पत्रद्वारा शिक्षण: संपूर्णतः किंवा अंशतः पत्रव्यवहाराने शिक्षण देण्याची पद्धती. व्यक्तीला आपल्या व्यावसायिक, सांस्कृतिक वा शैक्षणिक गरजांनुसार शिकता यावे, म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. शाळा, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्था अशा प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था करतात. या शिक्षणपद्धतीचा उपयोग प्रौढ व्यक्ती, महिला, विशेषतः पडदा पाळणाऱ्या स्त्रिया, कामगार त्याचप्रमाणे भौगोलिक दृष्ट्या विखुरलेल्या लोकसंख्येच्या गटांतील लोक यांना विशेष प्रकारे होतो.

शैक्षणिक विस्तार वर्ग आणि स्वाध्याय यांपेक्षा पत्रद्वारा शिक्षण वेगळे असते. लेखी व छापील साहित्य, चित्रे व रेखाकृती इत्यादींचा उपयोग पत्रद्वारा शिक्षणपद्धतीत करण्यात येतो. हे या पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे. पत्रद्वारा शिक्षणात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत नाही किंवा कोणत्याही विद्यालयात जात नाही पण ही उणीव शाळा किंवा संस्था विद्यार्थ्यांशी  अभ्यासविषयक कागदपत्रांची सतत देवाणघेवाण करून भरून काढते.

या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी शाळेत न जाता आपल्या घरीच व आपल्या इच्छेनुरूप शिक्षण घेत असतो. ज्या संस्थेत तो नाव नोंदवितो, त्या संस्थेतर्फे त्याला क्रमिक पुस्तके, त्यांवरील पश्नपत्रिका , प्रात्यक्षिक कामासंबंधी मार्गदर्शक सूचना, स्पष्टीकरणात्मक सूचना, आलेख, छोटे नकाशे इ. आवश्यक साहित्य टपालाने पुरविले जाते. हे सर्व साहित्य तज्ञ शिक्षकांकडून शैक्षणिक तत्त्वांनुसार तयार करून घेतलेले असते . सोबत परीक्षेचे प्रश्नही असतात. वर्षाचा अभ्यासक्रम आठवड्यानुसार वा इतर सोयीच्या कालावधीनुसार विभागलेला असतो.

हा विभागलेला अभ्यासक्रम व त्यातील प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक समजावून सांगण्यात येतो. अपेक्षित प्रश्नांनुसार पाठसाहित्य तयार करण्यात येते. विद्यार्थ्यातील विषय ग्रहण करण्याची पात्रता व अभ्यास करण्याची क्षमताही लक्षात घेऊन त्यांना योग्य ते साहाय्य करण्यात येते व त्यानुसार त्यांना अभ्यास करावयास सांगण्यात येते. वारंवार परीक्षा  घेण्यात येतात. आवश्यकतेनुसार अभ्यासामध्ये मदत मागण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. बहुतेक शाळा आणि शैक्षणिक संस्था विद्यार्थांना उत्साहवर्धक पत्रे लिहून आणि त्यांच्या लिखाणावर उत्साहवर्धक शेरे देऊन त्यांना उत्तेजन देतात. काही संख्या पुढील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांस विद्यावेतन देतात आणि काम मिळविण्यासही मदत करतात. प्रगत पश्चिमी देशांत दूरध्वनी, नभोवाणी, दूरचित्रवाणी इ. साधनांचाही उपयोग शैक्षणिक सूचना देण्याच्या दृष्टीने करण्यात येतो. काही अभ्यासक्रमांत आवश्यक उपकरणे तसेच प्रयोगासाठी आवश्यक असणारी साधनेही पुरविली जातात. विद्यार्थ्यांनी आठवड्याचा किंवा ठरलेल्या सोयीच्या कालावधीचा अभ्यास पुरा करून, त्यांवरील प्रश्न सोडवून ते शिक्षणकेंद्राकडे टपालाने पाठवावयाचे असतात. तेथील शिक्षक ते लागलीच तपासून त्यांसबंधीच्या आपल्या सूचनांसह ते परत पाठवितात. अशा प्रकारे वर्षाचा अभ्यास पूरा झाला, म्हणचे विद्यार्थांनी वार्षिक परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरेही लिहून पाठवावयाची असतात. त्यांची उत्तरे समाधानकारक असली म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला, असे समजले जाते.

