वेल्थीफिशर, वेल्थी हॉनसिंगेर : (१८ सप्टेंबर १८७९- १६ डिसेंबर १९८०). भारतात प्रौढ साक्षरताप्रसाराचे कार्य करणाऱ्या अमेरिकन कार्यकर्त्या. रोम (न्यूयॉर्क राज्य) येथे जन्म. रीतसर संगीताच्या शिक्षणाबरोबरच अभिनयाचे पद्धतशीर शिक्षणही त्यांनी घेतले. काही काळ त्या संगीत रंगभूमीच्या क्षेत्रातही चमकल्या. १९०० मध्ये सिरॅक्यूज विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील रोजबड कॉलेजमध्ये शिक्षिकेची नोकरी पतकरली. पुढे रॉबर्ट स्पीअर नावाच्या ख्रिस्ती धर्मगुरूपासून प्रेरणा घेऊन त्या चीनमधील जियांगसी प्रांतातील नानचांग येथील कन्याशाळेत मुख्याध्यपिका म्हणून काम करण्यासाठी दाखल झाल्या (१९०६). तेथे त्यांनी बरेच वर्षे काम केले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर (१९१४) त्या अमेरिकेस परतल्या. त्यांनी युद्धकार्यात भाग घेतला व युद्ध संपल्यावर वर्ल्ड नेबर्स हे नियतकालिक परिश्रमपूर्वक चालविले. १९२० मध्ये त्या प्रथमच भारतात आल्या. पुढे त्यांचा फ्रेडरिक वॉन फिशर नावाच्या मेथडिस्ट बिशपशी विवाह झाला. सी. एफ्‌. अँड्यूज, जॉर्ज अरूंडेल, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आदींच्या विचारसरणीने त्या विशेष प्रभावित झाल्या. शिक्षणप्रसाराची आधुनिक तंत्रे व पद्धती आत्मसात करण्यासाठी त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. भारतात पुनश्च आल्यानंतर १५ डिसेंबर १९४७ रोजी त्या महात्मा गांधी यांना भेटल्या ‘खेड्यात जा आणि ग्रामीण जनतेला मदत करा’ असा संदेश महात्माजींनी त्यांना दिला.

वेल्थी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे प्रौढ शिक्षणप्रसारार्थ भाड्याने घेतलेल्या घरातच प्रौढ शाळेच्या पहिल्या वर्गाची-लिटरसी हाउसची-सुरूवात केली. साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेकविध तंत्रे शोधून काढली, विविध साधनांचा वापर केला, स्वतंत्र पाठ्यपुस्तके लिहिली व इतरही अनेक प्रयोग केले. शिक्षकाला एकाच वेळी २५ प्रौढांना शिकविता येईल असे उपकरणसंचही त्यांनी तयार केले. ‘प्रत्येकाने निदान एकतरी व्यक्ती साक्षर करावी (ईच वन टीच वन)’ हा त्यांच्या साक्षरता-मोहिमेचा मूलमंत्र होता. पूढे कार्याचा व्याप वाढल्याने १९५६ मध्ये अलाहाबाद येथील ‘लिटरसी हाउस’ लखनौ येथे हलविण्यात आले. या शाळेत नंतर ग्रामीण स्त्रियांसाठी साक्षरता, आरोग्य, पोषण, कुटुंबकल्याण हे कार्यक्रम व साक्षरतेसाठी पुस्तके तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. वीस वर्षांच्या अहर्निश सेवेनंतर वेल्थी अमेरिकेत परतल्या. वरील शाळेचे व्यवस्थापन आता ‘भारतीय साक्षरता मंडळ’ करीत आहे.

वेल्थी फिशर यांना रेमन मॅकसाय-साय पारितोषिक (१९६४), नेहरू साक्षरता पुरस्कार (१९६८), यांसारखी अनेक मानचिन्हे मिळाली. भारतीय डाक-तार विभागाने त्यांच्या जन्मशताब्दीनंतर १८ मार्च १९८० ला पोस्टाने खास तिकीट काढले होते. दिल्ली विद्यापीठातर्फे एका खास पदवीदान समारंभात त्यांना भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (ऑनरिस कॉझा) ही पदवी प्रदान करण्यात आली (२४ मार्च १९८०). टू लाइट ए कँडल या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे (१९६२). १९७३ साली लिटरसी अँड डेव्हलपमेंट हा त्यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अमेरिकेतील हेरिटेज (कनेक्टिकट) येथे १६ डिसेंबर १९८० रोजी त्यांचे निधन झाले.

चोरघडे, शं. ल.