उपार्जित गुणधर्म: सजीवाच्या हयातीत भोवतालच्या परिस्थितीच्या किंवा इतर कार्यात्मक प्रभावामुळे शरीर अगर त्याच्या भागांवर होणारे परिणामकारक बदल म्हणजे उपार्जित गुणधर्म होत.

जीवविज्ञानात  भ्रूणविज्ञानाचा अभ्यास होऊ लागल्यावर दोन पिढ्यांत आनुवंशिक साधर्म्य व भेद का व कसे होतात, हे समजून घेण्याकडे शास्त्रज्ञ प्रवृत्त झाले. तसेच आनुवंशिकतेचे जैव क्रम विकासावर [साध्या सजीवांपासून अधिकाधिक जटिल सजीवांच्या हळूहळू क्रमाक्रमाने होत जाणाऱ्या उत्क्रांतीवर, क्रमविकास] स्वाभाविकच पण महत्त्वाचे परिणाम होत असल्याने त्यासंबंधीची आपापली अनुमाने शास्त्रज्ञ पुढे मांडू लागले. उपार्जित गुणधर्म हा अशाच एका विचारप्रणालीचा भाग असून तो लामार्क (१७२४–१८२९) या प्रसिद्ध फ्रेंच शास्त्रज्ञांना १८०१ च्या सुमारास सुचला व त्यांस वंशानुक्रमवादाचे संस्थापक असे संबोधिले जाऊ लागले.

नंतर १८०९ मध्ये लामार्क यांनी Philosophie Zoologiqueया ग्रंथात दोन सिद्धांतांच्याद्वारे जैव क्रमविकासाची कल्पना प्रथम मांडली. या कल्पनेचे स्वरूप थोडक्यात पुढीलप्रमाणे होते (१) सजीवात सतत उपयोगात येणारी व म्हणून आवश्यक ठरणारी इंद्रीये बलवान होतात व वाढतात, तर अनुपयोगी इंद्रीये अनावश्यकतेमुळे क्षीण होतात, खुरटतात व शेवटी लोप पावतात. (२) भोवतालच्या परिस्थितीच्या प्रदीर्घ परिणामाने त्या त्या जातीत घडणारे असे इंद्रीयातील बदल आनुवंशिकतेद्वारे घेतले जातात अथवा टाकले जातात. पुढे १८१५ मध्ये Historie naturelle de animaux sans vertebras या ग्रंथाच्या प्रथम खंडात लामार्क यांनी आपले विचार चार सिद्धांतांत मांडले. त्यांचे संक्षिप्त स्वरूप असे आहे : (१) जीवनशक्ती प्रत्येक सजीवाचे आकारमान विवक्षित मर्यादेपर्यंत वाढवू शकते. (२) प्राण्यात नव्याने उत्पन्न होणारे इंद्रिय हे त्याला नव्याने पण सतत वाटणार्‍या गरजेपोटीच निर्माण होते. (३) कोणत्याही इंद्रियाच्या वाढीचे व त्याच्या प्रभावीपणाचे प्रमाण त्याच्या वापरावर अवलंबून असते. (४) प्राणिमात्राच्या जीवनात असे उपार्जित गुणधर्म किंवा घडून आलेले बदल आनुवंशिकतेमुळे सुरक्षित राहतात व त्या प्राण्याच्या संततीकडे सोपविले जातात. जैव क्रमविकासवादातील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या उपार्जित गुणधर्माचे अनुहरण (वारसा मिळणे) किंवा लामार्कवाद (लामार्किझम) ह्या समानार्थक शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या सिद्धांताचे मूळ वरील चौथ्या सिद्धांतात सापडते.

उपार्जित गुणधर्मांच्या अनुहरणतत्त्वानुसार उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख व संबंधित स्नायू हे वापराने बलवान झाले व आवश्यकतेमुळे त्यांचे अनुहरण केले गेले (पुढील पिढीला त्याचा वारसा मिळाला) जलचर पक्ष्यांत पाय, मान व चोच यांची लांबी अशाच गरजेमुळे आवश्यक भासू लागली व त्यांचे अनुहरण झाले बेडकात मागील पायांची बोटे पोहताना ताणली जाऊन अशाच पद्धतीने जालयुक्त झाली तर जिराफाची लांब मान हा या पद्धतीचाच परिणाम होय. तथापि, उपार्जित गुणधर्मांच्या अनुहरणवादाची योग्यायोग्यता व संबंधित पुरावे पुढील पद्धतीने मांडून पाहता येतात :

