पुंज-इलेक्ट्रॉनिकी : काही पदार्थांमधील अणू किंवा रेणू यांच्याशी संलग्न असलेल्या विशेषक कंप्रतेच्या (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या विशेषक असलेल्या) प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) उपयोग करून उच्च गुणवत्तेने विद्युत् चुंबकीय तरंगांचे विवर्धन अगर आंदोलन क्रिया सिद्ध करण्याचे आधुनिक प्रभावी शास्त्र यामध्ये आढळणाऱ्या अणू अथवा रेणू व प्रारण यांमधील परस्परक्रियेचे विशदीकरण करण्याकरिता रूढ यामिकी सिद्धांत [प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे होणारी गती यांसंबंधीचे सिद्धांत → यामिकी] यथार्थ ठरत नाहीत. याकरिता ⇨ पुंजयामिकीच्या नियमांचाच वापर करावा लागतो. पुंज- इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तीचे कार्य मुख्यत: अणू अथवा रेणूंच्या अनुस्पंदन कंप्रतेशी [→ अनुस्पंदन ] निगडित असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या पुंज-इलेक्रॉत्नीय प्रयुक्ती विवर्धक अथवा आंदोलक म्हणून फक्त एका विशिष्ट कंप्रतेलाच कार्य करतात. पुंज–इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींच्या एका प्रकारात या विशिष्ट कंप्रतेचे मूल्य पाहिजे तसे बदलता येते. यामुळे या प्रयुक्तीचा उपयोग विविध कंप्रतांच्या संकेतांचे विवर्धन अथवा त्यांची निर्मिती (आंदोलक) याकरिता करण्यात येतो. काही प्रकारात ही सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा उपयोग मुख्यत्वेकरून एका विशिष्ट मूल्याच्या कंप्रतासंकेतांचे उत्पादन करणारा मानक (प्रमाणभूत) आंदोलक म्हणून करण्यात येतो. या प्रयुक्तींचे कंप्रता कार्यक्षेत्र सर्वसाधारणपणे निर्वात नलिका अथवा ट्रॅंझिस्टर [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] यांच्यावर आधारित असलेल्या मंडलांच्या कंप्रता कार्यक्षेत्रापेक्षा बरेच वरच्या कंप्रता पट्ट्यांत असते. त्यांचा उपयोग मुख्यत्वेकरून ⇨ सूक्ष्मतरंग आणि दृश्य प्रकाश या कंप्रता पट्ट्यांत (सु. १०१० ते १०१५ हर्ट‌्झ कंप्रता असलेल्या पट्ट्यांत )विवर्धक अथवा आंदोलक म्हणून करण्यात येत असला, तरी आधुनिक काळात या शास्रात झालेल्या विकासामुळे श्राव्य कंप्रतेपासून (सु. ३० हर्ट‌्झ ते २० किलोहर्ट‌्झ‌) सूक्ष्म तरंग आणि अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रकाश तरंग (सु. १०१४  हर्ट‌्झपर्यंत) या पट्ट्यांमधील विविध कंप्रतांकरिता विवर्धक अथवा आंदोलक म्हणून कार्य करण्यास उपयुक्त अशा अनेक पुंज-इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती उपलब्ध झाल्या आहेत. दृश्य प्रकाश आंदोलक म्हणजे प्रकाश उद्गम असे म्हणता येते. वर नमूद केल्याप्रमाणे या प्रकारचा आंदोलक फक्त एकाच कंप्रतेच्या प्रकाशाचे उत्पादन करू शकतो. पुंज-इलेक्ट्रॉनीय विवर्धकांत अथवा आंदोलकात गोंगाट [→ विद्युत् गोंगाट] आदि विक्षोभांचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे यांच्या कार्याची गुणवत्ता उच्च प्रकारची असते. ⇨ मेसर व ⇨ लेसर हे पुंज-इलेक्ट्रॉनीय विवर्धक वा आंदोलक यांचे विशेष उपयोगात असलेले प्रकार आहेत.

