रांची विद्यापीठ : बिहार राज्यातील एक विद्यापीठ. रांची येथे १२ जुलै १९६० राजी स्थापना. छोटा नागपूर विभागातील रांची, हजारीबाग, गीरीदीह, पालामाऊ, सिंगभूम आणि धनबाद हे जिल्हे या विद्यापीठाच्या कक्षेत मोडतात.

विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून त्यात ७८ महाविद्यालये व २० पदव्युत्तर विभाग आहेत. जून–मे हे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र, वैद्यक, विधी इ. विद्याशाखा या विद्यापीठात आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत विद्यापीठ विभागावर किंवा आंतरविभागीय स्तरावर चर्चासत्रे आयोजित करते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी अंतर्गत गुणांकन (३० %), शिष्यवृत्त्या, रोजगार माहिती व मार्गदर्शन संचालनालय, आरोग्यकेंद्र, वसतिगृहे तसेच बहिःस्थ परीक्षा (बी. ए., बी. कॉम्., एम. ए., एम्. एस्सी.), सायंकालीन महाविद्यालये इ. सोयी विद्यापीठात उपलब्ध आहेत. वैद्यक आणि सामाजिक मानसशास्त्र हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम, प्रत्येक पदव्युत्तर विभागाची स्वतंत्र ग्रंथालये इ. वैशिष्ट्ये आढळतात.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात (स्था. १९६३) ६५,००० ग्रंथ ( १९८७-८८ ) व ५,४२५ नियतकालिके असून विद्यापीठात ६६,२९६ विद्यार्थी व २,००० अध्यापक होते. विद्यापीठाचे उत्पन्न सु. ७.७८ कोटी रु. व खर्च ९.७२ कोटी रु. होता. (१९८५-८६ ).

मिसार, म. व्यं.