इन्सेक्टिव्होरा : (कीटकभक्षि-गण). स्तनिवर्गाच्या यूथेरिया उपवर्गातील हा एक गण असून त्यात चिचुंद्री, जाहक, मोल, टेनरेक इ. प्राण्यांचा समावेश होतो. यांची ८ कुले, ६३ वंश व सु. ३०० जाती आहेत. या गणातील प्राणी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण ध्रुवप्रदेश सोडून जगभर आढळतात.

कीटकभक्षक बहुधा लहान असतात लहानात लहान प्राणी (एका जातीची चिचुंद्री) सु. ४ सेंमी. लांब तर मोठ्यात मोठ्या (एका जातीचा टेनरेक) सु. ५० सेंमी. असतो. अंगावर दाट केस (फर) किंवा कंटक असतात. मुस्कट लांब व चिंचोळेकाही मोलांच्या मुस्कटावर संस्पर्शक (स्पर्शज्ञानाकरिता उपयोगी पडणारी लांब सडपातळ व लवचिक इंद्रिये) असतात. चर्वणक (दाढा) व अग्रचर्वणक (उपदाढा) यांची शिखरे त्रिकोणी किंवा आयताकार असून दंताग्रे अणकुचीदार असतात काहींमध्ये कृंतक (पुढचे दात), रदनक (सुळे) व अग्रचर्वणक यांत बरेच साम्य असते. प्रत्येक पायावर नखर (नख्या) असलेली पाच बोटे पायांवरील आंगठे इतर बोटांच्या समोर आणता येत नाहीत हे टाचा जमिनीवर टेकून पायांच्या तळव्यावर चालतात. कान लहान डोळे अगदी बारीक पुष्कळ जातीत जनन तंत्र (जननेंद्रिये) आणि मूत्र तंत्र (उत्सर्जनेंद्रिये) एकाच समाईक द्वाराने बाहेर उघडतात.

या गणातील प्राणी भूचर, बिळे करून राहणारे, वृक्षवासी किंवा अर्धवट पाण्यात राहणारे आहेत. थोड्या जाती वगळून बाकीच्या सर्व पूर्णपणे निशाचर आहेत. कीटक हे यांचे मुख्य भक्ष्य होय, पण काही मांसाहारी आहेत.

दातांची संरचना, प्रमस्तिष्क-गोलार्ध (मेंदूच्या पुढचा अर्धगोलाकृती भाग) व अपूर्ण तालू यांबाबतीत यांचे आद्य अपरास्तनींशी (ज्या सस्तन प्राण्यांत वार असते अशा प्राण्यांशी) साम्य आहे. या गणाचा भूवैज्ञानिक कालावधी क्रिटेशस कल्पाच्या अखेरापासून (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीपासून) अभिनव कल्पापर्यंत आहे.

जोशी, मीनाक्षी