प्राकृत भाषा : वैदिक संस्कृत बोलीपासून आधुनिक भारतीय आर्यभाषांपर्यंतच्या बहुतांश भारतात पसरलेल्या भाषिक विस्ताराला ‘भारतीय आर्य’ (भाआ) हे नाव आहे. या विस्ताराची सुरुवात ख्रि. पू. १५०० वर्षांच्या आसपास असून त्याचा प्रवाह साडेतीन हजार वर्षे अखंडित चालू आहे. या दीर्घ कालावधीत या भाषिक परंपरेत अनेक महत्त्वाची परिवर्तने झाली. भारताच्या वायव्येकडे एका मर्यादित क्षेत्रात बोलली जाणारी मूळ संस्कृत भाषा आणि तिच्या बोली, तिच्या भाषिकांच्या सांस्कृतिक व भौतिक वर्चस्वामुळे पूर्वेकडे आसामपर्यंत आणि दक्षिणेकडे केरळपर्यंत पसरल्या. प्राचीन परंपरेच्या समृद्ध द्राविड भाषांचा अडथळा नसता, तर आर्यभाषा निःसंशय सर्व भारतभर पसरल्या असत्या.

या मूळ भाषेत भाषिक परिवर्तनाच्या सामान्य नियमांना धरून बदल झालेच पण त्याचप्रमाणे भौगोलिक क्षेत्र, त्यात तिच्या आगमनापूर्वी असलेले लोक, त्यांच्या भाषा व त्यांची संस्कृती यांमुळे भिन्न भिन्न प्रदेशांत तिला काही स्वतंत्र वैशिष्ट्ये प्राप्त झाली. या वैशिष्ट्यांचा विचार करून या परिवर्तित नव्या रूपांचे वर्गीकरण करणे काही प्रमाणात शक्य झाले.

  सर्वांत प्राचीन अशी वैदिक भाषा, सर्वांत अर्वाचीन अशी तिची प्रचलित रूपे आणि या दोन टोकांना सांधणारी तिची मधली रूपे असे या दीर्घ भाषिक प्रवाहाचे विभाजन करण्यात येते आणि या तीन अवस्थांचा कालानुक्रम लक्षात घेऊन ‘प्राचीन भारतीय आर्य’ (प्राभाआ), ‘मध्य भारतीय आर्य’ (मभाआ) व ‘नव भारतीय आर्य’ (नभाआ) अशी नावे दिलेली आहेत. प्राभाआ ही अवस्था ख्रि. पू. १५०० ते ६००, मभाआ ही ख्रि. पू. ६०० ते ख्रिस्तोत्तर १००० आणि नभाआ ख्रिस्तोत्तर १००० पासून पुढे, असे स्थूलमानाने भाआचे कालखंड आहेत.

वर्गीकरण  : प्राकृत भाषा किंवा मभाआ या नावाखाली ज्या भाषिक सामग्रीचा अभ्यास केला जातो ती अफाट असून तिचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते :

(१) धर्मग्रंथांसाठी वापरलेली प्राकृत. यात बौद्ध साहित्याची पाली, जैनांनी वापरलेली अर्धमागधी किंवा आर्ष, जैन माहाराष्ट्री, जैन शौरसेनी आणि जैन साहित्यातील अपभ्रंश यांचा समावेश होतो.

(२) वाङ्‌मयीन ग्रंथांतील प्राकृत, यात माहाराष्ट्री, शौरसेनी व मागधी त्याचप्रमाणे पैशाची व अपभ्रंश यांचा समावेश होतो.

  (३) नाट्यवाङ्‌मयातील प्राकृत. यात माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी आणि या तिघींचे प्रकार अश्वघोषाच्या नाटकातली जुनी अर्धमागधी आणि ढक्कीसारख्या गौण बोली येतात.

