विद्यालय : अध्ययन-अध्यापनाचे कार्य जेथे चालते, असे स्थान वा संस्था. विद्यालयाला समानार्थी अशा ‘शाळा’, (संस्कृत), ‘स्कूल’ (इंग्रजी) इ. पर्यांयी संज्ञा आहेत. ‘शाला’ (शाळा) या शब्दांचा अर्थ दालन किंवा खोली एवढाच असून, त्यापासून ⇨पाठशाला हा शब्द तयार झाला. पाठ म्हणजे शिक्षण आणि शिक्षण देणारी (विशेषतः संस्कृत विद्येचे) संस्था म्हणजे पाठशाला होय. प्राचीन काळी निरनिराळ्या धार्मिक पंथांचे आचार्य, महंत व साधुसंत यांचे मठ म्हणजे पाठशाळाच असत. म्हणून ‘मठ’ शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांचे निवासस्थान असा दिलेला आहे. ‘मठःछात्रनिलयः’ असे जे म्हटले जाते, ते याच अर्थाने होय. ‘स्कूल’ या शब्दांचे मूळ लॅटिन ‘स्कोला’ (Schola) असून, त्याचा अर्थ ‘लेझर’ म्हणजे मोकळा वा फुरसदीचा वेळ असा आहे. अर्थोत्पादनाच्या विवंचना व कष्ट यांपासून मुक्त असलेली व्यक्ती ज्ञानसंपादन, चिंतन इत्यादींमध्ये आपला मोकळा वेळ घालवून स्वतःचा जो विकास साधते व आनंद मिळविते, त्याचा अर्थ शिक्षण.

शाळा ही वास्तूमध्ये, घरात, मठात, मंदिरात, विहारात, गुहांमध्ये, मशिदीमध्ये, चर्चमध्ये अशा बंदिस्त ठिकाणी भरणारी संस्था असून तीमध्ये मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना शिक्षण देण्याचे कार्य केले जाते परंतु बंदिस्त इमारतीतील शिक्षण असे बंधन शाळेला सर्वत्र दिसून येत नाही. प्राचीन भारतात वृक्षछायेखाली भरणाऱ्या शाळांचे उल्लेख आढळतात. अलीकडच्या काळात रवींद्रनाथ टागोरांच्या ⇨शांतिनिकेतन आश्रमात वृक्षांखाली शिक्षण देण्याची पद्धती अस्तित्वात होती. आकाशवाणी तसेच दूरदर्शन यांच्या माध्यमातून ग्रामीण लोकांसाठी दिले जाणारे शिक्षण म्हणजे आकाशाखालील शाळांचे उत्कृष्ट उदाहरण होय. आदिवासींच्या वस्तीतील तसेच ग्रामीण भागातील मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या. कुरणशाळा किंवा अंगणवाड्या ही वास्तुमुक्त शाळांची आणखी काही उदाहरणे होत.

विद्यालयीन अध्ययन-अध्यापनाचे विषय कोणते असावेत, याबाबतही काही समान कल्पना सर्वत्र दिसून येतात. त्यांत मुख्यतः वाचन, लेखन व गणित या विषयांचा समावेश केला जातो. पाश्चात्त्य शिक्षणप्रणालीमध्ये याच विषयांना ‘रीडिंग’, ‘रायटिंग’ आणि ‘ॲरिथमॅटिक’ हे तीन मिळून ‘थ्री-आर’ असे संबोधण्यात येते. कालानुसार या विषयांत अनेक विषयांची भर पडत गेली. त्यांमध्ये वाचन, लेखन, गणित यांबरोबरच सामाजिक शास्त्रे, सामान्य विज्ञान, आरोग्यशास्त्र, शारीरिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प इ. कला तसेच शेती, क्वचित धर्मशिक्षण, साहित्य, अर्थशास्त्र, संगणक इ. विषयांचा उल्लेख करता येईल. विद्यालयाच्या सर्वांगीण कल्पनेत अध्यापक, पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम, विविध शालेय उपक्रम, अध्यापन-साहित्य, शालेय शुल्क, शासकीय नियंत्रण इ. अनेक घटकांचा समावेश होतो. शाळांसंबंधीची ही सर्वसामान्य कल्पना सामान्य माणसाच्या मनात आज रूजली आहे. तथापि विद्यालयाच्या मूळ संकल्पनेला औपचारिक व संस्थात्मक स्वरूप प्राप्त होण्यासाठी पुढे सु. अडीच हजार वर्षाचा काळ जावा लागला.

