नाखोन रातचासीमा: थायलंडमधील याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १,०२,०९५ (१९७०). हे बँकॉकच्या ईशान्येस सु. ३०५ किमी. मून नदीवर असून देशाच्या पूर्व भागातील दळणवळण, व्यापार, आर्थिक व शासकीय केंद्र आहे. थायलंडच्या ईशान्य भागातील सर्व प्रांत व त्यांच्या राजधान्यांशी हे पक्क्या सडकांनी जोडले असून २४० किमी. लांबीच्या राष्ट्रीय हमरस्त्याने आणि हवाईमार्गानेही बँकॉकशी जोडले आहे. चौदाव्या शतकापर्यंत हे कंबोडियाच्या अंमलाखाली होते. याचे मून नदीवरील वसतिस्थान फार प्राचीन असावे, असे येथील काही अवशेषांवरून दिसते. येथे थायलंडमधील सर्वांत मोठी तागाची गिरणी आहे. ‘नॉर्थईस्टर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट’ यासारख्या शैक्षणिक सोयी तेथे आहेत. याच्या आसमंतात रेशीम उत्पादन व रेशमी कापड विणणे, पशुपालन व भातशेती इ. उद्योग चालतात. थाओ सुरनारी या थाई वीरांगनेचा पुतळा येथे आहे. कधीकधी नागोर किंवा नाकोन राजसीमा असेही यास म्हणतात.

कांबळे, य. रा.