पंजाब कृषि विद्यापीठ : पंजाब व कृषि विद्यापीठ अधिनियम १९६१ नुसार पूर्वीच्या पंजाब राज्यात ऑक्टोबर १९६२ मध्ये स्थापन झालेले पंजाबमधील एक कृषी विद्यापीठ. या विद्यापीठाचा परिसर प्रथम लुधियाना आणि हिस्सार अशा दोन्ही ठिकाणी होता. पंजाब राज्य पुनर्रचना अधिनियम १९६६ यानुसार या अधिनियमात केंद्र सरकारने सुधारणा केली. पुढे हरयाणा आणि पंजाब विद्यापीठ अधिनियम १९६९ अन्वये २ फेब्रुवारी १९७० रोजी दोन स्वतंत्र विद्यापीठे–पंजाब कृषि विद्यापीठ व हरयाणा कृषि विद्यापीठ–स्थापन करण्यात आली. त्यांपैकी पंजाब कृषि विद्यापीठाचे केंद्र लुधियाना येथे ठेवण्यात आले. हे विद्यापीठ अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या लँड ग्रँट इन्स्टिट्यूशनच्या धर्तीवर उभारलेले आहे. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक नसून निवासी आहे. पाच घटक महाविद्यालयांचा त्यात समावेश होतो. त्याच्या कक्षेत संपूर्ण पंजाब राज्य व चंडीगढचा केंद्रशासित प्रदेश येतो. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या १९७६-७७ च्या  उपलब्ध आकडेवारीनुसार २,४६४ होती.

विद्यापीठात कृषी, पशुविकारविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, रसायनशास्त्र इ. मूलभूत विज्ञाने व मानव्यविद्या अशा पाच विद्याशाखा आहेत. माध्यम इंग्रजी असून त्रिसत्र पद्धती व विस्तार शिक्षण संचालनालय हे या विद्यापीठाचे विशेष आहेत. या संचालनालयातर्फे शेतकऱ्यांना प्रसंगोपात्त योग्य ती मदत देण्यात येते व सल्लाही देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी वर्षातून दोनदा प्रशिक्षण वर्गही चालविले जातात. विद्यापीठात अनुशिक्षण पद्धत  असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आणि अडचणी यांबद्दल चर्चा करण्यास प्रत्येक शनिवारी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटतात. प्रत्येक शिक्षकाकडे असे १०–१२ विद्यार्थी असतात. विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे प्रौढ शेतकऱ्यांसाठी उजळणी पाठ्यक्रमाची व्यवस्था असून राज्यातील विविध जिल्ह्यांतून प्रगतिशील शेतकऱ्यांना आधुनिक प्रगत ज्ञानाचे शिक्षण देण्यात येते. एवढेच नव्हे, तर गृहिणींना अन्नधान्याचे परिरक्षण कसे करावे, याचीही माहिती हे केंद्र पुरविते.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात सूक्ष्मपट व सूक्ष्मपत्र यांची व्यवस्था आहे. १९७६-७७ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार ग्रंथालयात १,३९,०२४ ग्रंथ होते. विद्यापीठाच्या १९७३-७४ च्या अर्थसंकल्यात उत्पन्न ४ कोटी ६० लक्ष रु. होते, त्यांपैकी अनुदान-स्वरूपात ३,३७,२५,००० रु. अपेक्षित होते.

घाणेकर, मु. मा.