ओस्टव्हाल्ट, (फ्रीड्रिख) व्हिल्हेल्म : (२ सप्टेंबर १८५३ — ४ एप्रिल १९३२).  जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म लॅटव्हियातील रीगा येथे झाला. एस्टोनियामधील डोरपेट विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. तेथेच त्यांना १८७८ मध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळाली. त्यांनी काही काळ माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी केली. १८८५ मध्ये रीगा विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. १८८७ ते १९०६ या काळात ते लाइपसिक विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्रध्यापक होते. १९०६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

उत्प्रेरण (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थांची म्हणजे उत्प्रेरकांची होणारी क्रिया), रासायनिक समतोल व विक्रिया वेग यांवरील त्यांच्या मौलिक संशोधनाबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषक त्यांना देण्यात आले. त्यांनी शोधून काढलेला एक श्यानतामापक (द्रव पदार्थातील अंतर्गत घर्षण मोजण्याचे उपकरण) अद्यापही त्यांच्या नावानेच ओळखला जातो. १८९४ मध्ये त्यांनी उत्प्रेरकाची आधुनिक व साधार व्याख्या ठरविली. त्यामुळे बऱ्याच उत्प्रेरकीय विक्रियांच्या अभ्यासास चालना मिळाली [→उत्प्रेरण].१९०२ मध्ये अमोनियाचे उत्प्रेरकाच्या साहाय्याने नायट्रिक अम्‍लात रूपांतर करण्याच्या पद्धतीचे त्यांनी एकस्व (पेटंट) घेतले. ह्या पद्धतीत अमोनियाचे उत्प्रेरकीय ऑक्सिडीकरण [ऑक्सिजनाचा समावेश करणारी प्रक्रिया, →ऑक्सिडीभवन] होते व तिला ओस्टव्हाल्ट-ब्राऊअर पद्धती असे म्हणतात. ही पद्धती पुढे औद्योगिकद्दष्ट्या महत्त्वाची ठरली. विद्युत् रसायनशास्त्र, दुर्बल, अम्‍ले व क्षारके (अम्‍लांशी विक्रिया होऊन लवणे देणारे पदार्थ) यांच्या विषयीचा सिद्धांत, एस्टरे व त्यांचे घटक यांचा समतोल, उत्प्रेरकांचा अभ्यास इ. विषयांत त्यांनी महत्त्वाची भर घातली.

त्यांनी भौतिकीय व वैश्लेषिक रसायनशास्त्रावर अनेक पाठ्य पुस्तके  प्रसिद्ध केली. Zeitschrift fur physickalische Chemie या शास्त्रीय पत्रिकेच्या स्थापनेत (१८८७) त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी आपल्या ग्रंथांतून आणि नियतकालिकांतून इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनासही प्रसिद्धी दिली, त्यामुळे भौतिकीय रसायनशास्त्राच्या प्रगतीस फार साहाय्य झाले. १८८९ मध्ये त्यांनी , त्या कालापर्यंत प्रसिद्ध झालेले सर्व महत्त्वाचे रसायनशास्त्रातील निबंध Klasseiker  der  exakten  Wissenchaften या नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. सर्व द्रव्य स्वरूपाचे विवरण अणूंच्या रूपात करता येते यावर विश्वास नसणारे व फक्त ऊर्जेमुळे तिचे विवरण करता येते, असे मानणारे ते कदाचित शेवटचे मोठे रसायनतज्ञ होत. थोर शास्त्रज्ञांकडून जे ज्ञानोत्पादन होते त्याची मानसशास्त्रीय कारणमीमांसा करणारा Grosse Manner हा ग्रंथ १९०९ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केला. लाइपसिक जवळील ग्राॅस बॉथेन येथे ते मृत्यू  पावले.

जमदाडे, ज. वि.