अध्यापन व अध्यापन पद्धति : अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अध्यापन हा शब्द प्रयोजक आहे. ‘शिकावयास प्रेरणा देणे’ हा त्याचा अर्थ होय. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीनेही प्रेरणा व मार्गदर्शन हेच अध्यापनाचे सारसर्वस्व होय. अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. त्यात उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्ययनप्रसंगांची योजना, अध्यापन पद्धती आणि उद्दिष्टांच्या सफलतेचे मूल्यमापन या पाचही गोष्टींचा समावेश होते. संपूर्ण अध्यापन-प्रक्रियेचा अध्यापनपद्धती हा एक महत्त्वाचा भाग होय.

शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्कारसुमुच्चयाला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली . या शालेय वा संस्थांतर्गत शिक्षणाला ‘औपचारिक किंवा रीतसर शिक्षण’ म्हणतात. घरातील आईवडील प्रसंगानुसार मुलांना शिकवतात, त्यांच्या चारित्र्यविकासाकडे लक्ष देतात. आई हा सर्वांत श्रेष्ठ गुरू, पिताही गुरू, असे याचसाठी मानले जाते.

अध्यापनक्रियेचे स्वरूप फार व्यापक आहे. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. शिक्षण व जीवन यांचा परस्परसंबंध आहे ज्ञानाकरिता ज्ञान हे जसे एका अर्थी युक्त आहे, तसेच शक्य तेथे व्यवहारातही त्याच उपयोग करता आला पाहिजे, हेही युक्त आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे उपयोजन आणि कौशल्यांची प्राप्ती यांनाही महत्त्व दिले पाहिजे. तसेच अनेक दृष्टीकोन व मूल्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञानसंक्रमण नसून विद्यार्थांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीची विकास करणारे, त्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणारे, त्यांना चांगल्या सवयी लावणारे, त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास करणारे, त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना आणि त्यांच्या सर्जनशील शक्तीचा व विवेकबुद्धीचा विकास करणारे अध्यापकाचे कार्य, म्हणजे अध्यापन होय.

अध्यापन व अध्यापन या प्रकिया एकमेकींशी निगडित आहेत. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. विद्यार्थी शिकला याची साक्ष त्याच्या वर्तनात दिसते. जे समजले नव्हते ते समजले व जे करता येत नव्हते ते करता येऊ लागले, म्हणजे शिक्षण झाले. म्हणून अध्ययन म्हणजे संस्कारग्रहण आणि वर्तनात परिवर्तन व ते घडविण्यास साहाय्य करणे म्हणजे अध्यापन. शिक्षक व विद्यार्थी यांतील क्रियाप्रतिक्रियांच्या या दोन बाजू आहेत, म्हणून शिक्षण ही द्विध्रुव-प्रक्रिया समजली जाते.

विद्यार्थ्यावर होणाऱ्या संस्कारांत शिक्षकाचा वाटा मोठा असतो. शिक्षकाच्या आचारविचारांचा प्रभाव संस्कारक्षम विद्यार्थ्यावर होत असतो. यासाठी प्राचीन काळातील आचार्य सदाचारसंपन्न व शीलसंपन्न राहण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळेच गुरूची योग्यता मोठी मानली जाई. अध्यापकाची प्रतिष्ठा बऱ्याच अंशी त्याच्या विविध प्रकारच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्या बाबतही अनेक प्रकारचे संशोधन अलीकडे झाले आहे. या गुणवत्तेची सामान्यत: चार क्षेत्रे मानण्यात येतात : (१) अध्यापन विषयाचे क्षेत्र-जे विषय शिकवावयाचे त्यांवर उत्तम प्रभुत्व, ते विषय विद्यार्थ्यांना समजावून देण्याचे कौशल्य, स्वत:चा व्यासंग अद्ययावत ठेवण्याची धडपड, अध्यापनसाधनांचे ज्ञान व त्यांचा कौशल्यपूर्ण उपयोग करण्याचे सामर्थ्य यांचा समावेश या पहिल्या क्षेत्रात होतो. (२) मानसशास्त्राचे ज्ञान—विशेषत: बाल, किशोर व कुमार यांचे मानसशास्त्र शिक्षकाला उत्तम अवगत हवे. (३) मानवी संबंधांचे क्षेत्र—शिक्षकाला विद्यार्थी, सहव्यवसायी व संचालक यांच्यात काम करावयाचे असते. तसेच त्याचा पालकांशी व समाजाशी संबंध येतो.या सर्वांशी वागण्याचे ज्ञान व कला शिक्षकाजवळ असली पाहिजे. (४) नेतृत्व—शिक्षक हा विद्यार्थ्याचा नेता व मित्र असतो. लोकशाही समाजातील नेत्याचे गुण त्याच्या ठिकाणी असले पाहिजेत. विद्यार्थ्याविषयी प्रेम, सहानुभूती व आस्था असणारा शिक्षक हाच उत्तम शिक्षक होऊ शकतो. शिक्षकाची ही गुणवत्ता अध्ययनाने, प्रशिक्षणाने व प्रयत्नाने वाढत असते. अध्यापन करीत असताना शिक्षकाची वृत्ती व दृष्टीकोन ही लोकशाही स्वरूपाची आहेत की उदासीन आहेत किंवा हुकूमशाहीची आहेत, यालाही फार महत्त्व आहे. पहिल्या प्रकाराचा दृष्टिकोन असल्यास विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो व तो स्वतंत्र वृत्तीचा व सहकारशील बनतो, असा प्रयोगांचा निष्कर्ष आहे.

