श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विश्व महाविदयालय : तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्ह्यातील कांचीपुरम् येथे स्थापन झालेले एक अभिमत विदयापीठ. स्थापना १९९४. जगद्‌गुरू श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल हे या विदयापीठाचे पुरस्कर्ते आहेत. ‘ श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती न्यायशास्त्र महाविदयालय ’ ही मूळ संस्था दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानाशी संलग्न होती. मे १९९३ मध्ये केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून कार्यक्षेत्र व व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून, या महाविदयालयाला अभिमत विदयापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर १९९४ मध्ये यास ‘ श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विश्व महाविदयालय ’ असे नाव देण्यात आले.

 

विद्यापीठात बी.ए., बी.कॉम्., बी.ई., बी.ए.एम्.एस्., बी.एस्.ए.एस्., बी.एस्.सी.एस्., एम्.ए., एम्.बी.ए., एम्.सी.ए., एम्.ई., पीएच्.डी. इ. पदवी व पदव्युत्तर वर्गांचे शिक्षण दिले जाते. इंग्रजी, संस्कृत, व्यवस्थापनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, यांत्रिक अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, विद्युत् व इलेक्ट्रॉनिकी अभियांत्रिकी, विद्युत् संदेशवहन व अभियांत्रिकी हे विभाग या विदयापीठात आहेत.

 

कला शाखांतर्गत भारतीय संस्कृती, पुरातत्त्वविदया व पर्यटन या विषयांचे शिक्षण दिले जाते पदवी शिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा असून त्यासाठी सत्र पद्धती अवलंबिली जाते. संस्कृत विषयाचे पदव्युत्तर शिक्षण व पीएच्.डी.साठी मार्गदर्शन दिले जाते. आयुर्वेदिक वैदयक व शल्यचिकित्सा ( बी.ए.एम्.एस्.) हा पदवी अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा आहे. अभियांत्रिकी पदवी शिक्षण ( बी.ई.) या शाखेत संगणक विज्ञान व अभियांत्रिकी, विद्युत् व इलेक्ट्रॉनिकी अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिकी व संदेशवहन अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण दिले जाते. येथे अभियांत्रिकीचा पदव्युत्तर विभागही आहे. त्याचप्रमाणे विदयापीठामध्ये संस्कृत व उपयोजित विज्ञान ( बी.एस्.ए.एस्.) हे तीन वर्षांचे पदवी शिक्षण दिले जाते. या पदवी अभ्यासक्रमामध्ये संस्कृत, इंग्रजी, उपयोजित विज्ञान, जीवशास्त्र, लेखाशास्त्र, संगणक उपयोजन, संख्याशास्त्र व व्यावसायिक गणित या विषयांचा समावेश आहे.

चौधरी, वसंत