  (४) व्याकरणग्रंथांतील प्राकृत. यात प्राकृत व्याकरणकारांनी वर्णन केलेल्या माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, चूलिका पैशाची, अपभ्रंश आणि इतर दुय्यम प्रतीच्या बोली येतात. भरताचे नाट्यशास्त्र गीतालंकार, रुद्रटाच्या काव्यालंकारावरील नमिसाधूची टीका यांचाही समावेश यात करता येईल.

(५) बृहदभारतीय प्राकृत. खोतानमध्ये सापडलेले प्राकृत धम्मपदाचे अवशेष, मध्य आशियातील उत्खननात मिळालेल्या भारतीय भाषा.

  (६) शिलालेखांची प्राकृत. सम्राट अशोकाच्या शिलालेखांत सर्व भारतभर आणि श्रीलंकेच्या काही भागांत ही उपलब्ध होते. शिवाय लेणी, ताम्रपट, नाणी यांसारख्या साधनांद्वारे मिळते.

  (७) लौकिक संस्कृत. व्याकरणाने स्थिर केलेली पंडितमान्य संस्कृत अस्तित्वात आल्यावरसुद्धा तिच्या नियमांना न जुमानता लोकव्यवहारात आणि बौद्ध, जैन व काही हिंदूंच्याही ग्रंथांत आढळणारी नियममुक्त संस्कृत यात येते.

  भाषिक वैशिष्ट्ये : या संस्कृतोत्तर मभाआचे किंवा प्राकृतचे व्यवच्छेदक लक्षण ऋ या स्वराचे परिवर्तन हे आहे. ज्या ठिकाणी हे लक्षण आढळते, ते प्राकृतचे जुन्यात जुने रूप म्हणता येते. परिवर्तनाच्या क्रमाच्या दृष्टीने पाहिले, तर काही संयुक्त व्यंजने व स्वरमध्यस्थ स्फोटक जसेच्या तसे टिकवून धरणारी अशोकाची भाषा व पाली हा पहिला टप्पा, स्वरमध्यस्थ अघोष स्फोटकांचे जिच्यात सघोष स्फोटक होतात ती शौरसेनी हा दुसरा टप्पा, स्वरमध्यस्थ स्फोटक ज्यात अजिबात नष्ट झाले आहेत अशा माहाराष्ट्री इत्यादींचा तिसरा टप्पा आणि शेवटी संस्कृत रूपे पुन्हा उसनी घेण्याला सुरुवात करणारा अपभ्रंश हा शेवटचा, चौथा टप्पा.

  परंतु ‘प्रकृतिः संस्कृतम्‌। तत्र भवं तत आगतं वा प्राकृतम्‌।’ असे प्राकृत व्याकरणकारांनी म्हटले असले, तरीही संस्कृत व प्राकृत यांच्या ऐतिहासिक संबंधाची जाणीव त्यांना झालेली नाही. अशा प्रकारचा कारणकार्य किंवा पूर्वापार संबंध यांचा भाषेच्या अभ्यासात फार नंतर शोध लागलेला आहे. जुन्या विशिष्ट ग्रंथांतील प्राकृत हाच व्याकरणकारांचा आधार असल्यामुळे पाली काय किंवा अशोकाच्या शिलालेखांची भाषा काय यांचा त्यात उल्लेखही नाही. पालीसारखी समृद्ध अशी बौद्ध वाङ्‌मयाची भाषा दुर्लक्षित रहावी ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे.

प्राकृतांना दिलेली प्रादेशिक नावे काही अंशी दिशाभूल करणारी आहेत. सर्वत्र तालव्य घर्षक असणारी पूर्वेकडील प्राकृत मागधी आणि सर्वत्र दंत्य घर्षक असणाऱ्या पश्चिमेकडील प्राकृत असा स्थूल भेद करणे वस्तुस्थितीला धरून आहे. मात्र यामुळे बुद्धाची मानली गेलेली पाली ही त्याचे अवतारकार्य ज्या भागात झाले त्या पूर्वेकडची नसून एक पश्चिमेकडची प्राकृत आहे असे स्पष्ट होते. याच कारणासाठी बंगाली ही भाषिक व भौगोलिक दृष्टीने पूर्वेची आहे असे निश्चित आहे. त्याचप्रमाणे शौरसेनी व माहाराष्ट्री यांच्यातला संबंध उघडउघड पूर्वावस्था व उत्तरावस्था यांचा आहे.  