अध्यापनपद्धती : अध्यापनपद्धतीचे स्वरूप एका बाजूने शिक्षणाच्या उद्दिष्टांशी निगडित असते, तर दुसऱ्या बाजूने मन व ज्ञानार्जन यांसंबंधीच्या रूढ कल्पनांशी निगडित असते. त्यामुळे अध्यापनपद्धतीचे स्वरूप बदलत गेल्याचे दिसते. प्राचीन काळात धर्मज्ञान हे स्वर्गप्राप्ती, मुक्ती, पापनाश वा पुण्यप्राप्ती यांचे साधन मानले जात असल्याने व प्रमाणभूत ग्रंथ वा व्यक्ती यांच्याकडून ते मिळवावयाचे असल्याने, गुरूकडून ते ऐकावयाचे व मुखोद्गत करावयाचे, हीच पठणपाठणपद्धती अस्तित्वात होती. व्यावाहरिक शिक्षण उमेदवारीने घेतले जाई. त्यात निरीक्षण व अनुकरण यांवरच भर असे. या परंपरागत पद्धतीला धक्का देण्याचे पहिला प्रयत्न सॉक्रेटीसने केला. शिकणाऱ्याला प्रश्न व प्रतिप्रश्न करून, त्यालाच विचार करायला लावून ज्ञानाचा शोध घेण्याची पद्धती त्याने रूढ केली. या संवादात्मक व प्रश्नप्रधान पद्धतीलाच पुढे ‘सॉक्रेटीसची पद्धती’ हे नामामिधान मिळाले. आपल्या प्राचीन उपनिषदात ही पद्धती आढळते परंतु ही पद्धती फार काळ टिकली नाही. सॉक्रेटीसनंतरच्या जवळजवळ हजार वर्षांच्या काळात खिस्ती धर्ममठांतून पुन्हा पूर्वीची पाठांतरपद्धती रूढ झाली. पवित्र ग्रंथाचे वाचन व पठण एवढेच त्या काळात शिक्षणाचे उद्दिष्ट होते.

सोळाव्या शतकापासून या शब्दनिष्ठ पद्धतीविरूद्ध प्रतिक्रिया सुरू झाली. कोमीनियस हा त्या प्रतिक्रियेचा आद्य प्रतिनिधी व नव्या पद्धतीचा  जनक होय.


बालकांना परिचित व मूर्त वस्तूंचे प्रथम ज्ञान करून द्यावे व नंतर अपरिचित व अमूर्त कल्पनांकडे न्यावे, तसेच बालस्वभावाच्या विकासाशी अध्यापनपद्धती मिळतीजुळती असावी, असे प्रथम त्याने सांगितले. अध्यापन मूर्त करण्यासाठी चित्रमय पुस्तके रचण्याच्या उपक्रम त्याने केला. त्यानंतर प्रचलित शिक्षणपद्धतीला जबरदस्त धक्का दिला तो रूसो याने. रूसो हा बालककेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात अनुभव व कृती यांना त्याने स्थान दिले. बालकाच्या स्वातंत्र्याचाही तो पुरस्कर्ता होता. रूसोच्या कल्पना प्रत्यक्षात पडताळून पाहण्याचे कार्य पेस्टालोत्सीने केले व त्यांतील उणिवा ओळखून नवी भर घातली. अध्यापनपद्धतीला मानसशास्त्राची बैठक त्याने मिळवून दिली. पेस्टालोत्सीच्याच शाळेत त्याचा सहकारी म्हणून काम करून स्वत:ची अध्यापनपद्धती निर्माण करणारा तत्त्वज्ञ म्हणजे फ्रबेल हा होय. त्याच्या मताप्रमाणे बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलविणे हेच शिक्षकांचे कार्य. म्हणून बालमनाच्या कळ्या फुलविणाऱ्या शिक्षकाला त्याने माळ्याची उपमा दिली व त्या पद्धतीला बालोद्यान असे नाव दिले. अध्यापनात क्रीडाप्रवृत्तीला वाव देऊन भाषा, इतिहास इ. विषय शैशवकुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम इंग्लंडमध्ये कॉल्डवेल कुक याने पुढे केला. त्याने आपल्या पद्धतीला ‘क्रीडापद्धती’ असेच नाव दिले.

पूर्वोक्त प्रयोग पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या स्तरांवरच होते. माध्यमिक स्तरावर अध्यापनपद्धतीला नवे वळण लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम हेर्बार्ट याने केला. हेर्बार्टच्या पद्धतीची छाप इंग्लंड, अमेरिका व भारत या देशांतील अध्यापनावर अजूनही आहे. ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेत हेर्बार्टने कल्पनांचे साहचर्य यावर विशेष भर दिला आणि त्यातून अध्यपनाचे नवे तंत्र निर्माण केले. पूर्वतयारी उपन्यास, साहचर्य, सामान्यीकरण व उपयोजन या पाच पायऱ्या अथवा पंचपदी हेर्बार्टच्या तंत्रातून त्याच्या शिष्यांनी निर्माण केली. गणित, विज्ञान, भूगोल इत्यादींच्या अभ्यासाला त्या काळात महत्त्व होते. त्या विषयांच्या अध्यापनाला हे तंत्र चटकन लागू पडले व लोकप्रियही झाले. परंतु हेर्बार्टच्या तंत्राला पुढे यांत्रिक व कृत्रिम स्वरूप आले.

फ्रबेलच्या बालविकासाचे सूत्र घेऊन बालकांच्या शिक्षणाचा प्रयोगशील दृष्टीने अधिक विचार  मारिया माँटेसरी या शिक्षणतज्ञेने केला. द्ररिद्री व मंदबुद्धी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रयोग करून तिने आपली पद्धती शोधून काढली. ‘बालक-मंदिर’ या नावाने तिची संस्था ओळखली जाते. या मंदिरात इंद्रियशिक्षण देणाऱ्या व इतर उपकरणांच्या साहाय्याने मुले स्वप्रयत्नाने बुद्धिविकास साधतात व सामुदायिक जीवनातून सामाजिक विकास व आत्मनियंत्रणाची सवय आत्मसात करतात.

अमेरिकेत शब्दनिष्ठ अध्यापनाविरूद्ध टीका बरीच जुनी आहे. शिकवणे म्हणजे संशोधन, नवा अनुभव घेणे, या विचारांचा पुरस्कार प्रथम आर्मस्ट्राँग याने केला व ‘ह्यूरिस्टिक पद्धती’ शोधली. भूगोल, विज्ञान, गणित आदी विषयांना ती विशेष उपयुक्त आहे. भूगोल, विज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाकडे जाणे, सहली काढणे इ. उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला. पण अनुभवनिष्ठ व कृतियुक्त शिक्षणाला चालना दिली ती जॉन ड्यूई यांनी. जॉन ड्यूई यांनी शिकागो विद्यापीठाला जोडलेल्या प्राथमिक शाळेत अध्यापनपद्धतीबाबत नवे प्रयोग केले. आपण शिकतो म्हणजे कृतीद्वारा प्रयोग करतो. शिकण्यासाठी काही प्रयोजन वा हेतू लागतो. हे प्रयोजन गरजांतून वा समस्यांतून मिळते. समस्या-उकल हीच खरी शिकण्याची पद्धती, तीतूनच बौद्धिक विकास होतो आणि असे अध्यन समाजात घडत असल्याने सामाजिक विकासही होतो. अनुभवाची देवाणघेवाण ही शिकण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. सध्याच्या परिवर्तनशील जगात व्यक्तीच्या ठिकाणी नव्या परिस्थितीशी सामंजस्य राखण्याचे ज्ञान व कौशल्य आले पाहिजे, अशी ड्यूईची विचासरणी आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून समाजाची अखंड प्रगती साधण्यास आवश्यक अशा पद्धतीचे विवेचन ड्यूईने केले.