घर हेच विद्यालय : समाज जसजसा संघटित होऊ लागला, तसतशी मुलांना पद्धतशीर शिक्षण देण्याची व संस्कार करण्याची गरज निर्माण झली. प्रारंभीच्या काळात तरी घर वा कुटुंब हेच एकमेव संस्कार-केंद्र होते. मुलांचे संगोपन करीत असतानाच त्यांना चांगल्या सवयी लावणे, रीतीभाती शिकवून त्यांच्याकडून तसा आचार करवून घेणे, त्यांच्यात देवाधर्मासंबंधीच्या श्रद्धा निर्माण करणे व पूजाअर्चाविषयक धार्मिक कृत्ये शिकवणे, कुलाचार-कुलधर्म यांविषयी माहिती देणे आणि कुटुंबाच्या व्यवसायात मुलांना सहभागी करवून घेऊन त्यांना अर्थोत्पादनाचे सामर्थ्य मिळवून देणे ही कुटुंबाची व मातापित्यांची जबाबदारी होती. त्यामुळेच माता-पित्यांना गुरु मानले जाई. मातेची मांडी हे मुलाचे पहिले विद्यापीठ मानले जात असे. जे आईवडिल आपल्या मुलांना शिक्षण देत नसत, ते मुलांचे वैरी समजण्यात येत (‘माता शत्रुः पिता वैरी बालो येने न पाठितः’) मुलांच्या औपचारिक शिक्षणाला प्रारंभ झाल्यानंतरही कुटुंबसंस्थेचे मुलांवर संस्कार घडविण्याच्या कार्यातील स्थान व महत्त्व कमी झालेली नाही.

गुरुकुल शिक्षणपद्धती : औपचिरक शिक्षणाला प्रारंभ होताच गुरुकुलपद्धती अस्तित्वात आली. विद्यार्थ्यांने स्वतःच्या घरापासून दूर असलेल्या शिक्षकांच्या घरी राहणे, किंवा कीर्तिमंत गुरुंच्या वसतिगृहात वास्तव्य करणे, हे या प्राचीन गुरूकुलपद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य होते. या प्रज्ञावंत गुरुंपैकी वाल्मीकी, कण्व, सांदिपनी यांसारखे काही गुरुच निबिड अरण्यात वास्तव करीत परंतु बहुसंख्या गुरुकुले ग्रामात किंवा नगरात असत. विद्यार्थ्यांचा उपनयन संस्कार झाल्यानंतर त्याने गुरुगृही राहण्यास सुरुवात करावी, अशी अनुज्ञा स्मृतिग्रंथांनीच दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांस ‘अंतेवासी’ (आचार्य कुलवासी) असे संबोधण्यात येई. विद्यार्थ्यास गुरुचा अखंड सहवास लाभावा आणि गुरुच्या अनुकरणाची प्रेरणा त्यास मिळावी, हा गुरुकुलपद्धतीचा प्रमख उद्देश होता. गुरुकुलपद्धतीमुळे विद्यार्थ्यास अध्ययनास अनुकुल वातावरण, तसेच बहुतेक गुरु हे संसारी असल्याने कौंटुंबिक वातावरणही लाभत असे. विद्यार्थ्यांच्या स्वभावातील अनिष्ट कंगोरे नाहीसे होण्यास व त्यांच्या ठायी ज्ञानसंपन्नता आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास गुरुकुलपद्धती अतिशय उपयुक्त होती. विद्यार्थ्यांत शिस्त निर्माण करण्याचे कामही गुरुकुलपद्धतीमुळे सहज सुलभ होत असे. गुरुगृही वेद-वेदांगे, शास्त्रे इत्यादींबरोबच कृषी, वाणिज्य यांसारख्या विषयांचे, तसेच अन्य व्यवहारोपयोगी ज्ञानही विद्यार्थ्यांना दिले जात असे. शिक्षणाचे स्वरूप व्यक्तिगत, तसेच सामुदायिकही असे.

गुरूशिष्यांच्या निकट सहवासाच्या कल्पना यूरोपमध्ये तेराव्या-चौदाव्या शतकांत विद्यापीठे स्थापन झाल्यावरच दृढमूल झाली. भारतात गुरुकुल वा आश्रमपद्धती रूढ होती, तेव्हा यूरोपमध्ये मठ व लहानमोठी धर्ममंदिरे (चर्च व कॅथीड्रल) ही शिक्षणाची केंद्रे बनली. व त्यातून पाश्चात्त्य विद्यालयाची (स्कूल) संकल्पना प्रगत झाली. ‘स्कूल’ (Skool) हा शब्द ग्रीक आणि रोमन भाषांतून उद्‌भवला आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी व अधिकार धर्मसंस्थेचा आहे, असे मानले जात असे. ग्रीक व रोमन काळात मुलामुलींना अध्ययनासाठी शिक्षकाच्या घरी किंवा त्याने चालविलेल्या शाळेत पाठविले जात असे. मात्र भारतातील गुरुकुलपद्धतीप्रमाणे ती मुले गुरुगृही न राहाता स्वतःच्या घरीच राहत. भारतात बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर मठ, विहार ही विद्यादानाची केंद्रे बनली, बुद्धाच्या काळात प्रथम सामूहिक संस्था उदयास आल्याचे दिसून येते. बुद्धाने शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचा विचार मांडला व शिक्षणासाठी दहा वर्षांचा कालखंडही ठरविला. सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत बौद्ध भिक्षूंचे संघ भरभराटीस आले. ते प्रथम भिक्षू-भिक्षुणी यांच्यासाठी विद्याकेंद्रे बनली पण नंतर सर्वसामान्य जनांसाठी मुक्त करण्यात आली. या विद्याकेंद्रांतून आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच पवित्र धर्मग्रंथाचा, तसेच संस्कृत व पाली भाषांचाही अभ्यास करून घेतला जात असे.


