणी’ या नावाने सुरुवातीला ओळखली जाते असे. परंतु आता सार्वजनिक उपयोगासाठी जेथे चित्र व ध्वनी यांचे प्रेषण केले जात नाही अशा कोणत्याही संघटनेने स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी आयोजित केलेल्या दूरचित्रवाणी प्रणालीला ही संज्ञा दिली आहे. अशा प्रणाली प्रदेशात उद्योगधंदे, व्यापार आणि शिक्षणसंस्था यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अशा प्रणालीचा व्याप त्याच्या कार्यक्षेत्रानुसार लहान किंवा मोठा असू शकतो. एखाद्या लहानशा कारखान्यात अगर शिक्षणसंस्थेत अशी यंत्रणा बसविली असता तीमध्ये एक कॅमेरा व त्याला समाक्ष केबलीने जोडलेला अनुदर्शक ग्राही असतो परंतु एखाद्या मोठ्या व्यापारी संघटनेने अशी यंत्रणा आयोजित केली असेल, तर तिचा विस्तार इतका मोठा होतो की, नेहमीच्या दूरचित्रवाणीच्या जाळ्याप्रमाणे या यंत्रणेस सूक्ष्मतरंग अभिचालक प्रणाली समाक्ष केबलीऐवजी वापरल्या जातात. बंद–मंडल प्रणालीवर संपूर्णपणे खाजगी नियंत्रण असल्यामुळे आणि या प्रणालीद्वारे प्रेषित केलेले कार्यक्रम सार्वजनिक उपयोगासाठी नसल्यामुळे क्रमवीक्षणास नेहमीच्या मानकांपेक्षा निराळी मानके वापरता येतात. औद्योगिक कारखान्यांतील बंद–मंडल दूरचित्रवाणीच्या कॅमेऱ्यात सामान्यपणे व्हिडिकॉन कॅमेरानलिका वापरतात, कारण तिची किंमत तुलनेने कमी असते आणि तिचे आकारमानही आटोपशीर असते. शिक्षणक्षेत्रात मात्र प्रतिमा ऑर्थिकॉन नलिका वापरतात. या प्रकारच्या दूरचित्रवाणीची साधनसामग्री विशेष तंत्रज्ञांकडून चालविली जात नसल्यामुळे हिची रचना चालवावयास व सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच काळजी घेण्यास सोपी अशी केलेली असते. औद्योगिक क्षेत्रात या प्रणालीच्या साह्याने लांब अथवा उंच जागी असलेल्या नियंत्रण योजनेतील राशीचे निरीक्षण केले जाते. उदा., विद्युत् निर्मिती यंत्रणेतील वाफकामधील (बॉयलरमधील) पाण्याच्या पातळीचे किंवा उच्च तापमानाच्या भट्टीत वितळत असणाऱ्या धातूचे निरीक्षण व नियंत्रण या योजनेद्वारे करता येते. धोकादायक आणवीय द्रव्ये हाताळण्याच्या दूरस्थ नियंत्रण योजनेचे निरीक्षण करण्याकरिता सुद्धा अशा प्रणाली उपयोगी पडतात. क्ष–किरण प्रकाशनामुळे मानवी देहावर होणारे दुष्परिणाम टाळण्याकरिता एखाद्या रोग्याच्या घेतल्या जाणाऱ्या क्ष–किरण छायाचित्राचे निरीक्षण डॉक्टरांनी दूर अंतरावर ठेवलेल्या दूरचित्रवाणीद्वारा करण्याची पद्धत अनेक रुग्णालयांत वापरली जाते. बँकांमध्ये स्वाक्षऱ्या तपासण्यासाठी किंवा खात्यातील शिल्लक पडताळण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग करतात. अशा वेळी मंद क्रमवीक्षणाचा उपयोग करून पाहिजे ती दूर अंतरावर असलेली माहिती पुरेशा दीर्घकालापर्यंत दिसू शकते, अशी व्यवस्था केलेली असते. शिक्षणक्षेत्रात एखादा चांगला शिक्षक घेत असलेल्या पाठाचा फायदा या प्रमालीद्वारे वर्गाबाहेरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतो. ध्वनियुक्त चलचित्रपटाद्वारेसुद्धा हे कार्य करता येते पण दूरचित्रवाणीद्वारा केले असता हे कार्य परिणामकारक ठरते, असा अनुभव येतो.


आ. २२. सरळ ग्राही स्थानक : १. षट्‌कोणी भोके असलेल्या, तारेच्या जाळीचा, घमेल्याच्या आकाराचा आकाशक२. विवर्धक ३. समाक्ष केबल ४. दूरचित्रवाणी ग्राही.

