बोधावस्था : (कॉन्शसनेस). मानसशास्त्रातील एक संकल्पना. ‘बोधावस्था’ ह्या संज्ञेचा वापर मानसशास्त्रात अनेक अर्थांनी करण्यात आला आहे आणि म्हणूनच ही संज्ञा संदिग्ध आहे. बोधनिक वा बोधात्मक (कॉग्निटिव्ह), भावनात्मक (अफेक्टिव्ह) आणि क्रियात्मक (कोनेटिव्ह) अशा ज्या अवस्था जाणिवेच्या कक्षेत येतात त्या सर्वांचा समावेश बोधावस्थेत होतो. इतर कोणत्याही गोष्टीचे किंवा स्वतःच्याच व्यापारांचे मनाला ताबडतोब होणारे स्वयंप्रेरित ज्ञान, असाही बोधावस्थेचा अर्थ केलेला आढळतो. दुसऱ्या एका अर्थाने असे सूचित केले जाते, की स्वतःच्या अवस्थांवर अवधान केंद्रित करण्याचा मनाचा सक्रिय व्यापार व त्या अवस्था स्वतःच्या असण्यासंबंधी मनाला होणारी जाणीव म्हणजे बोधावस्था होय. ह्या दृष्टीने बोधावस्था ही आत्मनिरीक्षणात्मक क्रिया होय. हिलाच आत्म—बोधावस्था (सेल्फकॉन्शसनेस) म्हणता येईल.

बोधावस्था प्रक्रियांचे मूळ घटक शोधून त्यांच्या परस्परसंबधांचे संशोधन करणे व तत्संबंधी नियम प्रस्थापित करणे, हे ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) यांच्या मते मानसशास्त्राचे प्रमुख कार्य होय. ‘कोणत्याही क्षणी आढळणारी व्यक्तीच्या अनुभवांची गोळाबेरीज म्हणजे बोधावस्था’, अशी सुटसुटीत व्याख्या व्हिल्हेल्म व्हुंटचे शिष्य ⇨ ई. बी. टिचनर (१८६७-१९२७) ह्यांनी केलेली आहे. प्रयोगात्मक अंतर्निरीक्षणाच्या आधारे ह्या गुरु-शिष्यांनी संवेदन, प्रतिमा व भावना अशा बोधावस्थेच्या तीन मूळ घटकांचा निर्देश व विवरण केले. प्रतिमा व संवेदन हे अनुक्रमे विचाराचे आणि वस्तुप्रत्यक्षाचे मूळ घटक होत.

प्राणीश्रेणीतही बोधावस्था कमीअधिक पातळीवर आढळते. अर्भकांना व कनिष्ठ श्रेणीच्या प्राण्यांना संवेदनांची व सुखदुःखांची जाणीव होत असली, तरी अमूर्त पातळीवर त्या गुणवैशिष्ट्यांचे ज्ञान त्यांना होत नाही. घेतला जाणारा अनुभव व त्याचा अनुभवकर्ता ‘मी’ ह्यांची भिन्नात्मक जाणीव बुद्धियुक्त प्रगल्भ जीवनाच्या पातळीवरच होऊ लागते. आत्मविषयक जाणीवेचा पूर्ण विकास झाला म्हणजे एकरुप बोधावस्था किंवा तिची एकरुपता (युनिटी ऑफ कॉन्शसनेस) निर्माण होते. बोधावस्थ जीवनात जी एकसंधता वा सातत्य आढळते. तिचे मूळ आत्मविषयक अविभाज्यतेच्या जाणिवेत आहे, हे स्पष्ट आहे. एरवी व्यक्तीची बोधावस्था ही नित्यशः किमान एकदा तरी (निद्रेमुळे) खंडित होतच असते.

बोधावस्थेचे स्वरुप व्यक्तिगत, परिवर्तनशील व निवडपूर्ण असते. काही बोधावस्थ प्रक्रिया क्षणाक्षणाने बदलणाऱ्या असतात, तर काही टिकावू स्वरुपाच्या असतात. क्षणकाल टिकणाऱ्या बोधावस्थ प्रक्रियांच्या स्वरुपाकडे लक्ष वेधून ⇨ विल्यम जेम्स (१८४२-१९१०) यांनी वर्तन प्रभावित करणारे घटक म्हणून त्यांचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. तसेच बोधावस्थेच्या जीवशास्त्रीय महत्त्वावरही त्यांनी भर दिला आहे. नित्य बदलणाऱ्या परिस्थितीशी नीट समायोजन करण्यात बोधावस्था महत्त्वाचा कार्यभाग पार पाडते. सवयीने घडणाऱ्या क्रिया सहज होतात, पण नवीन परिस्थितीशी समायोजन करावयाचे असले, की बोधावस्थेचा स्पष्ट व महत्त्वपूर्ण असा संबंध येतो.

