धुत्तक्खाण : महाराष्ट्री प्राकृतातील एक कथाग्रंथ. कर्ता हरिभद्रसूरी (आठवे शतक). ग्रंथाचा संस्कृत शीर्षकार्थ धूर्ताख्यान. ब्राह्मणी पुराणांचा विडंबनात्मक उपहास करणे हा या ग्रंथाचा हेतू. त्यात एकूण ५ आख्याने असून ४८५ गाथा आहेत. ह्या कथाग्रंथात आलेली कथा थोडक्यात अशी : उजैनमधील एका उद्यानात मूलश्री, कंडरीक, एलाषाढ, शश हे चार धूर्त पुरूष आणि खंडपाणानामक एक धूर्त स्त्री ह्यांची भेट होते. प्रत्येकाने आपापले आश्चर्यकारक अनुभव सांगायचे जो ह्या अनुभवांवर विश्वास ठेवणार नाही त्याने सर्वांना भोजन द्यायचे जो आपल्या अद्‌भूत अनुभवांना रामायण, महाभारत वपुराणे ह्यांतून आधार मिळवून देईल त्याला सर्व धूर्तांचा गुरू मानावे. प्रत्येकजण आपले अनुभव म्हणून काही असंभाव्य घटना सांगतो आणि इतर धूर्त रामायण, महाभारत आणि पुराणे ह्यांतून तत्सम दाखले देऊन त्यांची सत्यता मान्य करतात. उदा., खंडपाणेने सांगितले, की मी तरुण असताना अत्यंत सुंदर होते. एकदा ऋतु-स्नान करून मी मंडपात निजले असता माझ्या रूपाने वारा विस्मित झाला त्याने माझा उपभोग घेतला त्यानंतर ताबडतोब मला एक पुत्र झाला. ह्यावर मूलश्रीने पौराणिक वायुपुत्रांची उदाहरणे देऊन खंडपाणेच्या अनुभवांचे समर्थन केले. पुढे खंडपाणेने भोजन द्यावे, असा सगळे आग्रह करतात एका धनाढ्याकडून पैसे उकळून ती तो पुरवते.

साध्या पण ओघवत्या शैलीत लिहिलेल्या ह्या कथाग्रंथातून हरिभद्रसूरीच्या कुशल निवेदनशैलीची प्रचीती येते. ह्या धूर्ताख्यानात ब्राह्मणी पुराणांची चेष्टा असली, तरी कटुता नाही हे लक्षणीय आहे.

तगारे, ग. वा.