मेसर अथवा लेसर व यासारख्या इतर पुंज-इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींकरिता उपयुक्त असे निरनिराळे पदार्थ, वायू यांतील तसेच वर्णपटविज्ञानातील भौतिकीय आविष्कारांचा समावेश पुंज-इलेक्रॉचेनिकीमध्ये केला जातो. लेसर प्रकाशाव्दारे विविध पदार्थांतील नैकरेषीय प्रकाशीय परिणामाचा [→ नैकरेषीय आविष्कार] अभ्यास याच शाखेमध्ये केला जातो.

इलेक्ट्रॉनिकीमध्ये विशिष्ट तरंगाकाराच्या विद्युत् चुंबकीय तरंगाची निर्मिती व त्याचे विवर्धन हा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. उदा., रेडिओ संकेताचे प्रक्षेपण करण्याकरिता योग्य इलेक्ट्रॉनीय आंदोलक मंडल वापरले जाते. [→ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] त्यायोगे विशिष्ट कंप्रतेचे ज्या-वक्राकार (त्रिकोणमितीतील ‘ज्या’ गुणोत्तराच्या आलेखाचा आकार) असलेले विद्युत् चुंबकीय तरंग निर्माण केले जातात. या मंडलाकरिता मुख्यत्वेकरून निर्वात नलिकांचा किंवा ट्रँझिस्टरांचा उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे याच प्रयुक्तींचा उपयोग विवर्धकांतही केला जातो [→ इलेक्ट्रॉनीय विवर्धक]. या प्रकारच्या विवर्धकाला आदान संकेत दिला असता त्यापासून मिळणाऱ्या प्रदान संकेतामध्ये फक्त मूळ संकेतच विवर्धित स्वरूपात मिळतो असे नसून भिन्न कंप्रतेच्या इतर विक्षोभ संकेतांचे यामध्ये मिश्रण झालेले आहे असे आढळते. हे इतर अनिष्ट संकेत (ज्यास गोंगाट असे म्हणतात) मंडलामध्ये वापरलेल्या नलिकांमध्ये अथवा ट्रँझिस्टरांमध्येच निर्माण होतात, असे दाखविता येते. निर्वात नलिकेमध्ये इलेक्ट्रॉन प्रवाह वाहत असतात व त्यामध्ये होणाऱ्या यदृच्छ विक्षोभामुळे वरील विक्षोभ संकेत अथवा गोंगाट निर्माण होतो. गोंगाटातील घटकांचे मूल्य आदान संकेत मूल्यावर अवलंबून असत नाही आणि त्यामुळे आदान संकेत जर निर्बल असेल, तर त्यामानाने गोंगाट संकेत महत्त्वाचे ठरतात. नलिकेमधील नैकरेषीय परिणामामुळे सुद्धा प्रदानात एक प्रकारची विकृती निर्माण होते. गोंगाट व विकृतीमुळे प्रदान संकेतामध्ये येणाऱ्या अनिष्ट संकेतांमुळे विवर्धक अथवा आंदोलकाची गुणवत्ता कमी होते. विवर्धकाची गुणवत्ता ठरविण्याकरिता पुढील निकष वापरले जातात. (१) प्रदान संकेत मूळ संकेताशी तद्रूप असला पहिजे. (२) त्यामध्ये विवर्धन व इतर कारणांमुळे निर्माण झालेल्या गोंगाट, नैकरेषीय विकृती यांसारख्या विक्षोभांचे प्रमाण अत्यल्प असले पाहिजे. (३) ज्या कंप्रता पट्ट्याकरिता विवर्धक वापरावयाचा असतो त्यामधील सर्व कंप्रता संकेताकरिता विवर्धकाचा प्रतिसाद सारख्याच मूल्याचा असला पाहिजे. याउलट आंदोलक मंडलाची गुणवत्ता ठरवण्याकरिता पुढील निकष वापरले जातात. (१) आंदोलकापासून मिळणारे तरंग एकाच शुद्ध कंप्रतेचे असले पाहिजेत. (२) त्यामध्ये गोंगाटाचे प्रमाण कमी असले पहिजे. (३) प्रदान कंप्रतेचे मूल्य काळानुसार न बदलेले पाहिजे. (४) प्रदान संकेताचा परमप्रसर (एका आवर्तनातील महत्तम मूल्य) काळानुसार न बदलला पाहिजे. प्रत्यक्षात मिळणारा तरंगाकार सर्वसाधारणपणे आदर्शापासून नेहमीच काही फरक अथवा विचलन दाखवीत असल्यामुळे या विचलनाचे मूल्य नगण्य स्वरूपाचे असावे एवढीच अपेक्षा केली जाते. विवर्धक अथवा आंदोलक यांमध्ये उद‌्भवणाऱ्या वरील सर्वसाधारण दोषांचे प्रमाण पुंज-इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींमध्ये का कमी असते व त्यांच्या कार्याची गुणवत्ता उच्च प्रकारची का असते हे या प्रयुक्तींच्या विशिष्ट कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यास लक्षात येते. या विवेचनाकरिता अमोनिया मेसरचे उदाहरण घेतले आहे.