(१) शरीराची सामान्यतः असलेली रचना व कार्ये आणि बदलत्या परिस्थितीचा परिणाम: माणसात विवक्षित वापराने त्वचा जाड होते. तळपायाची कातडी जाड असतेच. गर्भाच्या साधारण पाचव्या महिन्यातच ती जाड होण्यास सुरुवात होते. आता जमिनीशी संबंध न येणाऱ्या गर्भात असा कायिक बदल कसा होऊ शकेल? म्हणजेच या बदलाचे– उपार्जित गुणधर्माचे– अनुहरण होत असले पाहिजे, असे सीमन या शास्त्रज्ञांचे मत आहे. हे बरोबर असेल, तर हा एक काल-पूर्व अनुहरणाचा प्रकार होऊ शकेल. सप्ताळू (पीच) ह्या झाडाची रोपे विशिष्ट हवामानात वाढविल्यास सदैव हिरवीगार राहू लागतात व अशा झाडांपासून केलेली रोपे ज्या ठिकाणी सप्ताळूची पाने झडतात, अशा ठिकाणी लावल्यास हिरवीगार राहतात असे दिसून आले आहे. म्हणजे येथे परिस्थितीजन्य गुणधर्माचे अनुहरण होऊ शकते. उष्ण व थंड अशा वेगवेगळ्या तापमानांत उंदरांची वाढ केल्यास त्यांच्या कान, मागील पाय व शेपटी यांच्या लांबीत फरक पडतो. अशा उंदरांपासून एकाच परिस्थितीत संततीची निर्मिती झाली, तर वरील बदल समजू शकतील एवढ्या प्रमाणात अनुहरण होते. गुहावासी सॅलॅमँडरमध्ये डोळ्याचा ऱ्हास होतो. अँब्लिऑप्सिस ह्या आंधळ्या गुहावासी माशामध्ये अंधाऱ्या परिस्थितीमुळे त्वचेच्या रंगद्रव्याचा अभाव इतक्या पूर्णावस्थेस गेला आहे की, त्याची संतती उजेडात वाढविली तरी त्यांच्या त्वचेत बदल होत नाही.

(२) मुद्दाम केलेले अथवा अपघातजन्य विकलीकरण (छिन्नविछिन्न करणे): ब्रूअर यांनी एका मांजराच्या मादीच्या शेपटीस अपघाताने निर्माण झालेली विकृती पुढील संततीत उतरल्याचे म्हटले आहे. तर वाइझमन यांनी उंदरांच्या शेपट्या मुद्दाम कापून, अशा उंदरांपासून झालेल्या संततीच्या बऱ्याच पिढ्यांचा अभ्यास करून, सर्व उंदरांत पूर्ण वाढीच्याच शेपट्या आढळल्याचे म्हटले आहे.

(३) एखाद्या भागाच्या प्रतिरोपणाचा (एका जागेवरून काढून दुसऱ्या जागी बसविण्याचा) परिणाम: वेगवेगळ्या गुणधर्मांचे (उदा., काळ्या, पांढऱ्या इ. रंगांचे) ससे, गिनीपिग, कोंबड्या इ. प्राण्यांत विदलन (अंड्याचे बहुकोशिक भ्रूणात रूपांतर करणारी सूत्री विभाजनाची श्रेणी) होत असलेल्या अंडाणूचे अथवा अंडाशयाचे प्रतिरोपण केल्यावर धात्रेय-मातेचा (दाईचे काम करणाऱ्या आईचा) त्याच्या वाढीवर काही परिणाम होत नसल्याचे आढळते. वनस्पतींतही प्रतिरोपित फांदीस येणारी पाने-फुले यांवर वनस्पतीचा असा काही परिणाम होत नाही.

(४) इंद्रियविज्ञान प्रयोग : अगार यांनी गोड्या पाण्यातील एक प्रकारच्या चिंगाटीच्या आहारात बदल करून तिच्या कवचात बदल होतो व असे बदल सु. दोन पिढ्या तरी टिकतात, असे दाखवून दिले आहे. गायर व स्मिथ यांनी सशाच्या नेत्रमण्याचा प्रतिजन (जो पदार्थ शरीरात घातल्यावर प्रतिपिंड उत्पन्न करतो तो) म्हणून वापर करून व त्याने कोंबड्यांत प्रतिपिंड (सूक्ष्मजंतू, विषे किंवा इतरकाही पदार्थ शरीरात शिरल्यावर त्यांना विरोध करण्याकरिता रक्तद्रवात उत्पन्न होणारे खास पदार्थ) निर्माण करून त्यांपासून तयार केलेला रक्तरस गर्भार सशांना टोचला व त्यांच्या संततीत दृष्टिदोष निर्माण होतो व तो आनुवंशिक स्वरूपाचा असतो असे दाखविले. नंतर त्यांनी गर्भार सशांचेच नेत्रमणी सुईसारख्या तीक्ष्ण शस्त्राने नाहीसे करून प्रति-नेत्रमणी रक्तरस त्यांच्यातच निर्माण झाल्याने संततीवर दृष्टिदोषाचा परिणाम होत असल्याचे दाखवून दिले.

