वलभी विद्यापीठ : गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील वलभी येथील एक प्राचीन विद्यापीठ. हे विद्यापीठ इ.स. सातव्या शतकात स्थापन झाले. विद्यापीठाची स्थापना व संवर्धन यांचे श्रेय मैत्रक राजांना (४६५-७७५) दिले जाते. ‘विद्येचे माहेरघर व आंतरराष्ट्रीय व्यापारबंदर’ असा वलभीचा नावलौकिक असल्याचा उल्लेख काश्मीरी पंडित सोमदेव याच्या कथासरित्सागरात व मैत्रककालीन ताम्रपटांत आढळतो. वलभी विद्यापीठात बौद्ध, जैन इ. धर्मांचे अध्यापन होत असे. पूर्व भारतातील नालंदा विद्यापीठाशी याचे साम्य असून त्या काळी त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. जैन व बौद्ध आचार्यांनी येथे धर्मप्रसारार्थ विहार बांधले. त्या काळी जैन धर्मग्रंथ लिपिबद्ध नव्हते. जैन आचार्यांनी धर्मप्रसारार्थ त्यांचे सिद्धांत लिपिबद्ध केले. वलमी येथील जैन धर्मपरिषदेत (सु. ४५४) त्यांस मान्यताही लाभली (सु. ८४ ग्रंथ). ग्रामीण उत्पन्नातून अर्थसाहाय्य व विद्यापीठास लाभलेला राजाश्रय यांमुळे जैन धर्माचे शिक्षण उपलब्ध होऊ लागले.

वलभी विद्यापीठात पाठनिर्देश व व्यावसायिक शिक्षण ह्यांना अध्यापन पद्धतीत विशेष महत्त्व होते. यांपैकी पहिल्याचा प्राथमिक शिक्षणासाठी, तर दुसऱ्याचा उच्च शिक्षणासाठी उपयोग केला जाई. विविध विषयांचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात येत असे. कला, अध्यात्मविद्या, तर्कशास्त्र, वैद्यक इ. विषयांना अध्यापनात स्थान असे. धर्मशास्त्राव्यतिरिक्त वेदांगे, इतिहास, तत्त्वज्ञान, ज्योतिर्विद्या, भूगोल, अंकगणित, धातुविज्ञान, नीतिशास्त्र, व्रत, चिकित्साशास्त्र इत्यादींचे अध्यापन केले जाई. प्राकृत व संस्कृत हे अध्यापनाचे माध्यम असे. हे शिक्षण मोफत दिले जाई.

ह्यूएन्त्संग ह्या चिनी प्रवाशाने आपल्या प्रवासवृत्तात नमूद केल्यानुसार वलभी विद्यापीठाशी संलग्न  असलेल्या १०० बौद्ध धर्मीय विहारांत सु. ६,००० अनुयायी अध्ययन करीत होते. येथील कलासंस्था व विहारस्थाने ही अध्यापनाची प्रसिद्ध केंद्रे होती. कलासंस्थांत प्रा थमिक, माध्यमिक शिक्षणासोबत उपयुक्त कला, सैनिक प्रशिक्षण बौद्धिक व शास्त्रीय अध्यापन केले जात असे. विहारांत विद्वान भिक्षू निवास करून ज्ञानदान करीत. नालंदा विद्यापीठात अध्ययन केलेले स्थिरमती व गुणमती हे वसुबंधूचे शिष्य तसेच मयूरशर्मा (३४० – ७०) हा कदंब घराण्याचा संस्थापक येथे अध्यापनार्थ येऊन त्यांनी विहारांत निवास केल्याचा उल्लेख आहे. विहारांत श्रीमंत वा गरीब अशी तफावत केली जात नसे. समान संधीचा सर्वांना लाभ होई. विहारांतील विद्यार्थ्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी असून शांतता, शिस्त इ. सर्वसाधारण आचारनियम त्यांना पाळावे लागत. ग्रंथालयाचीही विहारांत सोय होती. ग्रंथखरेदी पहिला गुहसेन ह्या राजाने दिलेल्या अनुदानाच्या रकमेतून केली जाई. विहारांत अध्ययन पूर्ण केल्यावर विद्यार्थी राज दरबारी वर्णी लावून धर्मसिद्धांत, तत्त्वज्ञान यांवरील चर्चेद्वारे आपली योग्यता सिद्ध करीत व नंतर राजदरबारातील अधिकाऱ्याच्या नोकरीसाठी प्रयत्‍न करीत, असे इत्सिंग ह्या चिनी प्रवाशाने आपल्या प्रवासवृत्तात नमूद केलेले आढळते.

मिसार, म. व्यं.