स्त्रीशिक्षण, भारतातील : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, त्यावरून ठरते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी :वेदकाळ : भारतात वेदकाळी स्त्रियांना मान होता त्यांना मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण मिळत असे व उपनयनाचा अधिकार होता. उपनयनानंतर त्यांच्या अध्ययनास सुरुवात होई. ब्रह्मवादिनी व सद्योद्वाहा असे विद्यार्थिनींचे दोन प्रकार होते. ब्रह्मवादिनी मुली आजन्म ब्रह्मचर्य पाळून वेदविद्येचा व ब्रह्मविद्येचा अभ्यास करीत. पठणाशिवाय स्वतंत्र लेखनही त्या करीत. लोपामुद्रा, विश्ववारा व घोषा या विदुषींनी रचलेल्या ऋचा ऋग्वेदा त आढळतात. ब्रह्मयज्ञाच्या वेळी केल्या जाणार्‍या तर्पणात सुलभा, मैत्रेयी, गार्गी व वाचक्नवी या विदुषी स्त्रियांचीही नावे आढळतात. याज्ञवल्क्य यांची पत्नी मैत्रेयी आत्म-ज्ञानविषयक जिज्ञासेबद्दल प्रसिद्ध होती. विदेह जनकाच्या राजसभेत जी आध्यात्मिक चर्चा चाले, तिच्यात गार्गी प्रमुख होती. तिने एका प्रसंगी याज्ञवल्क्यालाही वादात कुंठित केले होते. ब्रह्मवादिनी पुरुषांप्रमाणेच अध्यापनाचा व्यवसाय करीत. त्यांना उपाध्याया किंवा आचार्या अशी संज्ञा होती.

सद्योद्वाहा विद्यार्थिनी सोळाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेऊन मग अनुरूप पतीशी विवाहित होत. गृहस्थाला पत्नीवाचून यज्ञाचा अधिकार नसे. यज्ञात पत्नीचा फार महत्त्वाचा वाटा असे. सामवेदातील ऋचा गाणे, यज्ञीय तांदूळ कुटणे, यज्ञीय पशूंना स्नान घालणे, यज्ञवेदीच्या विटा रचणे इ. कामे तिलाच करावी लागत. पती परगावी गेला असता पत्नीला यज्ञकर्म करण्याची परवानगी होती. सीतायज्ञ, रुद्रबल, रुद्रयाग यांसारखे यज्ञ फक्त स्त्रियांनीच करावयाचे असत. याचा अर्थ स्त्रीशिवाय गृहस्थाला गृहस्थपणच येत नसे. स्वतंत्र व सुबुद्ध स्त्रिया आपल्या अपत्यांच्या सर्वश्रेष्ठ गुरू समजल्या जात. हजार शिक्षकांपेक्षा पिता श्रेष्ठ गुरू व पित्यापेक्षा हजार पटींनी माता श्रेष्ठ गुरू समजावी, अशा अर्थाचे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. वैदिक काळात सुरू झालेली स्त्रीशिक्षणाची उच्च परंपरा त्यानंतरच्या रामायण-महाभारत काळात टिकून होती. तसेच बौद्ध-जैन धर्मांच्या प्रारंभीच्या काळातसुद्धा स्त्रियांना शिक्षणाच्या क्षेत्रात मानाचे स्थान होते. सूत्रकालापर्यंत स्त्रियांची ही स्थिती होती मात्र त्यानंतर त्यांचा सामाजिक दर्जा खालावला आणि पुरुषवर्गाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. स्त्रियांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लोप पावले. त्यांना यज्ञकर्म व वेदपठण यांबाबतीत अनधिकारी ठरविण्यात आले. सूत्रकालात वैदिक धर्माचे एकसूत्री व समानदर्शी स्वरूप नष्ट होऊन त्याला क्लिष्ट, उथळ व निव्वळ कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त झाले.

