वेढा युद्धतंत्र : (सीज वॉरफेअर). शत्रू-सैन्याचा अटकाव वा नाकेबंदी यास सामान्यपणे वेढा युद्धतंत्र अथवा वेढाबंदी असे म्हटले जाते. विज्ञानात होत असलेल्या द्रुतगती प्रचार-प्रसार माध्यमांची उपलब्धता, युद्धसामग्री व त्यांची आयात-निर्यातीची क्षमता व सुलभता यांमुळे आधुनिक युद्धपद्धतीत मर्यादित वेढाबंदी युद्धतंत्रास फारसे महत्त्व राहिलेले नाही.    

या युद्धतंत्रानुसार वेढयात वेढली गेलेली सेना किती काळ शत्रुपक्षाच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकेल अन्नधान्य, पाणी व दारुगोळा यांचा साठा किती दिवस पुरेल बाहेरुन कुमक येण्याची संभाव्यता किती आहे, या सर्व बाबींची दक्षता घेतली जाते. वेढलेल्या शत्रूला नामोहरम करावयाचे असल्यास त्याकरिता आवश्यक ती युद्धसामग्री, मनुष्यबळ, तोफखाना वगैरेंची तात्काळ सोय करावी लागते. या युद्धतंत्राचे यशापयश वरील दोन बाजूंवर अवलंबून असते.    

महाराष्ट्रात यादव घराण्यातील राजांनी सु. तीनशे वर्षे (९७५ ते १३१८) राज्य केले. दिल्लीच्या अलाउद्दीन खल्जीने यादवांच्या देवगिरी या राजधानीवर स्वारी करुन (१२९४) किल्ल्यास वेढा घातला. यावेळी रामदेवाचे सैन्य अन्यत्र स्वारीत गुंतले होते शिवाय फितुरीची त्यात भर पडली. अलाउद्दीनने रसद तोडली, तेव्हा रामदेवराव व त्याचे कुटुंबीय यांचा नाईलाज झाला. रामदेवाने जबर खंडणी देऊन अलाउद्दीनच्या वेढयातून आपली मुक्तता करुन घेतली. या इतिहासातून पुढे मराठयांनी धडा घेतला.    

भारतात मोगल, मराठे आणि इतर मुस्लिम राजवटी यांच्या रणनीतीमध्ये वेढा युद्धतंत्रास विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणच्या लढायांमध्ये त्यांनी हे युद्धतंत्र वापरले. शिवाजी महाराजांना पकडण्याकरिता विजापूरच्या सेनेने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता (१६६०) तथापि महाराज या वेढयातून हिकमतीने निसटून विशाळगडावर पोहोचले (१५ फेब्रुवारी १६६०). त्याचप्रमाणे पुरंदर किल्ल्यास मोगलांनी घातलेला वेढा (१६६५) उठविण्यासाठी महाराजांनी बाहेरुन किल्ल्यात मदत पाठविण्याचे निकराचे प्रयत्न केले परंतु शेवटी त्यांनी औरंगजेबाचा सरदार मिर्झाराजा जयसिंहाशी तह केला. या युद्धात त्यांचा पराक्रमी सेनानी मुरारबाजी देशपांडे कामी आला.    

मुंगी–शेगांव (पालखेड) व भोपाळ या निजामुल्मुल्कबरोबरच्या लढायांना डावपेच, युद्धनीती आणि वेढा युद्धतंत्र या दृष्टींनी विशेष महत्त्व आहे. पालखेडच्या लढाईत (१७२८) बाजीरावाच्या धडाडीमुळे निजामाचा टिकाव लागेना तेव्हा तो आपली बोजड शस्त्रास्त्रे, विशेषतः तोफखाना, मागे ठेवून औरंगाबादच्या पश्चिमेस तीस किमी. वर असलेल्या पालखेडच्या डोंगराळ भागात आला. त्यावेळी बाजीरावाच्या सैन्याने त्याला चोहोबाजूंनी वेढले. अखेर निजामाला मुंगी-शेगांवचा (२५ फेब्रुवारी १७२८) अपमानास्पद तह करावा लागला. भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी पाहणारी दुसरी महत्त्वाची लढाई होय. यावेळी (१७३७) निजामाने भोपाळच्या तटबंदीयुक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली. बाजीरावाने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली. किल्ल्यात अन्नधान्य, दाणा-वैरण यांची उणीव भासताच नाईलाजाने निजामाने शेवटी दोराहसराई या ठिकाणी तह करुन बाजीरावाच्या सर्व अटी मान्य केल्या (७ जानेवारी १७३८). पहिल्या बाजीरावाच्या या वेढा युद्धतंत्राचे कौतुक फील्डमार्शल मंगमरी याने आपल्या युद्धशास्त्रावरील ए हिस्टरी ऑफ वॉरफेअर (१९६८) या ग्रंथात केले आहे. पोर्तुगीजांच्या वसई किल्ल्यास चिमाजी आप्पाच्या नेतृत्वाखालील मराठयांनी दोन वर्षे वेढा देऊन अखेर तो १२ मे १७३७ रोजी जिंकून घेतला.

वेढा युद्धतंत्राची पद्धती सर्व देशांत फार पूर्वीपासूनच प्रचलित होती. ग्रीकांनी इ. स. पू. ४३१ च्या सुमारास वेढा युद्धतंत्राचे प्रशिक्षण मिळाल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळी थेसिलियन वेढाबंदी तंत्रज्ञांचे ग्रीक सैन्यात प्राबल्य होते.    

फ्रान्सच्या सम्राट ⇨ पहिला नेपोलियन बोनापार्ट (१७६९-१८२१) याने आपल्या अनेक धडक युद्धमोहिमांत वेढाबंदी तंत्रानुसार मार्गातील अनेक ठिकाणच्या शत्रू-सैन्याला बंदिस्त केले. नेपोलियनच्या पूर्वी युद्धमोहिमेत किल्ला, गढी वगैरे क्रमशः सर करुनच आक्रमक सेना पुढे सरकत असे. परिणामतः मार्गातील प्रदेशामधल्या जनतेचे दैनंदिन जीवनच उद्ध्वस्त होत असे.

दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने स्टालिनग्राडला घातलेला वेढा विशेष उल्लेखनीय आहे. स्टालिनग्राडचा घनघोर लढा जवळजवळ वर्षभर चालला होता (१९४२-४३). पुढे रशियन सरसेनापतीने स्टालिनग्राडच्या वेढयात गुंतलेल्या जर्मन सैन्यावर कडक थंडीच्या काळात (नोव्हेंबर १९४२ ते जनेवारी १९४३) प्रखर हल्ले चढवले. डॉन व व्होल्गा या नद्यांच्या दुआबात त्यांची कोंडी करुन त्यांच्यावर चोहोबाजूंनी तोफांचा भडिमार व हवाई हल्ले करण्यात आले. त्यामुळे जर्मन सैन्याला रशियन सैन्यापुढे शरणागती पतकरावी लागली.

स्वसंरक्षणार्थ किल्ला, तटबंदी, गढी इ. उभारुन मोर्चेबंदी करणे, तसेच शत्रू-पक्षाने सरळ धडक देऊन ते उद्ध्वस्त करणे, या युद्धकला मानवाला आदिकाळापासूनच अवगत आहेत. स्थलकालपरिस्थितिसापेक्ष तो त्यांचा उपयोग करीत आला. या दृष्टिकोनातून वेढाबंदी युद्धतंत्राच्या निकषांचा विचार केला जातो.

पहा : मराठयांची युद्धपद्धति.

बाळ, नि. वि.