स्वामीरामानंदतीर्थमराठवाडाविद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून १७ सप्टेंबर १९९४ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. हैदराबाद मुक्ती संग्रामातील नेते, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्यगौरवार्थ त्यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्न आणि अध्यापनात्मक आहे. याचे कार्यक्षेत्र हिंगोली, लातूर, नांदेड व परभणी या चार जिल्ह्यांत विस्तारलेले असून ३८५ महाविद्यालये त्यास संलग्न आहेत. रसायनशास्त्र, वाणिज्य व व्यवसाय प्रबंधन, भूविज्ञान, जीवविज्ञान, गणित व संगणक विज्ञान, शारीरिक शिक्षण आणि सामाजिक विज्ञान या विषयांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या १३ विद्याशाखा विद्यापीठात कार्यरत आहेत. विविध विषयांच्या पदवी, पदव्युत्तर पदवी, एम्.फिल., पीएच्.डी. या अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची व मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध आहे. विद्यापीठात सामाजिक शास्त्र संकुल कार्यरत असून महिला अध्ययन केंद्राची येथे स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे महिला सक्षमीकरण आणि महिला कल्याण यांसंदर्भातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाते. सामाजिक अध्ययन आणि संशोधन यांसाठी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आहे. विद्यापीठाने आदिवासी जमातींच्या जीवन आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी किनवट (जि. नांदेड) येथे आदिवासी संशोधन केंद्र स्थापण्याचा प्रस्ताव केला आहे. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र असून येथून जगभरातील विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करतात. विद्यापीठांतर्गत ३२ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठाने ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे, तसेच ‘आव्हान’ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून विद्यापीठाचे लातूर येथे एक विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

भटकर, जगतानंद