जंतुविषरक्तता : (सेप्टिसिमिया). सूक्ष्मजंतू व त्यांच्यापासून तयार झालेली अंतर्विषे (जंतूच्या शरीरात असणारी विषे) व बाह्यविषे (जंतूच्या शरीराबाहेर टाकली जाणारी विषे) यांचा रक्तात मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाल्यामुळे शरीराच्या तापमानात एकदम वाढ होऊन जी मारक रोगी अवस्था निर्माण होते, तिला जंतुविषरक्तता म्हणतात. सूक्ष्मजंतूंचा रक्तात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होऊन रक्तपरिवहनाबरोबर शरीराच्या सर्व भागांत पसरल्यामुळे होणाऱ्या अवस्थेला ⇨जंतूरक्तता (बॅक्टिरिमिया) म्हणतात, तर शरीराच्या एका भागात सूक्ष्मजंतूंचे स्थानीकरण (एका ठिकाणी गोळा होणे) होऊन त्यांच्यापासून तयार झालेली विषे रक्तात मिसळली जाऊन रक्तपरिवहनाबरोबर शरीराच्या सर्व भागांत पसरल्यामुळे होणाऱ्या अवस्थेला ⇨ विषरक्तता (टॉक्सिमिया) म्हणतात.

  जंतुरक्तता व जंतुविषरक्तता यांतील मुख्य फरक म्हणजे जंतुरक्ततेमध्ये सूक्ष्मजंतू रक्तपरिवहनात फार थोडा वेळ असतात व त्यामुळे बहुधा काहीही लक्षणे दिसत नाहीत. जंतुविषरक्ततेत रोगकारक जंतू बराच काळ रक्तामध्ये आढळून येतात आणि शरीराची प्रतिकार साधने कार्यान्वित होऊन जंतू व त्यांची विषे यांविरुद्ध प्रतिकार करू लागतात आणि ताप, घाम येणे इ. लक्षणे दिसून येतात.

मानवात अनेक रोगांमध्ये जंतुरक्तता आढळते. रक्तातील बहुकेंद्रकी कोशिका (एकापेक्षा अधिक केंद्रके असलेल्या पेशी) तसेच यकृत, प्लीहा (पानथरी) आणि फुप्फुसे यांतील जालिका अंतःस्तरी तंत्रातील (आतील पृष्ठभागावर असणाऱ्या व जालिका संरचनेच्या कोशिकांच्या समूहातील) कोशिका जंतूंचा नाश करतात परंतु दुर्बलता आणणाऱ्या दीर्घ आजाराने अथवा कॉर्टिकोस्टेरॉइड इ. औषधांच्या वापरामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सूक्ष्मजंतूंना रक्तात मोठ्या प्रमाणात वाढण्यास संधी मिळते. मग सूक्ष्मजंतूंचा आणि त्यांच्या विषांचा शरीरभर मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन जंतुविषरक्तता निर्माण होते.

सूक्ष्मजंतूंप्रमाणेच व्हायरस व प्रोटोझोआ यांचा रक्तात प्रवेश होऊन अशी अवस्था निर्माण होऊ शकते. व्हायरस विष तयार करीत नसला, तरी शरीरातील कोशिकांच्या मृत्युला कारणीभूत होतो. अशा मृत कोशिकांपासून तयार होणारे विषारी पदार्थ रक्तपरिवहनाद्वारे सर्व शरीरात पसरतात. सामान्यतः अशा विषांचे यकृतात निर्विषीकरण होते किंवा ती मलमूत्रावाटे शरीराबाहेर टाकली जातात. काही वेळा सूक्ष्मजंतू, व्हायरस वा प्रोटोझोआ यांची मोठ्या प्रमाणावर व जलद वाढ झाल्यामुळे हे शक्य होत नाही व परिणामी जंतुविषरक्तता होऊन शरीरातील सर्व इंद्रियांना इजा पोहोचते व मृत्यूचा धोका संभवतो.

  संबंधित जंतू ज्या प्रमाणात रोगकारक असतात त्या प्रमाणात जंतुरक्ततेचे गांभीर्य वाढते. काही वेळा पू उत्पन्न करणाऱ्या जंतूमुळे जंतुविषरक्तता झाल्यास तडकाफडकी मृत्यु न होता शरीराच्या निरनिराळ्या भागांत लहान लहान विद्रधी (गळवे) उत्पन्न होऊन विकार रेंगाळत राहतो. अशा वेळी या अवस्थेस ⇨पूयरक्तता म्हणतात.