नाट्यशास्त्राने प्राकृत भाषांना दिलेले नाट्यरचनेतील स्थान हा केवळ एक रूढ संकेतच मानता येईल. गद्यासाठी शौरसेनी, गीतासाठी माहाराष्ट्री, विशिष्ट जातींसाठी विशिष्ट प्राकृत ही व्यवस्था भाषिक दृष्टिकोणातून न पहाणचे इष्ट.


 

परिवर्तनाची दिशा : (अ) ध्वनी :स्वरव्यवस्थेत दोन महत्त्वाचे बदल झाले. संयुक्त स्वर , औचेए, ओ झाले आणि च्या जागी पश्चिमेकडे व वायव्येकडे आली. ओष्ठ्य व्यंजनाच्या सान्निध्यात हे परिवर्तनही होते. काही ठिकाणी र, रि, रु असा बदलही मिळतो.

  अंत्यस्थानी फक्त स्वरच येतो. हे एक तर अंत्य व्यंजनाचा लोप करून किंवा त्याला स्वर जोडून साधले जाते.

शब्दारंभी एकच व्यंजन रहाते. त्यापैकी न्‌, य्‌, श्‌, ष्‌ यांचे अनुक्रके ण्‌, ज्‌, स्‌, स्‌ होतात मागधीत मात्र श्‌ तसाच राहून ष्‌, स्‌ चा श्‌ होतो. स्वरमध्यस्थ म्‌, र्‌, ल्‌, ह्‌ टिकून रहातात, तर ट्, ठ्, ड्, ढ् या मूर्धन्यांचे ड्, ढ्, ड्, ढ् होतात. मात्र प्राभाआड् चा मभाआमध्ये होणारा ड् हा नंतर मराठी गुजरातीत ळ्‌ होत असल्यामुळे त्याचे ध्वनिमूल्य मूर्धन्य ड् पेक्षा वेगळे आहे हे निश्चित. संयुक्त व्यंजनाचे शब्दारंभी एकाच व्यंजनात परिवर्तन होते. इतरत्र संयुक्त व्यंजनयुग्म किंवा व्यंजनयुग्म + ह्‌ असे परिवर्तन होते. संयुक्त व्यंजनांच्या उच्चारातील शैथिल्य हे प्राकृत भाषांचे एक सामान्य वैशिष्ट्य म्हणता येईल. शब्दारंभीचा ण्‌ किंवा ञ्‌ हा केवळ एक लेखनसंकेत असून त्याचे ध्वनिमूल्य न्‌च होते असे नंतरच्या इतिहासावरून दिसते. इतर ठिकाणचा ण्‌ मात्र काही भाषांत न्‌ तर काहींत ऐतिहासिक संदर्भानुसार ण्‌ किंवा न्‌ आहे.

  (आ) व्याकरण :ध्वनिपरिवर्तनाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात भाषेच्या व्याकरणावर, विशेषतः नामव्यवस्था व क्रियापदव्यवस्था यांच्यावर, होतो. कारण पुष्कळदा मुळातले भिन्न प्रत्यय त्यामुळे एकरूप होतात.

मभाआत द्विवचन नष्ट झाले, पण लिंगव्यवस्था कायम राहिली, मात्र सर्वनामे स्वरान्त होऊन पुल्लिंगी व नपुंसकलिंगी नामांच्या शेवटी अ, इ, उ व स्त्रीलिंगी नामांच्या शेवटी आ, इ, ई, उ, ऊ हे स्वर राहिले. चतुर्थी व षष्ठी आणि तृतीया व सप्तमी या विभक्त्त्या एकरूप झाल्या.