धर्ममंदिर : प्राचीन संस्कृतीत देवदेवतांचे माहात्म्य वाढून पूजाअर्चादी  कर्मकांड निर्माण झाली, तशी धर्ममंदिरे ही विद्याकेंद्रे बनली. त्यातून औपचारिक शिक्षणपद्धतीस आरंभ झाला. धर्मगुरूंकडे विद्यादानाचे कार्य सोपविले गेले. धार्मिक शिक्षणाबरोबरच लेखन-वाचन−गणन ही व्यवहारोपयोगी कौशल्ये शिकविण्यात येऊ लागली. कुलोपाध्याय हा गुरू बनला. व्यावसायिक शिक्षण मात्र मुलांना वडिलांच्या व्यवसायांत वा उत्पादकसंघात उमेदवारीने घ्यावे लागे. यापुढच्या टप्प्यात धर्ममंदिरे हीच विद्यामंदिरे बनली. प्राचीन इस्राएल, ईजिप्त इ. संस्कृतींत धर्ममंदिरांत विद्यादान करण्याची प्रथा सुरू झाली. देवदेवतांचा पूजाविधी, मंत्रतंत्र, स्तोत्रपठण यांची दीक्षा देणारा एक स्वतंत्र वर्ग समाजात निर्माण झाला. भारतातही ब्राह्मण हा एक स्वतंत्र वर्ग परंपरागत ज्ञानाची जपणूक, नव्या ज्ञानाचा संग्रह आणि त्याचे वितरण-संवर्धन करण्यासाठी अस्तित्वात आला. अध्ययन-अध्यापन व सदाचाराची शिकवण हे त्याचे प्रमुख कार्य होते. धर्मसंस्थेचा शिक्षणातील वाटा ग्रीक-रोमन समाजात कमी होत गेला पण ख्रिस्ती समाजाच्या उदयानंतर सु. सतरा-अठरा शतकांपर्यंत चर्च, कॅथीड्रल, मठ, धर्ममंदिरे हीच विद्यादानाची केंद्रे होती. ही परंपरा अजूनही काहीशी टिकून आहे. जगातील प्रसिद्ध ख्रिस्ती चर्चच्या नावांनी संचालित अशा अनेक शिक्षणसंस्था आज चालू आहेत. तसेच भारतातही स्वामी रामकृष्ण मिशन, विवेकानंद केंद्र, तिरूपती बालाजी इ. धार्मिक संस्थांच्या वतीने अनेक शिक्षणसंस्था आज विद्यादानाचे कार्य करीत आहेत.

मुस्लिम समाजातही मशीद हेच शिक्षणाचे केंद्र होते. मुस्लिम राजकर्त्यांनी ‘मक्तब’ (प्राथमिक शाळा) व काही मद्रसा दिल्ली, लाहोर, आग्रा, जौतपूर येथे सुरू केल्या. या संस्थामध्ये अरबी, फार्सी, इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र यांचे शिक्षण दिले जाई. लहान खेड्यातील व शहरांतील मुसलमानी वस्त्यांत मक्तबा असत.

विद्यापीठांचा उदय : अनेक विद्वानांनी व विद्यार्थ्यांनी एकत्र राहावे, त्यांच्यात निकट साहचर्य असावे, त्यांना ग्रंथसंग्रह उपलब्ध असावा, चर्चा-वादविवाद यांच्याद्वारे ज्ञानसंवर्धनाचे व संशोधनाचे काम चालू राहावे, या गरजेतून विद्यापीठे निर्माण झाली. बरीच वर्षे भारतातील शिक्षण हे व्यक्तिकेंद्रित होते. निरनिराळे शिक्षक आपापल्या घरी, मठांतून वा मंदिरातून विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे शिक्षण देत असत. शिक्षक हे स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन व वैयक्तिक जबाबदारी पतकरूनविद्यादानाचे काम करीत. तथापि बौद्ध धर्मातील शिक्षणपद्धतीच्या प्रभावामुळे सामुहिक शिक्षणसंस्था सर्वत्र स्थापन होऊ लागल्या. बौद्ध अनुयायांनी सुरू केलेल्या महाविद्यालयांचा प्रभाव हिंदूंच्या मंदिर-महाविद्यालयांवर स्वाभाविकपणे पडू लागला. नालंदा, बलमी आणि विक्रमशिला ही विद्यापीठे आंतरराष्ट्रीय विद्याकेंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली (इ. स. पू. ८००). यूरोपमध्ये बाराव्या-तेराव्या शतकांत मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे प्रारंभीची विद्यापीठे इंग्रज राज्यकर्त्यांनी १८५७ मध्ये स्थापन केली. [⟶विद्यापीठ].

