काश्मीर विद्यापीठ : जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. पूर्वी अस्तित्वात असलेले जम्मू आणि काश्मीर विद्यापीठ बंद करण्यात येऊन त्याची जम्मू व काश्मीर अशी दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली. त्यांतील काश्मीर विद्यापीठ १९६९ मध्ये श्रीनगर ह्या ठिकाणी स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक असून श्रीनगर व त्याच्या परिसरातील १७ महाविद्यालये व प्राच्य विद्यांचे संशोधन-शिक्षण देणाऱ्या सु.६ संस्था त्यास संलग्न केलेल्या आहेत. वैद्यक, वाणिज्य वगैरे विषयांच्या ९ विद्याशाखा असून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे तथापि प्राचीन अभिजात भाषा व आधुनिक भारतीय भाषा ह्यांबाबतीत ती भाषाच माध्यम समजण्यात येते. श्रीनगर येथील स्त्रियांच्या महाविद्यालयाने अलीकडे प्रत्येक  विषयात अभ्यास-मंडळे सुरू केली अाहेेत. १९७१–७२मध्ये ह्या विद्यापीठाच्या कक्षेखाली सु.१३,४७५ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचे १९७१–७२ मध्ये उत्पन्न सु. ६४⋅३९ लाख रु. होते.

देशपांडे, सु.र.