वीर्य : लैंगिक ⇨ प्रजोत्पादनासाठी आवश्यक अशा व नर जनन ग्रंथींमध्ये निर्माण होणाऱ्या स्रावाला वीर्य अथवा रेत म्हणतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांपैकी ज्या वर्गांमध्ये आंतरनिषेचनाने स्त्रीबीजाचे फलन घडून येते अशा प्राण्यांमध्ये वीर्यनिर्मिती होते. या सस्तन प्राण्यांमध्ये ⇨वृषणांनी निर्माण केलेला शुक्राणू (नरबीज) सुस्थितीत टिकवून ठेवून तो मादीच्या जननेंद्रियांमध्ये सोडण्यासाठी वीर्यद्रवाचा क्रमविकास (उत्क्रांती) झाला आहे.

अशा प्रकारच्या सर्व प्राण्यांमध्ये ⇨ जनन तंत्राचा सर्वसामान्य आराखडा सारखाच असल्याने मानवी वीर्याचे वर्णन इतर प्राण्यांनाही गुणात्मक दृष्टीने लागू पडू शकते.

मानवी वीर्याची निर्मिती वृषण, ⇨ अष्ठीला ग्रंथी आणि रेताशय यांमधील स्रवणशील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांमध्ये) होते. वृषणातील रेतोत्पादक नलिकांमध्ये सर्टोली कोशिकांपासून (पेशींपासून) वीर्याचा कोशिकीय भाग तयार होतो. या कोशिकीय भागांची म्हणजेच शुक्रांणूंची प्रतिदिनी सु. ३ कोटी इतकी निर्मिती होत असते. हा अपरिपक्व शुक्राणुयुक्त द्रव नलिकांमधून अनुक्रमे वृषण जाल, अपवाहिन्या आणि अधिवृषण (प्रत्येक वृषणाच्या वरच्या भागाला जोडलेले लांबट पिंड) यांतून पुढे सरकत शेवटी रेतोवाहिनीत प्रवेश करतो [→ पुंस्त्वविद्या]. या प्रवासाच्या १० ते १२ दिवसांच्या अवधीत त्यात कार्निटीन, ग्लिसरोफॉस्फोरिल कोलीन आणि ग्लायकोप्रोटिनांची भर पडते व ऊतकजलांशाचे शोषण होऊन शुक्राणूंची संहती (दाटपणा) सु. शंभरपट वाढते. ⇨ शुक्राणूंची वाढ पूर्ण होऊन ते चलनक्षम व त्यामुळे फलनक्षम होतात. हे सर्व बदल टेस्टोस्टेरोन या वृषणजन्य हॉर्मोनाच्या (उत्तेजक अंतःस्रावाच्या) प्रभावाने वृषणात व अधिवृषणात घडून येतात.

रेतोवाहिनीमधील वीर्यद्रव वाहिनीच्या संकोचनाने हळूहळू पुढे ढकलला जातो. अष्ठीला ग्रंथीजवळ तो रेताशयाच्या तोंडाशी असलेल्या विस्फारणात (ताणले जाऊन विस्तार पावलेल्या भागात) साठतो. तेथे अष्ठीला ग्रंथी व रेताशय यांचे स्राव त्यात मिसळतात. त्यामुळे शुक्राणूंना पोषक व संरक्षक अशी श्लेष्म प्रथिने, प्रथिन अपघटक एंझाइमे, अम्ले, क्षार (अल्कली) आणि फ्रुक्टोज शर्करा तसेच प्रोस्टाग्लॅंडीन वर्गातील स्थानीय हॉर्मोन यांची  भर त्यात पडते.

स्खलनाच्या वेळी रेताशयाच्या आकुंचनाने हा द्रव मूत्रमार्गामध्ये फेकला जातो व मूत्रमार्गाच्या कंदीय भागाच्या बाजूस असलेल्या कंदमूत्रमार्ग ग्रंथींचा (शिश्नातील मूत्रमार्गाच्या भोवती असणाऱ्या स्पंजासारख्या ऊतकातील फुगीर भागाजवळील ग्रंथींचा म्हणजे कूपर ग्रंथींचा विल्यम कूपर या इंग्रज शस्त्रक्रियाविशारदांच्या नावावरून पडलेले नाव) स्राव त्यात मिसळतो. परिणामतः दुधी रंगाचे, अपारदर्शक, घट्ट, चिकट, किलाट स्वरूप असे वीर्य शिश्नातून बाहेर पडते. त्याचे किलाटन (द्रव अवस्थेतून दह्यासारख्या घट्ट स्वरूपाच्या अवस्थेत रासायनिक विक्रियेद्वारे बदल होण्याची क्रिया) एका मिनिटाच्या आत पूर्ण होते.