स्मृतिकाळ : ( इ. स. ४०० — १०००) स्मृती निरनिराळ्या काळांत रचल्या गेल्या आहेत. त्यांपैकी काही ( गौतम, आपस्तंब, मनु ) पहिल्या–दुसर्‍या शतकांत रचल्या गेल्या. त्यातील त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण पुरुषांच्या भोगेच्छापूर्तीचे एक साधन एवढाच मर्यादित होता. मुलींच्या दृष्टीने ते अंधारयुग होते. या काळात स्त्रियांवर अनेक निर्बंध लादले गेले. मुलींचे उपनयन नाममात्र होई. याज्ञवल्क्यांसारखे स्मृतिकार त्याहीविरुद्ध होते. वेदकाळी यज्ञ करणारी, वेदसूक्त रचणारी व ब्रह्मवादिनी म्हणून गौरविली गेलेली स्त्री स्मृतिकाळात अविद्या ठरली. मनू म्हणतो — पिता रक्षति कौमार्ये भर्ता रक्षति यौवने। रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमअर्हति॥ (मनु. ९.३) तथापि अशा प्रतिकूल कालातही उच्चभ्रू कुटुंबातील मुलींना, विशेषतः राजघराण्यातील मुली, सरदार-सरंजामदारांच्या मुली आणि गणिका व तत्सम महिला यांना, शिक्षकांकरवी शिक्षण मिळत असे. अशा काही सुविद्य कवयित्रींनी धर्मशास्त्र-तत्त्वज्ञानादी विषयांचा व्यासंग करून काव्यनिर्मिती केली. या काळातील रेवा, रोहा, माधवी, अनुलक्ष्मी, पहई, बद्धवही आणि शशिप्रभा या सात कवयित्रींचा उल्लेख हालाच्या गाथासप्तशतीमध्ये आढळतो. यांशिवाय काही संस्कृत स्तबकांत शीला–भट्टारिकांसारख्या काही विचक्षण कवयित्रींचा संदर्भ मिळतो. या काळात गुजरातमधील देवीनामक कवयित्री प्रसिद्ध होती, तर विययांकाची ख्याती राजशेखराने वर्णिली असून तिची तुलना सरस्वतीदेवीबरोबर केली आहे. राजशेखराची क्षत्रिय पत्नीसुद्धा संवेदनक्षम कवयित्री होती. कौमुदी-महोत्सव नाटकात पाटलीपुत्र येथील राजकीय क्रांतीचे दृश्य आहे त्या नाटकाची लेखिका तेथील राजदरबारातील सरदारीण आहे. आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्या वादविवादात मंडनमिश्र यांची पत्नी भारती न्यायकर्ती होती. त्यावरून ती धर्मशास्त्र, पूर्व व उत्तर मीमांसा, वेदान्त वगैरेंची ज्ञाती असली पाहिजे. या काळातील रूसानामक विद्वान स्त्रीने वैद्यकशास्त्रावर, विशेषतः स्त्रीरोगांवर, अत्यंत अभ्यासपूर्ण असा ग्रंथ लिहिला. त्याचा अनुवाद पुढे खलिफा हारुणच्या आज्ञेवरून अरबीत करण्यात आला. गुप्तकाळात ( सु. ३०० — ५५०) उच्चभ्रू समाजातील मुलींना संगीत, चित्रकला, नृत्य, संभाषणादी कलांचे शिक्षण खास दरबारी शिक्षकांकरवी व मुख्यत्वे गणिकांद्वारे दिले जाई. या काळातील काही शिक्षिकांची नावे आढळतात. त्यांत बृहन्नडा, गणदास आणि हरिदत्त हे प्रमुख अध्यापक होते. कामसूत्रात वात्स्यायन चौसष्ट कलांचे शिक्षण मुलींना देण्याविषयी सांगतात. गणिकांच्या अभ्यासक्रमात त्यांचा अंतर्भाव ते करतात. या काळातील नाटकांतील नायिका आणि त्यांच्या दासी या सुशिक्षित असत. त्या वादविवादातही सहभागी होत. दरबारात नृत्यशिक्षक असे, तिला अधिकार्‍याचा दर्जा असे. प्रभावती गुप्ता (चौथे शतक ), विजयभट्टरिका ( सातवे शतक  ), सुगंधा आणि दिड्डा (अकरावे शतक ) या राजस्त्रियांनी अनुक्रमे वाकाटक, चालुक्य व काश्मीर येथील सत्तास्थाने पतीच्या निधनानंतर कार्यक्षम रीत्या सांभाळली. त्या उत्तम प्रशासक असून सुविद्य होत्या. कर्नाटकात कल्याणी चालुक्यांच्या कारकिर्दीत (९८० — ११६०) राज्यपाल, प्रांताधिकारी व अधिकारी म्हणूनही काही उच्च-विद्याविभूषित राण्या व राज्यकन्या कार्यरत असल्याचे दाखले तत्कालीन कोरीव लेखांतून मिळतात.

