डूंगरपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील जुन्या राजपुतान्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ३,५९७ चौ. किमी. लोकसंख्या सु. चार लाख व त्यात भिल्लांचे प्रमाण जास्त (१९४१). उत्पन्न सु. ६ लाख रुपये. डूंगरपूर हेच संस्थांनच्या राजधानीचे शहर असून डूंगरपूर, अस्पुर व सागवाडा  हे तीन जिल्हे आणि ६३२ खेडी होती. उत्तरेस उदयपूर, पूर्वेस बांसवाडा, पश्चिम-दक्षिणेस ईडर, लूणावाड, कडाण व सुंथ संस्थाने यांनी संस्थान सीमांकित झाले होते. मध्ययुगात डूंगरपूर व बांसवाडा ही दोन संस्थाने मिळून होणाऱ्या प्रदेशाला बागड म्हणत. हा प्रदेश बहुतेक भिल्लांनी व्यापला होता आणि उरलेल्यांत परमार व चौहान राजपूत होते. उदयपूरचा राजा कर्णसिंह याचा थोरला मुलगा माहुप याने भिल्ल आदिवासींचा पराभव करून बाराव्या शतकाच्या अखेरीस बागड बळकाविला. माहुप काही वर्षे उदयपूरजवळील आहाडला राहत असे. त्यामुळे त्याच्या राजवंशाला आहाडिया असे म्हणत. रावळ देदा या माहुपच्या वंशजाने परमारांकडून गलियाकोट घेतले व ते आपले निवासस्थान केले. नंतर त्यातील रावळ वीरसिंहाने भिल्लप्रमुख डूंगरियाचा वध करून त्याच्या नावे डूंगरपूर शहर वसविले. भिल्लांना संतुष्ट करण्याकरिता डूंगरियाच्या वंशजांकडे राजाला प्रथम राजतिलक लावण्याची प्रथा पडली. बागडचा रावळ उदयसिंह १५२७ मध्ये खानवाच्या लढाईत मारला गेला. त्यानंतर १५३० च्या सुमारास त्याच्या मुलांत वाटण्या होऊन बागड राज्याची  डूंगरपूर व बांसवाडा अशी दोन स्वतंत्र संस्थाने अस्तित्वात आली. मही नदी ही त्यांची सीमा ठरली. यानंतर डूंगरपूर प्रथम मोगल सत्तेचे मांडलिक बनले. मोगलांच्या ऱ्हासानंतर अठराव्या शतकात त्याने धारच्या पवाराचे मांडलिकत्व पतकरले. त्यांना ते खंडणीही देऊ लागले. मराठेशाहीच्या अस्तानंतर १८१८ मध्ये डूंगरपूरने इंग्रजांचे मांडलिकत्व मान्य केले आणि मराठ्यांना जी खंडणी ते देत होते, ती इंग्रजांना देऊ लागले. इंग्रजांना सुरुवातीला भिल्लांचा असंतोष शमविणे भाग पडले. त्यांनी संस्थानची खंडणी वाढविली. ती १९०४ मध्ये १७,५०० रु झाली. १८९८ मध्ये विजयसिंह गादीवर आला. तो १९१८ मध्ये मरण पावला आणि त्याचा मुलगा लक्ष्मणसिंह गादीवर आला. या काळात डूंगरपूरने पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना सर्वोतोपरी साहाय्य दिले. डूंगरपूरचे महाराज नरेंद्रमंडळाच्या कामात प्रामुख्याने भाग घेत. महारावळ ही संस्थानिकांची उपाधी होती आणि त्यांना पंधरा तोफांची सलामी असे. संस्थानात रेल्वे वा पक्क्या सडका नव्हत्या. विसाव्या शतकात टपाल व डाक पद्धत सुरू झाली. शिक्षणादी सुधारणांत संस्थान मागासलेले राहिले. १९४८ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले. संस्थानिक कनिष्ठ उपराजप्रमुख होते. १९५६ मध्ये संस्थान राजस्थान राज्यात समाविष्ट झाले.

कुलकर्णी, ना. ह.