महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ : शैक्षणिक विकास व संशोधन करणारे मंडळ. २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे स्थापना. शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या स्वायत्त संस्थेकडे पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सोपवावे, अशा स्वरूपाची शिफारस कोठारी शिक्षण आयोगाने (१९६६) केली होती. तिला अनुसरून या मंडळाची स्थापना झाली. प्रस्तुत मंडळ ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे.

मंडळाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) शालोपयोगी पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तके व विद्यार्थ्यांसाठी व्यवसायपुस्तके तसेच शिक्षणविषयक इतर साहित्य तयार करणे, (२) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि शिक्षणाच्या इतर शाखा यांतील अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांच्या सुधारणेसाठी तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती, साहाय्यभूत शैक्षणिक साधने आणि विविध शिक्षणसाधने यांवरील साहित्याविषयी संशोधन करणे, (३) शिक्षणाच्या सर्वसाधारण दर्जामध्ये सुधारणा व्हावी या हेतूने अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करणे, त्याचा विकास करणे आणि शासनास किंवा अन्य  योग्य प्राधिकरणास त्याची शिफारस करणे, (४) सर्व शाखांमध्ये शिक्षणाची प्रगती व्हावी यासाठी उपयुक्त किंवा आवश्यक अशा पुस्तकांचे व साहित्याचे मुद्रण, विक्रय व वितरण करणे, (५) शासनास देणगीदाखल मिळालेल्या कागदपत्रांचा संग्रह व उपयोग करणे आणि त्यासंबंधीचा हिशोब ठेवणे तसेच शासनाच्या वतीने पाठ्यपुस्तके मोफत पुरविण्याविषयी योजना कार्यान्वित करणे.

मंडळाचे पुढीलप्रमाणे नऊ विभाग पाडण्यात आले आहेत : (१) विद्याविभाग, (२) सामान्य प्रशासन विभाग, (३) वितरण विभाग, (४) वित्त विभाग, (५) अंतर्गत-लेखापरिक्षण विभाग, (६) निर्मिती विभाग, (७) संशोधन विभाग, (८) ग्रंथालय विभाग, (९) किशोर विभाग.

मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथील ‘ बालभारती ’ नामक इमारतीत असून निर्मिती विभाग वरळी (मुंबई) येथे आहे. यांशिवाय पुणे, नागपूर, मुंबई (गोरेगाव) व औरंगाबाद या चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक-भांडारे व वितरण केंद्रे आहेत. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी मंडळाकडे नोंदणी करून क्रमिक पुस्तकांची मागणी केल्यास पुस्तक-विक्रेत्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थांना पुस्तकांच्या खरेदी किंमतीवर १५% वटाव दिला जातो. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये क्रमिक पुस्तकांचे वितरण सहकारी संस्थेमार्फतच केले जाते.

मंडळाच्या धोरणविषयक सर्व बाबी नियामक मंडळ आखते व या नियामक मंडळातर्फेच पाठ्यपुस्तक  मंडळाचे व्यवस्थापन चालते. राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण संचालक हे मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष आहेत. नियामक मंडळावर या दोघांसह नऊ पदसिद्ध व सहा अपदसिद्ध सदस्य असतात. अपदसिद्ध सदस्यांची नियुक्ती शासनातर्फे सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी होते. मंडळाचे व्यवस्थापन पुढील समित्यांमार्फत चालते : (१) कार्यकारी समिती, (२) वित्त समिती, (३) विद्यापरिषद, (४) संशोधनसल्लागार परिषद व (५) निर्मिती व वितरण परिषद.

मंडळाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार अधिक समित्या व उपसमित्या नियुक्त करण्याचे अधिकार नियामक मंडळास आहेत. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी भाषा विषयांच्या एकूण सात समित्या (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, इंग्रजी) आहेत. इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र, या भाषेतर विषयांसाठीही समित्या आहेत.

मंडळाच्या स्थापनेच्या वेळी शासनाने त्यांच्याकडील उपलब्ध पाठ्यपुस्तके (किंमत रु. ४२·८१ लक्ष ) तसेच रोख २७·६० लक्ष रु. वेळोवेळी कर्जरूपाने दिले. त्या सर्व रकमेची मंडळाने व्याजासह परतफेड केली आहे. मंडळाला दरवर्षी लागणारे खेळते भांडवल सु. ८ ते १० कोटी रु. हे बँकांकडून कर्जरूपाने पुस्तकसाठ्याच्या तारणावर वेळोवेळी मिळविले जाते व त्याची परतफेड पुस्तकविक्रीद्वारे मिळालेल्या रकमेतून केली जाते.

पाठ्यपुस्तकांची निर्मिती : मंडळ अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत इयत्ता १ ते ७ पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. मंडळनिर्मित इ. १ ते ७ पर्यंतची पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी आणि सिंधी (अरबी व देवनागरी लिपीत) या सात भाषांत प्रकाशित करण्यात आली.