ही शिक्षणपद्धती अनेक कारणांसाठी उपयुक्त व फायदेशीर ठरते. शिक्षणकेंद्रापासून फार दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय या शिक्षणपद्धतीमुळे होऊ शकते. विद्यालयात आणि महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची  सोय या पद्धतीमुळे होऊ शकते. जागा, शिक्षणसाहित्य, वेळापत्रकांची बंधने इ. अडचणी नसल्यामुळे पत्रद्वारा शिक्षण देणाऱ्या संस्थांना विविध अभ्यासक्रमांची सोय करता येते. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येतात व आपल्या कुवतीप्रमाणे व सवडीनुसार आपला अभ्यासक्रम पुरा करता येतो. पत्रद्वारा शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या संख्येवर बंधन नसल्यामुळे एखाद्या अभ्यासक्रमाकरिता जितके विद्यार्थी नोंदविले जातील, तितका त्यांच्या शिक्षणावरील खर्च विभागला जाऊन एकूण पैशांत काटकसर होते, असे या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

या शिक्षणपद्धतीत काही उणिवाही दिसून येतात. शिक्षकांच्या प्रत्यक्ष सहवासाच्या अभावामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप विद्यार्थ्यांवर पडू शकत नाही. नित्याच्या विद्यालयातून होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, सांघिक स्पर्धा इत्यादींना मुकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास पुरेसा होत नाही, समृद्ध ग्रंथालयाचा उपयोग करता येत नाही, अभ्यासावर प्रत्यक्ष देखरेख नसल्यामुळे अभ्यास करण्याबाबत वा वार्षिक परीक्षेच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून लबाड्या होण्याची शक्यता असते. या काही उणिवांपेक्षा या पद्धतींचे फायदे अधिक असल्यामुळे या पद्धतीचा अवलंब करण्याची प्रवृत्ती जगात वाढत्या प्रमाणावर दिसून येते.

औद्योगिक व व्यापारी संस्था आपल्या विषयांचे व कार्यक्रमांचे शिक्षण देण्याकरिता या शिक्षणपद्धतीचा उपयोग करतात. सरकारी संख्या, सैनिकी संघटना, कामगार व इतर संस्था आपल्या सभासदांची पात्रता व दर्जा वाढविण्याकरिता याच पद्धतीचा अवलंब करतात. विकसनशील राष्ट्रांनाही आपल्या नागरिकांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने या पद्धतीचा उपयोग होत आहे. अपंग व एकाकी जीवन जगणारे लोकही या पद्धतीचा उपयोग करून घेऊ शकतात. पाश्चात्त्य देशांत बहुतेक सर्व प्रकारचे शिक्षण पत्रद्वारा देण्याची व्यवस्था आहे.

इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क, जर्मनी इ. यूरोपीय राष्ट्रे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट रशिया, ऑस्ट्रेलिया इ. मोठे देश, आफ्रिका  खंडातील देश व आशिया खंडातील जपानसारखे देश या शिक्षणपद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करीत आहेत. आधुनिक अर्थाने या शिक्षणपद्धतीचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिका या देशांत झाला. औद्योगिक क्रांतीबरोबर या शिक्षणपद्धतीची गरज निर्माण झालेली होतीच. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वस्त मुद्रण व टपालसेवा यांमुळेच ही पद्धत अंमलात आणणे शक्य झाले. पश्चिमी प्रबोधन व धर्मसुधारणा या आंदोलनामुळे शिक्षणाबद्दल नवा उत्साह निर्माण झाला. पुस्तके, वर्तमानपत्रे, वाचनालये, वाचनकेंद्रे, चर्चामंडळे व विज्ञानोपासक गट यांची वाढ झाली. शाळा किंवा विद्यापीठ यात जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा औद्योगिक व शहरी जीवनाला अधिक शिक्षित कामगारांची आवश्यकता भासू लागली व पत्रद्वारा शिक्षण हे सर्वसाधारण माणसाचे शिक्षण घेण्याचे साधन बनले. १८४० साली लघुलिपीचा जनक पिटमन इझाक याने आपल्या विद्यार्थ्यांना बायबलमधील उतारे पोस्टकार्डावर लघुलिपीत लिहून आपल्याकडे पाठविण्यास सांगितले. पत्रद्वारा शिक्षणाचा आरंभ येथूनच झाला असावा, असे समजण्यात येते. १८५६ मध्ये फ्रान्सचे शार्ल तूसे व जर्मनीचे गुस्टाफ लँगेनशाइट यांनी बर्लिन येते आधुनिक भाषांचे पत्रद्वारा शिक्षण देण्याकरिता एक शाळा स्थापन केली. महिला विद्यार्थी व त्यांना शिक्षण देणारे शिक्षक यांचा प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे इंग्लंडमध्ये जी टीका होत असे, ती टाळण्याकरिता १८६० साली केंब्रिज विद्यापीठात चर्चा व परीक्षेकरिता या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. १८८० मध्ये एडिंबरो येथील महाविद्यालयामध्ये नागरी सेवा व व्यवसाय अभ्यास यांचे शिक्षण पत्रद्वारा देण्यास सुरुवात झाली.


अमेरिकेत विस्तारकेंद्रातील व्याख्याने व उन्हाळी वर्गातील अभ्यास यांचा पाठपुरावा हिवाळ्यात करता यावा, या गरजेतून पत्रद्वारा शिक्षणाचा आरंभ झाला. १८७३ साली बोस्टन येथे अशा प्रकारचे शिक्षण देण्यास प्रोत्साहन देणारी संख्या स्थापन करण्यात आली. १८८२ मध्ये डॉ. विल्यम रेनी हार्पर यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर हिब्रू भाषेचे शिक्षण पत्रद्वारा देण्यास सुरुवात केली. १८९१ साली ते शिकागो विद्यापीठाचे अध्यक्ष झाले. तेथे त्यांनी पत्रद्वारा शिक्षण देण्याचा स्वतंत्र विभाग स्थापन केला. हळूहळू इतर विद्यापीठांनीही त्यांचे अनुकरणच केले. पहिल्या महायुद्धानंतर तर अमेरिकन सरकारने लष्करातील व त्यातून बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी पत्रद्वारा शिक्षण देण्याची व्यवस्था केली. युसाफिया सरकारी संस्थेने तर लक्षावधी सैनिकांना पत्रद्वारा शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या संस्थेच्या शाखा जगभर आहेत व त्यांच्या अभ्यासक्रमांना विद्यापीठांची मान्यताही असते. पत्रद्वारा शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्थाची संख्याही वाढत गेली. त्यांच्यावर नियंत्रण रहावे व फसवणुकीच्या व्यवहारास आळा बसावा, म्हणून अमेरिकेमध्ये १९२६ साली नॅशनल होम स्टडी कौन्सिल ही संस्था स्थापन करण्यात आली.