अमोनिया मेसरचे कार्य व गुणवत्ता : अमोनिया रेणूंची त्रिमितीय रचना प्रसूचीसारखी (पिरॅमिडासारखी) असून त्याच्या शिखरावर नायट्रोजन अणू असतो, तर आधारस्तरावर तीन हायड्रोजन अणू असतात. विवेचनाच्या सोयीकरिता या रेणूच्या E1 व E2 या दोन अनूक्रमी पुंज अवस्थांचाच [→ पुंज सिद्धांत ] विचार केला आहे. E1 या अवस्थेत रेणूची ऊर्जा निम्नतर असते, तर E2 या अवस्थेत रेणू उत्तेजित झाल्यामुळे त्याची ऊर्जा E1 पेक्षा जास्त असते. या दोन अवस्थांमधील अमोनिया रेणूंचे विद्युत् गुणधर्म वेगवेगळे असतात. E1 या अवस्थेतील रेणूला द्विध्रुव परिबल [→ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले] असते, तर E2 अवस्थेतील रेणूच्या द्विध्रुव परिबलाचे सरासरी मूल्य शून्य असते. यामुळे विशिष्ट तऱ्हेचे नैकविश्व (सर्वत्र एकसारखे नसलेले) विद्युत् क्षेत्र लावून या दोन अवस्थांतील अमोनिया रेणू एकमेकांपासून वेगळे करता येतात.


एका ठराविक तापमानाचा अमोनिया वायू एका बंदीस्त पात्रात ठेवला, तर त्यामधील रेणूंचे परस्परांवर सतत आघात होत असल्यामुळे त्यामध्ये ऊष्मागतिकीय समतोल [→ ऊष्मागतिकी] निर्माण होतो. या परिस्थितीत एकंदर रेणूंपैकी काही अल्प संख्येचे रेणू उत्तेजित अवस्थेत आढळतील. पुंजयामिकीच्या सिद्धांतानुसार उत्तेजित रेणू आपल्या जवळच्या अतिरिक्त ऊर्जेचे फोटॉनाच्या स्वरूपात स्वंयस्फूर्तीने उत्सर्जन करून ते आपल्या मूळच्या कमी ऊर्जेच्या अवस्थेत जातात. कारण कोणतीही प्रणाली आपली निम्नतर ऊर्जापातळी गाठावयाचा नेहमीच प्रयत्न करीत असते. उत्सर्जित फोटॉनाची कंप्रता खालील सूत्राने मिळते.

 

E2 –E1 = h v21

 

वरील सूत्रात h = प्लांक स्थिरांक. अमोनिया रेणूच्या बाबतीत v21 चे मूल्य सु. २४,००० मेगॅहर्ट‌्झ एवढे आहे असे दाखविता येते. ऊष्मागतिकी सिद्धांतानुसार उत्सर्जित फोटॉनाच्या कला (एखाद्या संदर्भाच्या सापेक्ष असलेल्या अवस्था) यदृच्छ स्वरूपाच्या असतात व त्यांमध्ये काही परस्परसंबंध असत नाही. या प्रक्रियेमुळे बंदीस्त पात्रात तीन घटक निर्माण होतात : E1 ऊर्जा अवस्थेचे बहुसंख्य अमोनिया रेणू, E2 ऊर्जेचे कमी संख्येचे उत्तेजित अमोनिया रेणू आणि त्यांपासून उत्सर्जित झालेले v21 कंप्रतेचे मुक्त फोटॉन.