प्रगतीच्या काही दिशा : दूरचित्रवाणीच्या ग्राही पडद्यावर मिळालेल्या चित्राचे भिंगाच्या साह्याने वर्धन करून त्याचे मोठ्या पडद्यावर प्रदर्शन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कार्याकरिता वापरलेल्या एका प्रणालीत चित्रवाणीच्या ग्राही चित्रनलिकेत अनुस्फुरक पडद्यामागे एक अंतर्गोल आरसा बसविलेला असतो. इलेक्ट्रॉन शलाकेला मार्गक्रमण करण्याकरिता याच्या मध्यभागी एक वर्तुळाकार छिद्र ठेवलेले असते. मिळालेल्या वर्धित दृक् प्रतिमेतील दोष निवारण करण्याकरिता चित्रनलिका व पडदा यांमध्ये एक विशुद्धक भिंग ठेवलेले असते.

टेलिटेक्स्ट पद्धतीत मासिके व माहितीपटाचे दूरचित्रवाणी तंत्राचे प्रेषण करावयाच्या योजनेचे संशोधन चालू आहे. या तंत्राच्या साहाय्याने निःसंकेतन इलेक्ट्रॉनीय यंत्राची दूरचित्रवाणी ग्राहीला जोड दिली असता मासिकाच्या पानांचे लागोपाठ चित्रनलिकेच्या पडद्यावर प्रदर्शन करता येते.

उपग्रहाद्वारा दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे प्रेषण : अवकाशात जमिनीच्या पृष्ठभागापासून ३६,००० किमी. उंचीवर समकालिक (पृथ्वीच्या अक्षीय भ्रमणाइतकाच भ्रमणकाल असलेल्या) कक्षेत प्रस्थापित केलेल्या क्रियाशील उपग्रहाद्वारे जागतिक संदेशवहन सिद्ध करण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रकारचा उपग्रह पृथ्वीभोवती त्याच गतीने फिरत असल्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही एका स्थानावरून पाहता तो अवकाशात स्थिर आहे असे दिसते. या प्रकारचा संदेशवहनाचा प्रत्यक्ष प्रयोग (सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरिमेंट, SITE) भारतात १ ऑगस्ट १९७५ पासून ३१ जुलै १९७६ पर्यंत करण्यात आला. त्याकरिता अमेरिकेने एटीएस-६ या उपग्रहाचा उपयोग करण्याची परवानगी दिलेली होती. हा उपग्रह ३५ पूर्व या रेखांशावर उदग्र दिशेत प्रस्थापित केला गेला होता. या योजनेखाली आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओरिसा व राजस्थान या राज्यांत २,४०० सरळ ग्रहण स्थानके ठेवण्यात आली होती. उपग्रहाद्वारे मिळणारा कार्यक्रम या स्थानकांद्वारे ग्रहण करून वरील स्थानकांवर ठेवलेल्या सामुदायिक दूरचित्रवाणी ग्राहीत दाखवला जात होता. या प्रकारच्या स्थानकाची रचना आ.२२ मध्ये आहे. ८६० मेगॅहर्ट्‌झ कंप्रतेचा संकेत आकाशक (१) द्वारे ग्रहण करून त्याचे (२) या विवर्धकाद्वारे विवर्धन करून संकेताची कंप्रता ७० मेगॅहर्ट्‌झ एवढी केली जात होती. हा संकेत विशेष सुलभ रचना असलेल्या दूरचित्रवाणी ग्राहीला (४) पुरविला जात होता. कार्यक्रम दिल्ली व अहमदाबाद येथे बसविलेल्या जमिनीवरील स्थानकांपासून उपग्रहाकडे प्रेषित केले जात असत. याच पद्धतीचा जास्त प्रमाणात उपयोग करून जागतिक दूरचित्रवाणी दळणवळण प्रस्थापित करता येईल, अशी कल्पना आहे. [→ उपग्रह संदेशवहन दूरदर्शन].

आ. २३. अमेरिकेतील नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या दूरचित्रवाणी कलागृहातील चित्रणाचे एक दृश्यदूरचित्रवाणी कलागृह (स्टुडिओ) : प्रकाशयोजना, कॅमेरे, ध्वनिग्राहक, निरनिराळे कृत्रिम देखावे निर्माण करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री, कार्यक्रमनिर्मितीच्या वेळी निरनिराळ्या क्रियांचा क्रम ठरविण्यासाठी व शीर्षकांच्या चित्रीकरणासाठी लागणारी साधनसामग्री आणि कलागृह व नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संदेशवहन यंत्रणा व सोयी दूरचित्रवाणी कलागृहामध्ये असाव्या लागतात.

कलागृहे निरनिराळ्या आकारमानांची असतात. ६ मी. X १० मी. आकारमानांची लहान कलागृहे बातमीपत्रे व हवामानवृत्त यांसारख्या कार्यक्रमांसाठी वापरतात. नाट्यप्रयोगांसाठी २५–३० मी. रुंद व ५०–६० मी. लांब असलेली भव्य कलागृहे वापरतात. प्रेक्षकांच्या उपस्थितीतील कार्यक्रमासाठी नाट्यगृहासारखी कलागृहे लागतात. कलागृहाचे छत उंच (सु.१० मी.) असावे लागते. छत उंच असल्यास देखाव्यांमध्ये जलद बदल करणे सोपे जाते कारण तयार केलेल्या देखाव्याचे काही घटक वर उचलून घेणे व नवीन घटक वरून खाली सोडणे फार सोईचे असते. प्रकाशयोजनेसाठी आवश्यक असलेले  दिवेही हवे तसे खाली अगर वर सरकविणे उंच छत असल्यास सोपे होते.