  पीत पुंजगोलाणू (स्टॅफिलोकॉकस ऑरियस ), फुप्फुस गोलाणू (न्युमोकॉकस), पूयी मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस), नायसेरिया मेनिनजिटीडीस, क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय, एश्चेरिकिया कोलाय  व इतर ग्रॅम-रंजक अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजक क्रियेमध्ये तयार होणारा जांभळटसर रंग टिकून न राहणारे) सूक्ष्मजंतू हे जंतूविषरक्तता निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंपैकी काही होत. मोठ्या जखमा, कष्टप्रसूती, गर्भपात, नीलाशोथ (दाहयुक्त सूज), हृद् कपाटांचा (हृदयातील झडपांचा) शोथ, भाजल्यामुळे झालेल्या जखमा, वृद्धांत मूत्र तंत्रावर (संस्थेवर) केलेल्या शस्त्रक्रियेनंतर इ. वेळी जंतुविषरक्तता होण्याचा संभव असतो.

  लक्षणे : डोके दुखणे, अन्नावरील वासना उडणे, थकवा येणे, मळमळणे, ओकारी येणे इ. तीव्र संसर्गजन्य रोगांत आढळणारी लक्षणे यातही दिसतात. याशिवाय थंडी वाजून ताप येतो व तापाचा चढ-उतार होतो. रक्तातील तांबड्या कोशिका फुटल्यास कावीळ आढळते. रक्तातील बहुकेंद्रकी कोशिकांची संख्या ही रोग्याच्या प्रतिकारशक्तीचे निदर्शक असते.

चिकित्सा : रक्तातील रोगजंतूचे शरीराबाहेर संवर्धन करून त्या जंतूला मारणारे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषध निश्चित करता येते. योग्य प्रतिजैव आणि जंतुप्रतिरोधी (जंतूंची वाढ थांबविणारी) औषधे वापरल्याने रोगी बरा होतो. त्याचबरोबर इतर साहाय्यक उपचारही करावे लागतात.

पशूंतील जंतूरक्तता : पशूंमध्ये काही संसर्गजन्य रोगकारक जंतूंमुळे जंतुविषरक्तता होते. सामान्यपणे विस्तृत प्रमाणावर झालेल्या जखमा, हाडे आणि सांधे यांना आलेली सूज, नीलाशोथ, कष्टप्रसूतीच्या वेळी झालेल्या जखमा, भाजल्यामुळे होणाऱ्या मोठ्या आकारमानाच्या उघड्या जखमा यांतून रोगकारक जंतूंचा शरीरात प्रवेश होतो. अनुकूल परिस्थितीत हे जंतू झपाट्याने वाढतात व शरीराची प्रतिकार साधने अपुरी पडून जंतुविषरक्तता होते. सांसर्गिक काळपुळी, डुकरांचे धावरे इ. सांसर्गिक रोगांत जंतुविषरक्तता हे एक लक्षण आढळते तर गळसुजीसारख्या प्रामुख्याने गाई-म्हशींना होणाऱ्या रोगात जंतुविषरक्तता हे प्रमुख लक्षण असते. याशिवाय रक्तपरिवहनाद्वारे शरीरातील निरनिराळ्या भागांत पोहोचलेले जंतू त्या ठिकाणी स्थानिक स्वरूपात राहून अंतःस्तरीय इजा करतात. त्यामुळे बारीक रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. इतर लक्षणे अर्थातच जंतूंची विकार उत्पन्न करण्याची क्षमता व त्यांचे रक्तातील प्रमाण यांवर अवलंबून असतात. अशक्त पशूंत तर काहीही लक्षणे न दिसता एकाएकी ताप चढून मृत्यू येतो. इतर पशूंमध्ये थंडी भरल्याप्रमाणे अंग थडथडणे घामाने न्हाऊन निघणे कष्टमय श्वासोच्छ्‌वास नाडी जलद चालणे तोंड, नाक किंवा डोळे यांच्या श्लेष्मकलेवर (अस्तर त्वचेवर) धमन्यांतील रक्तस्रावामुळे टाचणीच्या टोकाएवढे तांबडे ठिपके दिसणे इ. लक्षणे दिसतात.

  सूक्ष्मदर्शकाने केलेल्या रक्ततपासणीत रोगकारक जंतू आढळल्यास, त्याचप्रमाणे डोळे व नाक यांच्या श्लेष्मकलेवर दिसणारे तांबडे ठिपके व उच्च ताप यांवरून रोगनिदान होऊ शकते.

  जंतूंचा नाश करणारी रासायनिक व प्रतिजैव औषधे त्वरित टोचल्यास रोगी जनावर बरे होते. यांमध्ये सल्फा औषधे, पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन व टेरामायसीन ही औषधे विशेष गुणकारी ठरली आहेत. तसेच विशिष्ट सांसर्गिक रोगकारक जंतूंमुळे जंतुविषरक्तता झाली असल्यास त्या रोगाविरुद्धचा रक्तरस टोचतात. 

सलगर, द. चि. गद्रे, य. त्र्यं.