मध्ययुग : मुसलमानी अंमलात ( अकरावे ते सतरावे शतक ) स्त्री- शिक्षणाची पीछेहाट भारतीय समाजाचे अर्धे अंग विकल करून गेली. या काळात स्त्रियांच्या शिक्षणाबाबतीत विशेष प्रयत्न झाले नाहीत मात्र बाबर बादशाहाची कन्या गुलबदन बेगम हिने हुमायूननामा हा ग्रंथ लिहिला. तो एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरला. शाहजहानची मुलगी जहांआरा, हिने तत्कालीन मुस्लिम साधूंची माहिती मुस्लिम अल्-अर्वाह या शीर्षकार्थाने संग्रहित केली, तर औरंगजेबाची मुलगी झीबुन्निसा हिने ‘ मुखफी ’ ( दडलेली ) या नावाने उर्दू कविता केल्या. या शाही घराण्या-तील काही उच्चभ्रू स्त्रिया सोडल्या, तर एकूण या काळात स्त्रिया शिक्षणापासून वंचितच राहिल्या. या काळी मात्र राजपूत महिलांत काही विधवा राण्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन करून मुस्लिम शत्रूबरोबर लढाया केल्याची उदाहरणे आढळतात. त्यांपैकी कुमारदेवी ( मेवाड ), कर्णवती ( चितोड ) व जवाहिराबाई या कुशल प्रशासक असून त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले होते. इतिहासकालीन भारतामध्ये राजपूत स्त्रियांनी युद्धकलेचे शिक्षण घेतल्याचे पुरावे आहेत. मराठ्यांच्या राजघराण्यांतील स्त्रियांनीही युद्धकला आणि राज्यकारभार यांतील रीतसर शिक्षण घेतल्याचे दिसून येते. झांशीची राणी लक्ष्मीबाई, कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई, इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांची उदाहरणे प्रसिद्ध आहेत. १८१८ मध्ये पेशवाईचा अंत झाल्यावर आणि इंग्रजांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर वैचारिक क्रांती होऊन या सर्वांत बदल झाला.

आधुनिक काळ : मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (कार.१८१९—२७) याच्या प्रयत्नामुळे मुंबई व पुण्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना झाली (१८२१ ) आणि स्त्रीशिक्षणाचाही प्रारंभ याच्याच राजवटीत झाला.१८२४ मध्ये अमेरिकन मिशनर्‍यांनी मुंबईतील भायखळा येथे एतद्देशीय मुलींकरिता एक स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील या मुलींच्या पहिल्या शाळेत सु. ३०० मुली शिक्षण घेऊ लागल्या. त्यास धर्ममार्तंडांचा मोठा विरोध होता. १८४९ पर्यंत सरकारी धोरण मुलींच्या शिक्षणाबाबत तटस्थपणाचे होते मात्र लॉर्ड डलहौसी याने स्त्रीशिक्षणाबाबत स्वतः लक्ष घातले आणि बंगालच्या शिक्षण मंडळासही या कामी लक्ष घालण्याची विनंती केली. दादाभाई नवरोजी तर या वेळी स्त्रीशिक्षणासाठी एक प्रमुख आधारस्तंभ होते. नवरोजी यांनी २१ ऑक्टोबर १८४९ रोजी ‘ स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ’ या संस्थेच्या वतीने मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा सुरू केल्या. त्या वेळी सु. ४४ मुली तेथे शिकत होत्या आणि शिक्षकही विनामूल्य काम करीत होते. पॅटन व रिड यांनी मुलींसाठी उपयुक्त पुस्तके लिहिली. त्या वेळचे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड, सर मंगलदास नथुबाई, भगवानदास पुरुषोत्तमदास यांचा विद्यार्थ्यांनी आरंभलेल्या स्त्रीशिक्षणाच्या चळवळीस पूर्ण पाठिंबा होता. पुढे ही चळवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता मुंबईबाहेर इतर प्रांतांत पसरली. या चळवळीत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. महात्मा फुले यांनी पुण्यात एक मुलींची खाजगी शाळा सुरू केली (१८४८). त्यापूर्वी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिक्षण दिले. सावित्रीबाई मुलींना शिकविण्याचे काम करीत. सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे बहुजन समाजाचे हे जोडपे आणि त्यांचे कार्य त्या वेळच्या काळात संस्मरणीय आहे. फुले यांनी १८५१  मध्ये पुण्यातील रास्ता आणि वेताळ पेठांत मुलींच्या आणखी दोन शाळा काढल्या. सावित्रीबाई यांनी शिक्षिकेचे व्रत अंगीकारून पतीच्या कार्यात पूर्ण सहकार्य दिले. स्त्री- शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचे नाव संस्मरणीय ठरेल.