वरील उदाहरणांवरून उपार्जित गुणधर्माचे अनुहरण काही बाबतींत तरी संभाव्य वाटते. निदान तसे होण्याची प्रवृत्ती असू शकते असे वाटते. पण बऱ्याच प्रयोगांत दीर्घकाळानंतर परिणाम दिसत नाहीत. तसेच हवामान, भोवतालची परिस्थिती, भौगोलिक स्थिती, अन्न इत्यादींच्या मार्फत कायिक बदल घडतात असे जरी मानले, तरी हे बदल नेमक्या कशा पद्धतीने जननद्रव्यावर (शरीराच्या सूक्ष्म घटकातील म्हणजे कोशिकेतील उत्पादक द्रव्यावर) परिणाम घडवून आणतात व त्यांचे अनुहरण कसे होते हे नीट कळत नसल्यामुळे ह्या सिद्धांताचे परिणामकारक स्वरूप कळलेले नाही.

लामार्क यांनी आपले विचार मांडल्यावर सु. ५० वर्षांनी चार्ल्स डार्विन ह्या प्रसिद्ध इंग्रज शास्त्रज्ञांनी आपल्या ऑरिजिन ऑफ स्पिशिज ह्या पुस्तकात नैसर्गिक निवडीच्या तत्त्वावर जैव क्रमविकासाची कल्पना मांडली. डार्विन तत्त्वप्रणाली शास्त्रीय जगतात मान्य होऊ लागली, तर लामार्क यांच्या कल्पनेवर टीका सुरू झाली. त्यांचे म्हणणे खोडून काढण्यासाठी डार्विन यांनी सर्वोत्पत्तिवाद (वैयक्तिक काय-कोशिकांपासून अदृश्य जंतूंद्वारे आनुवंशिक गुणधर्म नेले जाणे) तर वाइझमन यांनी जननद्रव्याच्या अखंडतेचा सिद्धांत मांडला. लामार्क यांच्या विचारसरणीस केवळ विरोध करण्याच्या भरात त्यांना नेमके काय म्हणायचे होते व क्लिष्टतेपायी त्यात काय घोटाळे निर्माण झाले होते याचा विचार न करता, क्यूव्हे वगैरेंनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रखर टीका करून त्यांच्या लेखनाची चुकीची भाषांतरे करून लामार्क यांचे कसे अतीव नुकसान केले, याचे मोठे मार्मिक विवेचन कॅनन यांनी आपल्या ग्रंथात केले आहे.

पुढे स्पेन्सर, सीमन, रिग्नॅनो तसेच पॅकर्ड, कोप, रॅकोव्हिट्झा इ. शास्त्रज्ञांनी लामार्कवादाचे थोड्याफार बदलाने पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नव-लामार्कवादी असे म्हणतात. कार्यामुळे रचनेत बदल होतो व अशा बदलांचे अनुहरण होते, परास्मृती (मागच्या पिढ्यांपासून आलेली स्मृती) व आनुवंशिकतेतील साम्य, गुहावासी प्राण्यांच्या डोळ्यांचा ऱ्हास इ. गोष्टी लामार्क यांच्या सिद्धांतांच्या आधारेच सांगता येतात व नैसर्गिक निवडवाद्यांस अशा पद्धतीचे जैव क्रमविकासाचे प्रतिगामी स्वरूप निरुत्तर करते असे ते मानतात.

सारांश, लामार्क यांचा इंद्रियाच्या उपयोग-अनुपयोगाचा सिद्धांत उदाहरणांनी सिद्ध करून दाखविता येणारा आहे. पण उत्परिवर्तनाचा (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणार्‍या आकस्मिक बदलाचा) जनन-द्रव्यावर होणारा परिणाम व त्याची आनुवंशिकता ही त्यातील दैव-संयोगाचा भाग वगळून जशी निश्चित स्वरूपाने दाखविता येते व पडताळून पहाता येते, तसे उपार्जित गुणधर्माचे अनुहरण निस्संदिग्धपणे दाखविता येत नसल्यामुळे लामार्कवादाचे अजूनही संपूर्ण खंडन झालेले नाही किंवा त्यास संपूर्ण मान्यताही मिळालेली नाही.

पहा : अनुहरण

परांजपे, स. य.