इयत्ता व स्तर : बालकांसाठी मूलभूत व प्राथमिक शिक्षण त्यानंतर कुमारांसाठी अधिक व्यापक पातळीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आणि युवकांसाठी महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण असे शिक्षणाचे स्वाभाविक स्तर सध्याच्या शिक्षणपद्धतीत दिसून येतात. हे शैक्षणिक स्तर व त्यांनुसार वेगवेगळे प्रकार, तसेच विद्यार्थ्यांची इयत्तांमधील व तुकड्यांमधील विभागणी, इयत्तांचा क्रम इ. घटकांनी युक्त अशी विद्यालयीन संरचना (स्ट्रक्चर) प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात रूढ झाली. ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षणपद्धतीनुसार भारतातही शाळांची स्थापना केली. १६५९ च्या दरम्यान पाश्चात्त्य मिशनऱ्यांनी येथे शाळा सुरू केल्या. ‘चॅरिटी स्कूल्स’ असे त्या शाळांना संबोधण्यात येत असे. १८१३ ते १८५६ या कालावधीत भारतात स्थूलमानाने पुढील चार प्रकारच्या शाळा अस्तित्त्वात होत्या : (१) मिशनऱ्यांनी चालविलेल्या शाळा, (२) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खाजगी रीतीने चालविलेल्या शाळा, (३) भारतीयांनी चालविलेल्या खाजगी शाळा व (४) जुन्या पद्धतीच्या संस्कृत पाठशाळा तसेच मुसलमानी मद्रसा. यूरोपमध्ये विद्यानिकेतनांची (पब्लिक स्कूल) स्थापना ८०० च्या सुमारास शार्लमेन द ग्रेटच्या प्रेरणेने झाल्याचे दिसून येते.

विद्यालयांची संरचना कालानुरूप विकसित होत गेली. विद्यार्थ्यांचे इयत्तांप्रमाणे वर्ग पाडण्यात आले. शिक्षणाची प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशी त्रिस्तरीय अशी विभागणी होऊन, ती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या प्रारंभापर्यंत रूढ होती. तथापि अलीकडच्या काळातील नवीन आकृतिबंधानुसार पूर्वप्राथमिक वर्ग वगळून इयत्ता १ ते ८ पर्यंत प्राथमिक शिक्षण, इयत्ता नववी आणि दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण आणि इयत्ता अकरावी व बारावीपर्यंतचे उच्च माध्यमिक शिक्षण (कनिष्ठ महाविद्यालय) अशी अध्ययनाची एकूण १२ वर्षे ही प्राथमिक, मध्यामिक व उच्च माध्यमिक स्तरांनुसार निश्चित करण्यात आली आहेत. आधुनिक काळात अध्ययन-अध्यापनाचे स्वरूपही बरेचसे औपचारिक, सामुदायिक व तांत्रिक बनले आहे. अध्यापनपद्धतीची नेमकी उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहेत. स्थूलमानाने विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीचा विकास करणे, त्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने योग्य ते तंत्रज्ञान व संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या कलाभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास साधण्यास पोषक वातावरण निर्माण करणे, त्यांच्यात जीवनविषयक विधायक दृष्टीकोणाची व नैतिक मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संस्कार करणे ही आधुनिक काळातील अध्यापनपद्धतीची प्रमुख उद्दिष्टे मानली जातात. ज्ञानदान, मूल्यसंवर्धन व योग्य असे परिवर्तन ही अध्यापनपद्धतीची आधुनिक त्रिसूत्री म्हणता येईल.

विद्यालयीन ⇨पाठ्यपुस्तकांची विविध स्तरांप्रमाणे मांडणी हा अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा गुण आज मानला जातो. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा पहिला प्रयत्न ⇨कोमीनिअस (१५९२-१६७०) याने केला. पहिल्यांदा सचित्र व सटीप क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केले. बालकांना प्रत्यक्ष अनुभवाने शिकविण्याची पद्धती ⇨पेस्टोलोत्सीने (१७४६-१८२७) सुरु केली. त्यामुळे पाठ्यपुस्तकनिर्मितीत क्रांती झाली. मुद्रणकलेच्या विकासामुळे पाठ्यपुस्तकांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. पाठ्यपुस्तके अभ्यासाच्या दिशा दाखविणारी व स्वतंत्रपणे अभ्यासाला साहाय्य करणारी असावीत, असा दृष्टिकोण पुढे स्वीकारण्यात आला. अभ्यासक्रमात बदल झाला आणि नव्या अध्यापनपद्धती पुढे आल्या, की पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना करावी लागते. भारतात १९६८ मध्ये शिक्षणविषयक नवीन धोरण जाहीर झाल्यावर राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवर पाठ्यपुस्तकांची निर्मिती व संशोधन मंडळे नेमण्यात आली. त्यानुसार १९६७ मध्ये ⇨महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळ राज्यातील इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यासाठी शासनमान्य अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करते.


‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या स्थापनेमुळे (१९६६) राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या तीन भागांतील माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांत असलेली विभिन्नता जाऊन एकसूत्रीपणा निर्माण झाला. डॉ. ईश्वरभाई पटेल समीक्षण समितीच्या शिफारशींना अनुसरून इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली व अभ्यासक्रम अधिक सुटसुटीत न अद्ययावत करण्यात आला. या नवीन अभ्यासक्रमात माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी अभ्यासावयाचे जे विषय आहेत. त्यांत राज्याची मातृभाषा ही सर्व स्तरांवर आवश्यक करण्यात आली असून, याशिवाय हिंदी, संस्कृत, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवसास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, कार्यानुभव (इयत्ता नववी अखेरच्या पातळीवर), शारीरिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण इ. विषयांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सामाजिक व मानसिक विकासासाठी, तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अभ्यासेतर उपक्रमांचा-उदा., क्रीडा, वक्तृत्व, नाट्य, संगीत, चित्र इ.-अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय ‘नॅशनल कॅडेट कोअर’ (एन्. सी. सी.), योगासने, रस्त्यावरील वाहतूकसुरक्षा पथक, समाजसेवा, स्काऊट इ. विषयांचाही अंतर्भाव अभ्यासेतर कार्यक्रमात करण्यात आला आहे. सामुदायिक रीतीने एखादी गोष्ट कशी आयोजित करावी, गटांतर्गत विचार कसा करावा, एकमेकांशी स्नेहभावाने कसे वागावे, नवनवीन कल्पना कशा मांडाव्यात, प्रसंगी त्या कशा सुधाराव्यात, त्या कार्यान्वित कशा कराव्यात, अशा कितीतरी गोष्टी या अभ्यासेतर कार्यक्रमांतून विद्यार्थी अनुभवतात, शिकतात. त्याचबरोबर त्यांच्यातील सहजीवनोपयोगी, समाजपोषक वृत्ती व सवयी विकसित होतात. विद्यार्थ्याच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वविकासासाठी अभ्यासाबरोबरच हे अभ्यासेतर कार्यक्रमही आधुनिक काळात फार महत्त्वाचे मानले जातात.

विशेष प्रकारची विद्यालये : विद्यानिकेतन : (पब्लिक स्कूल). उच्चवर्णीय व श्रीमंत लोकांच्या मुलांना शासकीय अधिकारपदाच्या नोकऱ्या मिळण्यासाठी वा कला, साहित्य, विज्ञान इ. विषयांत विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळविण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या निवासी शाळा, अशी या शाळांसंबंधीची मूळ कल्पना इंग्लंडमध्ये ११८० मध्ये प्रथम अस्तित्वात आली. भारतात मात्र श्रीमंत व गरीब मुलांसाठी विद्यानिकेतने सुरू करण्यात आलेली आहेत. श्रीमंत पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेली बव्हंशी विद्यानिकेतने ही खाजगी शिक्षणसंस्थांनी चालविलेली व इंग्रजी माध्यामातून शिक्षण देणारी आहेत. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बंल असलेल्याबुद्धिमान व गुणवान विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ सालापासून विद्यानिकेतने सुरू केली असून, ही विद्यानिकेतने पुसेगाव (सातारा), अमरावती, धुळे, औरंगाबाद, केळापूर (यवतमाळ) इ. ठिकाणी कार्यरत आहेत. इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश देण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या निकषांवर ३० विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. पालकांच्या उत्पन्नांच्या स्तरांनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या शुल्कांमध्ये पूर्ण माफी किंवा उत्पन्नाच्या प्रमाणांत काही टक्के सवलत दिली जाते. [⟶विद्यानिकेतन].

तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी : फ्रान्समध्ये १७७५ साली झां रूडॉल्फ पेरँ यांनी ‘एकोल द पॉलिटेक्निक’ स्थापन करून अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया घातला. १९४६ साली भारतात उच्च तांत्रिक शिक्षणाकरिता खरगपूर, मुंबई, कानपूर, मद्रास व नवी दिल्ली येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या नावाच्या पाच संस्था स्थापन झाल्या. १९९५ मध्ये भारतात तंत्रनिकेतनांची संख्या १,०२९ पर्यंत वाढली. महाराष्ट्रात सु. १४७ तंत्रनिकेतने आहेत. तंत्रनिकेतनांचा अभ्यासक्रम हा माध्यमिक शालान्त परीक्षेनंतर तीन वर्षांचा असून या काळात विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या स्थापत्य, यांत्रिक, विद्युत्‌, उत्पादन, इ. शाखांत, तसेच इलेक्ट्रॉनिकी, संगणक, वस्त्रनिर्मिती इ. विषयांत पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. पदविकेतील उच्च गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. राज्यात ११ तंत्रनिकेतनांमध्ये मुलींच्या तांत्रिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. शासकीय संस्था व विनाअनुदानित खाजगी संस्था अशा दोन्ही प्रकारची तंत्रनिकेतने राज्यात आहेत. [⟶तांत्रिक शिक्षण].