वेदभाषेची अत्यंत समृद्ध क्रियापदव्यवस्था नंतरच्या संस्कृत भाषेत सोपी झालीच होती. ती मभाआत आणखी सोपी झाली. आत्मनेपद व कर्मणी यांची जागा परस्मैपदाने घेतली आणि क्रियापदातील गणदर्शक प्रत्ययांचा लोप झाला.

वाक्यरचनेत म्हणण्यासारखा फरक मात्र घडून आला नाही.

(इ) शब्दसंग्रह :शब्दसंग्रहातला तत्सम, तद्‌भव व इतर हा फरक मभाआपासून सुरू होतो. मात्र तत्सम म्हणजे ध्वनिपरिवर्तनामुळे ज्यांचे रूप बदलू शकत नाही असे शब्द, ध्वनिपरिवर्तनाचा परिणाम होऊन उच्चारदृष्ट्या संस्कृतपेक्षा वेगळे झालेले ते तद्भव आणि ज्यांचे मूळ संस्कृतात सापडत नाही ते इतर.

मात्र संस्कृतोद्‌भव असूनही ज्यांची नोंद त्या भाषेत सापडत नाही असे पुनर्घटनेने मिळणारे अनेक शब्द मभाआत आहेत. शब्दांच्या बाबतीत धार्मिक साहित्य वाङ्‌मयीन लेखनापेक्षा पुष्कळच अधिक समृद्ध आहे.

  साहित्यात आलेले लांबलचक समास मूळ संस्कृत समासांना प्राकृत रूप देऊन बुद्धिपुरःसर बनवलेले आहेत. यावरून प्राकृत लेखन हा अनेक संस्कृत पंडितांचा विरंगुळा होता, असे मानावे लागते.

  साहित्य : शिलालेख, ताम्रपट इ. साहित्य वगळून पाहिले, तरी प्राकृत साहित्य अफाट आहे.

  पाली भाषेत बौद्धांच्या धार्मिक ग्रंथांप्रमाणे इतर पुष्कळ साहित्य आहे. मूळ धर्मग्रंथ ⇨त्रिपिटक (तिपिटक) या नावाने ओळखले जातात. त्रिपिटकाबाहेरही इ. स. च्या पाचव्या शतकापर्यंत धार्मिक ग्रंथ रचले जात होते. त्यात नेत्तिपकरण, पेटकोपदेस, सुत्तसंगह इ. ग्रंथ येतात. इ. स. च्या सु. पहिल्या शतकात रचिला गेलेला अखेरचा प्रख्यात⇨मिलिंदपञ्ह हा ग्रंथही त्यांपैकीच एक.

यानंतर त्रिपिटकावरील भाष्ये व टीका यांचा काळ येतो. तो बहुधा इ. स. च्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत असावा. त्यांत जातक अट्ठकथा, धम्मपद अट्ठकथा इत्यादींचा समावेश आहे. यानंतरच्या काळात टीकाग्रंथ, व्याकरणे इ. साहित्य झाले. [⟶पाली साहित्य].

  अर्धमागधी ही श्वेतांबर जैनांची धर्मभाषा. तिच्यातील ग्रंथ आज ज्या स्वरूपात आहेत ते स्वरूप जैन परंपरांनुसारच त्यांना इ. स. च्या पाचव्या शतकाच्या सुमाराला प्राप्त झाले. याबाहेरचे जैनांचे धर्मसाहित्य जैन माहाराष्ट्रीत आहे. विमलसूरीचे ⇨पउमचरिय याच भाषेत आहे. विमलसूरी कोणत्या काळात होऊन गेला ह्यासंबंधीची वेगवेगळी मते लक्षात घेता, इ. स. च्या पहिल्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला असावा, असे दिसते. त्याचप्रमाणे संघदासगणी व धर्मसेनगणी ह्यांची ⇨वसुदेवहिंडी, देवेंद्राची उत्तरज्झयणावरील टीका, जिनप्रभसूरीचा विविधतीर्थकल्प, हरिभद्राची ⇨समराइच्चकहा, धर्मदासगणीची ⇨उवएसमाला इ. ग्रंथ याच भाषेत आहेत. मात्र नंतरची भाषा आधीच्या भाषेपेक्षा बदलत जात असल्याचे जाणवते. [⟶ माहाराष्ट्री साहित्य].

