पैशाची भाषा  : पैशाची ही एक प्राकृत भाषा असून ती भारताच्या वायव्येला बोलली जाई, अशी समजूत आहे कारण तिचा नमुना आज उपलब्ध नाही. पैशाची म्हणजे राक्षसांची भाषा किंवा भूतभाषा, एक असंस्कृत भाषा किंवा व्याकरणकारांनी वर्णन केलेली एक प्राकृत भाषा, अशा अनेक कल्पना आहेत. इथे मात्र शेवटचाच अर्थ अभिप्रेत आहे.

प्राकृत व्याकरणात पैशाचीचे वर्णन आणि त्याबरोबर नमुन्यादाखल एखाददुसरी ओळ येते. तेराव्या शतकातल्या हम्मीरमदमर्दन (१२१९ ते १२२९ च्या दरम्यान) किंवा मोहराजपराजय (१२२९ ते १२३२ च्या दरम्यान) या नाटकांतली काही पात्रे एक प्रकारची पैशाची वापरतात.

पैशाची भाषा ख्रिस्ती शकाच्या प्रारंभीच्या काळात प्रचलित असावी असा अंदाज आहे.

वैशिष्ट्ये : प्राकृतच्या सर्वसामान्य वैशिष्ट्यांबरोबर पुढील खास वैशिष्ट्ये पैशाचीत आहेत.

सघोष व्यंजनांबद्दल अघोष व्यंजने येणे : संस्कृत-दामोदर, नगर, राजा, धर्म, कन्दर्प-पैशाची-तामोतर, नकर, राजा, खम्मा, कंतप्प. ह्यांखेरीज अन्य वैशिष्ट्ये अशी : णचा न होणेलचा ळ होणे ज्ञ व न्य यांचा ञ्‍ञ होणे टु बद्दल तु येणे.

इतर प्राकृतांप्रमाणे स्वरमध्यस्थ स्फोटकांचा लोप होत नाही किंवा स्वरमध्यस्थ महाप्राण स्फोटकांच्या जागी ह येत नाही.

संदर्भ :   1. Katre, S. M. Prakrit Languages and Their Contribution to Indian Culture, Poona, 1964.

           2. Trivedi, K. P. Ed. The Shadbhashachandrika of Lakshmidhara, Bombay, 1916.

           3. Vaidya, P. L. Ed. Prakrit Grammar of Hemachandra, Poona, 1958.

           4. Woolner, A. C. Introduction to Prakrit, Calcutta, 1977.

कालेलकर, ना. गो.