कलकत्ता विद्यापीठ : ब्रिटिशकालीन भारतातील पहिल्या तीन विद्यापीठांपैकी एक. स्थापना कलकत्ता येथे २४ जानेवारी १८५७. १९५१ च्या कलकत्ता विद्यापीठीय कायद्यानुसार त्याच्या संविधानात तसेच इतर बाबतींत अनेक फेरबदल करण्यात आले. उत्तर हिंदुस्थानातील सर्व महाविद्यालये १८८७ पूर्वी ह्या विद्यापीठाच्या कक्षेत येत असत. सध्या विश्वभारती, जादवपूर, बरद्वान, कल्याणी आणि नॉर्थ बेंगॉल या विद्यापीठांचे क्षेत्र वगळता प. बंगाल व त्रिपुरा या राज्यांतील सर्व भाग ह्याच्या कक्षेत येतो. त्यात एकूण २०६ महाविद्यालये आहेत. त्यांपैकी ६ विद्यापीठीय महाविद्यालये वगळता, उरलेली सर्व संलग्न महाविद्यालये आहेत. ह्यांशिवाय विविध विषयांच्या ५२ शाखोपशाखा विद्यापीठात असून, इतर ५ शैक्षणिक संस्थांनाही विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापन व संलग्न महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवणे हे आहे. १९१७ पासून विद्यापीठीय महाविद्यालयांत पदव्युत्तर परीक्षा व संशोधन यांची व्यवस्था करण्यात आली मात्र तीच व्यवस्था संलग्न महाविद्यालयांत १९५४ नंतर झाली. सध्या येथे मानव्यविद्या, विज्ञान व तंत्र, ललितकला, कृषिविज्ञान, वैद्यक इ. विविध विषयांचे विभाग आणि शाखोपशाखा आहेत. सर्व विषयांचे माध्यम अद्यापि इंग्रजीच आहे.

कलकत्ता विद्यापीठीय कायद्यानुसार १९५१ मध्ये विद्यापीठाचे अधिसभा, कार्यकारिणी, आर्थिक समिती, विद्यापरिषद आणि इतर शाखा मिळून शासकीय मंडळ झाले आहे. मात्र अधिसभा ही नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. कार्यकारिणी आणि विद्यापरिषद सर्व धोरणांची प्रत्यक्ष कार्यवाही करतात, तर आर्थिक समिती अर्थविषयक धोरणांची अंमलबजावणी करते. कुलपती हा पदसिद्ध अधिकारी असून वेतनधारी कुलगुरू व कुलसचिव हेच प्रत्यक्षात सर्व प्रशासनाचे प्रत्यक्ष कार्यकारी आहेत.

विद्यापीठाचे ग्रंथालय जुने आहे. त्यात सु. ३,७७,०५५ ग्रंथ (१९७२) आणि बंगाली, तिबेटी व संस्कृत भाषांतील दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. अलीकडे ग्रंथालयात सूक्ष्मपटवाचनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाचे आशुतोष कलावस्तुसंग्रहालय आणि मानवशास्त्रीय वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. १९७०-७१ साली २,४३,७७० विद्यार्थी शिकत होते. त्यांपैकी ६५,५९४ विद्यार्थिनी होत्या. विद्यापीठाचे १९७१-७२ मध्ये २,५५,८६,३५० रु. उत्पन्न व ३,०३,२०,८२९ रु. खर्च होता.

देशपांडे, सु.र.