 आ. २४. कलागृहाच्या नियंत्रण कक्षातील दिग्दर्शन कॅमेरा व प्रकाशयोजना यांची जुळणी करण्यासंबंधी सूचना देत आहे.कलागृहातील गोंगाटपातळी अगदी कमी ठेवावी लागते. कलागृहाचे ध्वनिकीय गुणधर्म सुधारण्यासाठी व गोंगाटाची तीव्रता शक्य तितकी कमी करण्यासाठी कलागृहाच्या भिंती व छत यांच्यावर ध्वनिशोषक द्रव्याचा थर बसविलेला असतो. गोंगाट कमीत कमी राहील अशा तऱ्हेने कलागृहासाठी वातानुकूलन यंत्रसामग्री बसविलेली असते. आ. २३ मध्ये दूरचित्रवाणीचे एक सर्वसामान्य कलागृह दाखविले आहे. कॅमेऱ्याच्या टप्प्यात येऊ नयेत आणि ध्वनिग्रहण योग्य प्रकारे व्हावे यासाठी ध्वनिग्राहक उंच जागी बसविलेले असतात आणि ते हवे तसे सरकविता येतील अशी योजना केलेली असते. रबराचे टायर असलेल्या गाडीवर बसविलेले कॅमेरे कलागृहामध्ये कोठेही सहज हलविता येतात. कॅमेऱ्याच्या हालचालीचे क्षेत्र जास्त असेल, तर उंच बैठकीवर किंवा ट्रॉलीवर बसविलेला कॅमेरा वापरतात.

लहान कलागृहांमध्ये प्रकाशयोजनेसाठी हवे तसे हलविता येतील असे एकूण सु. १००० वॉट शक्तीचे अनेक दिवे बसविलेले असतात. मोठ्या कलागृहांत व रंगीत दूरचित्रवाणीच्या कलागृहांत २५०० वॉट किंवा त्यापेक्षाही अधिक शक्तीचे शेकडो दिवे बसविलेले असतात. सर्व दिव्यांचे नियंत्रण एका मध्यवर्ती नियंत्रण केंद्रात करता येते. या नियंत्रणाने प्रत्येक दिव्याची प्रखरता कमीजास्त करता येते किंवा तो बंद करता येतो.

एकाच दृश्याचे एकापेक्षा अधिक कॅमेऱ्यांनी निरनिराळ्या बाजूंनी एकाच वेळी चित्रीकरण करण्यात येत असते आणि नियंत्रण कक्षातील तज्ञासमोर या सर्व कॅमेऱ्यांमधून होणारे चित्रण दाखविणारे ग्राही पडदे असतात. यांपैकी योग्य त्या कॅमेऱ्याद्वारे होणारे चित्रण आलटून पालटून प्रेषित करण्याचे काम हा तज्ञ करतो.

संदर्भ : 1. Ames, S. W. Birkinshaw, D. C. Television Engineering, London, 1960.

            2. Ennes, H. E. Broadcasting Engineering Notebook, Vol. I, Television Tape Fundamentals, Indiana police, 1962.

            3. Fink D. G. Principles of Television Engineering, London 1957.

            4. Grob. B. Basic Television, New York, 1964.

            5. Kiver, M. S. Colour Television Fundamentals, New York, 1964.

            6. Kiver, M. S. Television Simplified, Princeton, N. J. 1962.

            7. Lovell, A., Ed. Electronics and Their Applications in Industry and Research, 1947.

            8. Rose, A, Ed. Merton, L. Advances in Electronics, Vol.I, 1948.

            9. Wortman, L. A. Closed Circuit Television Handbook, Indianapolice, 1964.

           10. Zworykin, V. K. Morton.G. A. Television, London, 1954.

चिपळोणकर, व. त्रिं.


सुवाह्य ररंगीत दूरचित्रवाणी कॅमेरा

सुधारित झूम भिंगसंच वापरलेला दूरचित्रवाणी कॅमेरा

सूक्ष्मदर्क्षी दूरचित्रवाणी कॅमेरा उजव्या हातात पाण्याखाली वापरण्याचा कॅमेरा आहेब्रिटन व उत्तर अमेरिका यांच्या दरम्यान उपग्रहाज्वारे दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रेषण करणारे कॉर्नवालमधील गूनहिली उपग्रह स्थानक

घरच्या घरी शिक्षण देणारा बी.बी.सी. चा कार्यक्रम
५०.८ मिमी. पडदी व ७४० ग्रॅ. वजन असलेली दूरचित्रवाणी ग्राही

एक जपानी दूरचित्रवाणी केंद्रातील नियंत्रण कक्ष