  दिगंबर जैनांच्या भाषेला जैन शौरसेनी हे नाव आहे. या भाषेत शौरसेनीची व मागधीची वैशिष्ट्ये दिसून येतात. इतर प्राकृतांच्या मानाने हिच्यात देशीचा भरणा बराच कमी असला, तरी तिच्यावर संस्कृतचा व अर्धमागधीचा पगडा विशेष आहे. ⇨कुंदकुंदाचार्यांचे पवयणसार (सं. रूप प्रवचनसार, इ. स. चे सु. पहिले शतक), त्याचप्रमाणे वट्टकेराचार्यांचा मूलाचार, कार्तिकेयस्वामीची कत्तिगेयाणुवेक्खा हे आणि इतर महत्त्वाचे ग्रंथ आहेत. [⟶शौरसेनी साहित्य].

  दिगंबर जैनांनीच धार्मिक आणि इतर प्रकारच्या साहित्यासाठी अपभ्रंशाचा विशेष उपयोग केला. त्यातले ⇨भविसयत्तकहासनत्कुमारचरित हे ग्रंथ प्रसिद्ध झाले असून ⇨जोइंदूचापरमप्पपयासु, ⇨ पुष्पदंताचे ⇨महापुराण आणि इतर काही ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. काही संस्कृत ग्रंथांतही जैनांनी अपभ्रंश श्लोक घातले आहेत.

पूर्व भारतात बौद्धांनीही अपभ्रंशाचा उपयोग केला आहे. असा एक ग्रंथ म्हणजे काण्हपा व सरहपा यांचा दोहाकोश. [⟶अपभ्रंश साहित्य].

दंडीने सर्वश्रेष्ठ म्हटलेल्या माहाराष्ट्री प्राकृताला व्याकरणकारांनीही त्यांच्या वर्णनात पहिले स्थान दिले आहे. इतर प्राकृतांचे वर्णन माहाराष्ट्रीच्या तुलनेने करण्यात येते. ⇨हाल सातवाहनांची ⇨गाहा सत्तसइ तसेच जयवल्लभाचा ⇨वज्जालग्ग या भाषेतच आहेत.⇨प्रवरसेनाचा ⇨सेतुबंध आणि वाक्पतिराजाचा ⇨गउडवहो ही वीरकाव्येही प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारची साहित्यनिर्मिती करणारी माहाराष्ट्री ही एकमेव वाङ्‌मयीन प्राकृत आहे.

 

आज नष्ट झालेली गुणाढ्याची ⇨बड्डकहा (बृहत्कथा) ही पैशाचीत लिहिलेली होती, असा उल्लेख आहे. मात्र तिचे अवशेष संस्कृत रूपाने सोमदेवाचा ⇨कथासरित्सागर व क्षेमेंद्राची बृहत्कथा-मञ्जरी ह्या ग्रंथांत आज टिकून आहेत. बौद्धांच्या चार वैभाषिक शाखांपैकी एकीचे लेखन पैशाचीत असल्याचा उल्लेख असला, तरी त्यातले काहीच आज उपलब्ध नाही. व्याकरणसाहित्यातच तसेच ⇨कुवलयमाया (चंपूकाव्य), हम्मीरमदमर्दन, मोहराजपराजय (नाटके) ह्यांसारख्या ग्रंथांत पैशाचीचे आपल्याला दर्शन होते.

  इ. स. च्या दुसऱ्या सहस्रकाच्या सुरुवातीला धार्मिकेतर साहित्यात वापरलेली अपभ्रंश भाषा आढळते.