अंध, मूक-बहिरे यांसाठी खास विद्यालये : अपंगांसाठी मुख्यतः दोन प्रकारच्या शाळा सध्या अस्तित्वात आहेत. केंद्र शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांतून या शाळा अस्तित्वात आल्या आहेत. सौम्य प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांच्या बरोबर सामान्य शाळांतून शिक्षण देण्याच्या योजनेला ‘अपंग एकात्म शिक्षण योजना’ असे नाव देण्यात आले आहे. आठ अपंग विद्यार्थ्यांमागे एका प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती त्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती शास्त्रीय उपकरणे, त्या विद्यार्थ्यांची फी, पुस्तके, त्यांचा गणवेश व त्यांचा प्रवास भत्ता−या सर्व खर्चासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान दिले जाते. ज्यांचे अपंगत्व गंभीर स्वरूपाचे आहे, अशा विद्यार्थ्यांना निवासी विशेष शाळांतून शिक्षण दिले जाते.

विविध मनोरंजक, आकर्षक आणि कल्पक खेळ, शिक्षणसाधनांचा वापर, नाट्य, हस्तकला, चित्रकला, वनविहार इत्यादींचा उपयोग करून या विद्यार्थ्यांना शिक्षक अध्यापन करीत असतात. [⟶ अपंग : कल्याण व शिक्षण].

प्रौढशिक्षणाच्या शाळा : सामान्यतः ‘प्रौढ’ म्हणजे सार्वत्रिक आणि सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा संपलेली व स्वतःची उपजीविका स्वतःच करावयास लागलेली व्यक्ती. औपचारिक शिक्षणाचा काळ संपल्यावर स्वच्छेने जे शिक्षण व्यक्ती घेते, ते प्रौढशिक्षण होय. १९७७ साली भारत सरकारने प्रौढशिक्षणाच्या कार्यक्रमाला अग्रक्रम दिला. स्थूलमानाने भारतातील प्रौढशिक्षण, स्थिर व फिरती ग्रंथालये, व्यवसाय शिक्षण आणि साक्षरताप्रसार इत्यादींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. प्रौढशिक्षणाच्या शाळा प्रौढांच्या सोयीनुसार सामान्यतः सायंकाळी वा रात्री भरविण्यात येतात. प्रौढांना हे शिक्षण देताना साक्षरताप्रसार, जाणीव-जागृती आणि व्यावसायिक कार्यक्षमता हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. [⟶ प्रौढाशिक्षण].

सैनिकी शाळा : सैनिकी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांधिकवृत्ती, नेतृत्व, इ. गुणांचा विकास व्हावा, म्हणून महाराष्ट्र राज्यात सातारा येथे १९६३-६४ सालापासून सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली.  महाराष्ट्र शासनाकडून या शाळेस शिष्यवृत्या व अनुदान दिले जाते.  नासिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्येही सैनिकी शिक्षण दिले जाते.  महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक जाहीर केला असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झालेली आहे. [⟶सैनिकी शाळा ].

निवासी शाळा :  प्राचीन गुरूकुलपद्धतीप्रमाणे विद्यार्थ्याचा निवास व अध्ययन एकाच इमारतीत व परिसरात व्हावे, हा निवासी शाळांच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होय.  पुढे निवासी शाळांच्या स्वरुपात परिस्थितीनुरूप बदल होऊ लागले. निवासी शिक्षणामुळे आपल्या पाल्यास स्वावलंबन, शिस्त इ. चांगल्या सवयी लागाव्यात, त्याचे सामाजिकीकरण अधिक चांगल्या प्रकारे होऊन त्याच्या शिक्षणात अडथळे न येता त्याचे शिक्षण सलगपणे व्हावे इ. विविध कारणांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे निवासी शाळांच्या संख्येतही खूप वाढ झाली. विद्यानिकेतनांसारखेच त्यांचे स्वरूप असल्याने आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील विद्यार्थ्यांची संख्या या शाळांमधून विशेषत्वाने दिसून येते. बव्हंशी शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. कुलपध्दतीमुळे या शाळांतील वातावरण शिस्तबध्द व नियोजनपूर्ण दिसून येते. विद्यार्थ्यावर विविध जबाबदाऱ्या टाकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ठायी नेतृत्वगुणांचा, उद्यमशीलतेचा व स्वयंशिस्तीचा परिपोष होतो. सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक सहभाग घेता येतो.