सामुदायिक जीवनातून व सप्रयोजन-कृतीतून मिळणारा अनुभव म्हणजे शिक्षण, या विचारातूनच किलपॅट्रिक यांची योजना-पद्धती वा प्रकल्प-पद्धती निर्माण झाली. प्रकल्प-पद्धतीचा मुख्य भर विद्यार्थ्यांतील उपक्रमशीलता, स्वतंत्र विचारशक्ती, जबाबदारीची जाणीव व सहकार्यप्रवृत्ती वाढविण्यावर आहे. विद्यार्थ्यांनी माहितीचे भारे डोक्यात रिचविण्याऐवजी ज्ञानाचा खरा उपयोग करण्यास शिकावे, ही तिच्यात दृष्टी आहे.

अमेरिकेप्रमाणेच यूरोपमध्येही बालमानसशास्त्रावर आधारित अशा कृतिशील शिक्षणाची चळवळ विसाव्या शतकात सुरू होती.

प्राचीन भारतातील अध्यापद्धती अध्ययनविषयाला धरून असल्याने तिच्यात विविधता आढळते. तदनंतरचे मध्ययुग व ब्रिटिश राजवटीपासूनचा आधुनिक काळ, असे पुढचे दोन कालखंड आहेत.

प्राचीन काळी वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई. ते ग्रंथ कंठस्थ करण्याची पद्धती होती पण वेदांगांच्या साहाय्याने वेदमंत्राचा अर्थ व विनियोग समजून घ्यावा लागे. श्रवणाबरोबरच मनन व निदिध्यास यांवरही भर असे. कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम यांसारखे ज्ञानाचे विषयही असत. तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नप्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धीचा परिपोष करण्यावर कटाक्ष असे. संस्कृत-प्राकृतातील प्रचंड टीकासाहित्य व भाष्ये हे त्याचे फळ आहे. धनुर्विद्या, आयुर्वेद अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रत्यक्षिकांचा भाग मोठा असे. पाठांतराच्या बरोबरीनेच निरीक्षण, अनुकरण, मार्गदर्शन व चिंतन यांवरही भर होता.

मध्ययुगात चिकित्सक अध्ययनाची परंपरा लोपली. पाठांतराने वेदविद्या जिवंत ठेवण्याचीच धडपड करावी लागली. अन्य शास्त्रे व विद्या ग्रंथांतच राहिल्या. सामान्य जनांना लेखन-गणनाचे प्राथमिक शिक्षण तेवढे मूळाक्षरे गिरवून मिळे. त्यात विशिष्ट पद्धती नव्हती. व्यवसायांचे शिक्षण परंपरेने व उमेदवारी करूनच मिळवावे लागे.

ब्रिटिश अमदानीत ब्रिटनमधील अध्यापनपद्धतीच येथील शिक्षणात रूजल्या. प्राथमिक स्तरांवर घोकंपट्टीच्या जोडीला वस्तुपाठपद्धती सुरू झाली. माध्यमिक स्तरावर हेर्बार्टची पंचपदी व प्रश्नोत्तरपद्धती यांचा अवलंब झाला. इंग्रजीसारखी परकी भाषा शिकण्यासाठी प्रत्यक्षपद्धती व संवादपद्धती रूढ झाल्या. अलीकडे मूलभूत घटकरचनांवर आधारलेली पद्धती उपयोगात आणली जात आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणात फ्रेबेल व माँटेसरी यांचे अनुकरण झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांत केवळ पुस्तकी शिक्षण देत व माध्यमिक शिक्षणात इंग्रजी माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होई. या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नसे. या सर्वांचे दुष्परिणाम टाळून, जीवन जगत असताच जावनाची तयारी करून देणाऱ्या उद्योगमूलक शिक्षणाची कल्पना म. गांधींनी पुढे मांडली. ‘नयी तालिम’, ‘बुनियादी शिक्षा’ अशा नावांनी ती ओळखली जाते. एखादा उत्पादक व्यवसाय—उदा., शेती, सूतकताई—घेऊन त्याभोवती भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे इत्यादींचे अध्ययन गरजेप्रमाणे गुंफावयाचे, अशी तिच्यात कल्पना आहे. म्हणजे समवाय (गुंफणे) हे अध्यापनाचे मुख्य सूत्र. त्यामुळे ज्ञानाचे चांगले आकलन होते व त्याचा उपयोग कळतो. हा उद्योग सामुदायिक वातावरणात करावयाचा असल्याने विद्यार्थाचा सामाजिक विकासही त्यात घडून येतो.

आजच्या प्राथमिक शाळांतील पद्धती हे अनेक पद्धतींचे एक मिश्रण आहे. प्राथमिक शिक्षणात बालकांची कृतिशीलता, क्रीडाप्रवृत्ती, त्यांच्या गरजा आणि प्रत्यक्ष अनुभव-निरीक्षण यांच्यावर भर देण्याकडे कल आहे. माध्यमिक शिक्षणात हेर्बार्टच्या पंचपदीला प्रश्नोत्तरे, चर्चा, निरीक्षण,


प्रयोग इत्यादींची जोड देण्यात आली आहे.काही शाळांतून स्वाध्याय व प्रकल्पपद्धतीचाही थोडाफार अवलंब केला जातो. उच्च शिक्षणात व्याख्यान व विवरण यांचाच प्राय: अवलंब केला जातो. तसेच व्याख्यान, चर्चा, परिसंवाद, कृतिसत्रे, प्रयोगशाळा यांचाही हळूहळू प्रसार होत आहे. काही महाविद्यालयांत स्वाध्यायपद्धतीवरही भर आहे.

पाठाचे नियोजन व तंत्र: वर्षभरात शिकवावयाचा पाठ्यक्रम शिक्षकांना उपलब्ध करून दिला जाई. वर्षाचे तीन वा चार विभाग करून प्रत्येक विभागात किती पाठ्यक्रम पुरा करावयाचा, ते ठरविले जाई. पुढे ही वाटणी महिनावार, सप्ताहवार वा दैनंदिनही केली जाई. पाठ्यक्रम संपविणे म्हणजे त्या विषयाचे पाठ्यपुस्तक संपविणे, अशीच प्राय: समजूत असल्याने पाठ्यपुस्तकांच्या पृष्ठांची वाटणी म्हणजे अध्यापनाचे नियोजन समजले जाई. यात सुधारणा होऊन पाठ्यक्रमातील विषयांची यादी करून एकेक भाग किती दिवसांत व तासांत संपविता येईल, याचा विचार होऊ लागला.

मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापनपद्धती यांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पाठनियोजनाच्या कल्पना बदलल्या. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्ञानग्रहणप्रक्रियेला मदत करण्याचे काम. प्रत्येक विषयाच्या अध्यापनाची उद्दिष्टे नमूद करून विद्यार्थ्याच्या वर्तनात कोणते परिवर्तन घडवून आणावयाचे, त्याची आकलनशक्ती व कौशल्य यांत कोणती भर घालावयाची, यांचा प्रथम विचार केला जातो. ही उद्दिष्टे पार पाडण्यासाठी पाठ्यक्रमातील उपयुक्त घटक शोधले जातात. या घटकांची सुव्यवस्थित जुळणी कशी करावयाची व त्यासाठी कोणती अध्यापनसामग्री उपयोगी पडेल, याचा विचार केला जातो. त्यानंतर अध्ययन-प्रसंगाचा विचार होतो. हे अध्ययन-प्रसंग म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभव घेण्याची संधी. एखादी समस्या सोडविण्यासाठी, काही नवीन रचना करण्यासाठी किंवा नव्या विषयांचे आकलन करण्यासाठी शिक्षक—विद्यार्थ्यांनी करावयाच्या कृती, हा अध्ययन-प्रसंगाचा भाग होय. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता येईल, विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार प्रगती करण्याला साहाय्य कसे करता येईल इत्यादींचा विचारही याच वेळी करावा लागतो. अखेरच्या टप्पा मूल्यमापन, म्हणजे विद्यार्थ्याची प्रगती विविध चाचण्यांनी पारखणे, हा होय. पाठनियोजनाची ही शृंखलाबद्ध प्रक्रिया आहे.

पाठाचा आराखडा: दैनंदिन पाठाची रूपरेषा लिहून काढून आपला पाठ काटेकोर व सुव्यवस्थित करावा, अशी प्रशिक्षार्थी विद्यार्थ्याकडून अध्यापन-विद्यालयात अपेक्षा असते. प्रशिक्षित शिक्षक कागदावर जरी आराखडा लिहित नसले, तरी स्थूल आराखडा त्यांच्या डोळ्यासमोर असतोच. हेर्बार्टच्या पद्धतीनुसार पूर्वतयारी म्हणजे नव्या विषयाशी संबद्ध असलेले विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान तपासणे व पूर्वानुभव जागृत करणे, हा पहिला टप्पा. पाठाची प्रस्तावना व हेतुकथन हेही त्यात समाविष्ट असते. दुसरा टप्पा म्हणजे विषयोपन्यास. शिकावावयाच्या भागाचे दर्शन व विवेचन. प्रश्नोत्तरे, चर्चा, वाचन, निरीक्षण, दृष्टांत यांच्या साहाय्याने विषयाचे स्वरूप ह्या टप्प्यात स्पष्ट केले जाते. तिसऱ्या टप्प्यात सामान्यीकरण वा निष्कर्ष काढणे. चौथा टप्पा मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन व दृढीकरण. अखेरीस विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे. हा आराखडा पुढील तीन सदरांमध्ये लिहिता येतो : (१) उद्दिष्टे (२) पाठ्यवस्तूचे घटक व उपघटक (३) अध्ययन-प्रसंग.

अध्यापनाची सूत्रे : शिक्षकाचे अध्यापन सुगम, सुस्पष्ट व परिणामकारक व्हावे आणि विद्यार्थ्यांची ज्ञानग्रहणाची प्रक्रिया सुकर व्हावी, यासाठी मानसशास्त्राला धरून काही सिद्धांत पुढे आले आहेत. रूसो, पेस्टालोत्सी, फ्रबेल, हर्बर्ट स्पेन्सर व हेर्बार्ट यांच्या सर्वसामान्य नियमांना सूत्रांचे स्वरूप आले आहे. पैकी काही प्रमुख पुढीलप्रमाणे :

(अ) ज्ञाताकडून अज्ञाताकडे : शिकवावयाचा नवा, अपरिचित विषय एकदम पुढे न मांडता परिचित विषयावरून चर्चेला आरंभ करून त्याची कक्षा वाढवीत अज्ञात वा अपरिचिताचे ज्ञान करून द्यावे, असा या सूत्राचा अर्थ. त्यायोगे नवीन विषय शिकणे कंटाळवाणे होत नाही आणि जुन्यानव्या ज्ञानाचा मेळही बसतो.

(आ) सोप्याकडून कठिणाकडे : विद्यार्थ्यांचा उत्साह टिकवूनच शिकवायचे असल्याने सोपा भाग त्यांना समजावून देत क्रमश: कठीण भागाकडे त्यांना नेणे.

(इ) मूर्ताकडून अमूर्ताकडे व (ई) आधी अनुभव, मग नियम : ही दोन्ही सूत्रे जवळजवळ एकाच अर्थाची आहेत. मूर्त वस्तूंच्या संबंधात अनुभव आल्यानंतर त्यांच्या संबंधातील अमूर्त, तर्कशुद्ध नियम विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला जावा. असा या दोन्ही सूत्रांचा अर्थ आहे.

(उ) निसर्गाचे अनुसरण: ‘निसर्ग’ याचा अर्थ ‘बालकाच्या स्वाभाविक प्रेरणा व प्रवृत्ती’ असा आहे. नव्या वस्तूंबद्दल कुतूहल, वस्तूंचा संग्रह, वस्तूंशी चाळवाचाळव व त्यांची घडामोड, क्रीडा, अनुकरण या बालकाच्या सहजप्रवृत्ती आहेत. त्यांचा उपयोग करुन घेतला, तर ज्ञानार्जन हे कष्टप्रद न होता आनंदप्रद होईल.

 (इ) पूर्णाकडून विभागाकडे : आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे कोणत्याही वस्तूचे संपूर्ण रूप वा आकृती प्रथम ग्रहण केली जाते. नंतर तिच्या अंगोपांगांकडे लक्ष जाते. प्रथम संपूर्ण शब्दाकडे व नंतर त्यातील सुट्या अक्षरांकडे मुलांचे लक्ष जाते. या पद्धतीचा अवलंब कथा,चित्रे,कविता इत्यादींच्या रसग्रहणात व प्राथमिक भाषाशिक्षणातही केला जातो.

