योहान हाइन्रिrक पेस्टालोत्सी

पेस्टालोत्सी, योहान हाइन्‍रिक : (१२ जानेवारी १७४६ १७ फेब्रुवारी १८२७). स्विस शिक्षणतज्ञ. जन्म झूरिच येथे. तो पाच वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारल्याने आईने त्याचा सांभाळ केला. बालशिक्षणात मातृवात्सल्याचे महत्त्व व मनोविकासात मातेचे मार्गदर्शन त्यास स्वानुभवाने पटले होते. दरिद्री जीवनाचा अनुभव त्यास दलितांची सेवा करण्यास प्रेरक ठरला. प्रतिकूल परिस्थितीमुळे कायद्याचा अभ्यास करणे त्यास जमले नाही. 

१७६९ मध्ये ॲनाशूलथेस या युवतीबरोबर विवाह. न्यू हॉफ (स्वित्झर्लंड) येथे १७७५ साली स्वत:च्या शेतावर अनाथाश्रमाची उभारणी करून त्याने आपल्या शिक्षणप्रयोगास आरंभ केला. मुलांना शेती आणि मुलींना घरकाम, शिवणकाम व बागकाम यांसारखे जीवनोपयोगी शिक्षण देणे, असे या प्रयोगाचे स्वरूप होते. विद्यार्जनासोबत सूतकताईसारखे काम करून विद्यार्थी स्वावलंबी करण्याचा त्याचा १७८० मधील प्रयोग प्रारंभी अयशस्वी ठरला. या निराशेतूनच त्याने द ईव्हनिंग अवर्स ऑफ ए हार्मिट (इं. शी.) हा ग्रंथ लिहिला (१७८०). प्रस्तुत ग्रंथ पेस्टालोत्सीच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची गुरूकिल्ली समजला जातो. त्याच्या लिओनार्ड अँड गर्ट्रू (इं. शी.) नामक जर्मन कथेवरील आधारित वैचारिक कादंबरित शिक्षणविषयक मौलिक विचार आढळतात. १८०१ मध्ये त्याने हाऊ गर्ट्रूड टीचेस हर चिल्ड्रेन (इं. शी.) नावाची मूलग्राही शैक्षणिक विचारांना चालना देणारी दुसरी कादंबरी लिहिली. १८०० ते १८०४ या काळात त्याने निवासी शाळा चालविली. इव्हरडन येथील निवासी शाळेचा तो वीस वर्षे संचालक होता.या शाळेत अनेक राष्ट्रांतील विद्यार्थी होते. तेथेच त्याने आपल्या शैक्षणिक कल्पना प्रत्यक्षात उतरविल्या. 

पेस्टालोत्सी हा ईश्वरभक्त असला, तरी शिक्षणात धर्माची शिकवण नसावी, असे त्याचे मत होते. रूसोप्रमाणे, शिक्षण ही एक नैसर्गिक, ऐंद्रीय प्रक्रिया आहे, असे त्याचे प्रतिपादन होते. शिक्षण म्हणजे बालकाच्या शक्तीचा व क्षमतेचा नैसर्गिक, प्रगतिशील आणि समतोल विकास होय, अशी त्याने व्याख्या केली. शिक्षणात बालकाचा मेंदू आणि हात यांबरोबरच त्याच्या हृदयाचाही उपयोग करून घेतला पाहिजे, असे त्याने प्रतिपादन केले. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने ती केवळ श्रीमंताची मिरासदारी नसून प्रत्येक मनुष्यमात्राचा तो हक्क आहे. शिक्षणाच्या माध्यामातून बालकांची व्यक्तिगत सुधारणा व्हावी एवढाच उद्देश नसून मनुष्यजातीचा अभ्युदय व्हावयास पाहिजे, असे त्याचे सांगणे होते. अध्ययन हे संवेदनांमार्फत चांगले होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात डोळे, कान, हात यांचा उपयोग केला पाहिजे, असे त्याने सांगितले. त्याच्या अध्यापन पद्धतीत त्यामुळे निरीक्षणाला महत्त्व आले. अध्ययनात विचारालाही स्थान असते, याकडे मात्र त्याचे दुर्लक्ष झाले. 

पेस्टालोत्सीने शिक्षकांच्या प्रशिक्षणाला महत्त्व दिले. त्याच्या व्हर्डून येथील शाळेत निरनिराळ्या देशांतील शिक्षक येऊन त्याच्या पद्धतीचा अभ्यास करीत. आधुनिक प्रशिक्षण पद्धतीत अवलोकन, प्रयोग आणि चर्चा यांना आलेले महत्त्व पेस्टालोत्सीच्या मूळच्या प्रयोगात आहे. पेस्टालोत्सीच्या व्हर्डून येथील शाळेत पुढे शिक्षणतज्ञ म्हणून प्रसिद्ध पावलेले हर्बर्ट आणि फ्रबेल प्रशिक्षण घेऊन गेले. 

पेस्टालोत्सी यास अनेक ठिकाणी सुरू केलेल्या शाळा बंद कराव्या लागलेल्या असल्या, तरी त्यांची कारणे प्रामुख्याने राजकीय- सामाजिक होती. त्यामुळे त्याला मिळणारे आर्थिक साहाय्य कमी पडत असे व शाळा बंद होत असे. मात्र त्याच्या शिक्षण-पद्धतीचा फ्रान्स, जर्मनी, इंग्‍लंड या देशांप्रमाणेच कॅनडा आणि अमेरिकेतही प्रसार झाला. रूसोने एमिल या ग्रंथात बालकाचे शिक्षण कसे असावे, याचे वर्णन केले होते. पेस्टालोत्सीचे विचार रूसोच्या विचारांशी जुळते होते व हे विचार त्याने प्रत्यक्ष शिकविताना उपयोगात आणले. शाळेतील वातावरण आनंदाचे व प्रेमाचे असले पाहिजे, या त्याच्या विचाराचा ठसा आधुनिक शिक्षणात उमटलेला दिसतो.  

अध्यापनाची नवी पद्धत शोधून काढणे हे पेस्टालोत्सीचे ध्येय नसून दलितांचा उद्धार व मानवाचे कल्याण हा त्याच्या शिक्षणप्रणालीचा हेतू होता. पेस्टालोत्सीच्या शैक्षणिक विचारांना आधुनिक शिक्षणप्रणालीत महत्त्वाचे स्थान आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये राष्ट्रीय विचारप्रणालीनुसार शाळांची स्थापना करण्यास त्याची तत्त्वे उपयुक्त ठरली. 

संदर्भ :1. Brubacher,J. S. History of the problems of Education, New York, 1947.

             2. Meyer, A. An Educational History of the Western World, New York, 1975.

 

गोगटे, श्री.ब. घाणेकर, मु. मा. मिसार, म. व्यं.