मेरी कार्पेंटर यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी शाळा सुरू केल्या (१८७१ ). त्यानंतरच्या दहा वर्षांत शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि मॅट्रिकच्या परीक्षेच्या निकालात मुलींचेही नाव चमकू लागले. १८७५ च्या सुमारास रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत लिहिणे, वाचणे, इंग्रजी शिक्षण घेणे अशा गोष्टी मोठ्या धैर्याने केल्या. याच सुमारास पंडिता रमाबाई या विदुषी पुण्यास आल्या आणि त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली (१८८२). स्त्रियांवरील अत्याचार, त्यांच्याबद्दल समाजात असलेली उदासीनता आणि तिला मिळणारी हीन वागणूक यांमुळे राजा राममोहन रॉय यांचे हृदय पिळवटून गेले होते. त्यामुळे रॉय यांनी १८२८ मध्ये सतीच्या भयंकर चालीवर हल्लाबोल केला. अखेर ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीची चाल बंद करणारा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक याने केला. सनातन हिंदू मनाला राजा राममोहन रॉय यांचे वागणे जरी आवडले नसले आणि त्यांचा तीव्र विरोध या कामी असला, तरी राजा राममोहन रॉय यांच्या स्त्री- सुधारणाविषयक धोरणाचा सर्व देशभर अतिशय चांगला प्रसार झाला आणि त्यांना विद्वज्जनांचे उत्तम सहकार्य लाभले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र स्त्रीशिक्षणाचा विस्तार झपाट्याने होऊ लागला. १८५४ मध्ये उच्च शिक्षण इंग्रजीतूनच घेण्याचा पायंडा होता.  १८५७ मध्ये मुलींची शाळांमधून हजेरी वाढली आणि १८७०-७१  मध्ये स्त्रीशिक्षणाला बराच जोर येत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲडम- साहेबांनी प्रकाशित केलेल्या जनगणना वृत्तामध्ये २१ ,९०७ पुरुषांमध्ये फक्त ४ साक्षर स्त्रिया असे प्रमाण दिसून येते मात्र हिंदू ज्ञातींमधील मुलींना देशी शाळांमधून शिक्षण देण्याच्या प्रक्रियेला हळूहळू निश्चितपणे सुरुवात झाली होती. १ ८८२  मध्ये प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या १,२४,४९१  इतकी होती. हे सुधारणांचेच द्योतक होते. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाठ-पुरावा केला. हे समाजमनाच्या विरुद्ध असले, तरी त्यांनी आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले. १८७० मध्ये पुण्याला विमेन्स ट्रेनिंग कॉलेज सुरू झाले. याच काळात समाजसुधारकांच्या मनात सहशिक्षणाची मुहूर्त-मेढही रुजली आणि वाढली. मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी खास वेगळा अभ्यासक्रम आखण्यात आला. 

१९०६ मध्ये मुलींसाठी मोठ्या मेहनतीने तयार केलेली क्रमिक पुस्तकेही नेमली गेली. १८८२ — १ ९०२ या कालखंडाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे मुलींनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीत हळूहळू पण खंबीरपणे स्त्रीशिक्षण प्रगतिपथावर होते. १८८१  मध्ये केवळ ६ मुली उच्चशिक्षण घेत होत्या, तेथे २६४ पर्यंत ही संख्या वाढली. आर्ट्स कॉलेज, मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ एज्युकेशन, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अशी विविधांगी प्रगती झाली.

१८८१ – ८२  ते १९०१ – ०२  मधील स्त्रीशिक्षणाची उत्तरोत्तर प्रगती पुढीलप्रमाणे होती, असे दिसून येते.

शाळा 

मुलींसाठी असणार्‍या शिक्षणसंस्था 

सर्व शिक्षणसंस्थांतील मुलींची संख्या 

प्राथमिक शाळा 

   

१८८१ – ८२ 

३२६ 

१९,९१७ 

१८८६ – ८७ 

४७८ 

४४,२५३ 

१८९१ – ९२ 

६७७ 

६३,१५५ 

१८९६ – ९७ 

७४४ 

६७,४४० 

१९०१ – ०२ 

७६८ 

७६,०६८ 

दुय्यम शाळा 

   

१८८१ – ८२

२३ 

,५८१ 

१८८६ – ८७

५१ 

,९२१ 

१८९१ – ९२

५८ 

,०७० 

१८९६ – ९७

६३ 

,३८८ 

१९०१ – ०२

६७ 

,९८४ 

इ. स. १९०१ -०२  मध्ये व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्याएकूण ३४५ होती. पैकी ५ वैद्यकीय शाखेमध्ये, २० कला शाखेमध्ये,७६ औद्योगिक विद्यालयात, १० चित्रकलेच्या वर्गात आणि २३४ शिक्षकांच्या अध्यापनशाळांतून शिक्षण घेत होत्या. 