खाली वर्णन केल्याप्रमाणे, V21 या कंप्रतेचे फोटॉन अमोनियाच्या E1 व E2 या अवस्थांतील रेणूंबरोबर परस्परक्रिया करू शकतात परंतु V21 कंप्रतेच्या फोटॉनाऐवजी निराळ्या कंप्रतेचे फोटॉन बाहेरून बंदिस्त पात्रात सोडले, तर पुंजयामिकीच्या सिद्धांतानुसार हे फोटॉन व अमोनिया रेणू यांमध्ये काहीही परस्परक्रिया होणार नाही. याचा अर्थ असा होतो की, V21 या ठराविक कंप्रतेचेच फोटॉन अमोनिया रेणूंबरोबर परस्परक्रिया करू शकतात व फक्त त्यांच्याबाबतीतच विवर्धन वा आंदोलन क्रिया पुढे दाखविल्याप्रमाणे शक्य होतात. V21 फोटॉनाच्या अमोनिया रेणूबरोबर त्याच्या दोन अवस्थांनुसार दोन वेगळ्या प्रकारच्या परस्परक्रिया होतात.

(१) E1 अवस्थेतील रेणूबरोबर या फोटॉनाची परस्परक्रिया झाल्यास त्याचे संपूर्ण शोषण होऊन हा रेणू E2 या उत्तेजित अवस्थेत नेला जातो. (२) याउलट V21 कंप्रतेच्या फोटॉनाची E2 अवस्थेतील उत्तेजित अमोनिया रेणूबरोबर परस्परक्रिया झाली, तर आइन्स्टाइन यांनी दाखविल्याप्रमाणे आपाती फोटॉनाच्या प्रारण क्षेत्रामुळे हा रेणू V21 कंप्रतेच्या फोटॉनाचे उत्सर्जन करून परत आपल्या खालच्या ऊर्जा- पातळीवर येतो. या परस्परक्रियेमुळे आपाती फोटॉनाच्या ऊर्जेत फरक होत नसल्याने या विक्रियेमुळे V21 कंप्रतेच्या एका आपाती फोटॉनामुळे V21 एवढीच कंप्रता असलेल्या दुसऱ्या फोटॉनाते उत्सर्जन होते. हे उत्सर्जन स्वंयस्फूर्त स्वरूपाचे नसून उद्दीपित प्रकारे होते व या प्रकारात उत्सर्जित तरंगाची कला वा कंप्रता मूळ तरंगाच्या कला वा कंप्रतेशी एकरूप असते. या विक्रियेमुळे परिणामी फोटॉनाच्या संख्येत वाढ होते अथवा त्याचे विवर्धन होते असे आढळते.

आता दोन्ही प्रकारचे अमोनिया रेणू असलेल्या पात्रात जर V21 याच अचूक कंप्रतेची फोटॉन शलाका सोडली, तर निम्नतर अवस्थेमधील रेणूंची संख्या जास्त असल्यामुळे आपाती फोटॉनाचे शोषणच जास्त महत्त्वाचे ठरून फोटॉन शलाकेची तीव्रता कमीच होईल व तिचे विवर्धन होणार नाही. विवर्धन परिणाम मिळविण्याकरिता विशिष्ट योजना वापरून E2 अवस्तथेतील रेणूंची संख्या E1 या अवस्थेतील रेणूसंख्येपेक्षा वाढविणे आवश्यक ठरते. अशा तऱ्हेचा बदल घडवून आणणाऱ्या क्रियेस समष्टि-व्यस्तता असे म्हणतात. ऊष्मागतिकीतील बोल्टस‌्मान नियमानुसार समष्टि-व्यस्तता घडवून आणलेल्या वायूचे तापमान ऋण असते. त्यामुळे या स्थितीला तापमानाचे पर्यसन असेही म्हटले जाते.

