ओरिसा कृषि विद्यापीठ : ओरिसा राज्यातील या विद्यापीठाची स्थापना भुवनेश्वर येथे राज्यशासनाच्या १९६५च्या अधिनियमाने झाली व तत्पूर्वीचा तत्संबंधीचा अधिनियम रद्द करण्यात आला. या विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक-निवासी असे असून त्याच्या क्षेत्रात ओरिसा राज्यातील सर्व कृषिविषयक महाविद्यालयांचा समावेश व्हावा, असे नमूद केले आहे. मात्र सध्या चारच घटक महाविद्यालये त्यात अंतर्भूत होतात. त्यांतून व विद्यापीठातील विविध विद्याशाखांतून कृषी, पशुवैद्यक, कृषि-अभियांत्रिकी, पशुसंवर्धन तसेच काही मानव्यविद्यांतर्गत विषय व आधुनिक भारतीय भाषा इ. विषय शिकविले जातात. विद्यापीठात पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम असून परीक्षापद्धती केवळ पारंपरिक न ठेवता अंतर्गत मूल्यमापनावर आधारलेली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष त्रैमासिक सत्रात विभागलेले आहे. बहुतेक विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहांत राहतात. कुलगुरू व कुलसचिव हे विद्यापीठीय प्रशासनाचे प्रमुख वेतन पदाधिकारी आहेत. विद्यापीठाच्या विस्तार-विभागातर्फे द्दक्‌श्राव्य प्रकल्प, इतर क्षेत्रीय कार्यक्रम तसेच संशोधन व विस्तार कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. ओरिसा राज्यातील सु. ३९४ खेड्यांतून पशुसंवर्धन कसे करावे, पिकांवर औषधे कशी मारावीत, उत्पादन कसे वाढवावे वगैरेंची प्रात्यक्षिके विस्तार-विभागातर्फे १९७१ – ७२ या शैक्षणिक वर्षात योजिण्यात आली. विद्यापीठाचे ग्रंथालय अद्ययावत असून त्यात सु. ८६,००० ग्रंथ होते (१९७१). विद्यापीठाचे वार्षिक उतपन्न १९७१ – ७२ मध्ये १०८·८६ लाख रुपये होते. विद्यापीठात १९७१ – ७२ मध्ये १,३१३ विद्यार्थी  शिकत होते.                                                                           

देशपांडे, सु. र.