रोमानी भाषा : हिला जिप्सी भाषा असेही म्हणतात. ती ⇨इंडो-आर्यन भाषासमूहात मोडते. ७५० ते १२५० च्या दरम्यान केव्हा तरी भारताच्या वायव्य भागांतून आज ⇨जिप्सी म्हणून ओळखले जाणारे लोक नैर्ऋत्य आशियामार्गे मध्य आशिया व यूरोप येथे गेले आणि नंतर यूरोपातून अमेरिका इ. इतर ठिकाणी गेले. त्यांची मूळची भाषा रोमानी होय. मूळच्या टोळ्या वेगवेगळ्या असणार आणि भ्रमंतीच्या मार्गांवरील भाषांचा प्रभाव पडणार, या दोन कारणांमुळे आर्मेनियन, सिरियन, रशियन, स्पॅनिश, वेल्श इ. जिप्सींच्या थोड्याफार फरकाने भिन्न अशा बोली झाल्या. आज यांतील काही लुप्त झाल्या आहेत. कारण काही जिप्सी हल्ली केवळ तिथल्या स्थानिक भाषाच बोलतात. ग्रीस, रूमानिया, यूगोस्लाव्हिया, हंगेरी, फिनलंड, रशिया आणि वेल्समध्ये मात्र रोमानी भाषा अजूनही सुमारे ३० लक्ष लोक बोलतात. क्कचित ‘गाजो’ (बिगर-जिप्सी) लोकांनाही ती येते. पण बहुधा ती बिगर-जिप्सी लोकांना न समजणारी गुप्त बोली म्हणूनही वापरता येते. रोमानीला कुठेही कायद्यात, शिक्षणक्रमात मान्यता मिळालेली नाही.
वर्णमाला : आ, ई, ऊ, ए, ओ (रशियामधील बोलीत शिवाय एक संवृत तालुसीमीय प्रसृतोष्ठ स्वर) क्, ख्, ग्, घ्, ङ्, च्, छ्, ज्, झ् (च्, ज् मराठी चाक, जाड प्रमाणे), त्, थ्, द्, ध्, न् (ट-वर्ग लुप्त), प्, फ्, ब्, भ्, म्, य्, र्, ल्, व्, श्, स्, ह (काही बोलींमधून शिवाय ख़्, ग़्, फ़्). शिवाय संयुक्त स्वर : आइ, ओइ, उइ (ई, ऊ हे स्थानपरत्वे इ, उ असे उच्चारले जातात.).
रूपसिद्धी : नामांना दोन लिंगे, दोन संख्यावचने आणि पुढीलप्रमाणे रूपे आहेत : छावो (मुलगा) छावे (बहु.), छावेस (द्वितीया व सामान्यरूप), छावेन (त्याचे बहु.). सामान्य रूपाला परप्रत्यय के (ला), तीर (हून), ते (आत), सा (ने) असे लागतात. खेरीज काही पूर्वयोगी आहेत : पाश-छावेस-ते- (मुलग्यापाशी), वाशो-छावेस-के (मुलासाठी) इत्यादी. सर्वनामे अनियमित चालतात.
विशेषणांपैकी काहींना लिंगविकार असतात-बारो (मोठा), फेनाकीरो (बहिणीचा, फेन-बहीण) काहींना नसतात-फ्रेंतो (लुच्चा), बृतीत्को (काम करणारा, बूती-काम).
क्रियापदांना तीन पुरुष, दोन संख्यावचने आणि पुढीलप्रमाणे रूपे आहेत : खेलेला (खेळतो), खेल्दा (खेळला), खेलेलास (खेळत होता), खेलेल, (खेळेल, खेळो इ.-कधी पूर्वप्रत्ययांसह), खेलेन (खेळा). (क्रियापदामध्ये लिंगभेद नाही).
शब्दभांडार : मूळ शब्दभांडार अर्थात इंडो-आर्यन आहे : आमे (आम्ही), याव- (ये-), बाइ (बाही), ब्रीशींद (वृष्टी, पाऊस), चोर (चोर), चूची (चुचुक), देश (दहा), चीब (जीभ), दर-(डर-भि-) लोन (मीठ), राक्ली (मुलगी, तरुणी), रोम (जिप्सी, नवरा, पुरुष, मूळ शब्द डोम), मानूश (माणूस), रात (रक्त, रात्र), ऊश्त (ओठ), पानी (पाणी), शूको (सुका, हडकुळा), काम- (कामना कर-, चाह-, वर प्रेम कर).
पण त्याचबरोबर आपल्या भ्रमंतीमध्ये रोमानी-भाषकांनी इतर भाषांमधून पुष्कळ शब्द उसने घेतले : द्रोम (मार्ग, ग्रीक), ओख्तो (आठ, ग्रीक), रोता (चाक, रूमानियन), दोश्मन (शत्रू, फार्सी), प्राखो (धूळ, सर्बोक्रोएशियन), फेल्दा (शेत, जर्मन), गेन्स्तो (जाड, पोलिश), बीनो (पाप, इंगेरियन), तेआत्रो (थिएटर, स्पॅनिश), पोतीग्वाया (द्राक्ष-मद्यामध्ये भांग, स्पॅनिश).
काही रोमानी म्हणी व वाकप्रचार पाहण्याजोगे आहेत : बार्वालीपे लोवेंचा चोरोरीपे गीलेंचा (मालमत्ता पैशांनी, गरिबी गाण्यांनी), नीकोली ई नीकाइ नाने मानूश बाखतालो, ई नीकाइ योव नाने बिबाख़्तालो (ना कधी अन ना कुठे नाही माणूस सुखी अन ना कुठे तो नाही अ-सुखी), सीर तूके आदाइ जीवेलापे? (कसं तुला इथे जगणं-चाललंय?), नांगो ता ना चोर (नंगा असेल पण नाही चोर), पे रोता माख्यापे स्वातोसा केर्दापे [चाकाचं (वंगण) माखून घेतलं व्याही-सा (जणू व्याहीच) स्वतःला-करून-घेतलं-तोंडपुज्या माणसाचे वर्णन].
वाक्यरचना : कर्ता व क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला येतात : ते कामेस मान कालेस मेलालेस [अन (तू) चाहोस-तू (चहावेस-तू) मला काळा मळका (असलो तरी)], मे ना कामाम ते जाव तूसा (मी नाही चाहत जायला तुजसोबत), योइ राकीर्ला काम्ले मान्शेसा (ती बोलते चाहिलेल्या माणसाशी-म्हणजे आपल्या प्रेमपात्राशी).
वाङ्मय : म्हणींखेरीज विपुल कथा, गाणी इत्यादी मौखिक वाङ्मय आहे. रोमानीवर लेखनाचा संस्कार अलीकडेच काही देशांत झाला आहे.
संदर्भ : 1. Miklosich, F. Uber die Mundarten und die Wanderungen derZigeuner Europas, 12 Vols, Wier, 1872-81.
2. Pott, A. F, Die Zigeuner in Europe and Asien. Halle, 1844-45.
3. Turner, Ralph. The position of Romani in Indo-Aryan, Gypsy Lore Society Monograph, Edinburgh, 1927.
4. Ventzel. T. V. The Gypsy Language, Moscow, 1983.
केळकर, अशोक रा.
“