पैशाची साहित्य : पैशाची भाषेतील कोणताही ग्रंथ आज उपलब्ध नाही. ⇨बड्‌डकहा (बृहत्कथा) हा ⇨गुणाढ्यकृत कथाग्रंथ पैशाचीत रचिला गेला होता. तथापि तोही लुप्त झालेला आहे. अन्य प्राकृत भाषांतील काही ग्रंथांतून मात्र पैशाची भाषेचे नमुने आढळतात. उदा., उद्योतनसूरी ह्याने माहाराष्ट्री प्राकृतात रचिलेल्या ⇨कुवलयमाला ह्या चंपूकाव्यात संस्कृत, अपभ्रंश इ. भाषांबरोबर पैशाची भाषेचाही अधूनमधून वापर केलेला आढळतो. तेराव्या शतकात रचिल्या गेलेल्या हम्मीरमदमर्दन आणि मोहराजपराजय ह्या संस्कृत नाटकांतील काही पात्रे चूलिका पैशाची (पैशाचीची एक पोटभाषा) वापरतात. हेमचंद्रकृत कुमारपालचरित (बारावे शतक) ह्या संस्कृत काव्यात, तसेच त्याने रचिलेल्या प्रकृत व्याकरणग्रंथात पैशाचीतील आणि चूलिका पैशाचीतील सुंदर गाथा आढळतात. जैनांच्या काही स्तोत्रांतूनही पैशाची-चूलिका पैशाची-रचना पाहावयास मिळते.

तगारे, ग. वा.