जिवाजी विद्यापीठ : मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. स्थापना ग्वाल्हेर येथे (१९६४). या विद्यापीठाचे स्वरूप निवासी, संलग्नक व अध्यापनात्मक असून त्याच्या क्षेत्रात ग्वाल्हेर, भिंड, शिवपुरी, गुणा व दतिया हे महसुली जिल्हे समाविष्ट होतात. विज्ञान, आयुर्वेद, वाणिज्य, अभियांत्रिकी, शिक्षण, विधी, वैद्यक, शारीरिक शिक्षण, समाजशास्त्रे वगैरे विद्याशाखा येथे आहेत. येथील परीक्षामाध्यम कला, आयुर्वेद, वाणिज्य, विधी आणि समाजशास्त्रे या विषयांकरिता हिंदी असून अन्य विषयांसाठी इंग्रजी आहे. १९७२ मध्ये विद्यापीठात घटक महाविद्यालये १०  असून संलग्न महाविद्यालये ३३ होती. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत. या विद्यापीठाशी संलग्‍न असलेली महाविद्यालये पूर्वी विक्रम विद्यापीठाशी सलग्‍न असल्यामुळे त्या विद्यापीठाने १९५९–६० मध्ये त्रिवर्ष-पदवीअभ्यासक्रम योजना स्वीकारली होती, तीच या विद्यापीठाने सुरू केली आहे.

विद्यापीठाच्या  ग्रंथालयात ३१,१४१ पुस्तके व २५५ नियतकालिके येत होती (१९७२). विद्याव्रत ही विद्यापीठाची सुसज्ज अभ्यासिका सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत उघडी असते व तिथे विद्यार्थ्यांना अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन देण्याची व्यवस्था आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याकरिता एक विद्यार्थी उपदेश संस्था ग्वाल्हेर शहरात काम करते. ही संस्था विविध अभ्यासक्रमासंबंधी माहिती पुरवते. विद्यापीठाचा १९७१–७२ मध्ये उत्पन्न व खर्च अनुक्रमे ३८·५० व ३५·८५ लाख रु. होता आणि त्यासाठी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांत मिळून सु. ३३,९३१ विद्यार्थी शिकत होते.  

घाणेकर, मु. मा.