पालक शिक्षण : पाल्यास योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पालकांना आवश्यक ठरणारे शिक्षण. आधुनिक शिक्षणविचारातील ही नवीन कल्पना आहे. शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना शिस्त लागावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, शिक्षणात प्रगती व्हावी व पुढे आयुष्यातील योग्य व्यवसायाची निवड करण्यास त्यांना मार्गदर्शन लाभावे, यांसाठी आईवडिलांना काही मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते.

इंग्लंड-अमेरिकेत १८८० च्या सुमारासच पालकांच्या शिक्षणाची गरज भासू लागली. अमेरिकेत स्त्री-पालकांनी एकत्र येऊन विचारविनिमय करण्यास सुरुवात केली. या विचारविनिमयातून बालकअभ्यास संघ आणि पालक व शिक्षकांची संयुक्त राष्ट्रीय शिक्षण संघ स्थापन झाली. इंग्लंडमध्ये १८८८ साली पालकांचा राष्ट्रीय शिक्षण संघ स्थापन झाला व या संघामार्फत पालकांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळू लागले. अनेक राष्ट्रांचे लोक या संघाचे सभासद असून या संघामार्फत पालक समालोचन (म.शी.) नावाचे मासिक प्रकाशित करण्यात येते.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस पालक-शिक्षक सहकार्यास जोराची चालना मिळाली. बालवयात मुलांच्या प्रेरणांची परिपूर्ती झाली नाही किंवा त्यांचे अयोग्य रीतीने दमन झाले, तर त्याचे मानसिक दुष्परिणाम होतात व मुलांच्या भावी आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो, हा विचार फ्रॉइडने मांडला होता. हा विचार पालकांना समजावून देणे जरूरीचे होते. शालेय शिक्षणातील प्रगतीवर जीवनातील प्रगती अवलंबून असते, याची पालकांना जाणीव होऊ लागली होती तथापि विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीचा निकष म्हणजे परीक्षेतील गुण नव्हेत. अशा प्रगतीची काळजी केवळ शिक्षकांनी घ्यावी, असा विचार पालक मांडू लागल्यावर बालकांच्या शालेय प्रगतीत शाळा आणि कुटुंब या दोहोंचा वाटा असतो, हे पालकांना समजावून सांगण्याची आवश्यकता भासू लागली. मुलांच्या मूलभूत गरजांचा अभ्यास प्रगत झाल्यानंतर १९२९ च्या सुमारास इंग्लंड व अमेरिकेत शेकडो शिक्षक –पालक संघ स्थापन झाले व त्यांची राष्ट्रीय मंडळे अस्तित्वात आली.

पालकशिक्षणाची प्रत्यक्ष तरतूद केवळ अमेरिकेत विशेष झालेली दिसते. तेथे अनेक विद्यापीठांत पालकशिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यांत बालमानसशास्त्र, लैंगिक शिक्षण, शिस्त, व्यक्तिविकास इ. विषयांचा समावेश होतो. यांशिवाय बालचिकित्सालये, कुटुंबसल्लामसलत केंद्रे, अशा संस्थांकडूनही पालकशिक्षणाचे वर्ग चालविले जातात. त्या ठिकाणी पालकांना त्यांच्या विशिष्ट समस्यांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यास येते. औपचारिक वा अनौपचारिक प्रौढशिक्षणाच्या कार्यक्रमांतर्गतही पाल शिक्षणाचे वर्ग चालविले जातात. शिक्षणाचा आकृतिबंध बदलला, एखादा नवा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला, मूल्यमापनाची तंत्रे बदलली, तर या बदललेल्या गोष्टींची पालकांना जाणीव करून द्यावी लागते. या दृष्टीनेही पालकशिक्षणाची व्यवस्था शाळा, महाविद्यालये आणि पालक-शिक्षक संघटना यांच्यामार्फत करण्यात येते. यांशिवाय सुरक्षा कार्यक्रम, अध्यापक-प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्त्या देणे, मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था, आरोग्यतपासणी आणि उपचार तसेच सुटीतील शिबीरे यांसारखे कार्यक्रमही पालकशिक्षण संघटनेतर्फे आयोजित केले जातात.

ठिकठिकाणच्या पालकशिक्षण संघटनांतून राष्ट्रीय संघटना स्थापण्याच्या प्रयत्नामुळे या संघटनांतून सत्ता-गट निर्माण होतो की काय, या भीतीने १९५० च्या सुमारास अमेरिकेत या संघटनांविषयी सर्वसामान्य पालकांची सहानुभूती कमी झाली. प्रत्येक शाळेचा शिक्षक-पालक संघ स्वतंत्र असावा वा स्थानिक परिस्थितीप्रमाणे त्याने कार्य करावे, हा विचार नंतर पुढे आला.

बालकाचे अभ्यासातील यश आणि कुटुंबातील वातावरण यांत निकटचा परस्परसंबंध असतो, हे मत इंग्लंडमधील प्लाउडन समितीने मांडले आहे.

गोगटे, श्री.ब. मराठे, रा.म.