मागे नमूद केल्याप्रमाणे विशिष्ट विद्युत् क्षेत्राचा वापर करून अमोनियामध्ये समष्टि-व्यस्तता करता येते. अमोनिया रेणूंची शलाका अशा विशिष्ट विद्युत् क्षेत्रामधून जाऊ दिल्यास या क्षेत्रामुळे फक्त उत्तेजित झालेले रेणू वेगळे केले जाऊन ते एका ⇨ विवर अनुस्पंदकात एकत्र केले जातात. अनुस्पंदकात V21 कंप्रतेचे प्रारण सोडले असता त्यायोगे फक्त दुसऱ्या प्रकारची विक्रिया होऊन फोटॉनांचे त्वरीत गुणन होते व परिणामी फोटॉन संख्येचे विवर्धन होते आणि एकच कला वा कंप्रता असलेले अनेक फोटॉन निर्माण होतात. निर्माण झालेल्या फोटॉनामध्ये व मूळच्या फोटॉनामध्ये उच्च तऱ्हेचे कलामेलन होत असल्यामुळे प्रदान संकेताची तीव्रता अनेक पटींनी वाढलेली असते. फोटॉन व उत्तेजित अमोनिया रेणू यांमध्ये परस्परक्रिया होण्याची संभाव्यता वाढविण्याकरिता (१) अमोनिया रेणूचा उत्तेजित अवस्थेतील सरासरी आयु:काल मोठा असावा लागतो व (२) अमोनिया रेणू विवर अनुस्पंदकात ठेवावे लागतात. विवर अनुस्पंदक म्हणजे एक धातूची पेटी असून तिच्या भिंतीवरून विद्युत् चुंबकीय तरंगाचे परावर्तन होते. त्यामुळे आदान संकेताचा तरंग अमोनिया रेणूंच्या मधून उलटसुलट दिशेने प्रगत होत राहतो. त्याचे अनुस्पंदकामध्ये काही अंशी स्थानबंधन होते असे म्हणता येते [→ मेसर]. प्रदान संकेत विवर अनुस्पंदकाला जोडलेल्या ⇨ तरंग मार्गदर्शकाद्वारे बाहेर नेला जातो.

मेसर विवर्धकांत अंगभूत गोंगाट निर्मितीचे प्रमाण इतर विवर्धक प्रणालींशी तुलना करता अत्यंत कमी असते. विवर्धकांमध्ये निर्माण झालेल्या आदान गोंगाटाशी संबंधित समतुल्य तापमान hv / k या सूत्राने मिळते. यामध्ये h = प्लांक स्थिरांक, v = कंप्रता, k = बोल्टस‌्मान स्थिरांक. या समतुल्य तापमानाचे मूल्य जेवढे कमी असेल त्या प्रमाणात गोंगाटाचे मूल्यही कमी असते. सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या सूक्ष्मतरंग मेसर प्रयुक्तींमध्ये समतुल्य तापमानाचे मूल्य फक्त काही अंश केल्व्हिन एवढेच असते. गोंगाटाच्या या अत्यल्प मूल्यामुळे मेसर विवर्धकाच्या साहाय्याने एका फोटॉनइतक्या अल्प ऊर्जेचे सुद्धा विवर्धन करता येते, असे म्हणावयास हरकत नाही.

मेसर विवर्धकांमध्ये वर वर्णन केलेल्या प्रक्रियेमुळे मिळणारे विवर्धनाचे उच्च मूल्य व संकेताच्या विकृतीचा संपूर्ण अभाव आणि त्यामध्ये मिळणारे गोंगाटाचे अत्यल्प प्रमाण या गोष्टी विचारात घेता या विवर्धकांची गुणवत्ता उच्च प्रतीची का असते, याचा खुलासा मिळतो. विवर्धनाचे मूल्य उच्च असल्यामुळे अर्थातच हे विवर्धक अत्यंत संवेदनक्षम असतात. मिमी. तरंगलांबीच्या विद्युत् चुंबकीय सूक्ष्मतरंगाचे विवर्धन मेसरने करता येते. अवरक्त, दृश्य व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रकाशतरंगांच्या विवर्धनाकरिता मेसरच्याच तत्त्वांवर कार्य करणारे पण तंत्राच्या बाबतीत काहीसे भिन्न असलेले विवर्धक वापरण्यात येतात. त्यांना लेसर किंवा प्रकाशीय मेसर अशी संज्ञा आहे. पारंपारीक घटक वापरून बनवलेली मंडले सूक्म् तरंग अगर प्रकाशीय विभागांत कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे या विभागांत योग्य असे घटक – विवर अनुस्पंदक, तरंग मार्गदर्शक, प्रकाशीय अनुस्पंदक, प्रकाशीय तंतू [→ प्रकाशीय संदेशवहन] इ.–वापरून मंडले तयार करावी लागतात. मेसरमधील गोंगाटाचे प्रमाण अगदी कमी करण्याकरिता विवर्धक प्रयुक्त्या अत्यंत नीच तापमानापर्यंत (४ – ५ के.) थंड केल्या जातात.

