ल्येब्येडेव्ह, प्यॉटर न्यिकलायेव्ह्यिच : (८ मार्च १८६६-१४ मार्च १९१२). रशियन भौतिकीविज्ञ. प्रकाशामुळे पदार्थांवर पडणारा अत्यल्प दाब प्रायोगिक रीत्या त्यांनी मोजला व या दाबाचे अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळविले.

ल्येव्येडेव्ह यांचा जन्म मॉस्को येथे झाला. १८८७ मध्ये ते जर्मनीतील स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठात आउगुस्ट कुंट यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करण्यासाठी गेले. त्यांनी १८९१ मध्ये मॉस्को विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांनी आपले पहिले संशोधन ⇨विद्युत् अपारक पदार्थासंबंधीच्या मसोती-क्लॉसियस सिद्धांताविषयी करून या सिद्धांताला प्रायोगिक पुष्टी दिली. त्याच वर्षी मॉस्को विद्यापीठात त्यांची भौतिकीचे साहाय्यक व १८९२ मध्ये तेथेच प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०१ मध्ये त्यांचे प्रकाशाच्या दाबासंबंधीचे प्रायोगिक संशोधन प्रसिद्ध झाले. ⇨जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी सैद्धांतिक रीत्या दृश्य प्रकाश हा ज्याचा एक भाग आहे अशा विद्युत् चुंबकीय प्रारणाच्या (तरंगरूपो ऊर्जेच्या) दाबाचे केलेले भाकीत १९१० मध्ये ल्येव्येडेव्ह यांनी प्रायोगिक रीत्या मोजण्यात यश मिळविले आणि त्यामुळे मॅक्सवेल यांच्या सिद्धांताला पुष्टी मिळाली. यावरून वैश्विक धुळीतील सूक्ष्म कणांवर सूर्याच्या प्रारणामुळे पडणारा दाब गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त असू शकेल व त्यामुळे सूर्यापासून दूर जाणाऱ्या धूमकेतूची शेपटी सूर्यापासून विरुद्ध दिशेला असते, अशा ल्येब्येडेव्ह यांनी विचार मांडला. धूमकेतूतील द्रव्यावरील सौरवाताच्या (सूर्यापासून दर सेकंदाला ३०० ते १,००० किमी. वेगाने सतत वाहणाऱ्या वायूच्या प्रवाहाच्या) पुष्कळच मोठ्या परिणामाचा शोध लागेपर्यंत त्यांचा हा विचार प्रचलित होता. त्यांचे त्यानंतरचे कार्य मुख्यत्वे भूचुंबकत्त्वाच्या उत्पत्तीसंबंधी होते.

ल्येब्येडेव्ह यांनी १९११ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठाच्या स्वायत्ततेच्या केलेल्या अवैध भंगाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच वर्षी त्यांनी मॉस्को येथे एका खाजगी प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी प्रारंभ केला. पी. एन्. ल्येब्येडेव्ह फिजिकल इन्स्टिट्यूट ही संस्था त्यांच्या सन्मानार्थ मॉस्को येथे उभारण्यात आली. ते मॉस्को येथे मृत्यू पावले. त्यांनी स्थापन केलेल्या ल्येब्येडेव्ह फिजिकल सोसायटीने त्यांचे संग्रहित संशोधन कार्य १९१३ मध्ये रशियन भाषेत प्रसिद्ध केले.

भदे, व. ग.