शीतनिष्क्रियता : (हायबर्नेशन). पुष्कळ प्राणी थंडीचा काळ गलितगात्र होऊन शिथिलतेत घालवितात. ह्या त्यांच्या अवस्थेला शीतनिष्क्रियता असे म्हणतात. अन्नाची कमतरता व थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास शीतनिष्क्रियतेचा उपयोग होतो. थंडीप्रमाणे अति-उष्णताही प्राण्यांना सहन होत नाही. अति-उष्णतेचे निवारण करण्यासाठीही अशा अवस्थेचे अवलंबन काही प्राणी करतात व त्या अवस्थेला ⇨ ग्रीष्मनिष्क्रियता असे म्हणतात. ह्या क्रिया मुख्यत्वेकरून गोड्या पाण्यातील व भूपृष्ठावरील प्राण्यांमध्ये आढळतात. समुद्रातील प्राणी सहसा ह्या उपायांचा अवलंब करीत नाहीत.

अनियततापी प्राणी : पुष्कळ ⇨ अपृष्ठवंशी प्राणी हिवाळ्यातही क्रियाशील असतात उदा., पाण्यातील गोगलगाय, गांडूळ, कोळी वगैरे. इतर काही प्राणी मात्र हिवाळ्यात निष्क्रिय होतात. ते हिवाळ्याचा काळ पुटीभूत अंडजावस्थेत तरी घालवतात किंवा शीतसुप्तीत घालवतात. शीतसुप्ती हा प्राण्यांचा एक सामान्य गुणधर्म आहे. फुलपाखरे, घरातल्या माश्या, मधमाश्या इ. कीटक शीतनिष्क्रियता अवस्थेतून जातात. गोगलगायी आपल्या कवचाचे झाकण बंद करून आत निष्क्रियपणे राहतात. रोटिफेरानामक गोड्या पाण्यातील प्राणी आणि प्लँटलाईस हे ढेकणाच्या जातीचे कीटक हिवाळ्यात वेगळ्या प्रकारची अंडी घालतात, त्यांना हिवाळी अंडी असे म्हणतात. इतर काही कीटक कोषावस्थेतच हिवाळा घालवितात.

पृष्ठवंशी अनियततापी प्राण्यांची शीतसुप्ती अपृष्ठवंशी प्राण्यांच्या शीतसुप्तीप्रमाणेच असते. अनेक प्रकारचे मासे व बेडूक चिखलात स्वतःला पुरून घेतात. सरडे व साप खडकांच्या फटीत किंवा दगडांखाली शीतसुप्तीत असलेले आढळतात. केव्हाकेव्हा तर एका जातीच्या अनेक प्राण्यांची सामुदायिक शीतसुप्ती दृष्टीस पडते. शीतसुप्त प्राण्यांचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा थोडे जास्त म्हणजे १–२ अंशच जास्त असते. बेडूक आणि तत्सम प्राणी तापमान खूपच खाली आल्यास गोठून मरण पावतात.

नियततापी प्राणी : पक्षी शीतनिष्क्रियतेचा अवलंब करताना आढळत नाहीत. भांडीक व दुर्बल हे पक्षी हिवाळ्यात नाहीसे झालेले दिसतात पण ते शीतसुप्तीमुळे नव्हे तर त्यांनी स्थलांतर केलेले असते म्हणून. सस्तन प्राण्यांच्या शीतसुप्तीबाबत मात्र अजूनही पूर्ण ज्ञान झालेले नाही. विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे, काही शीतसुप्त सस्तन प्राण्यांत त्यांची ठराविक उष्णता राखण्याची शक्ती कमी होते व ते अनियततापी प्राण्यांप्रमाणे वागतात. अस्वल, स्कंक, रॅकून इ. प्राणी हिवाळ्यात योग्य स्थळी निवारा घेतात पण नियततापी प्राणी म्हणूनच राहतात. ध्रुवावरचे अस्वल पिलांना जन्म देते ते ह्याच वातावरणात परंतु शीतसुप्ती घेणाऱ्या इतर सस्तन प्राण्यांचे (उदा., मार्मोट, जमिनीवरची खार, वटवाघुळे इ.) तापमान हिवाळ्यात इतके खाली येते की, बाहेरील तापमानापेक्षा १–२ अंशच वर असते आणि प्राणी शीतसुप्तीत असेपर्यंत ते तसेच राहते.

ज्या प्राण्यांमध्ये शीतसुप्ती नेहमीच आढळते, त्यांच्यातही ती क्रिया अनियमित प्रमाणात विभागलेली असते व त्यामुळे प्राण्याच्या जीवनव्यापाराशी त्याच्या शीतसुप्तीचा तादृश संबंध प्रस्थापिणे कठीण जाते.

