बरद्वान विद्यापीठ : पश्चिम बंगालमधील या विद्यापीठाची स्थापना बरद्वान येथे १५ जून १९६० रोजी झाली. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. बरद्वान, बांकुरा, हुगळी (सेरामपूर हा उपविभाग वगळून), बीरभूम आणि पुरूलिया या पाच जिल्ह्यांत विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विखुरलेले आहे. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकरी विद्यापीठाची प्रशासनव्यवस्था पाहतात.

विद्यापीठाचे एक घटक महाविद्यालय असून ५६ संलग्न महाविद्यालये आहेत. मानव्यविद्या आणि वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रविद्या, विधी, वैद्यक इ. विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. मानव्यविद्यांतर्गत आठ, विज्ञानांतर्गत सहा तसेच विधी व ग्रंथपालन यांचे प्रत्येकी एक असे विद्यापीठाचे एकूण सोळा पदव्युत्तर विभाग आहेत. त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रमात इंग्रजी व बंगाली या दोन्ही भाषा अध्यापनाचे व परीक्षेचे माध्यम म्हणून स्वीकारलेल्या आहेत.

विद्यापीठाचे स्वतंत्र आरोग्यकेंद्र असून ते विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी व शिक्षक यांना आरोग्यसेवा पुरविते. विद्यापीठाचे एक क्रीडामंडळ व व्यायामशाळाही आहे.

विद्यार्थिनींसाठी दोन व विद्यार्थ्यांसाठी पाच अशी विद्यापीठाची एकूण सात वसतिगृहे आहेत. विद्यापीठचे निवास अनुशासन मंडळ शेजारच्या वसतिगृहात गरजू विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करते. वसतिगृहाचे निरीक्षण करणे आणि तेथील शिस्त सांभाळणे अशी दुहेरी जबाबदारी या मंजळाकडे आहे. प्रत्येक वसतिगृहात सु. ९८ विद्यार्थी राहू शकतात. ही वसतिगृहे विद्यार्थ्यांतर्फेच चालविली जातात.

विद्यापीठाचे संग्रहालय व कलावीथी यांची ऑगस्ट १९६५ मध्ये स्थापना झाली. पश्चिम बंगाल व लगतच्या राज्यांतील पुरातत्त्वीय वस्तू तसेच प्राचीन कलाकृती, नाणी कोरीव लेख, चित्रकला, शिलामुद्रण यांचे संचयन व जोपासना करणे हे संग्रहालयाचे कार्य होय.

विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात १,१२,००० ग्रंथ आणि १३,६७६ नियतकालिके आहेत (१९७९-८०). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न ३.४ कोटी आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ६०,९४५ व अध्यापक संख्या २,४६७ आहे. (१९७९-८०).

मिसार, म. व्यं.