ऑस्ती ॲक : रशियातील पश्चिम सायबीरियामधील ओब, तिच्या उपनद्या व उरलपर्वताच्या रांगा यांनी व्यापलेल्या प्रदेशास खांट प्रदेश म्हणतात. ह्या प्रदेशात राहणाऱ्या यूग्रीअन, सॅमॉइड व येनिसे ह्या तीन जमातींना ऑस्तीॲक ही सर्वसाधारण संज्ञा दिली जाते. ह्या नावासंबंधी आतापर्यंत अनेक स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत तथापि त्याबाबत तज्ञांत मतैक्य नाही. वरील प्रदेशनामामुळे त्यास खांट असेही म्हणतात. त्यांचे शेजारच्या मान्सी (व्होगूल) लोकांशी अनेक बाबतींत साधर्म्य आहे. म्हणून त्या दोहोंना ओब-यूग्रीअन असेही संबोधितात. वरील जमातींपैकी पहिल्या दोहोंत भाषिक व वांशिक दृष्ट्या बरेच साधर्म्य आहे, परंतु येनिसे ही तिसरी जमात सायबीरियातील कोणत्याही भाषिक वा वांशिक समूहाशी सदृश नाही. ती बहुधा संकरातून निर्माण झाली असावी. हे लोक मुळचे कोणत्या वंशाचे असावेत, ह्या बाबतीत तज्ञांत एकमत नाही. ह्यांतील काही फिनिश वंशीय, तक काही मंगोल वंशीय असावेत, असा कयास आहे. त्यांची भाषा व संस्कृती भिन्न आहे. सु. एकोणीसशे वर्षांपूर्वी हे सध्याच्या प्रदेशात आले असावेत.

बहुतेक ऑस्तीॲक भटके असून शिकार व मासेमारी हे धंदे करतात. अद्यापि शेतीविषयी त्यांना फारसे आकर्षण नाही तथापि ते रेनडिअरचे कळप पाळतात. काही ऑस्तीॲक लाकूड व हाडे ह्यांवर कोरीव काम करण्यात कुशल असून चामडे कमविण्यातही ते हुशार आहेत. लाकडाची (बर्च-भूर्ज) हत्यारे बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. उत्तर व पूर्वेकडील ऑस्तीॲक रेनडिअरच्या कातडी तंबूत राहतात, तर इतर ऑस्तीॲक लाकडी घरे बांधून वास्तव्य करतात. ख्रिस्ती व इस्लाम धर्माचा त्यांच्या आचारविचारांवर प्रभाव असला, तरी त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या रुढी व कल्पना सोडलेल्या नाहीत. त्यांच्या धर्माचे स्वरुप काहीसे जडप्राणवादी आहे. त्यांच्या समाजात पितृप्रधान कुटुंबपद्धती असून बहिर्विवाही कुळी व द्विदल संघटना ह्या प्रमुख होत. त्यांचे लोकसाहित्य समृद्ध असून त्यात कल्पितकथा, काव्य व अस्वलाच्या समारंभासंबंधीची रसभरित वर्णने आढळतात. ह्यांपैकी उत्तरेकडील जमातींत अजूनही मृतास पुरण्याची प्रथा आहे. मृताबरोबर त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूही पुरतात. दक्षिणेकडे रशियन पद्धतीनुसार दफनविधी उरकतात. ऑस्तीॲक ठेंगणे किंवा मध्यम उंचीचे असून त्यांचे मस्तक वाटोळे, केस काळे व मऊ असतात. त्यांचे डोळे काळे असून नाक रुंद व चपटे असते. खरा ऑस्तीॲक ओब नदीकाठच्या कोळी लोकांत व टंड्रामधील रेनडिअरांचे कळप बाळगणाऱ्यात पाहावयास सापडतो. ऑस्तीॲकांची लोकसंख्या १९५९ साली सु. २०,००० होती. त्यांच्या लोकसंख्येत हळूहळू घट होत आहे.

भागवत, दुर्गा