क्लॉसियस, रूडॉल्फ यूलिउस एमानूएल : (२ जानेवारी १८२२–२४ ऑगस्ट १८८८). जर्मन भौतिकीविज्ञ. ऊष्मागतिकी (उष्णता आणि यांत्रिक वा इतर ऊर्जा यांतील संबंधाचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) व रेणवीय भौतिकी या शाखांत महत्त्वाचे कार्य. प्रशियातील कोएसलीन येथे त्यांचा जन्म झाला. स्टेटीन व बर्लिन या विद्यापीठांत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बर्लिन (१८५०), झुरिक (१८५५), वुर्ट्‍सबर्ग (१८६७) आणि बॉन (१८६९) येथे भौतिकीचे अध्यापन केले.

त्यांनी १८५० मध्ये ऊष्मागतिकीचा दुसरा नियम (एंट्रॉपीच्या भाषेत) मांडला. ⇨द्रव्याच्या गत्यात्मक सिद्धांताचे त्यांनी १८५७ मध्ये प्रथमच पूर्णतः गणितीय विवेचन तयार केले. ‘विद्युत् विश्लेषणात विद्युत् चालक प्रेरणा सुरू करण्यापूर्वीच रेणूंचे अपघटन (घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) पुनःसंयोग एकसारखे चालू असतात व विद्युत् चालक प्रेरणा ही केवळ त्यांना विशिष्ट दिशेत मार्गदर्शित करणारी आहे’, हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला.

ते इंग्लंडची रॉयल सोसायटी व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य होते. रॉयल सोसायटीने १८७९ मध्ये त्यांना कॉल्पी पदक देऊन त्यांचा गौरव केला. ऊष्मागतिकी व द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत या विषयांवरील त्यांचे ग्रंथ व संशोधनपर निबंध सुप्रसिद्ध आहेत. ते बॉन येथे मृत्यू पावले.

पहा : ऊष्मागतिकी.

भदे, व. ग.