लँडस्टायनर, कार्ल : (१४ जून १८६८-२६ जून १९४३). ऑस्ट्रियन-अमेरिकन विकृतिवैज्ञानिक आणि रोगप्रतिकारक्षमतावैज्ञानिक.रक्तगटांसंबंधीच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना १९३० सालच्या शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

लँडस्टायनर यांचा जनम व्हिएन्ना येथे झाला. व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी १८९१ मध्ये एम्.डी. पदवी मिळविली. काही काळ जर्मनीत एमील फिशर व स्वित्झर्लंमध्ये आर्थर हांट्श यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्राचा अभ्यास केल्यावर त्यांनी काही रुग्णालयांत व पुढे व्हिएन्ना विद्यापीठाच्या पॅथॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये १८९७-१९०८ पर्यंत संशोधन साहाय्यक म्हणून काम केले. १९०९-१९ या काळात व्हिएन्ना विद्यापीठात ते विकृतिविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९१९ मध्ये ते नेदर्लंड्सला गेले आणि तेथून १९२२ मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथील रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेच्या निमंत्रणावरून गेले व तेथेच मृत्यूपावेतो त्यांनी अध्यापन व संशोधन केले. त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले.

लँडस्टायनर यांना मानवी रक्तात मूलभूत फरक असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तारतम्यतेने विचार न करता केलेल्या रक्ताधानातील (एका व्यक्तीतील रक्त काढून ते दुसऱ्या व्यक्तीला रक्तवाहिनीद्वारे देण्यातील) धोके समजून आले. रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) कलाच्छादनावरील (पातळ पटलमय आवरणावरील) शर्करायुक्त पदार्थांच्या (प्रतिजनांच्या) प्रकारांवरून किमान तीन प्रमुख रक्तगट ओळखता येतात, असे त्यांनी १९०१ मध्ये दाखविले. या गटांना त्यांनी A, B व O अशी नावे दिली. पुढील वर्षी त्यांच्या  साहाय्यक संशोधकांना A व B हे दोन्ही प्रतिजन असलेला पण AB प्रतिपिंड नसलेला असा चौथा रक्तगट (गट AB) आढळला. लँडस्टायनर यांच्या या ABO रक्तगट विभागणी पद्धतीमुळे आता रक्ताधान ही वैद्यकीय परिपाठातील एक सुरक्षित बाब झालेली आहे. पुढे १९२७ मध्ये लँडस्टायनर यांनी पी. लेव्हिन यांच्यासमवेत M,N व P या रक्तगटांचा आणि १९४० मध्ये लेव्हिन व अलेक्झांडर वीनर यांच्या समवेत ऱ्हीसस (Rh) घटकाचा शोध लावला [⟶रक्तगट ऱ्हीसस घटक]. माता व भ्रूण यांच्या रक्तात घडून येणाऱ्या घटनांत Rh घटक मूलभूत महत्त्वाचा असून त्यांमुळे गर्भपात किंवा नवजात अर्भकामध्ये अपायकारक आजार उद्‌ भवू शकतो. लँडस्टायनर यांच्या कार्यामुळे न्यायवैद्यकात विवाद्य पितृत्व व खुनाची चौकशी यासंबंधात ग्राह्य धरता येण्यासारखा पुरावा उपलब्ध झाला. रक्तगट विशिष्ट जीनांद्वारे [आनुवंशिक घटकाच्या एककांद्वारे ⟶ जीन] वारसाने प्राप्त होतात असे सिद्ध झाल्याने मानवी आनुवंशिकी व मानवशास्त्र यांचया अभ्यासात महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले.

झटकेयुक्त रक्तारुणमे ह (रक्तातील तांबड्या कोशिकांमधील लाल रंजकद्रव्य-हीमोग्लोबीन-मूत्रात मुक्त स्थितीत असणे) ही विकृती निर्माण करणाऱ्या  प्रक्रियेचा लँडस्टायनर यांनी शोध लावला. बालपक्षाघात (पोलिओ) हा रोग माकडांमध्ये प्रायोगिक रीत्या त्यांनीच प्रथम उत्पन्न केला. हा रोग व्हायरसजन्य आहे असा निष्कर्षही त्यांनी काढलेला होता. १९२१ मध्ये त्यांनी प्रतिजनांच्या हॅप्टेन या विशिष्ट घटकांचे अस्तित्व सिद्ध केले. रोगप्रतिकारक्षमताविज्ञानाच्या विकासात हा शोध महत्त्वाचा ठरला. रासायनिक व रक्तरस वैज्ञानिक तंत्रांचा उपयोग करून त्यांनी रक्तारुणाच्या विविध प्रकारांत भेद केला. लँडस्टायनर व निग्ज यांनी १९३०-३२ मध्ये प्रलापक सन्निपात ज्वराला (टायफस ज्वराला) कारणीभूत असणाऱ्या रिकेट्सिया प्रोवाझेकी या सूक्ष्मजंतूंचे जिवंत माध्यमावर संवर्धन करण्यात यश मिळविले.

नोबेल पारितोषिकाखेरीज लँडस्टायनर यांना पॉल अर्लिक पदक व डच रेडक्रॉस पदक आणि शिकागो, केंब्रिज, ब्रूसेल्स व हार्व्हर्ड या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे बहुमान मिळाले. त्यांनी लिहिलेल्या द स्पेसिफिसिटी ऑफ सेरॉलॉजिकल रिॲक्शन्स (इं. भा. १९६२ मूळ जर्मन ग्रंथाचे शीर्षक Die Spezifitaet der Serelogischen Reaktionen, १९३६) या ग्रंथामुळे रोगप्रतिकारक्षमता रसायनशास्त्र प्रस्थापित होण्यास मदत झाली. त्यांचे सु. ३५० संशोधन निंबंध प्रसिद्ध झाले. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

कनिटकर, बा.मो. भालेराव, य.त्र्यं.