ॲल्फ्रेड व्हेगेनरव्हेगेनर (वॅगनर), ॲल्फ्रेड : (१ नोव्हेंबर १८८०–? नोव्हेंबर १९३०). जर्मन हवामानशास्त्रज्ञ. उत्तर ध्रुवाचा समन्वेषक, भूभौतिकशास्त्रज्ञ व खंडविप्लव (खंडवहन) सिद्धान्ताचा जनक. पूर्ण नाव अल्फ्रेड लोतार व्हेगेनर. जन्म बर्लिन येथे. त्याचे वडील ख्रिस्ती धर्मोपदेशक व एका अनाथाश्रमाचे व्यवस्थापक होते. १९०५ मध्ये व्हेगेनरने बर्लिन विद्यापीठाची खगोलशास्त्रातील पीएच. डी. पदवी संपादन केली. पुढे लिंडनबेर्ख येथील वैमानिकी वेधशाळेत त्याने नोकरीही केली. ग्रीनलंडला गेलेल्या डॅनिश मोहिमेत (१९०६ – ०८) एक हवामानशास्त्रज्ञ म्हणून तो सहभागी झाला. त्यानंतर मारबर्ग येथे स्थायिक होऊन तेथेच वातावरणविज्ञानाचा अध्यापक म्हणून त्याने काम केले.

अनेक आवृत्त्या निघालेले थर्मोडायनॅमिक देर ॲटमॉस्फीअर (१९११) हे व्हेगेनरचे एक महत्त्वाचे पुस्तक. १९१२-१३ मधील ग्रीनलंडच्या दुसऱ्या सफरीत त्याने हिवाळ्यातील हिमनदीविषयक संशोधन केले. पहिल्या महायुद्धात त्याने सक्रिय भाग घेतला होता. त्यानंतर तो हँबर्ग येथे (१९१९–२४) व ग्रात्स विद्यापीठात (१९२४ – ३०) वातावरणविज्ञानाचा व भूभौतिकीचा प्राध्यापक होता. व्हेगेनरने या दोन्ही शास्त्रांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. १९३०मध्ये ग्रीनलंडच्या नव्या सफरीची त्याने आखणी केली. ग्रीनलंडवर वातावरणविज्ञान केंद्र स्थापन करणे, तेथील हिमस्तरांची जाडी निश्चित करणे आणि ग्रीनलंडच्या खंडवहनाचा वेग अजमावणे, ही त्या सफरीची उद्दिष्टे होती. या सफरीतच प्रतिकूल हवामानामुळे त्याचे निधन झाले.

व्हेगेनरचे महत्त्वाचे योगदान म्हणजे खंडविप्लव सिद्धान्त. दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा व आफ्रिकेचा पश्चिम किनारा, म्हणजेच अटलांटिक महासागराच्या पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यांचा सारखेपणा हा त्या सिद्धान्ताचा प्राथमिक आधार आहे. पुराजव महाकल्पाच्या उत्तरार्धात म्हणजेच सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी सध्याची सर्व खंडे मिळून एकच मोठे खंड (सुपर काँटिनेंट) होते. त्या बृहत्‌ खंडाला व्हेगेनरने पँजिया असे नाव दिले. पँजियाचे वस्तुघटक दीर्घ काळपर्यंत एकमेकांपासून दूरदूर होत गेले (विभक्त झाले). ही प्रक्रिया अद्यापही चालू आहे. या प्रक्रियेला ‘काँटिनेंटल डिसप्लेसमेंट’ व पुढे ‘काँटिनेंटल ड्रिफ्ट’ (खंडविप्लव) अशी संज्ञा रूढ झाली. व्हेगेनरच्या मते खंड व महासागर यांची उत्पत्ती खंडवहनाने झाली असावी.

व्हेगेनरने ‘दि ओरिजिन ऑफ काँटिनेंट्‌स अँड ओशन्स’ (इं. शी. १९२४) या पुस्तकात आपल्या उपपत्तीचे विवेचन केले. अमेरिका व आफ्रिका या खंडांच्या किनारी भागातील भूगर्भरचना व पुराजलवायुविज्ञानाचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून तेथील वनस्पति–जीवाश्म व खडकरचना यांच्यात, तसेच या दोन खंडांच्या किनाऱ्याच्या आकारातही खूपसे साम्य असल्याचे त्याने दाखवून दिले. मात्र या खंडांच्या हालचालींच्या प्रक्रिया स्पष्ट करण्यात त्याला विशेष यश आले नाही. १९६० नंतर भूपट्ट सांरचनिकी सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणात मात्र व्हेगेनरच्या खंडविप्लव उपपत्तीमधील सर्वसाधारण कल्पना ग्राह्य धरण्यात आल्या.

एल्स व्हेगेनर या त्याच्या मुलीने ग्रीनलंड जर्नी (इं. भा. १९३९) या पुस्तकात व्हेगेनरच्या अखेरच्या ग्रीनलंड सफरीचा वृत्तान्त दिला आहे. जोहॅन्स गॉर्गी याचे दि स्टोरी ऑफ दि व्हेगेनर एक्स्पिडिशन टू ग्रीनलंड (इं. शी. १९३४) हे व्हेगेनरच्या काऱ्यावरील पुस्तक उल्लेखनीय आहे. या पुस्तकाशिवाय एल्स व्हेगेनरचे जर्मन भाषेतील ॲल्फ्रेड व्हेगेनर (१९६०) व एस्. के. रंकर्न यांनी संपादन केलेले काँटिनेंटल ड्रिफ्ट (१९६२) ही इतर पुस्तके होत.

पहा : खंडविप्लव.                                  

चौधरी, वसंत