(ए) विशिष्टाकडून सामान्याकडे व (ऐ) सामान्याकडून विशिष्टाकडे : ही दोन्ही सूत्रे परस्परांना पूरक अशीच आहेत. ही दोन्ही सूत्रे म्हणजे तर्कशास्त्रांतील अनुक्रमे विगामी व निगामी पद्धती होत.

या परंपरागत सूत्रांच्या जोडील आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर उपयोगी पडणारी पुढील सूत्रेही सांगितली जातात : (१) विद्यार्थ्यांना गरज भासली की अध्ययनाचे कार्य सुकर होते. गरज ही मोठी प्ररेक शक्ती आहे. (२) जितक्या अधिक ज्ञानेंद्रियांचा उपयोग शिकताना होईल, तितके ज्ञानग्रहण प्रभावी होते. (३) विद्यार्थ्यांच्या आस्था-अभिरुचीला आवाहन करून शिकविल्यास अध्ययन रोचक होते. (४) विद्यार्थी पाठात सहभागी झाले, तर अध्यापन फलदायी होते. (५) विद्यार्थ्यांची मानसिक तयारी व परिपक्वता लक्षात घेतली जावी. (६) विद्यार्थांची मने भावनादृष्ट्या स्थिर असतील, तरच त्यांचे अध्ययनाकडे लक्ष लागते. (७) धाक-शिक्षेपेक्षा उत्तेजन वा प्रशंसेमुळे अध्ययन परिणामकारक होते.

पाठांचे प्रकार : (१) उद्गामी पाठ : या प्रकाराच्या पाठात संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढावयाचा असतो. ज्यांत विशेषणे वापरलेली आहेत, अशा अनेक वाक्यांच्या निरीक्षणानंतर विशेषणाची व्याख्या मुले तयार करू शकतात. अशा पाठात निरीक्षणासाठी पुष्कळ गोष्टी घेतात आणि व्यावहारिक अनुभवांवरून नियमांचा पडताळा पाहतात. या पद्धतीस शास्त्रीय पद्धत म्हणतात. तिला मानसशास्त्राचाही आधार आहे. शास्त्र, गणित, व्याकरण, भूगोल इ. विषयांचे बरचसे अध्यापन उद्गामी पद्धतीने करणे इष्ट असते.

(२) अवगामी पाठ : सामान्यवरून विशिष्ठाचे ज्ञान मिळविणे व समस्यांची उकल करणे म्हणजे अवगामी पाठ. हवामानाची तत्त्वे, भूमितीतील प्रमेये इ. शिकवल्यानंतर त्यांवरील उदाहरणे सोडवावयास सांगणे, ही अवगामी पाठाची उदाहरणे होत.

(३) समालोचन पाठ : या पाठाचा हेतू मिळालेल्या ज्ञानाची उजळणी व व्यवस्थापन नव्या दृष्टिकोनातून करणे हा असतो. त्यासाठी तुलना, वर्गीकरण, मूल्यमापन इ. प्रक्रियांचा उपयोग करता येतो. समालोचनाचे  कार्य विद्यार्थ्यांवर सोपविल्यास त्यांस स्वावलंबनाची सवय लागते आणि विषयात नवी गोडी निर्माण होते.


(४) आवृत्तिपाठ : नवसंपादित ज्ञान व कौशल्य कायम राहण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती करणे जरूर असते. त्या दृष्टीने आवृत्तिपाठ उपयुक्त ठरतो. अशा पाठात सारखेपणामुळे येणारी नीरसता शिक्षक आपल्या कल्पकतेने टाळू शकतो. एखाद्या धड्यातील आशयाचे कथन करून घेणे, तत्संबंधी एखादे पत्र लिहावयास सांगणे अथवा त्याचे नाट्यीकरण करणे इ. प्रकारेही आवृत्तिपाठ घेता येतो.

(५) रसग्रहणात्मक पाठ : निसर्गाचे, ललित कलाकृतीचे व साहित्यकृतीचे सौंदर्य प्रतीत करून देणे व सौंदर्याभिरुची निर्माण करणे ह्या हेतूने दिलेला पाठ म्हणजे रसग्रहणात्मक पाठ होय. प्रत्यक्षात काव्य अथवा काव्यमय गद्य यांपुरताच रसग्रहणात्मक पाठ घेतला गेला, तरी चित्रकला, संगीत व मूर्तिकला यांसंबंधीही रसग्रहणात्मक पाठ घेता येतात.

अध्यापनाच्या युक्त्या (तंत्रे) : प्रश्न : प्राचीन काळापासून प्रश्नांचा उपयोग, विद्यार्थ्यास काय माहीत आहे, ते समजून घेण्यासाठी चालू आहे. पण प्रश्नांची रचना करणे सुलभ नसते. प्रश्न सोपा, सुटसुटीत, मुद्देसूद, नि:संदिग्ध व विचारप्रवर्तक असावा लागतो. कार्यकारणभाव शोधावयास लागणारे प्रश्न, परिणामशोधक प्रश्न व तुलना करावयास सांगणारे प्रश्न विचारप्रवर्तक असतात. त्यांचा उपयोग प्रतिपादन-टप्प्यात होतो. माहितीपर प्रश्नांचा उपयोग प्रस्तावनेत आणि परीक्षक प्रश्नांचा उपयोग उपयोजनात होतो.

कथन : कथन या अध्यापनयुक्तीचे महत्त्व फार आहे. गोष्टी मुलांना मनापासून आवडतात. भाषा, इतिहास या विषयांत कथनकौशल्याला महत्त्व असते. कथनाचा सर्वांत महत्वाचा गुण समरसता होय. निर्विकारपणे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हलू न देता केलेले कथन नीरस ठरते. कथनाची भाषा सोपी, नि:संदग्धि व समर्पक असावी. लहान मुलांना सांगावयाच्या कथांत शब्दांची व कल्पनांची पुनरुक्ती असावी. उचित हावभावांची जोड दिल्याने कथन परिणामकारक होते. आवाजात योग्य चढउतार करण्यानेही कथनात रंग भरतो.

शब्दिक दाखले : अध्यापकाला पुष्कळदा अमूर्त कल्पनांचे स्पष्टीकरण करावे लागते. त्यासाठी शाब्दिक दाखले, दृष्टांत, उदाहरणे इत्यादींचा उपयोग होतो.