राज्यात १९७२ मध्ये १० + २ + ३ या नव्या आकृतिबंधानुसार इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता ८ वी इतिहास, बीजगणित व भूमिती या विषयांची पाठ्यपुस्तके मंडळाने खाजगी प्रकाशनासोबतच प्रकाशित केली. १९७३–७४ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या इयत्ता ८ ते १२ ह्या पाठ्यपुस्तकांची छपाई व वितरण याचे काम मंडळाने स्वीकारले. अशा प्रकारे आतापर्यंत मंडळाने इयत्ता १ ते ७ पर्यंतची एकूण ३९५ पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या एकूण ३३१ पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण यांचे कामही मंडळ प्रतिवर्षी करत आहे. इयत्ता १ ते ७ च्या भाषा व गणित या विषयांच्या नव्या मालेचे काम मंडळाने पूर्वीच क्रमश : हाती घेतले असून गणिताच्या मालेतील अखेरचे म्हणजेच इयत्ता ७ वीचे गणिताचे पाठ्यपुस्तक १९८४–८५ या वर्षी प्रकाशित झाले आहे.

पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे एक पुस्तक तयार करून ते प्रसिद्ध केले. पाठ्यपुस्तकांतील काही निवडक कविता तसेच स्फूर्तिगीतांतील काही गीते निवडून मंडळाने १८ गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत. त्यांचे संगीत दिग्दर्शन वसंत देसाई यांनी केले तसेच बालभारती गीतमंजुषा प्रसिद्ध करून या गीतांची स्वरलिपीही उपलब्ध करून दिली.


मंडळाने इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मराठी बालभारतीवर आधारीत ‘बोलकी बालभारती’ ही ध्वनिफीतही प्रसिद्ध केली आहे.

मंडळाने इयत्ता पहिलीच्या सहा भाषांतील बालभारती या पाठ्यपुस्तकावर आधारित हस्तपुस्तिका, इयत्ता दुसरीच्या सात भाषांतील बालभारती या पाठ्यपुस्तकांच्या शिक्षक आवृत्याही प्रकाशित केल्या आहेत. या साहित्याबरोबरच मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ, संस्कारवाचनमाला, कार्यानुभव-शिक्षक-मार्गदर्शिका, विज्ञान-अध्यापन संयोजन, बालगीते, बालगोष्टी, मुलांसाठी खेळ तसेच महात्मा गांधींची आत्मकथा (पुनर्मुद्रण), धडपडणारे शिक्षक, ‘आत्मचरित्र माले’तील दादासाहेब रेगे यांचे माझे जीवन : माझी बाळं हे पहिले आत्मचरित्र इ. विविध स्वरूपाचे पाठ्येतर साहित्य प्रकाशित केले आहे. श्रीमती राधाबाई शेवडे यांचे दुसरे आत्मचरित्र प्रकाशनमार्गावर आहे. मंडळाने शालेय शब्दकोश तयार केला असून त्याची छपाई सुरू आहे.

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेंनिग (एन्. सी. ई. आर्. टी., स्थापना १९६१) नवी दिल्ली या संस्थेने विज्ञानविषयक अभ्यासक्रम आखून त्यावर आधारित पाठ्यपुस्तके तयार केली. ती पाठ्यपुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करण्याचे कार्य मंडळाने हाती घेतले. याशिवाय मूळ इंग्रजी पुस्तके इयत्ता ३ व ४ ची पाठ्यपुस्तके उर्दू भाषेतही मंडळाने छापून ती प्रसिद्ध केली आहेत. तसेच या विषयांच्या शिक्षक-मार्गदर्शिकाही प्रसिद्ध केल्या आहेत.

मंडळाचे शैक्षणिक संशोधन कार्य दोन स्तरांवर चालते. कार्यालयीन स्तरावर अधिक व्याप्तीचे व महत्त्वाचे असे काही संशोधन प्रकल्प हाती घेण्यात येतात. याशिवाय ‘संशोधन प्रकल्प’, आर्थिक साहाय्य योजनेनुसार दरवर्षी काही प्रकल्प दिले जातात. हे प्रकल्प सर्वसाधारणपणे प्रशिक्षण महाविद्यालये, अध्यापक विद्यालये यांमधील प्राध्यापक तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक यांना देण्यात येतात. संशोधन प्रकल्पाशिवाय काही अन्य शैक्षणिक उपक्रम या विभागातर्फे घेतले जातात. उदा., पाठ्यपुस्तक लेखक कृतिसत्र, शैक्षणिक संशोधन व्याख्यानमाला, अखिल भारतीय पाठ्यपुस्तक प्रदर्शन इत्यादी.

किशोर मासिक : मंडळाने ८ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक दृष्ट्या दर्जेदार असे किशोर मासिक सुरू केले आहे. मंडळाच्या या मासिकाला राष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

देशात २ ऑक्टोबर १९७८ साली राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. या कार्यासाठी औरंगाबाद येथे राज्य प्रौढशिक्षण संस्था स्थापन झाली. ही संस्था प्रौढशिक्षणासाठी जी पाठ्यपुस्तके, पूरक साहित्य आणि अध्यापन साहित्य तयार करते, त्यांची छपाई, निर्मिती आणि वितरण यांचे काम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ करते. १९८०–८१ पासून मंडळाने वही-वितरण योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे वह्या तयार करण्यात येऊ लागल्या. त्यांचे वितरणही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत होते.

पाटील, शंकर