मायरहोफ, ओटो फ्रिट्‌झ : (१२ एप्रिल १८८४–६ ऑक्टोबर १९५१). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. ऑक्सिजनाचा व्यय व स्‍नायूंतील लॅक्टिक अम्‍लाचा चयापचय (सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) यांतील सहसंबंधाच्या शोधाबद्दल त्यांना ⇨ आर्चिवॉल्ड व्हिव्हिअन हिल यांच्या समवेत १९२२ सालच्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयातील नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

मायरहोफ यांचा जन्म हॅनोव्हर (जर्मनी) येथे झाला. हायडल्‌बर्ग विद्यापीठाची एम्. डी. पदवी १९०९ मध्ये त्यांनी मिळविली. प्रथमतः त्यांना मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांची आवड होती परंतु ओटो व्हारर्बुर्ख या जीवरसायनशास्त्रज्ञांची भेट झाल्यावर त्यांच्या प्रभावामुळे मायरहोफ यांचे लक्ष शरीरक्रियाविज्ञानाकडे वळाले. १९०९–२४ या काळात त्यांनी कील विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिऑलॉजीमध्ये संशोधन आणि अध्यापन केले. नंतर १९२४–२९ मध्ये त्यांनी बर्लिन-डालेम येथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजीमध्ये काम केले. १९२९ मध्ये ते हायडल्‌बर्ग येथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेच्या शरीरक्रियाविज्ञान विभागाचे संचालक झाले. नाझींच्या उदयानंतर इतर ज्यू शास्त्रज्ञांप्रमाणेच १९३८ मध्ये त्यांनी जर्मनी सोडणे भाग पडले आणि ते पॅरिस येथील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकोकेमिकल बायॉलॉजी या संस्थेत काम करू लागले परंतु जर्मनीने फ्रान्सवर स्वारी केल्यावर १९४० मध्ये तेथूनही मायरहोफ यांना बाहेर पडावे लागले. १९४० च्या अखेरीस ते अमेरिकेस गेले व तेथे त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये शरीरक्रियावैज्ञानिक रसायनशास्त्राचे संशोधन प्राध्यापक म्हणून मृत्यूपावेतो काम केले. १९४८ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.

मायरहोफ यांनी स्‍नायूच्या आकुंचनातील रासायनिक व शरीरक्रियात्मक प्रक्रियांचा अभ्यास केला. विशेषतः त्यांनी ऑक्सिजनाच्या व्ययाच्या संदर्भात स्‍नायूतील ग्‍लायकोजेन व लॅक्टिक अम्‍ल यांच्यातील बदलासंबंधी संशोधन केले. स्‍नायूच्या आकुंचनात ऑक्सिजनाच्या अनुपस्थितीत स्‍नायूतील ग्‍लायकोजेनाचे लॅक्टिक अम्‍लात रूपांतर होते, असे १९१९ मध्ये त्यांनी दाखविले. ऑक्सिजनाच्या उपस्थितीत सु.१/५ लॅक्टिक अम्‍लाचे ⇨ ऑक्सिडीभवन होऊन कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी तयार होते आणि या ऑक्सिडीभवनात निर्माण झालेली ऊर्जा उरलेल्या लॅक्टिक अम्‍लापासून पुन्हा ग्‍लायकोजेन तयार करण्यास उपयोगी पडते, असे मायरहोफ यांना दिसून आले [→ चयापचय]. या शोधामुळे स्‍नायूच्या आकुंचनात व तो मूळ अवस्थेत परत येण्यात होणाऱ्या उष्णता बदलाचे स्पष्टीकरण देण्यास रसायनशास्त्रीय पाया उपलब्ध झाला आणि याचाच हिल यांनी विशेष अभ्यास केला. कार्बोहायड्रेटांच्या चयापचयातील एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिने) व कोशिकांतील ऑक्सिडीभवन यांसंबंधीही मायरहोफ यांनी महत्त्वाचे संशोधन केले. मायरहोफ यांच्या कार्याचा विसाव्या शतकाच्या नंतरही जीवरसायनशास्त्राच्या विकासावर मोठा प्रभाव पडलेला होता, असे ⇨ फ्रिट्‌स लिपमान व ⇨ सेव्हेरो ओचोआ या त्यांच्या भूतपूर्व विद्यार्थांच्या (या दोघांनाही नंतर नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला) कार्यावरून दिसून येते.

मायरहोफ हे लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य व अमेरिकेच्या नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. केमिकल डायनॅमिक्स ऑफ लाइफ फेनॉमेना (१९२५), Die Chemich en Vorgange in Muskel and Zusammenhang mit Arbeitsleistung und Warmebidung (१९३०) व Chimie de la contraction musculaire (१९३३) हे ग्रंथ आणि सु. ४०० शास्त्रीय लेख त्यांनी लिहिले. ते फिलाडेल्फिया येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.