देखरेखीखालील अभ्यास : अशा अभ्यासाचे दोन हेतू असतात : (१) मुलांना स्वावलंबनाची सवय लागावी व (२) मुलांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे. हल्ली नित्याच्या वेळापत्रकात किंवा त्यानंतरही अशा अभ्यासासाठी तास ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. देखरेख करणारा शिक्षक दक्ष व उत्साही असणे इष्ट असते.

अध्यापनाची साधने : (अ) आवश्यकता : अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी साधनांची मदत होते. साधने विवेचनीय विषयाला मूर्त रूप देतात व त्यामुळे ज्ञानग्रहण सुलभ होते. दोन अधिक दोन बरोबर चार या कल्पनेचा प्रत्यय मणी पुढे ठेवल्याने झटकन येतो. लहान मुलांना शिकवताना शक्य तितक्या इंद्रियांचे साहाय्य घ्यावे, हे तत्त्व सर्वसामान्य आहे. म्हणून माँटेसरी-पद्धतीत इंद्रियशिक्षणाची विविध साधने वापरतात. साधनांचा उपयोग अर्जित ज्ञान टिकवण्यासाठीही होतो. सचित्र कथेतील अधिक तपशील दीर्घतर कालावधीपर्यंत मुलांच्या ध्यानात राहतो. भौतिक शास्त्रांच्या अध्यापनात चलत्‌चित्रपटांचा उपयोग केल्यास विषयबोध चांगला होतो. साधनांचा आणखी एक उपयोग म्हणजे ज्ञानव्यवस्थापन हा होय. इतिहासातील एखाद्या कलखंडाचा अभ्यास संपल्यानंतर नकाशे व आलेख यांच्या साहाय्याने मिळविलेले ज्ञान सुव्यवस्थित व पक्के करता येते. अशा रीतीने साधनांच्या योगे ज्ञानग्रहण सुकर होत असले, तरी त्यांचा उपयोग विवकाने व उतरत्या भाजणीने करावयाचा असतो. प्राथमिक शाळेत सर्वच विषयांच्या अध्यापनात साधनांचा उपयोग आवश्यक असतो. माध्यमिक व उच्च शिक्षणात त्यांचा उपयोग कमी कमी होत जातो. साधनांचा उपयोग अमूर्त कल्पनांच्या द्वारा ज्ञानसाधना करण्याची शक्ती येईपर्यंतच करावयाचा असतो.

(आ) साधनांचे प्रकार : पाठ्यपुस्तक—हे अध्यापनाचे प्रमुख साधन होय [→पाठ्यपुस्तके]

प्रत्यक्ष वस्तू—प्रत्यक्ष वस्तूंच्या द्वारा होणारे ज्ञान नि:संदिग्ध असते. प्राथमिक शाळेत निसर्गाभ्यासाठी फळे, फुले, वनस्पती इ. वर्गात प्रत्यक्ष आणता येतात. भूगोलाच्या अभ्यासात टेकडी, नदी, दरी इ. सहलीस नेऊन दाखविता येतात. रासायनशास्त्रातील गंधक व अन्य पदार्थ, विज्ञानातील तरफादी यंत्रे प्रत्यक्ष दाखविता येतात.

प्रतिकृती—जेव्हा प्रत्यक्ष वस्तू आणणे शक्य नसते, तेव्हा तिची प्रतिकृती उपयोगी ठरते. वाफेच्या यंत्राचे कार्य प्रतिकृतीच्या द्वारा स्पष्ट होते. अनुक्रमश: होणाऱ्या यांत्रिक प्रक्रियांच्या स्पष्टीकरणासाठी प्रतिकृतीचा उपयोग आवश्यक असतो.

चित्रे व तक्ते-चित्रांचा उपयोग अनेक विषयांच्या अध्यापनात होऊ शकतो. शब्दांचे व कृतीचे ज्ञान चित्राच्या साह्याने करून देता येते. तसेच लेखनाच्या अध्यापनातही चित्रांचा उपयोग चांगला होतो.

आकृत्या-गणित व भौतिक शास्त्रे यांच्या अध्यापनात आकृत्या आवश्यक असतात. शास्त्रीय प्रयोगातील विविध वस्तूंच्या मांडणीची आकृती काढता येणे, हे शास्त्राध्ययनाचे एक आवश्यक अंग होय.

नकाशे-इतिहास व भूगोल यांच्या अध्यापनात अनेक प्रकारे नकाशांचा उपयोग होतो. उठावाचे नकाशे म्हणजे प्रतिकृतीचाच एक प्रकार होय. भूमीची उंचसखलता, पाण्याच्या प्रवाहाची दिशा इत्यादींसाठी त्यांचा उपयोग होतो.

आलेख-आलेखांचा विशेष उपयोग भौगोलिक व आर्थिक विषयांत होतो. व्यापारी मंडळाच्या उत्पादनात व नफ्यातोट्यांत सालवार होणारे फरक आलेखांच्या द्वारा दाखवितात. भूगोलातील वार्षिक व महिनावार पर्जन्यमान व इतिहासातील घडामोडींचा कालानुक्रम इत्यादींसाठी आलेखांचा उपयोग होतो.

काही विशेष साधने : फळा-फळ्याचा उपयोग सर्व विषयांच्या अध्यापनात होतो. त्यासाठी चांगल्या हस्ताक्षराची व चित्र काढण्याच्या कसबाची गरज असते. फळ्याच्या बहुविध उपयुक्ततेमुळे त्यास शिक्षकाचा मित्र म्हणतात.

दृक्श्राव्य साधने : आधुनिक दृक्साधनांत चित्रदीप, अंतरोपरिद्रश, चित्रपट्टीप्रक्षेपक व चित्रक्षेपक यांचा समावेश होतो. या चार साधनांनी एकाच विषयावरील चित्रांची मालिका क्रमवार दाखविता येते. अशा चित्रमालिका इतिहास, भूगोल, भौतिक शास्त्रे इ. विषयांच्या अध्यापनात फार उद्धोधक ठरतात. त्यांपैकी पहिल्या तीन साधनांचा उपयोग करताना, मध्येच थांबून शिक्षकास योग्य ते स्पष्टीकरण करता येते. चलच्चित्रपटांत अधिक आकर्षकपणा असतो. ही साधने वापरली, तरी प्रक्षेपणपूर्व मार्गदर्शन व प्रक्षेपणापणोत्तर चर्चा आवश्यक असतात व त्यांसाठी शिक्षकास योजना व पूर्वतयारी करावी लागते. अन्यथा ही साधने केवळ करमणूक करतात व अध्यापनाचे उद्दिष्ट सफल होत नाही. पाश्चात्य देशांत चलच्चित्रपट व तत्संबंद्ध बोधपुस्तिका तयार मिळतात. तिकडे या दृक्साधनांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होतो.