कॉन्व्हेंट स्कूल : ‘कॉन्व्हेंट’ हा शब्दप्रयोग पारंपरिक अर्थाने ज्या ख्रिश्चन भिक्षुणी धर्मनियमानुसार एकाच निवासस्थानी व्रतस्थ होऊन राहतात, त्या स्थानाला उद्देशून वापरला  जातो. ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द ‘कॉन्व्हेंटस’ (Conventus) या लॅटिन शब्दापासून सिद्ध झाला असून, त्याचा मूळ अर्थ ‘धर्मगृह’ असा आहे. बंदिस्त अशा धर्मगृहात या ख्रिश्चन भिक्षुणी आपला सर्व काळ प्रार्थना, पूजा व आत्मचिंतन यांत घालवीत असत परंतु खुल्या धर्मगृहातील भिक्षुणी मात्र रूग्णसेवा, शिक्षण, समाजसेवा अशा कार्यात कालक्रमण करीत असत. शिक्षण, समाजसेवा अशा  कार्यात कालक्रमण करीत असत. शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या या कार्यातून ‘कॉन्व्हेंट स्कूल’ असा शब्द पुढे रूढ झाला. सध्या तो शब्द गैरसमजाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या बहुसंख्य शाळांना उद्देशून वापरला जातो.

पाठशाळा : संस्कृत विद्येचे शिक्षण प्राधान्याने देणारे विद्यालय. वेदपाठशाळा, शास्त्रपाठशाळा, वेदशास्त्रपाठशाळा अशा प्रकारच्या शिक्षणसंस्था वेदकालापासून ब्रिटिश राज्याच्या अखेरपर्यंत भारताच्या नगरांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांमध्ये कमीजास्त प्रमाणात चालू होत्या. वेद, स्मृती, पुराणे, काव्ये, धर्मशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, षडदर्शने, तसेच बौध्द व जैन धर्मग्रथांचे अध्यापन पाठशाळांची संख्या नगण्य झाली आहे.

नवोदय विद्यालये :  केंद्र सरकारने स्वतंत्र व स्वायत्त संघटना स्थापन करून व भरपूर अर्थसाहाय्य करून स्थापन केलेल्या या निवासी शाळा होत.  बव्हंशी प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागांत हे विद्यालय सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबईतील  तीन धरून एकूण ३२ विद्यालये सातव्या योजनेच्या काळात स्थापन करण्यात आली आहेत. या विद्यालयांतून इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंत शिक्षण विनामूल्य दिले जाते. प्रत्येक विद्यालयात ग्रामीण भागातील पंच्चाहत्तर टक्के विद्यार्थ्यांना व नागरी भागातील पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.  प्रत्येक तुकडीत एकूण विद्यार्थिसंख्येच्या एकतृतीयांश प्रवेश मुलींसाठी राखून ठेवलेला आहे. वर्गीकृत जातिजमातींच्या विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. विद्यालयात प्रवेश देताना चाचणी परीक्षा घेऊनच प्रवेश दिला जातो. इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून आणि त्यानंतरचे शिक्षण इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून दिले जाते. आंतरभारतीची एकात्मतेची कल्पना विद्यार्थ्यांच्या ठायी निर्माण व्हावी, म्हणून या विद्यालयातील वीस टक्के विद्यार्थी इयत्ता आठवी नंतर भारताच्या  इतर राज्यांमध्ये विनिमय तत्वावर पाठविण्याची नावीन्यपूर्ण कल्पना या विद्यालयांच्या स्थापनेमागे आहे. भारतीय संस्कृती, मूल्यसंस्कार, साहसी उपक्रम, शारीरिक शिक्षण इ.  विषयांवर विद्यालयातील अध्यापनामध्ये भर देण्यात आलेला आहे.

प्रशासनव्यवस्था व आर्थिक साहाय्य :  विद्यालयाचे  प्रशासन हा व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. शालेय व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि प्रशासन (ॲड्‌ मिनिस्ट्रेशन) या दोन संकल्पनांत मात्र थोडा फरक आहे. उपलब्ध वेळ या सर्व गोष्टी विचारात घेऊन उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करावयाचे नियोजन म्हणजे  शालेय व्यवस्थापन होय.  शालेय प्रशाकनामध्ये संस्थेच्या ताब्यात असलेल्या सर्व बाबींची देखभाल व आर्थिक व्यवस्थापन याला जास्त महत्त्व असते. यशस्वी प्रशासनासाठी मुख्याध्यापकाजवळ प्रभावी व्यक्तिमत्त्व, नेतृत्वगुण, संभाषणकौशल्य, वक्तृत्वकौशल्य, लेखनकौशल्य व अध्यापनकौशल्य हे व्यक्तिगत गुण असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकाचे कार्य हे बहुविध स्वरूपाचे असते. अध्यापक म्हणून स्वतःचे अध्यापनकार्य व त्याचबरोबर स्वयंविकास, शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन, सहशालेय कार्यक्रमांची आखणी, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची योग्य दखल घेऊन त्यांच्या  प्रगतीचे दिग्दर्शन, त्यांच्या आरोग्याची व अन्य सुविधांची देखभाल, शिक्षकांना अध्यापनात मार्गदर्शन, विद्यार्थी, शिक्षक, अन्य कर्मचारी यांच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देण्याचा विधायक प्रयत्न, अध्यापन व परीक्षा यांसंबंधीचे पर्यवेक्षण, शालेय आर्थिक व्यवहारावर दक्षतापूर्वक देखरेख, शाळा व समाज यांच्यातील सातत्यपूर्ण सहकार्याचा दृष्टीकोण व त्यासंबंधीची कार्यवाही अशी अनेक कार्ये मुखाध्यापकाने पार पाडणे अपेक्षित असते. शाळेचे सर्वसाधारण वातावरण प्रेरक, प्रसन्न मूल्याधिष्ठित, जिव्हाळ्याचे व आश्वासक ठेवले गेले, तरच शाळेतील विद्यार्थींच्या बेशिस्तीचे प्रश्न फारसे उपस्थित होत नाहीत. विधायक, प्रोत्साहक व आस्थापूर्ण प्रशासनाचा (रूल बाय लव्ह) दृष्टिकोण बाळगल्यास शाळेवरील नियंत्रण मुख्याध्यापकास योग्य रीतीने ठेवता येते.

