सुरक्षितता शिक्षण : शाळा व शिक्षणसंस्था ज्याप्रमाणे मुलांची बौद्घिक तयारी करुन घेतात, त्याचप्रमाणे अपघात कसे टाळावेत व अपघाती प्रसंगांना तोंड कसे द्यावे, याचे शिक्षण देत असतात. प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या सुरक्षितता शिक्षणात स्वतःचे विविध प्रकारचे संरक्षण कसे करावे, हा एक भाग असतो. मॉर्टिमर (१९८५) यांच्या मताप्रमाणे ज्या मानवी, वस्तुरूप, जैविक आणि पर्यावरणविषयक परिवर्तकांचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो, त्यांपासून संरक्षण करण्याचे शिक्षण म्हणजे सुरक्षितता शिक्षण होय. या परिवर्तकांमुळे रोजचे काम, खेळ, मनोरंजन, दळणवळण, घर आणि भोवतालचे वातावरण या सर्वांवर विपरीत परिणाम होतो. तसेच यांचा परिणाम केवळ उत्पादने आणि सेवा यांच्यावरच होत नसून उत्पादनप्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरही होतो.

सुरक्षितता शिक्षण ही संज्ञा व्यापक आहे. आरोग्यापासून संकटकालीन उपाययोजनांपर्यंत अनेक बाबींचा तिच्यात समावेश होतो. सध्या शाळांतून जे सुरक्षितता शिक्षण दिले जाते, त्यामध्ये शारीरिक संरक्षण रस्त्यावरून चालताना व वाहन चालविताना अपघात टाळण्याचे शिक्षण रहदारीचे नियम भूकंप वा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या असताना कसे वागावे यांचे शिक्षण बाँबची भीती असेल, तर काय करावे याचे शिक्षण साथीच्या रोगांपासून कसे संरक्षण करावे याचे शिक्षण मुलांची होणारी फसवणूक, खोटे व अश्लील दूरध्वनी, सडक-सख्याहरींचा मुलींना होणारा त्रास, मुलींचे आरोग्य, एड्स, पाण्यापासून सुरक्षितता, हृदयरोगाचा झटका आणि त्यावरील प्रथमोपचार अशा अनेक विषयांचे शिक्षण दिले जाते. यांतील काही विषयांचा समावेश शालेय अभ्यास-क्रमात केला जातो, तर काही अतिरिक्त विषय म्हणून शिकविले जातात. ज्यांचा नेहमीच्या शिक्षणात समावेश असतो, त्यांमध्ये रहदारीतील सुरक्षितता, प्रथमोपचार, आगीपासून संरक्षण, नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग इत्यादींचे शिक्षण दिले जाते. बहुधा नेहमीच्या शिक्षकांकडूनच त्यांचे अध्यापन होते. विशेष बाबी तज्ज्ञांकडून शिकविल्या जातात.

शाळेतील सुरक्षितता शिक्षणात ज्या गोष्टी चटकन अंमलात आणण्याजोग्या असतात, त्यांचे शिक्षण दिले जाते. त्यांचे स्वरुप प्रतिबंधात्मक असते आणि जेथे ताबडतोब उपाययोजना करणे जरुर असते, अशा गोष्टी शाळेच्या नेहमीच्या वेळात शिकविल्या जातात. त्यासाठी चित्रे, नकाशे, तक्ते, स्पृपपट्ट (स्लाईड्स), चित्रपट, पथनाटये आणि व्याख्याने व चर्चा या पद्घती वापरतात. काही शाळांतून आरोग्य आणि शारीरिक शिक्षणात सुरक्षिततेच्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. एन्‌सीआर्‌टी या संस्थेने शालेय शिक्षणाचा जो राष्ट्रीय अभ्यासक्रम २००० मध्ये तयार केला, त्यात ह्या विषयाचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमात स्पष्टपणे असे म्हटले आहे की, मुलांना पोषण, आरोग्य आणि स्वच्छता यांबाबत योग्य माहिती मिळावी त्यांच्यामध्ये योग्य जाण निर्माण व्हावी आणि त्याबाबतच्या शास्त्रीय कृती माहिती व्हाव्यात, हे लक्षात घेऊन शास्त्र, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे विषय शिकवावेत. यामुळे केवळ मुलांचाच नव्हे, तर त्यांचे कुटुंब आणि समाज यांचाही फायदा होईल. शालेय अभ्यासक्रमात इतर कार्यक्रमात बालवीर चळवळ, राष्ट्रीय छात्रसेना आणि रेडक्रॉस या कार्यक्रमांचाही पुरस्कार केला आहे. त्यामुळे मुलांमध्ये सहकार्य, सोशिकता, धैर्य, निर्णयशक्ती, इतरांबद्दलचा आदर, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि इतरांबाबतची कणव या गुणांचा विकास होतो. या अभ्यासक्रमात असेही सूचित करण्यात आले आहे की, शालेय शिक्षणामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या प्रश्नांची, सुरक्षिततेच्या अपायांची, पोषणविषयक प्रश्नांची, भेसळीची, प्रथमोपचाराची आणि स्वच्छतेची जाण वाढावी. शाळेच्या वरच्या वर्गात, विशेषतः कनिष्ठ महाविद्यालयात, मुलांना आरोग्यविषयक प्रश्नांची अधिक सखोल जाणीव व्हावी, तसेच त्यांना अन्न, पाणी आणि हवा यांच्या प्रदूषणाची, लोकसंख्यावाढीच्या प्रश्नांची आणि एड्स या भयानक रोगाची जाणीव व्हावी. मुलींना या काळात प्रथमोपचार, घरच्या घरी दाईकाम आणि सुरक्षितता या उपायांची माहिती व्हावी. या अभ्यासक्रमावरून असे दिसते की, शालेय वयाच्या सर्व मुलांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे सुरक्षितता शिक्षण मिळावे, अशी नव्या अभ्यासक्रमात सोय आहे.