विखुरलेली वस्ती असलेल्या ऑस्ट्रेलियात १९१४ पासून या शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यात आला. शिक्षणातील प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेण्याकरिता प्रयोगशाळेतील साहित्य मोठ्या मोटरीतून तेथील दूरदूरच्या वस्त्यांतून नेण्यात येते. कॅनडातही विरळ वस्ती असल्यामुळे हजारो विद्यार्थांना पत्रद्वारा शिक्षणपद्धतीवरच सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. न्यूझीलंडमध्ये तांत्रिक शिक्षण पत्रद्वारा देण्याचे विद्यालय सरकारी शिक्षण खात्यामार्फत चालविले जाते व विद्यार्थ्यांकरिता खास क्रमिक पुस्तकेही तयार करण्यात येतात. या देशातील एक वैशिष्ट्य म्हणजे स्वाध्याय किंवा वार्षिक परीक्षेचे प्रश्न या बाबतीत “मी कोणतीही लबाडी करणार नाही,” असे लेखी आश्वासन विद्यार्थ्यांना द्यावे लागते. रशियामध्ये द युनियन क़ॉरिस्पाँडन्स पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ही पत्रद्वारा तांत्रिक शिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे. तेथे विद्यापीठे व खास संस्थाही पत्रद्वारे शिक्षण देतात. रशियातील पत्रद्वारा शिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे  विद्यार्थ्यांना सल्ला देणारी केंद्रे आहेत. पत्रद्वारा  शिक्षण देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जवळच्या सल्ला-केंद्रावर जाऊन तेथील तज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावेच लागते. प्रत्येक ६० विद्यार्थ्यांकरिता एक या प्रमाणात ही केंद्रे आहेत व प्रत्येक केंद्राकरिता एक या प्रमाणात शिक्षक असतात. पत्रद्वारा शिक्षणपद्धतीने रशियामध्ये पदवी मिळविता येते. भारतात हा उपक्रम काही खाजगी ब्रिटिश संस्थांनी सुरू केला. स्वातंत्र्याप्राप्तीनंतर बऱ्याच वर्षांनी विद्यापीठाचे लक्ष या उपक्रमाकडे वेधले गेले. प्रौढ शिक्षणासाठी बहिःशाल किंवा विस्तार सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठाने याचा स्वीकार केला. १९६१ साली केंद्र सरकारने डॉ. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या पद्धतीची शिफारस केली. त्याच वर्षी दिल्ली विद्यापीठाचा कायदा लोकसभेने दुरुस्त केला व विद्यापीठाला पत्रद्वारा शिक्षणक्रम सर्व देशाकरिता सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून दिला मुंबई व राजस्थान विद्यापीठांनी पत्रद्वारा शिक्षणपद्धती स्वीकारली आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्वतंत्र संचालनालयामार्फत मानव्यविद्या, वाणिज्य या शाखांचे अभ्यासक्रम सुरू आहेत. राजस्थान विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम पत्रद्वारा पार पाडता येतो. भोपाळची रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ही संस्था बी.एड्.चा अभ्यासक्रम पुरा करून घेते. पुणे येथील राज्यशिक्षणशास्त्र संस्थेने शिक्षकांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. खाजगी संस्थांमध्ये द ब्रिटिश इन्स्टिट्यूट ही सर्वांत मोठी पत्रद्वारा शिक्षणसंस्था मुंबईतच आहे.  इंटरनॅशनल कॉरिस्पाँडन्स स्कूल हेही मुंबईतच आहे. नागपूर येथे सेंट्रल स्कूल ऑफ कॉरिस्पाँडन्स व मद्रास येथे हिंदुस्थान एंजिनिअरिंग ट्रेनिंग सेंटर या संस्थाही पत्रद्वारा शिक्षण देतात. पंजाबी विद्यापीठातही पत्रद्वारा शिक्षणपद्धती अवलंबविली आहे. उच्च व कनिष्ठ स्तरांवरील अभियांत्रिकी व तंत्रविज्ञान यांच्या अभ्यासक्रमाबरोबर व्यक्तिमत्व समृद्ध करणारे सांस्कृतिक अभ्यासक्रमही त्यांनी आखलेले आहेत. अशा तऱ्हेने भारतातील पत्रद्वारा शिक्षणपद्धतीचा विकास हळूहळू होत आहे.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा व अमेरिका या देशांत पत्रद्वारा शिक्षणपद्धतीचा एक खास प्रकार आहे, त्यास पर्यवेक्षित पत्रद्वारा शिक्षण असे संबोधिले जाते. या पद्धतीत शिक्षक किंवा पर्यवेक्षक शाळा व विद्यार्थी यांमध्ये संपर्क साधणारा दुवा असतो. पर्यवेक्षक सर्व विषय शिकविण्याच्या योग्यतेचा असतोच असे नाही. तो फक्त अभ्यासाची सामग्री मिळवितो, तिची विभागणी करतो, परीक्षेवर देखरेख ठेवतो, सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे देतो आणि विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे वागावयास लावतो. या पद्धतीमुळे प्रौढांना व नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्कळ फायदा होतो.

