मणिपूर विद्यापीठ : मणिपूर राज्यातील एक विद्यापीठ, मणिपूर विद्यापीठ अधिनियम १९८० (मणिपूर अधिनियम ८) अन्वये हे विद्यापीठ ५ जून १९८० रोजी इंफाळ येथे स्थापन झाले. विद्यापीठाचे कार्यालय इंफाळपासून ८ किमी. वर असलेल्या इतिहासप्रसिद्ध कांचीपुर येथे आहे.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे पदव्युत्तर केंद्र मणिपूर येथे होते. १ एप्रिल १९८१ रोजी वरील केंद्राचे मणिपूर विद्यापीठात विलीनीकरण करण्यात आले. हा मणिपूर राज्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि संस्मरणीय दिवस मानला जातो. विद्यापीठाचे क्षेत्र मणिपूर राज्यभर विखुरलेले असून कांचीपुर येथील विद्यापीठ – परिसर मनोवेधक आहे.

विद्यापीठाचे स्वरूप सांघिक, संलग्‍नक व अध्यापनात्मक आहे. विद्यापीठास २८ महाविद्यालये संलग्‍न असून त्यांत १० पदव्युत्तर विभाग आहेत. विद्यापीठात कृषी, पुरातत्त्वविद्या, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र, इतिहास, गृहशास्त्र, गणित, वैद्यक, तत्त्वज्ञान, भौतिकी, राज्यशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र तसेच इंग्रजी, मणिपुरी व हिंदी भाषा – साहित्य यांच्या विद्याशाखा आहेत.

विद्यापीठांचे ग्रंथालय समृद्ध असून ३०,००० ग्रंथ व ४०० ज्ञानपत्रिका आहेत (१९८२). याच वर्षी विद्यापीठात सु. ११,००० विद्यार्थी शिकत होते. हे विद्यापीठ नव्याने स्थापन झाले असल्याने त्याचा हळूहळू विकास होत आहे.

मिसार, म. व्यं.