पार्कर, फ्रॅन्सिस वेलँड : (९ ऑक्टोबर १८३७ – २ मार्च १९०२). अमेरिकेतील प्रगमनशील शिक्षणाचा पुरस्कर्ता. जन्म मॅसॅचूसेट्स संस्थानात बेडफोर्ड येथे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने अध्यापनाचे कार्य सुरू केले. १८६१ साली सुरू झालेल्या अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळी त्याने सैन्यात प्रवेश केला. तेथे त्यास ले. कर्नल या पदापर्यंत बढती मिळाली. सैन्यातून परतल्यावर ओहिओ राज्यातील डेटन येथे त्याने शिक्षकाची नोकरी केली. १८७२-७५ ही तीन वर्षे त्याने यूरोपचा प्रवास केला. जर्मनीमध्ये हर्बर्ट याच्या शिक्षणातील पंचपदीचा अभ्यास केला, फ्रबेल याच्या बालवाटिकांच्या कार्याचे अवलोकन केले व रिटर याच्या भूगोल अध्यापनाच्या नव्या पद्धतींचे परिशीलन केले. यूरोपहून परतल्यावर १८७५ – ८० क्विन्सी (मॅसॅचूसेट्स) येथील शाळेत प्रमुख. तेथेच त्याने प्रगमनशील शिक्षणाची चळवळ सुरू केली. १८८०-८३ शाळेत पर्यवेक्षक, १८९९ साली शिकागो येथील शिक्षणसंस्थेचा प्रमुख म्हणून नेमणूक. याच संस्थेमध्ये जॉन ड्यूई हे त्याचे सहकारी होते. सदर शिक्षणसंस्था शिकागो विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचा प्रमुख भाग बनली.

प्रगमनशील शिक्षणाच्या चळवळीत पार्कर याने पुढील गोष्टींचा पुरस्कार केला : (१) अध्ययन – अध्यापन प्रक्रियेने सामाजीकरण : बालकाच्या सामाजिक विकासाकडे अधिक लक्ष देण्यावर भर. (२) कृतियुक्त अध्ययन –केवळ ऐकणे आणि पाहणे यांपेक्षा कृतिद्वारा केलेल्या अध्ययनावर अधिक भर देणे. (३) अध्यापनाच्या पद्धती औपचारिक असण्यापेक्षा अनौपचारिक असणे : अध्ययन हसतखेळत व्हावे. (४) अभ्यासक्रमामध्ये विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांचा समावेश करणे. (५) शाळेमध्ये कडक शिस्तीला वाव न देणे.

पार्कर याच्या लिखाणामुळे अध्यापन प्रक्रियेबाबतचा पारंपरिक दृष्टिकोण बदलला व अभ्यासक्रमही अधिक आधुनिक झाला. अध्ययनपद्धती व भूगोल या विषयांवर पार्कर याने बरेच ग्रंथलेखन केलेले आहे. पार्करचे शिकागो येथे निधन झाले.

संदर्भ : (1) Curtis, S.J. Boultwood, M.E.A. Morris, Charles, A Short History of Educational Ideas, London, 1961. (2) Good, H.G.A. History of Americal Education, New York, 1962.

गोगटे, श्री.ब.