बरेचसे कृंतक व कीटकभक्षक प्राणी थंड प्रदेशात राहूनही किंवा त्यांना शीतनिष्क्रियतेला अनुकूल वातावरण असतानाही थोडा काळसुद्धा शीतनिष्क्रियतेत घालवीत नाहीत. काही प्राण्यांच्या शीतसुप्तीचा काळ व तीव्रता ह्यांत बदल होत असतात. काही प्राणी सबंध हिवाळा शीतसुप्तीत न घालवता मध्यंतरी अनेक वेळा क्रियाशील झालेले आढळतात. शीतसुप्ती अवस्थेतून जाणारे सर्वच सस्तन प्राणी, शीतसुप्तीत गोठण्याचा संभव निर्माण झाल्यास निद्रेतून तात्काळ उठतात.

जीवनव्यापार : शीतनिष्क्रियता ही केवळ थंडीचा परिणाम आहे असे नव्हे. सर्वसाधारणपणे शीतसुप्तीत जाणारे प्राणी ग्रीष्मनिष्क्रियताही अनुभवतात. ग्रीष्म व शीत सुप्तीचे स्वरूप सारखेच असते. शीतसुप्तीत जाणाऱ्याप्राण्यांची थंडीसंबंधीची संवेदनशीलता नेहमी बदलत असते. साधारणपणे वातावरणातील तापमान १२0–१५0 से. इतके खाली आले की, शीतनिष्क्रियतेस सुरुवात होते परंतु त्याच जातीतील काही प्राणी मात्र याही तापमानाखाली खूप वेळा सक्रिय राहू शकतात. यावरून असे अनुमान काढता येते की, शरीरातल्या जीवनव्यापारातील फेरफारांमुळे किंवा इतरही काही उद्दीपकांमुळे हा शीतनिष्क्रियतेचा बदल घडू शकतो.शरीरात शीतनिष्क्रियतेला अनुकूल असे जे फेरफार होत असतात, त्यात शारीरिक जडत्व हा एक होय. बहुतेक शीतसुप्ती अनुभवणारे प्राणी क्रियाशील काळाच्या शेवटी लठ्ठ होतात आणि ह्या काळात संग्रहित केलेली चरबी (मेद) निष्क्रियतेच्या काळात उपयोगात आणतात. मेदाचा संग्रह न करणारे प्राणी लवकर शीतसुप्तीत जात नाहीत. कार्बन डाय-ऑक्साइडच्या सान्निध्यातसुद्धा प्राण्यांना शीतसुप्तीत जाता येते.शीतनिष्क्रियतेच्या अवस्थेत प्राण्यांचा देहव्यापार पार बदलतो. शरीराचे तापमान २0 –४0 से. पर्यंत खाली येते. हृदयाचे ठोके फार मंद होतात. श्वासोच्छ्वासही मंद होतो. नेहमी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या २-५% एवढा ऑक्सिजनही निद्रावस्थेत लागत नाही. सोडलेल्या कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण घेतलेल्या ऑक्सिजनपेक्षा कमी होते. ऊतकातील पाण्याच्या प्रमाणात फरक होतो. त्वचेची संवेदनशीलता नेहमीपेक्षा कमी होते. रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते. अंतःस्रावी ग्रंथींचे (अवटू ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी व जनन ग्रंथी यांचे) कार्य मंदावते पण तंत्रिका-तंत्र मात्र पूर्णतः निष्क्रिय असतेच असे नाही. सूक्ष्म व अतिसूक्ष्म प्राण्यांमध्ये मृतप्राय निद्रावस्था आढळते. हे प्राणी वाळून गेले, तरी पावसाचे पाणी मिळाल्याबरोबर त्यांना जाग येते व ते पूर्ववत आपल्या उद्योगाला लागतात. सर्वसाधारणपणे १४0–१६ 0 से. इतके तापमान चढले की, प्राणी शीतसुप्तीतून जागे होऊ लागतात. शीतसुप्तीतून उठणे बहुधा झपाट्याने होते. काही वेळा मात्र फार वेळ लागतो. शारीरिक व्यापार वाढत्या तापमानाबरोबर हळूहळू स्थिरस्थावर होतो.

सिद्धांत : निष्क्रियतेसंबंधी होणाऱ्या विविध जीवनव्यापारविषयक प्रक्रिया कशा होतात किंवा होऊ शकतील, यासंबंधी अनेक सिंद्धांत मांडले गेले, पण कोणताच सिद्धांत सर्वमान्य ठरलेला नाही. शीतनिष्क्रियतेसंबंधीचे केंद्र मध्यमस्तिष्कामध्ये असावे. ह्या मुख्य केंद्राच्या द्वारे विकेंद्रीकरण होऊन अंतःस्रावी ग्रंथींच्यातर्फे निष्क्रियतेला अनुकूल बदल कार्यवाहीत आणले जात असावेत. तथापि हा सिद्धांतदेखील पूर्णपणे मान्य झालेला नाही.

जोशी, अ. कृ. पाटील, चंद्रकांत प.