विसाव्या शतकाच्या आरंभी स्त्रीशिक्षणात बरीच सुधारणा झाली असे म्हणण्यास हरकत नाही. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई येथे मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुला-मुलींच्या अभ्यासांत फरक नव्हता पण अलाहाबाद आणि लाहोर येथे मुलांना संस्कृत आणि मुलींना हिंदी अथवा यूरोपियन भाषा यांपैकी एक निवडायची मोकळीक होती. मद्रास येथे मुलींना सक्तीचे विषय मुलांप्रमाणेच असले, तरी ऐच्छिक विषयांमध्ये शिवणकाम, गृह अर्थशास्त्र अशा विषयांचा अंतर्भाव असे. मुंबईत इंग्रजीच्या माध्यमिक शाळांत बीजगणिताऐवजी शास्त्राचा इतर कोणताही भाग घेता येत असे.स्वामी विवेकानंद यांनी सर्वार्थाने आपले डोळे उघडतील असे शिक्षण स्त्रियांना मिळावे, असे प्रतिपादन केले. मुलींना ज्यायोगे स्फूर्ती मिळेल, जीवन यशस्वी करावयाचा मार्ग गवसेल अशी जीवनचरित्रे — उदा., सीता-सावित्री, दमयंती, लीलावती इत्यादी — वाचायला द्यावीत, असेही त्यांना वाटे. आधुनिक काळात शास्त्राच्या साहाय्याने मुलींनी अभ्यास करावा, अशी त्यांची अपेक्षा होती. सांस्कृतिक आणि नैतिक अधिष्ठानाची जपणूक त्यांना मुलींच्या शिक्षणात महत्त्वाची वाटे. स्त्रीजीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा या संदर्भात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, विल्यम वेडरबर्न व अन्य समाजसुधारकांचा मोठा वाटा आहे. अज्ञान नाहीसे करणे, अंधश्रद्धेचा नायनाट करणे, स्त्रीबाबत असलेल्या जुलमी रूढींचे उच्चाटन करणे ह्यांबाबत ते आग्रही होते. १८८३ मध्ये ‘ महाराष्ट्र फिमेल स्कूल ’ या नावाने त्यांनी शिक्षण संस्थेची नोंदणी केली. १९०९ मध्ये सयाजीराव गायकवाड त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्याअगोदर आबासाहेब घाटगे संस्थेचे अध्यक्ष होते. सयाजीराव महाराज यांनी ‘ महाराणी गर्ल्स हायस्कूल अँड ट्रेनिंग कॉलेज ’ या संस्थेमधून बडोदे संस्थानात स्त्रीशिक्षणाचे महान कार्य केले. पुण्यातील ‘ हुजूरपागा ’ ही मुलींसाठी एक सुसंस्कृत शिक्षणसंस्था फार नावारूपास आली. त्यात आगरकर यांचा सिंहाचा वाटा होता. १९१५ पासून मुलींसाठी विविध शिक्षणसंस्था सर्वदूर निघू लागल्या. २  ऑक्टोबर १९०९ रोजी रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने पुणे येथे ‘ सेवासदन ’ संस्थेची स्थापना झाली. स्त्रियांची धर्म, जाती आणि वर्णद्वेषविरहित सर्वांगीण उन्नती हेच संस्थेचे उद्दिष्ट होते. स्त्रीचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रकार्यास उपयोग हा संस्थेचा ध्यास होता. त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेण्यासाठी  स्त्रियांना प्रवृत्त केले. हा एक अभिनव उपक्रम होता. संस्थेला ऊर्जित अवस्था आल्यावर १९१४ मध्ये स्वतःची इमारत घेता आली. १९६६ अखेर सेवासदनाच्या स्त्रिया सर्वदूर ख्याती पावल्या. शिवणकला, शिक्षिका, परिचारिका, महिला डॉक्टर्स, प्रौढशिक्षण अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांना स्वावलंबी करण्यात सेवासदन संस्थेचा उल्लेखनीय वाटा आहे. 

पंडिता रमाबाई यांनी विधवांच्या उन्नतीसाठी मुंबईला ‘ शारदा सदन ’ ही संस्था काढली (मार्च १८८९). मुंबई आणि महाराष्ट्र हे आपले कार्यक्षेत्र निवडून त्यांनी विधवांच्या शिक्षणाचे कार्य हाती घेतले. लोकांमध्ये विश्वास उत्पन्न करीत, त्यांनी हे काम पुणे जिल्ह्यात केडगाव येथे चालू केले. विधवांच्या शिक्षणासंबंधी कलकत्ता, मद्रास येथेही काम चालूच होते. विधवांना आश्रय देऊन शिक्षण देण्याचे काम मद्रासमध्ये रा. ब. वीरेशलिंगम् पंतलू , तर कलकत्त्याजवळील बरानगर येथे बाबू शशीपाद बॅनर्जी यांनी  मोठ्या धीराने केले. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे एका लहानशा झोपडीत अनाथ बालिकाश्रमाची सुरुवात केली (जून, १९००). त्यांनी त्यासाठी अतोनात कष्ट केले. स्त्रीजीवनाविषयी मनापासून सहानुभूती बाळगणार्‍या कर्वे यांनी त्यांची पहिली पत्नी निवर्तल्यावर पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील आनंदीनामक एका विधवेशी पुनर्विवाह केला (१८९१). मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीन असणार्‍या समाजात कर्वे यांचे काम अतुलनीय आहे. १९१६ मध्ये भारत-वर्षीय महिला विद्यापीठ स्थापण्यासाठी पुढाकार घेणे हे फार मोठे काम होते आणि या कामास कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांचाही पाठिंबा कर्वे यांना मिळाला. ‘ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विमेन्स युनिव्हर्सिटी ’ हे या संस्थेचे बदललेले नाव सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या भरघोस देणगीमुळे देण्यात आले.  