आधुनिक श्राव्य साधनांत ग्रामोफोन, फीतमुद्रक व नभोवाणी यांचा समावेश होतो. ग्रामोफोन व फीतमुद्रकाचा उपयोग संगीतशिक्षणात विशेष होतो. ग्रामोफोन व फीतमुद्रक ही साधने भाषाशिक्षणासही फार उपयुक्त आहेत. परकी भाषा शिकविताना उच्चार, आघात इत्यादींचे प्रत्यक्ष शिक्षण तज्ञांची भाषणे ऐकवूनच देता येते. फीतमुद्रकाच्या द्वारा मुलांचे वाचन व भाषण मुद्रित करून त्यांस ऐकविता येते व अशा रीतीने त्यांस स्वत:च्या दोषांचे प्रत्यक्ष ज्ञान घडते. ठराविक कालांतराने  अशी मुद्रिते करीत गेल्यास वाचनात व भाषणात होणारी सुधारणा दृष्टोत्पत्तीस येते.


हल्ली सर्व प्रगत देशांत नभोवाणीवरून खास शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येतात व या कार्यक्रमांतून सर्व शालेय विषयांचे शिक्षण होऊ शकते. आपल्या देशातही ही प्रथा सुरू झाली आहे. या कार्यक्रमांचा पूर्ण फायदा होण्यासाठी श्रवणपूर्ण मार्गदर्शन व श्रवणोत्तर चर्चा यांची जरूरी असते. शिवाय नभोवाणीच्या कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते. तो कार्यक्रम ऐकविण्यासाठी वेळापत्रकात बदल करावा लागतो. नभोवाणीवरील कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून जरूर त्या वेळी त्याचा फायदा घेता येतो.

बोलपट, दूरचित्रवाणी व संगणक ही अत्याधुनिक साधने होत. बोलपटांना, विशेषत: माहितीपटांना व अनुबोधपटांना, शैक्षणिक दृष्टीने महत्त्व आहे. विशेषत: भूगोल व विज्ञान यांच्या अध्यापनात बोलपट उपयुक्त ठरतात. प्रगत देशांत शालेय शिक्षणासाठी दूरचित्रवाणीचा उपयोग केला जात आहे. पाश्चमात्य देशांत अध्यापनासाठी अध्यापनयंत्रांचाही आता उपयोग होऊ लागला आहे. त्यातून क्रमान्वित अध्यापनाचे तंत्र निर्माण झाले आहे.

आधुनिक विचारप्रवाह असा आहे, की नभोवाणी, बोलपट व दूरचित्रवाणी यांच्या साहाय्याने तज्ञ शिक्षकांकडून दूरदूरच्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी एकसमयावच्छेदे ज्ञानदान करता येते व म्हणून या साधनांचा उपयोग करून शिक्षकांचे श्रम व वेळ वाचवावीत आणि त्यांना अधिक महत्त्वाचे सूचनात्मक विचारप्रवर्तन करण्यास मोकळे करावे. असे केल्याने शिक्षणसंस्थांतील वाढत्या विद्यार्थी संख्येची व शिक्षकांच्या तुटीची समस्या सुटेल. अधिक गुणवान व कार्यक्षम शिक्षक नेमणे शक्य होईल, त्यांना विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देणेही शक्य होईल व याचा परिणाम शिक्षणाचा कस सुधारण्यात होईल.

 वस्तुसंग्रहालये व कलासंग्रहालये : या दोन्ही संग्रहालयांचा उपयोग वाढत्या प्रमाणात करण्याची प्रवृत्ती प्रगत देशांत आढळते. वस्तुसंग्रहालयांचा उपयोग सांस्कृतिक ज्ञानबोधासाठी व कलासंग्रहालयांचा उपयोग सौंदर्यप्रतीती घडविण्यासाठी होतो. बहुतेक देशांतील, विशेषत: भारतातील, शालेय शिक्षणातील एक उणीव अशी आहे, की त्यातून सौंदर्यशोधक व सौंदर्यास्वादक दृष्टी निर्माण होत नाही. कलासंग्रहालयांशी मुलांचा परिचय वाढविल्याने ही दृष्टी निर्माण होईल व त्यांचे जीवन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल.

विशिष्ट विषयांचे अध्यापन व अध्यापनपद्धती : अध्यापनाच्या उद्दिष्टांनुसार अध्यापनपद्धतीतही फरक आढळतो. मातृभाषेच्या अध्यापनात आधी लेखनवाचनादी गोष्टी निरीक्षण-अनुकरणपद्धतीने शिकविल्यानंतर, प्रमुख उद्दिष्ट विचारशक्तीचा विकास करणे हे असते. त्यासाठी समस्यानिष्ठ पद्धतीचा अवलंब करावा लागतो. उलट परभाषांच्या अध्यापनात निरीक्षण-अनुकरण पद्धतीचाच उपयोग होतो. कारण त्याचे उद्दिष्ट परकीय भाषा आत्मसात करणे हे असते. गणितात गणनकौशल्याच्या अध्यापनासाठी परिपाठपद्धतीचा अवलंब करावा लागतो. अंक ही अमूर्त कल्पना पटविण्यासाठी मूर्ताकडून अमूर्ताकडे जावे लागते व समस्या-उकलनाचा महत्त्वाचा भाग समस्यानिष्ठ पद्धतीने शिकवावा लागतो. इतिहासाच्या अध्यापनात मुलांना सत्यान्वेषण करता यावे म्हणून संशोधनपद्धती वापरतात. नैतिक मूल्ये बिंबविण्यासाठी अनुमानपद्धतीचा वापर करतात. भूगोलाच्या अध्यापनात निसर्गाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्पष्ट करण्यासाठी निरीक्षण-अनुमान-पद्धती उपयोगी पडते. विज्ञान शिकविण्याचे उद्दिष्ट भौतिक घटनांतील कार्यकारणभाव समजावा हे असल्यामुळे, त्या विषयाच्या अध्यापनात विशिष्टाकडून सामान्याकडे जाणाऱ्या उद्गामी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. कलांच्या अध्यापनात सौंदर्यप्रतीती व्हावी न सौंदर्यनिर्माणशक्ती विकसित व्हावी हा हेतू असतो. यासाठी निरीक्षण, तुलना, समालोचन, अनुकरण इ. प्रतिक्रियांचा उपयोग करावा लागतो. सर्व शालेय विषयांच्या अध्यापनात ज्ञानग्रहण हे उद्दिष्ट असल्यामुळे ज्ञानदानासाठी कथनाचा व ज्ञान पक्के करण्यासाठी परिपाठांचा अवलंब करावा लागतो.

