चिलट : या कीटकाला घुंगरटे असेही नाव आहे. त्याचा समावेश डिप्टेरा गणाच्या क्लोरोपिडी कुलात होतो. त्याच्या पुष्कळ जाती असून त्या जगभर सर्वत्र आढळतात. सायपंक्युला फ्युनिकोला  ही जाती भारतात आढळते व हिप्पेलेट्‌स प्युसिओ  ही जाती अमेरिकेत आढळते.  ते. १·६ – ४·८ मिमी. लांब असते. ते बहुधा काळसर करडे, अनावृत किंवा किंचित केसाळ व चपळ असते. डोके काहीसे कोनयुक्त मुखीय दृढरोम ऱ्हसित (ऱ्हास पावलेले) किंवा नसतात. शृंगिका (सांधे असणारी लांब स्पर्शेंद्रिये) सुस्पष्ट आणि पुढे विस्फारित असतात. पंखाची प्राथमिक शीर ऱ्हसित असून द्वितीयक शीर बिंबवत (तबकडीसारखी) व चौथी शीर वाकडी असते. त्याची अळी आखूड, दंडगोलाकार असून तिच्या तोंडावरील अंकुश (आकडे) स्पष्ट दिसतात. अळीच्या शृंगिका द्विखंडी (दोन भाग असलेल्या) असून डिंभपाद म्हणजे भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेत असणारे पाय मांसल असतात.

दिवसा चिलटे माणसाचे डोळे, कान, नाक, तोंड यांभोवती घोंघावून हैराण करतात. तसेच त्यांचा पाळीव प्राण्यांनाही उपद्रव होतो. ते डोळे येणे या रोगाच्या सूक्ष्मजंतूंचा प्रसार करतात. त्यामुळे कधीकधी डोळे येण्याची साथ येते. तसेच ते उष्ण कटिबंधातील दमट भागात पायांना होणाऱ्या ‘नागा’ व्रण या रोगाचा प्रसार करतात.  

जमदाडे, ज. वि.