व्हुंट यांनी बोधावस्था हाच मानसशास्त्राचा अभ्यासविषय कल्पिला असला, तरी प्रक्रियावादी वा कार्यवादी (फंक्शनॅलिस्ट) व वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांकडून बोधावस्थेच्या संकल्पनेसच विरोध करण्यात आला. बोधावस्थ अनुभव सर्वस्वी व्यक्तिसापेक्ष असल्याने कोणत्यातरी स्वरुपाच्या वर्तनात बोधावस्थेचे प्रकटीकरण झाल्याशिवाय तिला शास्त्रीय दृष्ट्या काडीमात्र किंमत देता येत नाही, असे ए. पी. वाइस यांचे मत आहे. वर्तनवादी वॉटसन यांनी तर बोधावस्थेच्या अस्तित्वाचाच निषेध केला. परंतु एंजेल व हंटरसारख्या नंतरच्या वर्तनवाद्यांनी तिचे अस्तित्व मान्य केले.

⇨ सग्मंड फ्रॉइड (१८५६ – १९३९) यांनी आपल्या मनोविश्लेषणाच्या उपपत्तीत मानवी मनाच्या बोध-मन, अवबोध वा जाणीवपूर्व-मन व अबोध-मन अशा तीन पातळ्या कल्पिल्या आहेत. त्यांच्या विवेचनातील बोध-मनाची संकल्पना म्हणजे एका अर्थी जाणीवयुक्त प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या मनाची संकल्पना म्हणता येईल. फ्रॉइड प्रणीत ⇨ अबोध-मनाची  संकल्पना मात्र बोध-मनाच्या नेमकी विरोधी अशी निश्चितच नाही. एकूण जाणिवेच्या व बोधावस्थेच्याच त्यांनी बोध, अवबोध व अबोध अशा तीन पातळ्या मानल्या आहेत. [⟶ मनोविश्लेषण].

तंत्रिका वा मज्जा-शरीरक्रियात्मक यंत्रणेनुसार बोधावस्था ही मेंदूतील प्रक्रियांवर अवलंबून असल्याचे मानले जाते. बोधावस्था ही मेंदूतील प्रक्रियांवर अवलंबून असल्याची माहिती प्राचीन काळीही असल्याचे दिसते. तथापी आजही बोधावस्था आणि मेंदूतील तंत्रिका यंत्रणा यांच्यातील संबंध व त्यांचे ज्ञान संपूर्णपणे अवगत झालेले नाही. बोधावस्थेतील विविध पातळ्या आणि तत्पर-सावधानता (अलर्टनेस) वा प्रतिक्रियाक्षमता यांतील साहचर्य मेंदूच्या विद्युत् लेखातील काही आकृतिबंधांतून दिसून येते. संपूर्ण जागृतावस्थेतील मेंदूलहरी ह्या गतिमान, अनियमित व कमी दोलविस्ताराच्या (अँप्लिट्यूड) वा विद्युत् दाबाच्या असतात. याउलट निद्रितावस्थेतील (म्हणजे बोधावस्था ही न्यूनतमपणे कार्यरत असताना) मेंदूलहरी ह्या मंद, नियमित व अधिक दोलविस्ताराच्या असतात.

वर्तनावस्थेतील बोधावस्था आणि विद्युत् लेखाच्या हालचालींचे आकृतिबंध यांच्यातील सहसंबंध मेंदूतील जालिकाबंधावर (रेटिक्यूलर फॉर्मेशन) अवलंबून असल्याचेही आढळून आले तथापी जालिकाबंध हाच बोधावस्थेचे अधिष्ठान आहे, असे मात्र निर्णायकपणे सिद्ध करणे आज तरी शक्य झालेले नाही [ ⟶ शारीरक्रिया मानसशास्त्र].

पहा : तंत्रिका तंत्र मन.

संदर्भ : 1. Abramson, H. S. Problems of Consciousness, New York, 1951-55.              2. Boring, E. G. Physical Dimensions of Consciousness, New York, 1933.              3. Delafresnaye, J. F. Ed. Brain Mechanisms and Consciousness, 1954.              4. Holt, E. B. The Concept of Consciousness, 1914.              5. James, William, Principles of Psychology, New York, 1890.  

पंडित, र. वि.