इतर प्रयुक्ती व अनुप्रयोग : पुंज-इलेक्ट्रॉनिकी संबंधीचे आतापर्यंतचे विवेचन अमोनिया मेसरच्या संदर्भातच करण्यात आले आहे. अलीकडील काळात मेसर व लेसरचे कार्य करणाऱ्या निरनिराळ्या घनावस्थी प्रयुक्त्या शोधून काढण्यात आल्या आहेत. त्यांमध्ये उपयोगात आणलेली कार्यकारी तत्त्वे मूलत: रेणूंच्या अनुस्पंदन कंप्रतांवर आधारित परंतु तंत्राच्या दृष्टीने काहीशी भिन्न प्रकारची आहेत.


मेसर विवर्धकाचा उपयोग उपग्रह संदेशवहन, रेडिओ ज्योतिषशास्त्र, दीर्घ अंतर रडार इ. प्रणालींमध्ये विशेष होतो. वर वर्णन केलेला अमोनिया मेसर एका अत्यंत अरुंद कंप्रता पट्ट्यात कार्य करीत असल्यामुळे त्याचा उपयोग आंदोलक अथवा कंप्रता मानक (मूलभूत प्रमाण) म्हणून करणे जास्त योग्य ठरते. यामध्ये (१) गोंगाटाचे प्रमाण अत्यल्प असून कंप्रता कालाप्रमाणे बदलत नाही. या आंदोलकाच्या कंप्रतेत एक वर्षात होणारा एकंदर बदल हा १ अब्ज भागांमध्ये एका भागापेक्षाही कमी मूल्याचा असतो, असे आढळून येते. (२) प्रदान संकेतात फक्त एकच कंप्रता उपस्थित असते व इतर घटक अनुपस्थित असतात. त्यामुळे त्याचा तरंगाकार संपूर्णपणे ‘ज्या’ वक्राकार असतो. मेसर आंदोलकाच्या कंप्रतास्थैर्याचा उपयोग घड्याळाचे नियंत्रण करण्याकरिता करता येतो. याप्रकारे नियंत्रित केलेल्या घड्याळाने दाखविलेल्या वेळात होणारा बदल काही शतक वर्षांत फक्त एक सेकंद या प्रमाणात असेल, असे गणन करून दाखविण्यात आले आहे.

लेसरपासून मिळणाऱ्या उच्च तीव्रतेच्या प्रकाशशलाका वापरून अनेक तऱ्हेचे प्रयोग करण्यात आले आहेत. या सर्वांचा समावेश पुंज-इलेक्ट्रॉनिकीमध्ये केला जातो. त्यांपैकी काही प्रातिनिधिक प्रयोगांचा येथे निर्देश केला आहे : (१) नैकरेषीय प्रकाशकी [→ नैकरेषीय आविष्कार], (२) लेसर शलाकेद्वारा वायूचे विद्युत् विभंजन, (३) इलेक्ट्रॉन भडिमाराद्वारे कलामेलित प्रकाश उत्सर्जन, (४) घन व द्रव पदार्थांमधून लेसरद्वारा उद्दीपित रामन प्रारणाचे उत्सर्जन [→ रामन परिणाम], (५) स्थिर प्रकाश तरंग आकृतिबंधात मिळणारे लेसर फोटॉन (जे कलामेलीत असतात ते) व इलेक्ट्रॉन यांमधील परस्परक्रिया, (६) होलोग्राफी [त्रिमितीय छायाचित्रण व त्रिमितीय प्रतिमेचे अवकाशात प्रक्षेपण → होलोग्राफी].

संदर्भ : 1. Gordon, J. P. Maser, Scientific American, December, 1958.

     2. Kelley, P. L. Lax, B. Tanewald, P. E. Physics of Quantum Electronics, New York, 1966.

     3. Lengyel, B. A. Introduction to Laser Physics, New York, 1966.

     4. Thewlis, J., Ed. Encyclopaedic Dictionary of Physics, Vol. 4, Oxford, 1961.

चिपळोणकर, व. त्रिं.