कर्मवीर भाऊराव पाटीलपाटील, भाऊराव पायगौंडा: (१ सप्टेंबर १८८७ – ९ मे १९५९). महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली म्हणून अनेक विद्वान व बहुजन समाज आदराने आणि प्रेमाने त्यांना कर्मवीर म्हणू लागला. कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. शाहू महाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.

ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान ते विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत हिंडल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. त्यातून दुधगाव (जि. सांगली) येथे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आश्रम काढला. कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधींनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथे जेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, हा त्यांचा मंत्र होता.

वास्तविक भाऊराव बहुजनसमाजाच्या शैक्षणिक उद्धाराकडे वळले, त्याचे कारण सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. स्वतःच्या मातापित्यांची व समाजाचीही इतराजी त्यांनी ओढवून घेतली. सर्व जातिधर्मांचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले. रयत शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने जनतेची झाली. वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यात मनःपूर्वक साथ दिली. त्यांना तीन मुले झाली दोन मुली आणि एक मुलगा. संस्थेचे विद्यमान संघटक अप्पासाहेब हे त्यांचे चिरंजीव होत.

गांधीवधानंतरच्या उद्रेकात १९४८ साली संस्थेचे सरकारी अनुदान काही दिवस स्थगित करण्यात आले पण कर्मवीर भाऊराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाणेदारपणाने लोकाश्रयावर संस्था पुढे चालविली व संवर्धित केली. कर्मवीर भाऊराव हे विलक्षण जिद्दीचे व धडाडीचे कार्यकर्ते होते. धिप्पाड शरीर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि गरीब, पददलितांचा अंतर्यामी जिव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होत. महात्मा फुले व राजर्षी शाहू यांची शिक्षणप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. सद्‌गुरू गा़डगे बाबांचेही रयत शिक्षण संस्थेस अमोल साहाय्य झाले. हृदयविकाराने भाऊरावांचे पुण्यास निधन झाले.

भगीरथ प्रयत्नांनी भाऊरावांनी खेड्यापाड्यांत ज्ञानगंगा नेऊन पोहोचविली. या संस्थेची ३१२ माध्यमिक विद्यालये व १९ महाविद्यालये आहेत. 

संदर्भ : Matthew, A. V. Karmaveer Bhaurao Patil, Satara, 1957.

चव्हाण, रा.ना.