बिधानचंद्र कृषि विश्वविद्यालय : पश्चिम बंगालमधील कृषी विद्यापीठ. कृषी, पशुसंवर्धन आणि त्यांच्याशी निगडित अशी इतर विज्ञाने यांतील अभ्यास व संशोधन करण्यासाठी राज्यशासन अधिनियम १९७४ अन्वये हे विद्यापीठ हरिंघाट (पो. मोहनपूर, जि. नडिया) येथे १ सप्टेंबर १९७४ रोजी स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप एकात्मक व निवासी असून त्याच्या अधिकारक्षेत्रात संपूर्ण बंगाल राज्य मोडते. जून-मे हे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून त्यात जून-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मे अशी दोन सत्रे (प्रत्येकी १५ आठवड्यांची) आहेत. द्विसत्रीय पद्धत पदवी परिक्षेपर्यंत असून षण्मासिक परीक्षापद्धती ही पदव्युत्तर परिक्षेसाठी नुकतीच सुरू केलेली आहे.

कृषी व पशुसंवर्धन-पशुविकारविज्ञान ह्या विद्यापीठाच्या दोन प्रमुख विद्याशाखा असून त्यांत अनुक्रमे १० व ९ विषयांचा समावेश आहे. त्यातच ‘दुग्धशाला विज्ञाना’चा अंतर्भाव होतो. वरील विद्याशाखांत संशोधन करून पीएच्.डी. देण्याची विद्यापीठात सोय आहे. विद्यापीठाने अंतर्गत गुणांकन पद्धती आणि पाठनिर्देश पद्धती स्वीकारलेल्या आहेत. सुमारे ५०% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या व शुल्कसवलती देण्यात येतात. संशोधन शिष्यवृत्त्या तसेच शिक्षक प्रशिक्षणासाठी साहाय्य यांचीही विद्यापीठाने तरतूद केली आहे.

पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तीन व पदव्युत्तर परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक अशी विद्यापीठाची चार वसतिगृहे आहेत. विद्यापीठातील विद्याशाखांची स्वतंत्र ग्रंथालये आहेत. ग्रंथालयांत एकूण ७१,०१७ ग्रंथ असून अनेक नियतकालिकेही आहेत. (३१ मार्च १९८०). विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे १.७५ व २.३३ कोटी रु. असून विकासयोजनांखालील उत्पन्न ४९.१७ लक्ष व खर्च ३४.६९ लक्ष रु. आहे. (१९८०-८१). विद्यापीठात सु. १,०३२ विद्यार्थी शिकत होते. (१९७९-८०).

 मिसार, म. व्यं.