 

स्त्रीशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या अनेक नामवंत संस्थांमध्ये ‘ शारदासदन ’ ही आर्यन एज्युकेशन सोसायटीची १८९७ मध्ये मुंबई येथे निघालेली संस्था, माणेकजी फुरसेतजी यांनी काढलेली अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन, लेडीज होम क्लास ही मनुताई बापट यांची संस्था, मालवण येथील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळा ( १९११ ),आबासाहेब देसाई यांचे नागपूर येथील सुळे महिला विद्यालय ( सोनूताई सुळे, द्वारकाबाई प्रधान यांची संस्था ), श्राविका ज्ञानपीठ, सोलापूर ( संस्थापक — सुमतीबाई शहा, १९१२ ), छत्रपती राजर्षी शाहू महाराजां-कडून प्रेरणा घेऊन कोल्हापूर येथे १९४५ मध्ये सुरू झालेले महाराणी ताराराणी विद्यापीठ अशी काही उदाहरणे प्रामुख्याने देता येतील. 

स्त्रीशिक्षणाचा १८५७ — १९५८ पर्यंतचा कालखंड लक्षात घेता शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार पांढरपेशा वर्गापुरता मर्यादित न राहता बहुजन समाजापर्यंत पोहोचला, ही स्त्रीशिक्षणाच्या प्रगतीची हिंदुस्थानातील महत्त्वाची घटना होय. मद्रास, मुंबईसारख्या शहरांतून व बंगाल, पंजाब, आसाम अशा राज्यांतून मातृभाषेतून तसेच इंग्रजीतून स्त्रियांना शिक्षण घेता येऊ लागले, ही महत्त्वाची घटना आहे. सहशिक्षणाची सुरुवात हा क्रांतिकारी निर्णय विसाव्या शतकाच्या अगदी प्रारंभापासून सुरू झाला आणि एकविसाव्या शतकात मुलींना मुलांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेण्याची, स्वतःची प्रगती करण्याची आणि राष्ट्रासाठी उपयुक्त असे काम करण्याची संधी प्राप्त झाली. १९३५-३६ च्या काळात एम्.ए., एम्.एस्सी. अशा परीक्षांमध्ये तुरळक यश मिळविणार्‍या मुली आय्.ए.एस्. एम्.डी. एम्.एस्. पीएच्.डी अशा अत्युच्च पदव्या उच्च गुणवत्तेने बहुसंख्येने मिळवित असत.  

स्वातंत्र्योत्तर कालखंड : एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतातील स्त्रीशिक्षण क्रांतीच्या मोठ्या टप्प्यावर उभे आहे. प्रामुख्याने शहरी विभागा-पुरते मर्यादित असलेले स्त्रीशिक्षण आता ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक स्त्री शिकली की, ती सारे कुटुंब साक्षर करते, संस्कारक्षम करते, या महात्मा फुलेंच्या वचनाला स्मरून स्त्री-शिक्षणाला भारतवर्षाने प्राधान्यक्रम दिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कोठारी कमिशनने स्त्रीशिक्षणाला प्राधान्य देऊन मोठी कामगिरी बजावली आहे. स्त्रीला शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत समान संधी आहे. भारतीय अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, आहारतज्ज्ञ कमला सोहोनी, टेस्ट ट्यूब बेबीच्या जनक, इंदिरा आहुजा, भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी, लेखिका अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, गानकोकिळा लता मंगेशकर, नृत्यशारदा कनक रेळे, अभिनेत्री शबाना आझमी अशी कितीतरी उदाहरणे स्त्रियांच्या विविधांगी क्षमतेची देता येतील. ज्या देशात स्त्रीचे कर्तृत्व जगाला गवसणी घालते, त्या देशात स्त्रीचा आणि स्त्रीशिक्षणाचाही खर्‍या अर्थाने सन्मान होतो . 

बाबासाहेब आंबेडकरांनी १९५१ मध्ये हिंदू कोड बिल लोकसभेत सादर केले होते. त्यात त्यांचा स्त्रीविषयक सन्मान, उदार दृष्टिकोण आणि स्त्रीशिक्षणविषयक आस्था दिसून येते. स्त्रीला जे हवे ते शिक्षण मिळाले पाहिजे, मालमत्तेत मुलाबरोबरीची वाटणी, वारसाहक्क, घटस्फोटाचे स्वातंत्र्य, अपत्याचा ताबा, आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य, आंतरजातीय विवाहाचे स्वातंत्र्य अशा अनेक गोष्टींनी हे बिल पुरोगामी विचारसरणीचे आणि स्त्रीच्या जीवनाला माणूसपण देणारे होते परंतु परंपराप्रिय लोकांनी त्यास विरोध केला. शेवटी १९५४ मध्ये तुकड्या-तुकड्याने ते संमत झाले. स्त्री शिकली नाही, तर समाजाचा अर्धा हिस्सा पंगू राहील, असा ठाम विश्वास असलेल्या बाबासाहेबांनी आपली पत्नी रमाबाई आंबेडकर यांना लिहायला, वाचायला शिकविले आणि स्त्रीशिक्षणाची सुरुवात घरातून केली. ‘ शिका आणि संघटित व्हा , हा त्यांचा मूलमंत्र मुलांप्रमाणे मुलींनाही लागू होतो.