शाळांव्यतिरिक्त नॅशनल ऑइल कार्पोरेशन आणि मॅकडोनल्ड यांसारख्या संस्था शासकीय खात्यांच्या मदतीने आग आणि वाहतूक सुरक्षितता यांच्या बाबतीत माहिती देणारी पत्रके प्रसृत करतात. या पत्रकांतील माहिती संक्षिप्त असते, शिवाय त्यात केवळ उदाहरणे असतात. या पत्रकांतून दिलेल्या माहितीत आगीपासून संरक्षण कसे करावे, आणीबाणीचे समयी कसे वागावे, कपड्यांना आग लागली असता होणाऱ्या जखमांवर प्रथमोपचार कसे करावेत, फटाके उडवताना कोणती काळजी घ्यावी, घरात आग लागली असता काय करावे ही माहिती असते. मुलांनी ही माहिती वाचावी, त्यांना त्यात गोडी वाटावी या दृष्टीने या पुस्तिकांतून प्रश्न कोडी असतात. या संस्था शाळाशाळांतून वा आंतरशालेय चढाओढी आयोजित करून मुलांपर्यंत माहिती योग्य प्रकारे पोहोचली की नाही, याची खात्री करुन घेतात. या चढाओढीत प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलांना पारितोषिके देण्यात येतात. सुरक्षितता शिक्षणात प्रसारमाध्यमेही महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रसारमाध्यमे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचा परिणाम चांगला होतो.

रस्ता ओलांडताना कोणती काळजी घ्यावी, रस्त्याने सायकल चालविताना कोणती काळजी घ्यावी, मोटारीने प्रवास करताना सुरक्षापट्टे वापरणे का जरुरीचे असते, ही उदाहरणे पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत केलेली असतात. औद्योगिक संस्था, खाण-व्यवस्थापन अशा प्रकारच्या संस्था आपल्या कामगारांनी कोणती काळजी घ्यावी, इजा न होता कसे काम करावे, यांबद्दल कामगारांना सुरक्षितताविषयक शिक्षण देतात. सुरक्षितता शिक्षणाचा व्याप आता वाढत आहे. राज्य परिवहन मंडळ, रेल्वे, विमानसंस्था आपल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या शिक्षणाची विविध प्रकारे सोय करतात. भोवतालच्या वातावरणात वरचेवर जे आघात-अपघात होतात, त्यांनाही योग्य तऱ्हेने तोंड कसे द्यावे, याचे शिक्षण सर्वसामान्य जनतेलाही द्यावे लागते. घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी, विजेची उपकरणे सुरक्षितपणे कशी हाताळावीत, ही त्याची काही उदाहरणे. प्रगत देशात मुले-मुली मोकळेपणाने मिसळत असल्याने पौगंडावस्थेतील मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाद्वारे सुरक्षितता शिक्षण द्यावे लागते.

बावणे, ज्योती