काही संकीर्ण प्रश्न :(अ) वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण : आधुनिक मानसशास्त्रातील संशोधनानुसार सर्व मुलांना ज्ञानाचे ग्रहण सारख्याच गतीने करता येत नाही म्हणून वर्गशिक्षणाची पद्धती त्याज्य असा विचारप्रवाह सुरू झाला. इंग्रज शिक्षणतज्ञ बॅलर्ड याने वर्गशिक्षण कालच्युत ठरविले. पण व्यक्तिगत शिक्षण’ कितीही स्पृहणीय असले, तरी व्यवहार्य नाही. सर्वच देशांतील वाढती विद्यार्थीसंख्या लक्षात घेता व्यक्तिगत शिक्षणासाठी शिक्षक पुरविणे अशक्य आहे. शिवाय मानसशास्त्रज्ञांच्या मते इतिहास, वाङ्‌मय यांसारखे स्फूर्तिप्रद विषय शिकविण्यासाठी मोठे वर्ग असणे आवश्यक असते. भावनासंक्रमणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी समूह लागतो. समाजशास्त्रदृष्टया वर्ग शिक्षणाचे वा सामूहिक शिक्षणाचे काही फायदे आहेतच. म्हणून वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण यांमधील सवर्णमध्य साधण्यासाठी प्रवृत्ती निर्माण झाली. यासाठी वर्गातील विद्यार्थीसंख्या मर्यादित करणे हा एक उपाय होय. अशी मर्यादा घातल्याने वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण दोन्ही साधतात. हा उपाय आर्थिक टंचाई असलेल्या विकासनशील देशांत शक्य होत नाही. दुसरा पर्याय म्हणजे वर्ग मोठा ठेवून त्याचे व्यक्तिभेदाप्रमाणे गट पाडणे, व्यक्तिभेदास अनुसरून स्वाध्याय व गृहपाठ देणे व मुलांस नेतृत्व देऊन त्यांचे साह्य घेणे हा होय. हा पर्यायही फारसा व्यवहार्य नाही. शिक्षणाचा दर्जा खालावण्यास वर्गातील वाढती संख्या अंशत: जबाबदार आहे. पण ही संख्या कमी करण्यासाठी जास्त शिक्षक नेमणे आर्थिक टंचाईमुळे व शिक्षकांच्या दुर्मिळतेमुळे शक्य होत नाही. तांत्रिक साधनांच्या साहाय्याने काही उणिवा दूर करण्याची धडपड अनेक देशांत सुरू आहे.

(आ) शिक्षक-विद्यार्थी-सहकार्य : खऱ्या शिक्षणासाठी शिक्षक-विद्यार्थी-संबंध जिव्हाळ्याचे असावे लागतात. सहकार्यासाठी उद्दिष्टांची एकवाक्यता आवश्यक असते. विद्यार्थ्याला शिकण्याची आच असेल व शिक्षकाला शिकविण्याची तळमळ असेल, तर दोघे एकोप्याने काम करतील. शिक्षक-विद्यार्थी-विसंवादाचे मूळ शिक्षणविषयक अपसमजात आहे. शिक्षण म्हणजे प्रभावी व्यक्तीने संस्कारक्षम व्यक्तीला लावलेले वळण, ही जाणीव समाजात निर्माण झाल्यास शिक्षणकार्य व्यवस्थितपणे चालेल. या जाणिवेतूनच शिक्षक-विद्यार्थीमधील विसंवाद नष्ट होईल. त्यासाठी शिक्षक-पालक-सहकार्याचीही गरज आहे.

(इ) शिस्त आणि शिक्षा : अध्यापन यशस्वी व्हावयाचे असेल, तर वर्गात सुव्यवस्था व शिस्त पाहिजे. त्यासाठी अध्यापनकौशल्यही इष्ट असते. शिस्तीसंबंधीच्या कल्पना आता बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी निमूट बसणे व शिक्षकाने बोलत राहणे, ही शिस्तीची कल्पना मागे पडली आहे. विद्यार्थी पाठात सहभागी होतात, अध्यापनात रुची दाखवितात व ज्ञानग्रहणाला पोषक वातावरण राखतात, म्हणजे शिस्त होय. ती शिक्षेच्या भीतीतून निर्माण न होता विद्यार्थ्याच्या जबाबदारीच्या जाणिवेतून निर्माण व्हावी व ती स्वयंशिस्त असावी.

मानसशास्त्रीय दृष्टीने विद्यार्थांच्या उच्छृंखल, गैरशिस्त व आळशी वर्तनाची कारणे त्यांच्या संगोपनात व संस्कारांत आढळतात. ती कारणे दूर करण्याच्या प्रयत्न करणे योग्य ठरते. काही प्रसंगी शिक्षा करणे अनिवार्य ठरते पण शिक्षेमुळे आपल्यावर अन्याय झाला असे विद्यार्थ्यास वाटले, तर त्यात सुधारणा होणार नाही. शिवाय अध्यापनाला प्रेरणा शिक्षेच्या भितीतून मिळत नाही व मिळणे इष्ट नसते. प्रौढ विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्वचित कानउघाडणी करून, तर कधी त्यांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना अध्ययनाला प्रवृत्त करता येते.

पहा : अध्यापक-प्रशिक्षण शिक्षण शैक्षणिक मानसशास्त्र.

संदर्भ : 1. Barnard, H. C. An Introduction to Teaching, London, 1965.

           2. Brembeck, C. S. The Discovery of Teaching, Englewood Cliffs, 1962.

           3. Gragia, Alfred de Sohn, D. A. Ed. Revolution in Teaching, New York, 1964.

           4. Mursell, J. L. Successful Teaching, Tokyo, 1964.

           5. Peterson, A. D. C. Ed. Techniques of Teaching, 3 Vols., Oxford, 1965.

           6. Shipley, C. Y. Cann, M. M. Hildebrand, J. Mitchell, G. T. A. Synthesis of Teaching Methods, Toronto, 1964.

           7. Yoakan, G. A. Simson, R. G. Modern Methods and Techiques of Teaching, New York, 1961.

          ८. गद्रे, ल. रा. सर्वसामान्य अध्यापन पद्धती, पुणे, १९६३.

          ९. सोहनी, गो. प्र. अध्यापनपद्धतीची मूलतत्त्वे, पुणे, १९६३.

मराठे, रा. म.