नाट्यवाङ्‌मयातील प्राकृतात माहाराष्ट्री, शौरसेनी व मागधी या मुख्यतः येतात. उच्च दर्जाच्या स्त्रिया गद्यात बोलताना शौरसेनीचा आणि गीतांत माहाराष्ट्रीचा वापर करतात. मागधीचा वापर जैन साधू, मच्छीमार, नोकरवर्ग इत्यादींकडून होतो. अश्वघोष, भास, शूद्रक, कालिदास आदींच्या नाटकांत अशा प्रकारे या प्राकृतांचा दुय्यम उपयोग आढळतो. मात्र अगदी प्राचीन नाटककारांच्या काळात प्राकृत या जिवंत भाषा होत्या, तर नंतरच्या काळात त्या इतक्या ग्रांथिक बनल्या होत्या, की नीट अभ्यास केल्याशिवाय त्यांचा योग्य उपयोग करणे लेखकाला शक्य नव्हते.


प्राकृत भाषांचे वर्णन करणाऱ्या व्याकरणांची परंपरा ⇨वररुचीपासून सुरू होते. त्याच्या प्राकृतप्रकाश या ग्रंथात माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची यांचा अभ्यास आहे. ⇨हेमचंद्राच्या ग्रंथात चूलिका पैशाची किंवा पैशाचिका, अपभ्रंश व आर्ष यांची त्यात भर आहे. लक्ष्मीधर, सिंहराज, नरसिंह आणि इतर काही व्याकरणकारांनी यातील आर्ष ही भाषा सोडून बाकीच्या सहांचा विचार केला आहे.

  मात्र मार्कण्डेयाच्या प्राकृतसर्वस्वामध्ये सोळा भाषांचा विचार असून त्यांचे त्याने भाषा, विभाषा, अपभ्रंश व पैशाच असे भाग केले आहेत. माहाराष्ट्री, शौरसेनी, प्राच्या, आवन्ती, मागधी, अर्धमागधी, दाक्षिणात्या व बाह्‌लीकी या भाषा शाकारी, चाण्डाली, शाबरी, आभीरिकी, शाक्की व द्राविडी या विभाषा सत्तावीस प्रकार असलेली अपभ्रंश आणि अकरा प्रकार असलेली पैशाची.

  वररुचीपासून पुढे कित्येक शतके अनेक व्याकरणकारांनी प्राकृतावर लिहिले आहे.

 

एका अर्थाने भरताच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचाही समावेश वरील प्रकारच्या साहित्यात करता येईल, कारण त्यात काही प्राकृतांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा रंगभूमीवरील उपयोग यांची माहिती दिलेली आहे.

  प्राकृत शब्दसंग्रहाच्या माहितीसाठी धनपाल याचा पाइअलच्छी व हेमचंद्राचा रयणावलि (देशीनाममाला) हे कोश अत्यंत उपयुक्त आहेत. अलिकडच्या काळात हरगोविंददास त्रिकमचंद सेठ यांचा पाइअसद्दमहण्णवो हा १९२८ मध्ये प्रसिद्ध झालेला कोश अतिशय महत्त्वाचा आहे.

बृहद्‌भारतातील प्राकृत अवशेषांचे श्रेय बौद्धांना आहे. यांतली भाषा व्याकरणबद्ध नाही. यात १८९२ मध्ये फ्रेंच प्रवासी द्युत्रय द रँस याला खरोष्ठी लिपीत लिहिलेल्या व खोतान येथे मिळालेल्या धम्मपद या ग्रंथाचा काही भाग येतो. बाकीचा भाग कॅश्गारला असलेल्या पेत्रोव्स्की या रशियन अधिकाऱ्याला आधीच मिळाला होता. याशिवाय सर ऑरेल स्टाइन याला चिनी तुर्कस्तानात खरोष्ठी लिपीतील बरीच लिखित सामग्री १९००–०१ च्या सुमारास मिळाली. ती सर्व नीया येथे मिळालेली आहे, म्हणून या भाषेला ‘नीया प्राकृत’ हे नाव देण्यात आले आहे. ही सामग्री सरकारी स्वरूपाची असून त्यात राजाने अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना, विक्रीखते, खासगी पत्रे, याद्या इत्यादींचा समावेश आहे.