परीक्षणासाठी कुपीत गोळा केलेले वीर्य सु. १० ते २० मिनिटांत उत्स्फूर्तपणे द्रवीभूत होऊन अर्धपारदर्शक, सांद्र द्रव दिसू लागतो. हा द्रव शक्य तितक्या लवकर रासायनिक व सूक्ष्मदर्शकीय चाचणीस घेतला असता पुढील वैशिष्ट्ये दिसतात : (१) घनफळ १.५ ते ५ मिलि. (सरासरी ३.५ मिलि.) (२) ⇨ पीएच मूल्य ७.७ (३) प्रतिमिलि. रासायनिक घटक : फ्रुक्टोज १.५ मिग्रॅ., इनॉसिटॉल ०.४ मिग्रॅ., सायट्रेट ०.२ मिग्रॅ., ग्लिसरोफॉस्फोरिल कोलीन ०.५ मिग्रॅ., ॲसिडफॉस्फेटेज एंझाइम व प्रोस्टाग्लॅंडीन स्वल्प (४) शुक्राणूंची संख्या प्रतिमिलि. ४ ते २५ कोटी एकूण आणि त्यांपैकी कमीत कमी ६० प्रतिशत चलनशील व कमीतकमी  ७० प्रतिशत अविकृत परिपक्व कोशिका. यासाठी रक्तकोशिकामापकाच्या साहाय्याने गणन करतात व सूक्ष्मदर्शकाच्या उच्च विवर्धन क्षेत्रात कमीत कमी २०० शुक्राणूंची चलनशीलता तपासतात व पापानिकोलाऊ अभिरंजनाने (जॉर्ज निकोलस पापानिकोलाऊ या अमेरिकन कोशिकावैज्ञानिकांवरून पडलेले नाव) अविकृत कोशिकांची चाचणी करतात.

जननअक्षम जोडप्यांमध्ये पुरूषातील संभाव्य दोष शोधण्यासाठी प्रामुख्याने वीर्यपरीक्षा केली जाते. फलनक्षमतेस बाधा आणणाऱ्या घटकांपैकी अत्यंत कमी घनफळ, प्रतिमिलि. ५ कोटीहून कमी शुक्राणू संख्या, ६० प्रतिशतहून कमी चलनक्षमता आणि ३० प्रतिशतहून जास्त विकृत शुक्राणू ही बव्हंशी सर्वमान्य आहेत. इतर गुणधर्मांमधील फरकांची दोषजनकता सिध्द झालेली नाही.

नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये रेतवाहिनीस छेद घेऊन तिची टोके बांधली जातात. त्यामुळे सु. ४–६ आठवड्यांनी वीर्य शुक्राणूहीन दिसू लागते. वीर्याचा सु. ६० प्रतिशत भाग (घनफळ वा व्याप) रेताशयातून व ३० प्रतिशत अष्ठीला ग्रंथीतून येत असल्याने शस्त्रक्रियेनंतर वीर्याचे इतर गुणधर्म बदलत नाहीत. शुक्राणू अल्पता असतानाही फलनाची संभाव्यता अल्पशी असते हे लक्षात घेऊन शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे गर्भनिरोधाची इतर साधने वापरणे इष्ट ठरते.

कृत्रिम वीर्यसेचन हे पशुप्रजननातील तंत्र मानवी वैद्यकातही वापरणे आता शक्य झाले आहे. त्यासाठी आणि कृत्रिम गर्भधारणेसाठी वीर्याचे परिरक्षण (जतन) शीतनाने केले जाते. [→ वीर्यसेचन कृत्रिम].

पहा : अष्ठीला ग्रंथि जनन तंत्र पुंस्त्वविद्या प्रजोत्पादन.

संदर्भ : 1. Austin, C. R. Short, R. V. Ed., Germ Cells and Fertilization, Cambridge, 1982.

           2. Benington, J. L., Ed. Saunder’s Dictionary and Encyclopedia of Laboratory Medicine and Technology, New York, 1984.

          3. Findlay, A. L. R. Reproduction and the Foetus, London, 1984.

श्रोत्री, दि. शं.