  

स्त्रीशिक्षणविषयक धोरणे : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्त्रीशिक्षणाच्या गरजा वाढत्या प्रमाणात पुढे आल्या. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी नेमली गेली, तिनेही स्त्रीशिक्षणावर भर दिला. स्त्रिया शिकल्या नाहीत, तर समाज अधुरा राहील, यावर राज्य-कर्त्यांचा भर होता. स्त्रियांना प्राथमिक आणि माध्यमिक व्यवसायाचे शिक्षण देणारी नॉर्मल स्कूल सरकारने काढली. याशिवाय आग्रा, लखनऊ, कानपूर येथे वैद्यकीय शिक्षणात स्त्रियांसाठी जागा राखीव ठेवल्या. शैक्षणिक आयोगाने १९४७ मध्ये अनेक शैक्षणिक सुधारणा सूचित केल्या. त्यांत स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. सहशिक्षण देणार्‍या संस्थांनी स्त्रियांना जरूर त्या सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात, हा विचार मांडला. 

दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने स्त्रीशिक्षणास अधिक प्राधान्य देण्याची शिफारस केली होती (१९५८). मुलींचे शिक्षण मुलांच्या बरोबरीने व्हावे, यासाठी स्त्रीशिक्षणाचा खास विभाग भारत सरकारच्या शिक्षण खात्याने निर्माण करावा प्रत्येक राज्यात स्त्रियांचे नेतृत्व असलेल्या स्त्रीशिक्षणविषयक कमिट्या असाव्यात स्त्रीशिक्षणासाठी नियोजित रकमेपेक्षा १० कोटी रुपये अधिक खर्च करावेत आणि खेड्यांतल्या मुलींच्या शिक्षणावर सरकारने भर द्यावा, अशा महत्त्वाच्या सूचना त्यात होत्या. ‘ कमवा आणि शिका ’ या योजनेलाही येथे वाव होता. गृहशास्त्र, बालवाडी प्रशिक्षण या विषयांवरही बहु-उद्देशीय संस्था स्थापन होऊ लागल्या.  

प्रौढ साक्षरता मोहीम अंतर्गत प्रौढांना लिंगभेद, गरीब, श्रीमंत तसेच जातिभेदविरहित शिक्षण मिळू लागले. समाजशिक्षण मोहिमेचा हा सर्वांत आशाजनक भाग होता. यात सुशिक्षित स्त्रियांनी आणि पुरुषांनी फार उल्लेखनीय कामगिरी केली. भूतपूर्व मुंबई प्रांत आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र या बाबतीत आघाडीवर होता. कुसुम सयानी यांचे नाव प्रौढ साक्षरता मोहिमेत आघाडीवर होते. प्रौढांसाठी वेगळी, सोपी व सचित्र पुस्तके निघू लागली. सरोजिनी बाबर यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने चालविलेले समाजशिक्षण मालेचे कामही उल्लेखनीय आहे. 

स्त्रीशिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण, उपस्थितीसंबंधी शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, मोफत क्रमिक पुस्तके, शिक्षिकांची नेमणूक, सहशिक्षण देणार्‍या शाळांमधून मुलींवर देखरेख करणार्‍या आयांच्या नेमणुका अशा महत्त्वाच्या शिफारशी अंमलात आणल्या गेल्या. स्त्रीशिक्षणाच्या वाटचालीत अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कला आणि शिल्प, औषधशास्त्र, पशुवैद्यकशास्त्र, शेती, वनपालन, वाणिज्य, कायदा, उपयोजित कला व वास्तुशास्त्र, प्राच्यविद्या अभ्यास, समाज शिक्षण, शारीरिक शिक्षण, ग्रंथालयशास्त्र, नृत्य व गायन अशा विविध क्षेत्रांत स्त्रियांसाठी सहशिक्षणाची तरतूद झाली. 