  या भाषेत दीर्घ स्वर, ऋ आणि घर्षक यांना स्वतंत्र चिन्हे आहेत. शिलालेखात प्राकृतात सिंहाचा वाटा सम्राट अशोकाचा आहे. हे शिलालेख मोठ्या शिलांवर व शिलास्तंभांवर कोरलेले आहेत. त्यांच्यातील भाषेत प्रदेशपरत्वे फरक असल्यामुळे प्रत्येक शिलेवरील लेख हा त्या प्रदेशातील बोलीत असावा, असे अनुमान आहे. मुळात या लेखांचा एकच अधिकृत मसुदा पाटलिपुत्र येथे तयार करून त्याची प्रादेशिक बोलींत भाषांतरे झालेली दिसतात. रहदारीच्या रस्त्यावरील हे लेख उभ्याने वाचता किंवा वाचून दाखवता येण्यासारखे आहेत. ते त्यांच्या सु. बावीसशे वर्षांपूर्वीच्या स्वरूपात जसेच्या तसे उपलब्ध असल्यामुळे भारतीय आर्य भाषांच्या अभ्यासात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. वायव्येकडील काही प्रदेशांत हे लेख खरोष्ठी लिपीत असून इतरत्र ब्राह्मीत आहेत.

श्रीलंकेतही ख्रि. पू. २०० ते ख्रिस्तोत्तर चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत ब्राह्मी शिलालेख आढळतात. त्यांच्या भाषेला सिंहली प्राकृत म्हणतात. भारतात अशोकानंतरही जवळजवळ एक हजार वर्षांपर्यंत ही परंपरा काही प्रमाणात आढळते.

प्राचीन नाण्यांवरील मजकुराचाही लिपी व भाषा यांच्या अभ्यासात थोडा वाटा आहे. ही नाणी ख्रि. पू. चौथ्या शतकापासून उपलब्ध आहेत. मजकूर असलेले सर्वांत जुने नाणे सागर भागातील एरॅम येथील असून त्यावर उजवीकडून डावीकडे ‘धमपालस’ (प्राकृत धम्मपालस्स, सं. धर्मपालस्य) असे कोरलेले आहे. प्राकृत लेख असलेल्या नाण्यांची ही परंपरा ख्रि. पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धापासून गुप्तकालापर्यंत अखंड चालू राहिलेली दिसते.

 

लौकिक संस्कृत आपली बोली शक्य तितकी संस्कृतचा आदर्श पुढे ठेवून केलेल्या प्रयत्नातून निर्माण होते किंवा संस्कृत व तत्कालीन बोलींच्या संकरातून येते. म्हणजे प्राकृतचे संस्कृतीकरण किंवा संस्कृतचे प्राकृतीभवन यातून एक संस्कृतचा आभास निर्माण करणारी एक चमत्कारिक लौकिक भाषा जन्माला येते. ⇨महावस्तु, ⇨ सद्धर्मपुण्डरीक, ⇨ ललितविस्तर यांसारखे ग्रंथ अशा संस्कृतमध्ये आहेत. ही बौद्धांनी निर्माण केली. अशी एक जैनांची संस्कृत आहे. त्याचप्रमाणे हिंदूंच्या वीरकाव्यांतून आणि पुराणांतून मधूनमधून नियममुक्त अशा संस्कृत रूपांचे दर्शन होते. ही रूपे अशुद्ध नसून प्राकृत अवस्थेची सूचक आहेत. यासंबंधीच्या संशोधनाला अजून बराच वाव आहे.

संदर्भ : 1. Bloch, Jules, L’ indo-aryen du veda aux temps modernes, Paris, 1934.

            2. Bloch, Jules, Les Inscriptions d’ Asoka, Paris, 1950.

            3. Katre, S. M. Prakrit Languages and Their Contribution to Indian Culture, Poona, 1964.      4. Woolner, A. C. Introduction to Prakrit, Calcutta, 1917.  

                                                                                                                                         

कालेलकर, ना. गो.