विकसनशील देशांत पाठ्यक्रमाचे साहित्य आणि त्यांचे स्थानिक भाषेतून भाषांतर करण्यास आर्थिक अडचण जाणवते. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने नायजेरिया, केन्या, मालावी, झँबिया व व्हेनेझुएला या देशांत पत्रद्वारा अभ्यासक्रम स्थापन करण्यास मदत केली आहे. दक्षिण आफ्रिका विद्यापीठाने या अभ्यासक्रमात खास वैशिष्ट्य प्राप्त केले आहे. जमेकामध्ये नियमित शैक्षणिक कार्यक्रमाऐवजी पत्रद्वारा शैक्षणिक कार्यक्रम अवलंबिला जातो. ग्रामीण शाळांना शिक्षकांचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने मेक्सिको या पद्धतीचा उपयोग करून घेत आहे.

या शिक्षणपद्धतीची गुणवत्ता व विश्वासार्हता यांबद्दल शिक्षणतज्ञांना सतत चिंता जाणवते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे व रशिया या देशांत पत्रद्वारा शिक्षणाचा समावेश कमीअधिक प्रमाणात सर्वसाधारण शिक्षण पद्धतीतच करण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या बाहेरच या पद्धतीचा विकास झाला. असोसिएशन ऑफ ब्रिटिश कॉरिस्पाँडन्स कॉलेजेस व कॉरिस्पाँडन्स कॉलेजेस स्टँडर्ड असोसिएशन या संस्था इंग्लंडमधील पत्रद्वारा शिक्षणपद्धतीचा समन्वत व नियमन करण्याचा प्रयत्न करतात.

यूरोपियन कौन्सिल फॉर एज्युकेशन बाय कॉरिस्पाँडन्स ही संस्था १९६२ साली नेदर्लंड्समध्ये लेडन येथे स्थापन करण्यात आली. ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, इंग्लंड, फिनलंड, फ्रान्स, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी, इटली, नेदर्लंड्स, नॉर्वे, स्पेन, स्वीडन व स्वीत्झर्लंड या देशांतील प्रमुख शालेय संस्था तीत समाविष्ट आहेत. या संस्थेतर्फे अभ्यासाचा दर्जा चांगला ठेवण्याचा व पत्रद्वारा शिक्षणपद्धती विकसित करण्याचा परिणामकारक प्रयत्न होतो. अनेक देशांनाही या पद्धतीबद्दल काळजी वाटत असल्यामुळे कॅनडामधील व्हिक्टोरिया या गावी १९३८ साली एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आली. प्रत्येक चार वर्षांनी या संस्थेचे निरनिराळ्या देशांत अधिवेशन भरविण्यात येते. पत्रद्वारा शिक्षणाबद्दल लोकांना माहिती देणे, सर्व राष्ट्रांतील पत्रद्वारा शिक्षण देणाऱ्यांमध्ये मैत्री व समन्वय निर्माण करणे, प्रदर्शने, अधिवेशन व अहवाल यांद्वारा विचारांची व माहितीची देवाणघेवाण करणे, हे  या संघटनेचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर दूरचित्रवाणी व विमानटपाल यांमुळे पत्रद्वारा शिक्षणाचा आणखी विकास होऊन त्याचे क्षेत्रही वाढले आहे. उपग्रहांद्वारे शिक्षण देण्याचीही सोय उपलब्ध होत आहे.

संदर्भ : 1. Brubacher, J.S. History of  the Problems of  Education, New York, 1947.

   2. Carmer, J. F. Browne, G.S. Contemporary Education, New York, 1956.

   3. Good, H. G. A History of Western Education, Collier-Mac., 1962.

   4. Government of India, Report of the Education Commission, New Delhi, 1964–66.

पाटणकर, ना. वि. अकोलकर, ग. वि. खोडवे, अच्युत