विद्यालयांना मिळणाऱ्या अर्थसाहाय्यात कालानुरूप विविध बदल होत गेले.  प्राचीन भारतात गुरूकुलपध्दती रूढ असताना गुरूंना मिळणारे अर्थसाहाय्य हे गुरूदक्षिणेच्या रूपाने मिळत असे. शिष्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार गुरूदक्षिणेचे स्वरूप ठरत असे. पेशवे काळातही राज्यकर्त्यांनी दक्षिणा वाटण्याची प्रथा चालू ठेवली होती. ब्रिटिश अमदानीत सु. १८५५ साली शाळांना अनुदान देण्याची प्रथा सुरू झाली. शिक्षणसंस्थांना विद्यार्थ्यांकडून शुल्करूपाने (काही प्रमाणात) उत्पन्न मिळत असे. तथापि सेवा व त्याग यांवर चालणाऱ्या खाजगी शिक्षणसंस्थांची आर्थिक स्थिती मात्र फार हलाखीची असे. शिक्षण खात्याकडून मिळणारे अनुदान शाळांचे खर्च भागविण्यास अपुरे पडे. जनतेकडून ठेवा घेऊन संस्थांना आर्थिक कारभार चालवावा लागे. पुढे सरकारी नियम जारी होऊन शिक्षक-सेवकांचे ठरावीक पगार देणे विद्यालयांना सक्तीचे होऊ लागले. विद्यार्थ्यांचे शुल्क त्या प्रमाणात वाढविण्यास महाराष्ट्र शासनाने निर्बंक घातले आणि शाळांना अनुदान देण्याच्या सूत्राची फेररचना केली. या नवीन सूत्रानुसार शासनाने शालेय सेवकांच्या मान्य वेतनासाठी शंभर टक्के वेतन–अनुदान, अनुशेय असलेल्या मागील वर्षाच्या इमारत-भाड्यावरील खर्च व कर आणि बारा टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत अनुदानपात्र बाबींवरील मागील वर्षाचा संपूर्ण खर्च असे आर्थिक साहाय्य देण्यास सुरुवात केली. उच्च माध्यमिक वर्गासाठी नेमलेल्या  शिक्षकांचे  वेतन-अनुदान  व कला, वाणिज्य शाखेच्या प्रत्येक तुकडीस रु. २,००० व विज्ञान शाखेच्या प्रत्येक तुकडीस रु. २,४०० पर्यंतचे अनुदान संमत करण्यात आले (१९७५-७६ पासून आजतागायत). प्राथमिक शाळांतील सेवकांचे वेतन-अनुदान व इतर मान्य खर्चावर काही प्रमाणात अनुदान अशा प्रकारचे अर्थसाहाय्य, काही बदल करून, देण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींकडून शाळांना मिळणाऱ्या देण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींकडून शाळांना मिळणाऱ्या देणग्या हा शाळेच्या आर्थिक साहाय्याचा अजूनही फार मोठा आधार आहे. शासनाने मान्य केलेल्या ‘विकास-निधी’च्या रूपानेही काही आर्थिक साहाय्य शाळेस मिळते. विना-अनुदान तत्वावर चालणाऱ्या शाळांना मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि पालकांकडून मिळणाऱ्या देणग्या यांवरच आपला  आर्थिक व्यवहार चालवावा लागतो.

संदर्भ : 1. Aggarwal, J. C. Progress of Education in Free India: Moder Indian Education and its Pronlems, Its Problems, New Delhi, 1977.

           2. Chakravarty, S. R. Audio-Visual Aids in Education, Delhi, 1977.

           3. Govt. of Maharashtra, Directorate of Educaton, Education at a Glance, Pune, 1983.

          4. Mookerji, R. K. Ancient Indian Education, Delhi, 1974.

          5. Thomas, T.M . Indian Educational  Reforms in Cultural Perspective, New Delhi, 1970.

         ६. डांगे, चंद्रकुमार, शैक्षणिक समस्या, पुणे, १९६३ .

         ७. सोहनी, गो. प्र. अध्यापन पद्धतीची मूलतत्वे, पुणे, १९६३.

अकोलकर, ग. वि. गावडे, प्र.ल.