स्त्रीशिक्षणाचे महत्त्व आता सर्वमान्य झाले आहे. स्त्रीशिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून केंद्रशासन, राज्य शासने व अन्य संस्था, संघटना इत्यादींचे सर्व स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. सर्व शिक्षा अभियान योजनेला अनुसरून २००२ व २००९ मध्ये घटना दुरुस्तीने ६—१४ वर्षे वयाच्या सर्व मुला मुलींच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा संमत झाला. केंद्र शासनाने तत्पूर्वी दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणासाठी नॅशनल प्रोग्रॅम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेव्हल ( एन्पीइजीइएल् ) हा कार्यक्रम सुरू केला असून मुलींनी प्राथमिक शाळा सोडून जाऊ नये,असे प्रयत्न या योजनांद्वारे केले जातात. तसेच महिला समाख्य योजना १९८९ मध्ये ग्रामीण भागातील मुलींच्या व्यक्तिविकासासाठी सुरू करण्यात आली. सांप्रत ही योजना दहा राज्यांतील १०४ जिल्ह्यांत कार्यरत आहे. शैक्षणिक दृष्ट्या दुर्गम व मागास भागांत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना २००९-१० मध्ये कृतीत आली आहे. जवाहर नवोदय विद्यालये ही सहशिक्षणाच्या तत्त्वावर स्थापन झालेली निवासी विद्यालये असून त्यांत किमान ३३% मुली असाव्यात असा दंडक आहे. २००९ मध्ये भारतात अशी ५७६ निवासी विद्यालये होती. २००१ च्या जनगणनेनुसार ५३.६७% प्रौढ स्त्रिया साक्षर होत्या. म्हणून केंद्र शासनाने साक्षर भारत आणि राष्ट्रीय साक्षरता अभियान यांवर २०११ मध्ये विशेष भर दिला आहे. स्त्रिया शिक्षित झाल्यास कुटुंब नियोजन, लोकसंख्येला आळा आणि बालमृत्यूंचे प्रमाण घटून कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाईल, तसेच त्यांचे सबलीकरण हाही उद्देश त्यामागे आहे. केंद्रशासनाने कस्तुरबा गांधी योजना सुरू केली असून शैक्षणिक दृष्ट्या मागास भागात मुलींसाठी निवासी शाळा असलेल्या सु. ३,५०० कस्तुरबा बालिका विद्यालयांतून २०१२ मध्ये जवळपास ३.६ लाख मुली शिक्षण घेत आहेत. 

महाराष्ट्र राज्य हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील प्रागतिक राज्य असून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेची अभिनव कल्पना महाराष्ट्रात कार्य-वाहीत आणली गेली. त्यामुळे बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा पायंडा महाराष्ट्रात प्रथम पाडला गेला. मुलींसाठी प्रत्येक तालुक्याच्या गावी वसतिगृहे बांधण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने हाती घेतला आहे. मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात १९८३-८४ दरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रशासनाने महाराष्ट्र राज्याला पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक व ढाल दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य केंद्र- शासनाचे सर्व कार्यक्रम चिकाटीने राबवीत आहे. 

विसावे शतक हे स्त्रियांच्या उत्थापनाचे शतक होते. सर्वच क्षेत्रांत स्त्रीशिक्षणासाठीचे प्रयत्न व शिक्षणाचा विकास ऊर्ध्वगामी झालेला दिसतो पण अजूनही भारतात शिक्षित स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अल्पसंख्य आहेत. स्त्रीला एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सबल पंख लाभत आहेत. स्त्रियांच्या म्हणून खास समजल्या जाणार्‍या नोकर्‍यांकडून वैमानिक, संशोधिका, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता, संगणकतज्ञ,पोलिस अधिकारी, व्यवस्थापक, संपादक, उद्योजक, प्रशासक अशा एरवी स्त्रियांना खुल्या नसणार्‍या व स्पर्धात्मक जगात सत्ता हाती असणार्‍या महत्त्वाच्या स्थानांवरही स्त्रियांचा हळूहळू प्रवेश होऊ लागला आहे. स्त्रीशिक्षणाने तिला आपली उन्नती करण्याची ऊर्जा दिली असून त्यांना पुरुषांइतकाच अधिकार प्राप्त झाला आहे. जेव्हा खेड्यांतील आणि दुर्गम भागांतील प्रत्येक मुलगी शिक्षित झालेली असेल, तेव्हा भारताची नोंद विकसनशील देश अशी न राहता विकसित देश अशी होईल. भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारत एक महासत्ता बनण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने स्त्रीशिक्षणास अग्रक्रम दिला पाहिजे. 

पहा : प्रौढ शिक्षण सर्वशिक्षा अभियान साक्षरता स्त्रीउद्योजक व कामगार.  

 

संदर्भ : 1. Agrawal, S. P. Women’s Education in India, 3 Vols., New Delhi, 2001.

          2. Altekar, A. S. The Position of Women in Hindu Civilization, Banaras, 1938.

          3. Gupta, N. L. Women Education Through the Ages, New Delhi, 2000.

          4. Kelly, G. P. Ed., International Handbook of Women’s Education, Westport, 1990.  

          5. Madhavanand, Swami Majumdar, R. C. Eds., Great Women of India, Almora,1953.

          ६. बाबर, सरोजिनी, स्त्री-शिक्षणाची वाटचाल, मुंबई, १९६८.

 

वाड, विजया